गोंदियात प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोन ठार

0
317

मृतात महिला वैमानिकाचा समावेश
गोंदिया, २६ एप्रिल 
येथील बिरसी विमानतळावरील राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्रातील एक प्रशिक्षणार्थी विमान बुधवार, २६ रोजी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास कोसळले. या अपघातात वरिष्ठ पायलटसह प्रशिक्षणार्थी महिला पायलटही जागीच ठार झाली. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील दवनीवाडा पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्‍या देवरी गावाजवळ असलेल्या वैनगंगा नदीत घडली.
वरिष्ठ पायलट रंजन आर. गुप्ता (४५) रा. गुवाहाटी व प्रशिक्षणार्थी पायलट हिमानी गुरुदयालसिंग कल्याण (२४) रा. दिल्ली अशी मृतांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार प्रशिक्षणार्थी वैमानिकाने आपल्या वरिष्ठ पायलटसोबत येथील विमान-तळावरून उड्डाण घेतले. पण गोंदियापासून पश्‍चिमेला असलेल्या देवरीजवळ अचानक विमानात बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. सावधगिरी बाळगत ते विमान आकस्मिकरित्या उतरविण्याच्या प्रयत्नात असतानाच देवरी ते मध्यप्रदेशातील लावणी (ढिमरटोला) या गावी जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रोपवेच्या तारेला विमानाचा एक पंखा अडकला. त्यानंतर ते विमान नदीत असलेल्या डोंग्याला आढळून अपघातग्रस्त झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
चार आसनी विमान कोसळल्याचे लक्षात येताच आजुबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती देत घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाचे प्रबंधक राजा रेड्डी, अप्पर तहसीलदार एन.एस. मेश्राम, बालाघाट जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक व उपविभागीय अधिकार्‍यांनीही घटनास्थळावर धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातात पूर्णत: चेंदामेंदा झालेल्या प्रशिक्षणार्थी विमानाच्या ब्लॅकबॉंक्सची तपासणी केल्यानंतरच काय बिघाड झाला, याचा उलगडा होणार असल्याचे सांगण्यात आले.
बिरसी येथील प्रशिक्षण केंद्र तयार झाल्यानंतर आतापर्यंत प्रशिक्षणार्थी विमानाला अपघात होण्याच्या घटना यापूर्वीही तीन ते चार वेळा घडल्या असून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक लाखो रुपये खर्च करून पायलट प्रशिक्षणासाठी त्यांना येथे पाठवतात. मात्र प्रशिक्षणार्थीचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत प्रशासनातील अनेक कच्चे दुवे पुढे आणणारा ठरतो. (तभा वृत्तसेवा)
अहवालानंतर वस्तुस्थिती कळणार ः राजा रेड्डी
या अनुषंगाने तभा प्रतिनिधीनी बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे प्रबंधक राजा रेड्डी यांना विचारणा केली असता त्यांनी ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगितले. अपघाताच्या कारण मिमांसेविषयी अद्याप सांगणे कठीण असल्याचे साूंन यासाठी डीजीसीएची तज्ज्ञ चमू दिल्लीवरून येत असून त्यांच्या अहवालानंतरच अपघाताचे खरे कारण कळू शकणार असल्याचे रेड्डी म्हणाले.
येथील विमानांची योग्य तपासणी आवश्यक
येथील विमान प्रशिक्षण केंद्रात आतापर्यंत प्रशिक्षणार्थी विमान अपघाताच्या तीन ते चार घटना घडल्या असून यात प्रशिक्षणार्थी पायलटला आपला जीवच गमवावा लागला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे येथील विमानांच्या गुणवत्तेची योग्य तपासणी व चौकशी होणे गरजेचे आहे. याशिवाय या अपघाताने विमानांची नियमित देखभाल दुरुस्तीही संशोधनाचा विषय ठरली आहे.