स्नोडेनची रशियन आवृत्ती

0
132

विश्‍वसंचार
रशियन हेरखात्याचं असं वैशिष्ट्य बरेचदा दिसून आलं आहे की, ते सहसा आपल्या पुरुष हेरांना एकटं सोडत नाहीत. एक म्हणजे असे एकटे पुरुष हेर प्रतिस्पर्धी हेरखात्यांच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये म्हणजे बाईच्या मोहात अडकण्याचा संभव असतो. आणि दुसरं म्हणजे पुरुष-स्त्री-घर-कुटुंब असं एक घरगुती वातावरण असलं की, लोकही फार चौकसपणे त्यांच्या उद्योगांकडे पहात नाहीत.

कित्येक आठवड्यांपूर्वी या स्तंभातून एडवर्ड स्नोडेन या अमेरिकन हेराबद्दल माहिती दिली होती. अमेरिकन गुप्तवार्ता संस्था नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचा हस्तक असलेला एडवर्ड स्नोडेन हा अमेरिकेतून पळाला. रशियाने त्याला राजकीय आश्रय दिला. इस्लामी अतिरेक्यांची माहिती जमा करण्याच्या नावाखाली अमेरिका आपल्या मित्र देशांवर कशी हेरगिरी करीत होती, हे स्नोडेनने उघड केलं आहे.
आता आंद्रिआस ऍनश्‍लाग आणि हीड्रन ऍनश्‍लाग यांच्या कहाणीमुळे अशा हेरगिरीत रशियादेखील मागे नाही, हे कळलं आहे. गेली कित्येक वर्षं अगदी निवांतपणे जर्मनीत बसून, खुद्द जर्मनी आणि हॉलंडमधली माहिती मॉस्कोला पाठवणार्‍या ऍनश्‍लाग जोडप्याला जर्मन प्रतिगुप्तवार्ता (काऊंटर इंटेलिजन्स) पोलिसांनी पकडलं.
ते पहा जर्मनीतल्या वाईसबाडेन शहरातलं केंद्रीय पोलिस कार्यालय. तिथे ठेवलेली ती काळ्या रंगाची बॅग पहा. त्यात काय विशेष? हा तर सीमेन्स कंपनीचा चांगला भारीपैकी लॅपटॉप संगणक दिसतोय. चुकलात तुम्ही! तो लॅपटॉप नव्हे; तो अत्यंत उच्च प्रतीचा सॅटेलाईट ट्रान्समीटर आहे. ती पहा त्या बॅगेच्या कडेमध्ये दडवलेली त्याची अँटेना. ऍनश्‍लाग दाम्पत्य गेली वर्षानुवर्षे याच ट्रान्समीटरवरून मॉस्कोला माहिती पुरवत होतं. आंद्रिआस माहिती मिळवायचा आणि हीड्रन ती माहिती मॉस्कोला पाठवायची आणि हा उद्योग ते कुठून करीत होते? जर्मन राजधानी बर्लिंनमधून? बॉन, फँ्रकफर्ट, हॅम्बुर्ग अशा शहरातून? छे: छे:! मिचेलबाख नावाच्या एका निसर्गरम्य खेड्यातून!
जर्मनीच्या शेजारी आग्नेय दिशेला ऑस्ट्रिया हा देश आहे. देश म्हणून ऑस्ट्रिया वेगळा असला तरी तिथले लोक जर्मन भाषिक, जर्मन वंशाचेच आहेत. १९८४ सालच्या ऑक्टोबर महिन्यातल्या एका शुभ प्रभाती एक वकील ऑस्ट्रियातल्या विल्डालपेन नावाच्या एका अवघ्या ५०० लोकसंख्येच्या खेड्यातल्या ग्रामपंचायत कार्यालयात आला. त्याने असा अर्ज दाखल केला की, आपला अशील आंद्रिआस ऍनश्‍लाग हा १९५९ साली दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिनामध्ये जन्मलेला जर्मन भाषिक इसम असून, त्याला आता ऑस्ट्रियात प्रस्तुत विल्डालपेन गावी स्थलांतर करायचं आहे. व्यवसायाने तो मेकॅनिकल इंजिनीअर आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे त्या वकिलाने सादर केली. काही काळाने आंद्रियास ऍनश्‍लाग अधिकृतपणे ऑस्ट्रियाचा नागरिक आणि विल्डालपेनचा रहिवासी बनला.
रशियन हेरखात्याचं असं वैशिष्ट्य बरेचदा दिसून आलं आहे की, ते सहसा आपल्या पुरुष हेरांना एकटं सोडत नाहीत. एक म्हणजे असे एकटे पुरुष हेर प्रतिस्पर्धी हेरखात्यांच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये म्हणजे बाईच्या मोहात अडकण्याचा संभव असतो. आणि दुसरं म्हणजे पुरुष-स्त्री-घर-कुटुंब असं एक घरगुती वातावरण असलं की, लोकही फार चौकसपणे त्यांच्या उद्योगांकडे पहात नाहीत.
या संकेताला अनुसरून थोड्याच दिवसांत आणखी एक वकील विल्डालपेनमध्ये अवतरला. तो आंद्रिआस ऍनश्‍लागला बरोबर घेऊनच ग्रामपंचायत कार्यालयात गेला. तिथे त्याने जाहीर केलं की, माझी अशील हीड्रन ही १९६५ साली दक्षिण अमेरिकेत पेरू देशात जन्मलेली जर्मन भाषिक स्त्री असून, तिलाही विल्डालपेन गावात स्थलांतरित व्हायचं असून, विल्डालपेन गावचे सन्माननीय नागरिक इंजिनीअर आंद्रिआस ऍनश्‍लाग यांच्याशी तिला विवाहबद्ध व्हायचं आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रं त्या वकिलाने सादर केली.
सर्वच देशांच्या हेरखात्यांकडे अगदी खरी भासणारी खोटी कागदपत्रं बनवणारी तज्ज्ञ माणसं असतातच. पण अशी फोर्ज्ड डॉक्युमेंट्‌स बनवण्यात सोवियत रशियन हेरखात्याचे-के.जी.बी.चे लोक फारच निष्णात समजले जात असत. आंद्रिआस आणि हीड्रन यांच्या वकिलांनी विल्डालपेनमधल्या सरकारी कार्यालयात सादर केलेली कागदपत्रं अर्थातच अशीच ‘फोर्ज्ड’ होती. पण ती इतकी हुबेहूब होती की, विल्डालपेनच्या अधिकार्‍यांना तर सोडाच, पण ऑस्ट्रियन राजधानी व्हिएन्नामधल्या अधिकार्‍यांना कोणताही संशय आला नाही.
हीड्रन विल्डालपेनमध्ये आली. मग विवाह नोंदणी कार्यालयात आंद्रिआस आणि हीड्रन यांचं रीतसर लग्न झालं. एक छोटीशी मेजवानी झाली. लोकांना मिष्ठान्न भोजन मिळालं. राजाराणीचा संसार सुरू झाला. वर्षभराने त्यांना एक मुलगीसुद्धा झाली. न्यूज म्हटलं तर एकच होत आंद्रिआसने नोकरी अशी पकडली होती की, त्या कंपनीच्या कामासाठी म्हणून त्याला बरेचदा आठ-आठ दिवस प्रवास करावा लागे. म्हणून मग हीड्रनने नोकरी न धरता घर आणि मूल यांच्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं.
थोडक्यात, आंद्रिआस ऍनश्‍लाग हा एक नोकरदार, कुटुंबवत्सल माणूस आहे, असं दृश्य के.जी.बी.ने मोठ्या सफाईने उभं केलं. आंद्रिआस आठ-आठ दिवस बाहेर फिरून विविध प्रकारची माहिती गोळा करायचा. तो घरी आला की, हीड्रनचं कामं सुरू व्हायचं. त्याने गोळा केलेली माहिती सांकेतिक भाषेत रूपांतरित करायची आणि सॅटेलाईट ट्रान्समीटरवरून मॉस्कोला रवाना करायची.
साधारण १९८५-८६ सालापासून सुरू झालेला हा सिलसिला परवापरवापर्यंत अगदी निर्वेधपणे सुरू होता. मात्र ऍनश्‍लाग दाम्पत्याने एक काळजी घेतली. दोन-अडीच वर्षांपेक्षा जास्त ते कुठेही राहिले नाहीत. विल्डालपेनमधून ते सतत पश्‍चिमेकडे स्थलांतर करीत राहिले. ऑस्ट्रियातून जर्मनीत गेले. जर्मनीतही सतत पश्‍चिमेकडे जात ते हॉलंड देशाजवळ जात राहिले. पण, ते कधीही मोठ्या शहरात किंवा नगरातही राहिले नाहीत. ते कायम एखाद्या छानशा, निसर्गरम्य खेड्यातच राहिले. आता ज्या गावात त्यांना पकडण्यात आलं ते मिचेलबाख गाव हे मारबर्ग या नगराच्या परिसरात येतं.
महत्त्वाच्या सरकारी खात्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे प्रतिस्पर्धी देशांच्या हेरखात्यांच्या दृष्टीने फारच महत्त्वाचे लोक असतात. त्यांच्याकडून माहिती मिळते. कर्जबाजारी, जुगारी, दारुडे वेश्यागमनी, लोभी सरकारी कर्मचारी म्हणजे हेरांच्या दृष्टीने घबाडच. आंद्रिआस ऍनश्‍लागला हॉलंडच्या परराष्ट्र मंत्रालयात असाच एक मोठा मासा मिळाला. त्याचं नाव रेयॉन व्हॅलेंटिनो पोएट्रे. रशियन हेरखात्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते उच्च सरकारी अधिकार्‍यांपेक्षा मध्यम दर्जाच्या अधिकार्‍यांना पटवतात. रेेऑन पोएट्रे हा डच परराष्ट्र खात्यात मध्यम दर्जाचा अधिकारी होता. तो कर्जबाजारी आहे आणि त्याची बायको सतत आजारी असते, एवढी माहिती आंद्रिआसला मिळाली. पुढचं काम सोपं होतं. पैसा फेको माल उठाओ! आंद्रिआस त्याच्या प्रवासांतर्गत दर महिन्यातून एकदा हॉलंडमध्ये द हेग शहरात विशिष्ट जागी जायचा. रेऑन पोएट्रे तिथे यायचा. पैशाची बॅग आणि डच परराष्ट्र मंत्रालयाच्या गोपनीय कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींची बॅग यांची अदलाबदल व्हायची. या कागदांमध्ये मंत्रालयातल्या अन्य कर्मचार्‍यांबद्दल आणि एकंदर घटनांबद्दल रेऑनने केलेली टिपणंही असायची.
ऍनश्‍लाग जोडप्याची ही हेरगिरी चालू असताना इतिहासाने खूप मोठं वळण घेतलं. प्रथम १९८६ साली जर्मनीला विभागणारी बर्लिन भिंत कोसळली. पूर्व जर्मनीची साम्यवादी राजवट संपून पूर्व आणि पश्‍चिम जर्मनी पुन्हा एकवटले. पाठोपाठ १९९१ साली सोवियत रशियाच कोसळला. सत्तर वर्षांची सोवियत साम्यवादी राजवट जाऊन लोकशाही व्यवस्थेचा रशियन फेडरेशन हा नवा देश अस्तित्वात आला. अत्यंत अमानुष अशी के.जी.बी. ही सोवियत गुप्तवार्ता संस्था संपुष्टात आली. जुना पश्‍चिम जर्मनी आणि रशिया हे शत्रू होते. आता नवा एकत्रित जर्मनी आणि नवा रशिया हे मित्र बनले. त्यांच्यात मैत्रीचे नि त्या अनुषंगाने व्यापाराचे नवनवे करार झाले.
पण ऍनश्‍लाग जोडप्याच्या कामगिरीत काहीही फरक पडला नाही. नव्या रशियन राजवटीलाही गुप्त माहिती हवीच होती. उलट नव्या राजवटीत ऍनश्‍लाग दाम्पत्याला सेंट पीटर्सबर्ग आणि मॉस्कोमध्ये बोलावून ‘सेपल’ आणि ‘पॅरायोला’ नामक नव्या सांकेतिक परिभाषांचं खास प्रशिक्षण देण्यात आलं. के.जी.बी. या सोवियत हेर संघटनेची नवी वारसदार एस.डब्ल्यू.आर. ही संघटना तिने आंद्रिआस ऍनश्‍लागला डिपार्टमेंेट डायरेक्टर आणि हीड्रन ऍनश्‍लागला डेप्युटी डिपार्टमेंट डायरेक्टर म्हणून बढती दिली.
पण गेल्या ऑक्टोबर महिन्यात ऍनश्‍लाग दाम्पत्याचे ग्रह फिरले. ऑस्ट्रियातून जर्मन हेरखात्याला काहीतरी टीप मिळाली. जर्मन हेरांनी आंद्रिआसवर पाळत ठेवली आणि मग एका शुभ प्रभाती आपल्या प्रवास कार्यक्रमात आंद्रिआस एका हॉटेलमध्ये गाढ झोपेत असताना जर्मन हेरांनी त्याला उचललं. त्याच्याकडची चावी घेऊन दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे जर्मन हेर मिचेलवाख गावातल्या त्याच्या घरात गुपचूप शिरले. संपूर्ण घर रिकामं होतं. जर्मन हेर थोडे गोंधळले. पक्षीण निसटली की काय? पण नाही; गच्चीतल्या खोलीत बसून हीड्रन सॅटेलाईट ट्रान्समीटरवर संदेश घेत होती. कोणतीही कल्पना नसताना पिस्तुलं सरसावलेले लोक आपल्या खोलीत घुसलेले पाहून ती इतकी दचकली की, खुर्चीवरून ती जवळजवळ कोसळून पडलीच.
जग आता फार गमतीदारपणे पुढारलं आहे. पूर्वी कोणताही देश आपलं गुप्तवार्ता खातं आहे, हे कबूल करायलाच तयार नसे. हल्ली गुप्तवार्ता खात्यांचे प्रमुख जाहीर पत्रकार परिषदा वगैरे होतात. तसेच हल्ली परदेशी वकिलांतींमध्ये अधिकृतपणे एक गुप्तवार्ता प्रतिनिधी असतो. रशियाची, जर्मन राजधानी बर्लिनमध्ये अर्थातच वकिलात आहे. तिथे सर्जी राशमनिन नावाचा अधिकारी उघडपणे गुप्तवार्ता प्रतिनिधी म्हणून नेमलेला आहे. ऍनश्‍लाग दाम्पत्याला अटक झाल्याचं कळताच हा सर्जी राशमनिन धावत बर्लिनहून मिचेलबाखला गेला.
आता ऍनश्‍लाग दाम्पत्याला न्यायालयाने रीतसर शिक्षा ठोठावली आहे. उच्च पातळीवरून जर्मन हेरखातं आणि अमेरिकन सी.आय.ए. यांनी रशियाशी बोलणं लावलं आहे की, आम्ही ऍनश्‍लाग जोडप्याला तुमच्याकडे देतो; तुम्ही आमच्या पकडलेल्या हेरांना त्या बदल्यात आमच्याकडे सोपवा.
मात्र आंद्रिआस आणि हीड्रन ऍनश्‍लाग यांची खरी नावे आणि त्यांना डिपार्टमेंट डायरेक्टर बनवलं म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आणखीन कोणीतरी असणारच, ते कोण? याबद्दल दोन्ही बाजू गप्प आहेत.
– मल्हार कृष्ण गोखले