दिल्लीच्या जनतेने शिकवला केजरीवाल यांना धडा

0
127

दिल्लीचे वार्तापत्र
चुकांपासून बोध घेत जो आपल्यात सुधारणा करतो, त्याला भाजपा म्हणतात आणि जो चुकांपासून कोणताही बोध न घेता चुकांवर चुका करत जातो, त्याला केजरीवाल म्हणतात. मराठीत ‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी एक म्हण ती केजरीवाल यांच्यासाठीच आहे, असे वाटते.
दिल्लीतील तीन महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले आहे. भाजपाने या निवडणुकांतही स्पष्ट आणि निर्विवाद बहुमत मिळवले आहे. आम आदमी पार्टी दुसर्‍या तर कॉंग्रेस तिसर्‍या स्थानावर आहे. भाजपाला महापालिका निवडणुकांत स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे संकेत मतदानपूर्व आणि मतदानोत्तर सर्वेक्षणात मिळाले होते. दिल्ली महापालिका निवडणूक निकालाचे राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
महाराष्ट्र आणि ओडिशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर तसेच उत्तरप्रदेशसह पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्‍वभूमीवर दिल्ली महापालिकेतही भाजपाला दणदणीत असे यश मिळाले आहे. हा मोदी लाटेचा परिणाम म्हणावा लागेल. दिल्ली महापालिकेत भाजपाला मिळालेला विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी धोरणांवर तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवडणुकीच्या सूक्ष्म व्यवस्थापनावर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिल्लीतील सातही जागा जिंकत इतिहास घडवला होता, मात्र त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला होता. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. भाजपाला फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले होते. महापालिका निवडणुकांत दणदणीत बहुमत मिळवून भाजपाने विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेत आम आदमी पार्टीला त्याची जागा दाखवून दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील मतदारांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त केला होता, पण दिल्लीतील मतदारांच्या या विश्‍वासाला केजरीवाल खरे उतरले नाही. दिल्लीतील लोकांच्या केजरीवाल यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षांची पूर्तता केजरीवाल करू शकले नाही. जे विषय दिल्ली सरकारच्या थेट अखत्यारीत होते, त्या ठिकाणी काम करून लोकांना रिझल्ट देण्यापेक्षा केजरीवाल यांनी आपली पूर्ण ताकद जे विषय दिल्ली शासनाच्या अखत्यारीत नव्हते आणि जे विषय कितीही प्रयत्न केले तरी ते मिळणे शक्य नव्हते, ते मिळवण्यासाठी लावली होती.
केजरीवाल यांची ही कृती म्हणजे ‘हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्या’सारखी होती. सर्वसामान्य माणसासाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते आणि पथदिवे यासारख्या क्षेत्रात केजरीवाल यांच्याकडे करण्यासारखे खूप काही होते. पण ते न करता केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर कारण नसताना हल्ला चढवण्यात धन्यता मानत होते. दिल्लीच्या जनतेने एक चांगली संधी केजरीवाल यांना दिली होती, पण त्याचे सोने करण्यापेक्षा केजरीवाल यांनी त्याची माती केली. त्यामुळेच दिल्लीच्या जनतेने केजरीवाल यांना आणि त्यांच्या पक्षाला धडा शिकवला आहे. पण यामुळे केजरीवाल यांचे डोळे उघडण्याची कोणतीच शक्यता नाही. कारण केजरीवाल यांचे नेतृत्व आहे त्यात समाधान मानण्यापेक्षा जे नाही त्या मागे धावणारे आहे.
पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने उतरली होती, पण तेथील जनतेनेही केजरीवाल यांना नाकारले. आता दिल्लीच्या जनतेनेही केजरीवाल यांना झिडकारले आहे. पंजाब आणि गोव्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर केजरीवाल यांनी ईव्हीएमवर फोडले होते. दिल्ली महापालिका निवडणुकीतील पराभवाचे खापरही ईव्हीएमवर फोडले जात आहे. ही मोदी लहर नाही तर ईव्हीएम लहर असल्याचा हास्यास्पद आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. ईव्हीएममुळे जर दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपाला निर्विवाद बहुमत मिळाले असेल तर दिल्ली महापालिकेत आम आदमी पार्टीला ज्या दुसर्‍या क्रमांकाच्या जागा मिळाल्या, त्या त्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड केल्यामुळे मिळाल्या का? याचे उत्तर केजरीवाल यांना द्यावे लागेल. केजरीवाल यांचे असे दुटप्पी वागणे म्हणजे रडीचा डाव म्हणावा लागेल. केजरीवाल यांची ही वागणूक राजकीय अप्रगल्भतेची आणि बालिशपणाची आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आणि ७० पैकी फक्त ३ जागा जिंकल्यानंतरही भाजपाने आपल्या पराभवाचे खापर कधी ईव्हीएमवर फोडले नाही. उलट जनतेने दिलेला जनादेश आम्ही नम्रपणे मान्य करत असल्याचे म्हटले होते. आपल्या पराभवाचे आत्मपरीक्षण करत भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे दिल्लीच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत झालेली चूक दुरुस्त करत भाजपाच्या झोळीत मतांचे दान भरभरून टाकले आहे.
केजरीवाल यांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्यात आपला जेवढा वेळ आणि शक्ती घालवली, तेवढाच वेळ त्यांनी आपल्या पक्षाच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करण्यात घालवला असता, तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. चुकांपासून बोध घेत जो आपल्यात सुधारणा करतो, त्याला भाजपा म्हणतात आणि जो चुकांपासून कोणताही बोध न घेता चुकांवर चुका करत जातो, त्याला केजरीवाल म्हणतात. मराठीत ‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी एक म्हण ती केजरीवाल यांच्यासाठीच आहे, असे वाटते. जे केजरीवाल अण्णा हजारे या आपल्या राजकीय गुरूचे झाले नाही, ते दिल्लीच्या जनतेचे कसे होणार? अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा शिडी म्हणून उपयोग करून घेत केजरीवाल यांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला. ‘गरज सरो वैद्य मरो’, अशी केजरीवाल यांची प्रवृत्ती आहे. त्यामुळेच त्यांनी आधी अण्णा हजारे आणि नंतर प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांच्यासारख्या आपल्या अनेक जवळच्या सहकार्‍यांना लाथ मारली.
राजकारणात असणार्‍या प्रत्येकालाच राजकीय महत्त्वाकांक्षा असते. राजकीय महत्त्वाकांक्षेची चप्पल बाहेर काढून ठेवत कोणीच राजकारणात उतरत नसतो. राजकीय महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही, मात्र त्यासाठी मनात देशातील गोरगरीब जनतेबद्दल प्रामाणिक तळमळ, त्यांच्या समस्या सोडवण्याची, त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याची कळकळ असावी लागते. लोकप्रिय घोषणा करून आणि मोठमोठी आश्‍वासने देऊन लोकांना जिंकता येत नसते. केजरीवाल यांनी नेमके तेवढेच केले. तुम्ही काही काळासाठी काही जनतेला मूर्ख बनवू शकता, पण सर्व काळासाठी सर्व जनतेला मूर्ख बनवू शकत नाही, याचा अनुभव आता केजरीवाल यांना आला असावा. सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करण्यापेक्षा आपण सहज पूर्ण करू शकू तेवढीच आश्‍वासने त्यांनी दिली असती तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. अण्णा म्हणतात त्याप्रमाणे कथनी आणि करणीत फरक पडल्यामुळे जनतेने अरविंद यांचा ‘केजरीवाल’ केला.
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७