पाकला ठोका!

0
38

वाचक पत्रे
पाकिस्तान काहीही झाले तरी सुधरायला तयार नाही. पाकिस्तानचे शेपूट हे कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे वाकडेच आहे! सातत्याने युद्धविरामाचे उल्लंघन करणार्‍या पाकला आता झोडपून काढण्याची वेळ आली आहे. मानवाधिकाराची चिंता करत न बसता, भारताने आता थेट पाकमध्ये घुसून तिथले अतिरेकी अड्‌डे उद्‌ध्वस्त केले पाहिजे. मागे केला होता तसा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून पाकला नेस्तनाबूत करायला हवे. मागे आपल्या सैन्याने लाहोरपर्यंत धडक मारली होती, पाकचे ९३ हजार सैनिक शरण आले होते. मात्र, आपण त्यांना दया दाखवली. आता तेच आपल्यावर डोळे वटारत आहेत. त्यामुळे त्यांचे डोळे फोडण्याचीही वेळ आली आहे. आता नाही तर कधीच नाही, या तत्त्वाने आपण त्यांच्यावर चढाई केली पाहिजे अन् त्याला जेरीस आणले पाहिजे.
-प्रदीप विनायक बरबडे
यवतमाळ

केजरीवाल, राजीनामा द्या!
दिल्लीतील तीनही महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दणदणीत विजय मिळाला आहे. दिल्लीत सत्तेत असलेल्या केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला सपशेल पराभव स्वीकारावा लागला आहे. आता केजरीवाल ईव्हीएम मशिन्सच्या नावाने बेंबीच्या देठापासून बोंबलत सुटले आहेत. आपला पराभव झाला, जनतेने आपल्याला नाकारले, हे मान्य करायला ते तयार नाहीत. ईव्हीएममध्ये गडबडी केल्याचा आरोप त्यांनी भाजपावर करणे म्हणजे एकप्रकारे जनादेशाचाही अपमान आहे! खरे तर जनतेने त्यांना नाकारले याचा अर्थ, आता जनतेचा त्यांच्यावर विश्‍वास राहिलेला नाही, हे लक्षात घेत त्यांनी तत्काळ दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सोडायला हवे.
-कमलाकर विनायक कुळकर्णी
रवींद्रनगर, नागपूर

शासनाने तूर खरेदी करावी
शेतकर्‍यांनी यंदा तुरीचे बंपर पीक घेतले आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे तुरीचे उत्पादन घटले होते. त्यामुळे तुरीची डाळही दोनशे रुपये किलो झाली होती. देशभर प्रचंड गदारोळ झाला होता. शेवटी डाळ आयात करून प्रश्‍न सोडवावा लागला होता. आता डाळीचे विक्रमी उत्पादन झाल्याने भावही गडगडले आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात तूर विकायला आली आहे. पण, आता शासनाकडे पैसाही नाही आणि जागाही नाही, त्यामुळे शेतकर्‍याकडची तूर खरेदी करायला ते तयार नाहीत. पण, सरकारने असे करायला नको. शेतकरी जेव्हा केव्हा तूर विकायला आणेल, तेव्हा सरकारने ती विकत घेतली पाहिजे. असे केले नाही तर शेतकर्‍याचे नुकसान होईल आणि तो पुन्हा कर्जबाजारी होईल. त्याच्यामागचे दुष्टचक्र संपणारच नाही. असे होता कामा नये. शेती आणि शेतकरी जगवणे ही शासनाची जबाबदारी आहे. ती सरकारने टाळू नये. कबूल केल्याप्रमाणे शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करावी.
-चंद्रशेखर नागनाथ जोशी
मेहकर

शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे…
भाजपा हा आता आपला मोठा भाऊ आहे, हे शिवसेनेने मान्य करायला हवे आणि भाजपाला त्रास देण्याच्या भूमिकेतूनही बाहेर पडावे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या तीन महानगरपालिकांच्या निवडणुकांत शिवसेनेने भाजपाविरुद्ध ५६ उमेदवार उभे केले होते. त्यातील ५५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. शिवसेना उगाचच भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करते आहे. प्रत्येक निवडणुकीत भाजपाची सरशी होत आहे. महाराष्ट्रातही आठ महापालिकांमध्ये भाजपाचाच विजय झाला आहे. जनता आता भाजपाला स्वीकारू लागली आहे. भाजपाच आपले भले करू शकते, हा जनतेचा विश्‍वास खरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी जिवाचे रान करीत आहेत. असे असताना आता शिवसेनेने भाजपाला विरोध करण्याचा नाद सोडून देत प्रादेशिक राजकारण तेवढे करावे, एवढेच यानिमित्ताने सुचवावेसे वाटते.
-जीवन के. राजकारणे
महाल, नागपूर

आत्महत्या रोखल्या पाहिजेत
गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या राज्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे आणि ही अतिशय चिंताजनक बाब आहे. आत्महत्या शेतकर्‍यांच्या जास्त असल्या, तरी अन्य प्रकारच्या आत्महत्यांचे प्रमाणही फार वाढत चालले आहे. जीवन गतिमान झाल्याने आणि प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली असल्याने अनेक जण अपयशाने खचून जात आहेत, निराश होत आहेत. नैराश्यातून मग ते टोकाचे पाऊल उचलत आहेत. एकूणच परिस्थिती चिंताजनक होत आहे. ती लक्षात घेत आपण सगळ्यांनी संवेदनशील होत, निराशेच्या गर्तेत सापडलेल्यांना मानसिक आधार देत त्यांच्यात उमेद जागविली पाहिजे.
– मुक्तेश्‍वर जहागीरदार
लोणार