अक्षय्य तृतीया एक विचार

0
124

प्रासंगिक
अक्षय्य तृतीया या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येते. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाचा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीएवढे मडके आणून, त्यात पाणी टाकून त्यात वाळं टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांनी तयार केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो, असे मानले जाते.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ अक्षय्य (न संपणारे) असे मिळते. अक्षय्य तृतीया ब्रह्म व श्रीविष्णू यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकातून म्हणजे सगुणलोकातून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते, अशी कल्पना आहे.
अर्थ : अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपणावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे.
मृत्तिका पूजन : सदोदित कृपादृष्टी ठेवणार्‍या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धन्यलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून अशा मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.
मातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय्य तृतीया येते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीची मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खतमिश्रित मातीच्या थरांना खाली वर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृत्तिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे. या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणापासून विपुल धान्य पिकते व बियाणाला कधीही तोटा पडत नाही.
वृक्षारोपण : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. आयुर्वेदात सांगितलेल्या औैषधी वनस्पतीही या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतीचा क्षय होत नाही.
या दिवशी श्री विष्णूसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन कृतज्ञतेने करावे. ज्यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. नुसत्या लक्ष्मीदेवीची कृपा आपल्यावर होत नाही, कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्ती आहे. म्हणून कोणत्याही रूपातील लक्ष्मीपूजनाच्या वेळी विष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर लक्ष्मीलाही करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो. त्रेतायुगाचा प्रारंभ दिन अक्षय्य तृतीया होता. ज्या दिवशी एका युगाचा अंत होऊन दुसर्‍या युगाला सुरुवात होते, त्या दिवसाला हिंदू धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पूर्वजांचे ऋण फेडण्याचे दिवस : एका ताटलीत पूर्वजांना आवाहन करावे. पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळामध्ये श्रीविष्णू व ब्रह्म यांची तत्त्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी. त्यानंतर पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत व आपण त्यांच्या चरणावर तीळ व जल अर्पण करीत आहोत, असा भाव ठेवावा. त्यानंतर २-३ मिनिटांनी देवतांच्या तत्त्वांनी भारित झालेले तीळ व अक्षता पूर्वजांना अर्पण कराव्यात. सात्त्विक बनलेले तीळ हातात घेऊन त्यावरून ताम्हणामध्ये हळुवार पाणी सोडावे. त्या वेळी दत्त ब्रह्म किंवा श्रीविष्णू यांना पूर्वजांना गती देण्यासाठी विनंतीपूर्वक प्रार्थना करावी. तीलतर्पणामुळे पूर्वजांच्या सूक्ष्म देहातील सात्त्विकता वाढून त्यांना पुढच्या लोकात जाण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.
एष धर्मघटो दत्तो ब्रह्माविष्णूशिवात्मक:|
अस्य प्रदानात तृप्यन्तु पितरोऽपि पितामह:॥
गन्धोदकतिलैमिश्‍वं याचं कुम्भं फलान्वितम्‌|
पितृभ्य: सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु॥
ब्रह्म, विष्णू आणि शिव ज्यात सामावले आहेत असा हा धर्मघट ब्राह्मणाला दान केला आहे. या दानामुळे पितर व देवता तृप्त होतात. गंध, उदक, यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय्य (क्षय न पावणारा) ठरो. श्‍लोकाचा शब्दार्थ जरी असा असला तरी केवळ ब्राह्मणालाच हा घट दान करावा हाच अर्थ येथे अपेक्षित आहे.
– नचिकेत चं. काळे
९०२८३३५२३५