माझी रंगयात्रा…

0
121

गेल्या अनेक वर्षांत मी स्वत: कित्येक स्थित्यंतरे नाटकात होताना पाहिली. त्या सर्वांचा माझ्यावर वेळोवेळी परिणाम होत गेला. कसा? मी केलेली नाटके ही माझ्या उपयोजित कलेला धरून होती. कोणत्याही यशस्वी नाटककाराची नाटके माझ्यातल्या दिग्दर्शकाने शोधली नाहीत. माझी बरीचशी नाटके माझी मीच लिहिली, दिग्दर्शित केली, त्यांचं संगीत नेपथ्यही माझे मीच केले.

रंगभूमी कोणासाठी थांबत नाही, तिला हवं ते ती घेत असते, तिला हवे त्याची नोंद आपोआप होते आणि बाकीचे काळाच्या ओघात निघून जातात. प्रा. दामू केंकरे एकदा असे म्हणाले होते.
गेली अनेक वर्षे आपण पाहतोय. ही जिवंत कला रसिकांचे मनोरंजन करते आहे. अथकपणे आहे. मी थांबलो म्हणून रंगभूमी थांबत नाही. मी सिनेमात गेलो म्हणून पोरकी होत नाही. मला वेळ नाही म्हणून ठप्प झाली नाही. माध्यमांची कितीही आक्रमणे झाली तरीही पहिली, दुसरी आणि तिसरी घंटा होते. पडदा उघडतो आणि एका अद्भुत विश्‍वात रसिकगण प्रवेश करतोच.
मला नाटक या माध्यमाची समज आली किंवा जाणीव झाली तेव्हाचा काळ हा गिरगावातली केळेवाडी, म्हणजे सध्याचे साहित्य संघमंदिर जेथे आहे तेथे ओपन एयर थियेटर होते, तेव्हापासूनची. आई-वडिलांचा हात धरून साग्रसंगीत नाटक बघणे या पलीकडे कसली जाणीव नव्हती. मग व्हायची तिसरी घंटा. ऑर्गनचे सूर आणि पिटात बसलेल्या वादकांचे वाद्य लावण्याचे सूर सुरू झाले की माणसे सरसावून बसायची. नाटक पहाणे हा त्या काळी समारंभ होता. एखाद्या नाटकाला जायचे तर त्या घरात चार दिवस आधी ते गाजत असे. कपड्याच्या तयारीपासून गजबज असे. मग घोडागाडीतून केळेवाडीत पोहोचण्याचा अनोखा प्रवास. त्या काळचे मी पाहिलेले सुपरस्टार (तेव्हा हे विशेषण नव्हते) म्हणजे केशवराव दाते, भालचंद्र पेंढारकर, बाबुराव पेंढारकर वगैरे. नानासाहेब फाटक, चिंतामणराव कोल्हटकर वगैरे नावे तेव्हा छोट्या कानावर पडायची; पण त्यांचे दर्शन कधी झाले नाही. त्या काळात बाळ कोल्हटकर, शंकर घाणेकर, डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा उदय होत होता.
बंदिस्त थिएटर आले आणि सर्व बदलले. वातानुकूलित रंगमंदिरे आली. नाटकात आधुनिकता आली. बाळ कोल्टकरांच्या नाटकांनी मराठी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला होता. बाळ कोल्हटकर यांच्या कौटुंबिक नाटकांना तुडुंब गर्दी व्हायची. भावविवश होऊन प्रसंगी रडून कढून प्रेक्षक बाहेर पडू लागले. त्या लाटेत ‘तो मी नव्हेच’ आले आणि प्रभाकर पणशीकर बघता बघता लोकप्रिय झाले. समाजातली लंपटशाही, भामटेगिरी आचार्य अत्र्यांनी मोठ्या शिताफीने रंगमंचावर कोर्ट उभे करून मांडली. मो. ग. रांगणेकर या दिग्दर्शकाने रसिकांना त्यात गुंतवून टाकले. एका बाजूला ही अशी सामाजिक आशयांची, नेपथ्याची कमाल दाखवत रसिकांचा ठाव घेणारी नाटके तर दुसर्‍या बाजूने संगीत रंगभूमी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लढा देत होती. तरीही मान्यवर संस्थासंगीत नाटकांचा पारंपरिक पीळ सोडत नव्हती. ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकात संगीत होतं पण भावनात्मकता जास्त होती. दिगूचं गाणं हे त्याच्या आईच्या आठवणींशी निगडित होते. ‘जपून टाक पाऊल जरा’, म्हणून जीवनविषयक सल्ला देणारे होते. त्यात भावनांची आळवणी होती. गाण्यासाठी गाणे नव्हते. विद्याधर गोखले यांची ‘पंडितराज जगन्नाथ,’ ‘मंदारमाला,’ ‘मदनाची मंजिरी,’ वसंत कानेटकर यांची ‘मत्स्यगंधा’सारखी संगीत नाटकेही लोकप्रिय होत होती.
शहरांची केंद्र बदलतात तसे नाटकवाल्यांचे अड्डेही स्थलांतरित होतात. एकेकाळी साहित्य संघ मंदिर हा नाटकवाल्यांचा प्रमुख अड्डा होता. तो माझ्या मते पहिला अड्डा. संध्याकाळ झाली की, अनेक रंगकर्मी खांद्यावर झोळी लावून संघात जमायचे. दादरला शिवाजी मंदिर आले आणि रसिकांना आणखी एक पर्वणी लाभली. दादर, ठाणे येथे असलेली ओपन एअर थियेटर्स हळूहळू बंदिस्त व्हायच्या मार्गावर होती. त्यातले पहिले दादरचे शिवाजी मंदिर. तरीही अड्डा अजून साहित्य संघ मंदिरातच होता. विशेषत: डॉ. अ. ना. भालेराव यांच्या नावाने डॉ. बाळ भालेराव आणि तात्यासाहेब आमोणकर यांच्या हौशी नाट्यचळवळीला तरुणांचा चांगलाच आश्रय मिळत होता. माझ्यासारखे प्रेक्षक मोठे होऊ लागले होते. डॉ. काशिनाथ घाणेकरांची हाऊसफुल्ल नाटके वेड लावत होती. डॉ. काशिनाथ तरुणांच्या गळ्यातला ताईत झाले होते. मला आठवतंय ‘गारंबीचा बापू’ या नाटकाचे मला परवडणारे तिकीट तिकीट काढून मी स्वतंत्रपणे पाहिलेले पहिले नाटक. बाल्कनीतून नाटक बघताना छोटेसे दिसणारे डॉ. काशिनाथ घाणेकर हे किती उत्तुंग स्टार होते हे तिथूनच कळत होते. वसंत कानेटकर लेखक म्हणून आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शक म्हणून चमकत होते. नाटके बघण्याची गोडी या लोकांनीच लावली. कारण तो काळ हिंदी सिनेमाचा सुवर्णकाळ होता. गिरगावातले साहित्य संघ मंदिर नाटकवाल्यांचा अड्डा असले तरी, त्याच गिरगाव क्षेत्रात हिंदी सिनेमांची प्रमुख थियेटर्स होती. राजकपूर, दिलीप कुमार, देव आनंद यांचा तो जमाना होता; आमच्या तारुण्याच्या त्या काळात, किंबहुना हिंदी सिनेमांच्या झंझावातात मराठी तरुणांना डॉ. काशिनाथ घाणेकरांची नाटके आम्हा तरुणांना आकृष्ट करीत होती. त्याच वेळी वसंत कानेटकरांचं ‘लेकुरे उदंड झाली’ हे आधुनिक संगीत नाटक आलं आणि जितेंद्र अभिषेकींनी नाट्यसंगीत क्षेत्रात नवी नांदी केली. आमच्यासारख्या नाटकाकडे नुकतेच आकर्षित होणारे संगीतप्रिय रंगकर्मी या नव्या प्रकारच्या संगीताकडे आकृष्ट झाले. आपणही काहीतरी करू या प्रेरणेने अस्वस्थ झाले.
शाळा-कॉलेजातली स्नेहसंमेलने, हे आमचे प्रमुख रंगपीठ होते. त्यानंतर फक्त अभ्यास एके अभ्यास. नाटक करणे तर सोडाच पण बघणे पण चोरी. एस.एस.सी.चा अभ्यास म्हणजे कठोर तपश्‍चर्येचा काळ. त्या काळात नाटक हा विषय कोसो दूर असे. त्यानंतर मग सगळ थोडं शिथिल व्हायचं. तरीही जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये गेल्यानंतर खरा फरक पडला. प्रा. दामू केंकरे हे आमचे सहायक डीन होते. त्यांचं नाव पेपरमध्ये येत असे दिग्दर्शक म्हणून. नाटकाच आकर्षण तोपर्यंत मनात उमजलं होतं. त्यामुळे दामू केंकरे यांच्याबद्दलही एक आकर्षण होते. पांढर्‍या होत चाललेल्या केसांचे हे अवलिया प्रोफेसर म्हणजे आमच्या जे.जे.ची शान होते. त्यांचं स्वतंत्र केबिन म्हणजे कित्येक महामहीम रंगकर्मींचा आखाडा होता. माधव वाटवे, अरुण जोगळेकर, अरुण सरनाईक, श्रीकांत मोघे ते अगदी अमोल पालेकरपर्यंत अनेक नट मंडळी केंकरे सरांना भेटायला आली की, आम्ही त्यांना अगदी हपापल्यासारखे पाहायचो. सतीश पुळेकर, नाना पाटेकर, मीना सुखटणकर (मीना नाईक) हे आमचे ज्येष्ठ. त्यातल्या मीना सुखटणकरला दामू केंकरे यांनी कॉलेजमधल्या नाटकातले काम बघून व्यावसायिक नाटकात घेतले, हा तेव्हा चर्चेचा विषय होता. आपल्यालाही कधी सर बोलावतील का, असा प्रश्‍न आम्हा कॅन्टीनमध्ये बाकडी बडवणार्‍या वात्रट विद्यार्थ्यांना पडत असे. त्यातल्या त्यात मला जास्त. अखेर शेवटच्या वर्षी जे.जे.च्या वार्षिक स्टडी टूरवर आधारित ‘टूरटूर’ ही एकांकिका मी केली आणि ती इतकी गाजली की, केंकरे सरांनी खरंच मला त्यांच्या व्यावसायिक नाटकात काम करायला बोलावले. नाटक होते दी गोवा हिंदू असोसिएशनचे ‘दिसतं तसं नसतं.’ या नाटकात माधव वाटवे, अरुण जोगळेकर, दया डोंगरे, मोहन कोठीवान, बाळ कर्वे, नयन भडभडे (आताची रीमा) अशी मातब्बर मंडळी होती. कॉलेजातले माझे कर्तृत्व केंकरे सरांव्यतिरिक्त कोणालाच माहिती नसल्याने मी तिथे अगदी नगण्य असल्यासारखा वावरत होतो. उद्देश एकच होता, दामू केंकरेंसारख्या गुरूकडून रिहर्सलच्या निमित्ताने माझं नाट्य प्रशिक्षण.
जे.जे.मधून ‘टूरटूर’ एकांकिका गाजवून आम्ही शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलो आणि नाट्य हौस भागवण्यासाठी ‘या मंडळी सदर करू या’, ही हौशी नाट्यसंस्था सुरू केली. अध्यक्ष होते प्रा. शांताराम पवार. तो काळ प्रायोगिक नाटकांचा अगदी ऐन सृजनशीलतेच्या भराचा काळ. छबीलदासमध्ये नाटके होतात, असे बरेच ऐकले होते. नक्की काय ते पाहू म्हणून आम्ही मित्र तिथले एक नाटक पहायला गेलो. नाटकाचं नाव होत ‘क्षितिजरेषा.’ ज्यो पोल सार्त्रच्या नाटकावर आधारित, विजय बोंद्रे याचं दिग्दर्शन. प्रमुख भूमिका विनय आपटे. नाटक नीट कळले नाही, तरीही आवडले. तोपर्यंत संघात होणारी आणि शिवाजी मंदिर गाजवणारी व्यावसायिक नाटके हे माझे आदर्श होते. सिनेमात राज कपूर, हृषीकेश मुखर्जी, विजय आनंद, मनमोहन देसाई आणि नाटकात दामू केंकरे, पुरुषोत्तम दारव्हेकर हे आदर्श. ‘क्षितिजरेषा’ या अमूर्त शैलीच्या नाटकाने झपाटलं होतं. असं काही असतं हेच माहिती नव्हत. मग अच्युत वझेंचं ‘चल रे भोपळ्या…’ हे अमोल पालेकर दिग्दर्शित नाटक छबीलदासमध्ये पहिले, पुण्याहून आलेली थियेटर अकादमीची ‘घाशीराम कोतवाल,’ ‘महानिर्वाण’ आणि ‘महापूर’ ही नाटकं पाहिली. छबीलदासमध्ये ‘शांतता कोर्ट चालू आहे,’ ‘हयवदन’सारखी नाटकं पाहिली. या सर्व नाटकांनी अक्षरश: झपाटून सोडलं. तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल,’ ‘शांतता कोर्ट…’ने, आळेकरांच्या ‘महानिर्वाण,’ ‘महापूर’ने व एलकुंचवारांचं ‘पार्टी’, ‘गार्बो’ने आमच्या डोक्याचा पार भुगा करून टाकला.
खरे तर ‘या मंडळी सादर करू या’ या आमच्या नाट्यसंस्थेत एकापेक्षा एक हुशार विद्यार्थी होते. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत स्वतंत्र व जाहिरात क्षेत्रात या सर्वांनी पुढे भरपूर नाव कमावले व नाट्य क्षेत्रातही. त्यात मी, रघुवीर कुल, नलेश पाटील, (निसर्ग कवी), अशोक वंजारी (सध्या अमेरिकेत आहे), राणी सबनीस (पाटील), प्रदीप मुळ्ये (आजचा आघाडीचा नेपथ्यकार व दिग्दर्शक), निवेदिता जोशी-सराफ, संजय पवार (पत्रकार व नाटककार), प्रकाश निमकर (वेशभूषाकार) आणि विजय केंकरे ही सर्व मंडळी म्हणजेच ‘या मंडळी सादर करू या’ या संस्थेचे फाऊंडर मेंबर्स. आमच्या एकांकिका व ‘अलवारा डाकू’ सारखे नाटकही स्वतंत्र ठसा उमटवणारे ठरले.
हौशी किंवा प्रायोगिक रंगभूमीवरून व्यावसायिक रंगभूमीवर हळूच सरकणार्‍या अनेक कलाकारांनी व्यावसायिक रंगभूमीवर चांगलेच झेंडे गाडले. मग ते लेखक असोत वा दिग्दर्शक अथवा कलावंत किंवा तंत्रज्ञ. वेगळा दृष्टिकोन आपोआपच डोक्यात ठासून भरलेला असतो. मग कधी पदार्पणात तर कधी प्रयत्नांती एखादे नवीन काहीतरी व्यावसायिक रंगभूमीवर पहायला मिळते. गेल्या अनेक वर्षांत मी स्वत: कित्येक स्थित्यंतरे नाटकात होताना पाहिली. त्या सर्वांचा माझ्यावर वेळोवेळी परिणाम होत गेला. कसा? मी केलेली नाटके ही माझ्या उपयोजित कलेला धरून होती. कोणत्याही यशस्वी नाटककाराची नाटके माझ्यातल्या दिग्दर्शकाने शोधली नाहीत. माझी बरीचशी नाटके माझी मीच लिहिली, दिग्दर्शित केली, त्याच संगीत नेपथ्यही माझे मीच केले. प्रथितयश कलावंत न घेता नाटक करताना मला भीती वाटली नाही. कास्टिंग परफेक्ट झाल की,दिग्दर्शकाचं अर्ध कामं झालेलं असतं. पूर्वग्रह नसलेले, रिहर्सलला भरपूर वेळ देणारे, व्यावसायिक मर्यादा ओळखणारे व त्या पाळणारे कलावंत असतील तर ते व्यावसायिक नाटकाला जास्त चांगला न्याय देतील, असे मला नेहमी वाटत असते. याचा अर्थ प्रतिथयश कलावंत तसे नसतात असे नाही; पण मी ज्या पद्धतीची नाटके केली त्यात फ्री फॉर्म जास्त असल्यामुळे समूहनाट्याला जास्त स्कोप असलेली नाटके मला सुचत गेली आणि त्यामुळे कुणा एका भूमिकेला त्यात वाव असेलच असे झाले नाही. तरीही माझ्या नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, किंवा टूरटूरची सगळी टीम नावाजली गेली. तीच गत मुंबईमध्ये विजय पाटकर, ‘जाऊबाई जोरात’मध्ये निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई या कलाकारांनी आपला मार्ग शोधला आणि त्यात त्यांना अपार प्रसिद्धी मिळाली.
आज मराठी रंगभूमी नवे नवे शोध तर घेतच आहे, पण व्यावसायिकदृष्ट्या ही समृद्ध आहे असे मला वाटते. प्रशांत दामले, भरत जाधवसारखे अभिनेते स्वत:च्या वलयावर गर्दी खेचत आहेत. जितेंद्र जोशी, मुक्ता बर्वे यांच्या नव्या नाटकांची वाट रसिक पाहताना दिसतायत. सातत्याने नाटकं करणारे विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी आणि दिलीप जाधव, दिनू पेडणेकर यांच्यासारखे मुरलेले निर्माते व वितरक तर भरत काणेकर, प्रसाद कांबळी यांच्यासारखे नव्या दमाचे निर्माते मुख्य धारेत सातत्य दाखवत आहेत. आज व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वच निर्मात्यांच्या धाडसाचं कौतुक करावं तितकं थोडेच आहे. कारण शनिवार-रविवारच्या प्रयोगांवर आज रंगभूमी तगली आहे, असे म्हणत असताना नवे नवे निर्माते नवी नाटकं घेऊन येतच आहेत. शिवाय पुण्या- मुंबईतच नव्हे तर कल्याणपासून कणकवलीपर्यंत प्रायोगिक नाट्यचळवळ कधी पोटतिडकीने तर कधी स्पर्धांच्या निमित्ताने का होईना कार्यरत आहे. म्हणूनच दामू केंकरे सरांचे वरील वाक्य पुन्हा आठवले… रंगभूमी कुणासाठी थांबत नाही… ती सतत पुढे जातच असते.
(उस्मानाबाद अ. भा. नाट्य संमेलनाच्या स्मरणिकेतून साभार)
– पुरुषोत्तम बेर्डे /९८६९४४७४८७