उस्मानाबादी नाट्यसंमेलन

0
152

आयोजकांचा उस्मानाबादी उत्साह, रसिक प्रेक्षकांची तोबा गर्दी आणि त्यांना साद घालणारी नाटकं व लावणी या कार्यक्रमाची रेलचेल, असे हे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे ९७ वे संमेलन प्रामुख्याने तीन दिवसांचे असले तरी १६ एप्रिल ते २० एप्रिल आणि २१ एप्रिल ते २३ एप्रिल अशा दोन भागात मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.
नाट्यसंमेलन हे स्वागताध्यक्ष भाजपाचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या पूर्णत्वाने ताब्यात होते. भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ता कुळकर्णी आणि त्यांची चमू संमेलनाने भारली होती. सारे काही भव्यदिव्य होते.
नाट्यसंमेलनासाठी शहरात तीन ठिकाणी रंगमंच उभारण्यात आले होते. तुळजाभवानी क्रीडा संकुलात राजाराम शिंदे हा मुख्य रंगमंच होता. तुळजाभवानी मंदिराचे प्रवेशद्वार बळीराजा आणि नटराजाची वेधक मूर्ती आणि इंद्रधनुच्या रंगाने रेखाटलेली लक्षवेधक रांगोळी मनाचा ठाव घेत होती. रंगमंचही संमेलनाला साजेसा होता. तुळजाभवानीची मूर्ती आणि संत तुकोबारायांचे तैलचित्र लक्षवेधक होते. नगरपालिकेच्या नाट्यगृहात डॉ. वि. भा. देशपांडे तर रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या पटांगणात बापू लिमये रंगमंचाची उभारणी करण्यात आली होती.
तब्बल एकशेदहा नाटकांतून विविध भूमिका साकारत साठ वर्षांची प्रदीर्घ उपासना करणारे ८२ वर्षांचे जयंत सावरकर या वेळी नाट्यसंमेलनाध्यक्ष म्हणून अविरोध निवडून आले ही संमेलनाची जमेची बाजू. एका ज्येष्ठ नाट्यकलावंताला हा सन्मान मिळाला यासाठी मानाचा मुजरा म्हणून तमाम मराठी रंगवेडे एकत्र यायला हवे होते. पण, कुठल्याही कारणाने का असेना काही अपवाद वगळता नाट्यधर्मी म्हणवणार्‍या नाट्यकलावंतांनी संमेलनाकडे फिरवलेली पाठ रंगभूमीबद्दलची कृतघ्नताच वाटली.
राजाराम शिंदे रंगमंचावर मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उस्मानाबादकरांनी या सोहळ्यालाही प्रचंड गर्दी केली होती. स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे लांबलेले भाषण अभ्यासपूर्ण तर होतेच, पण त्यातून मराठवाडा रंगभूमीविषयीची त्यांची जाण आणि कलोपासकांच्या नोंदी लक्षवेधक होत्या. नाट्यपरिषदेचे कार्यवाह डॉ. दीपक करंजीकरांचे प्रास्ताविक शिस्तबद्ध आणि परिषदेच्या कार्याचा आढावा घेणारे होते. पूर्वाध्यक्ष गंगाराम गवाणकरांना थोडक्यात बोलण्याची सूचना असल्यामुळे ते फारसे उमलले नाही. उद्घाटक नामदार महादेव जानकरांनी बरीच आश्‍वासने दिली. त्यामुळे रंगकर्मींना क्षणिक का होईना दिलासा मिळाला. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी आपली व्यथा व्यक्त केली. आगतस्वागत सत्कार यात बराच वेळ रेंगाळलेल्या या समारोहात अध्यक्ष जयंत सावरकर आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या शिदोरीतून एक वेगळी अनुभूती देतील अशी अपेक्षा होती. परंतु अध्यक्षाला काहीच अधिकार नसतात एवढे सांगून ते मोकळे झाले मात्र, रंगकर्मींना येणार्‍या अडचणी व त्यांना हव्या असणार्‍या सवलती यावर त्यांनी प्रकाश टाकला. अभिनयाचे क्षेत्र आता खूप विस्तारित झाल्यामुळे आणि तरुणवर्ग या क्षेत्राकडे आकर्षित झाल्यामुळे या पिढीला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पाया म्हणून अभिनय हा विषय शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याची त्यांची मागणी एकूणच अध्यक्षीय भाषणात महत्त्वाची वाटली. मराठवाडा रंगभूमीवर अखंड सेवा देणार्‍या ज्येष्ठ कलावंताचा हा सत्कार वातावरण भारावून गेला.
संमेलनाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी तीनही रंगमंचांवर नाटक-एकांकिका, एकपात्री, लावणी, लोकनृत्य, स्थानिक कलावंतांचे सादरीकरण अशी दिवसरात्र भरपूर रेलचेल होती. विशेष म्हणजे संमेलनात स्थानिक कलावंतांना भरपूर वाव देण्यात आला होता. रंगपीठाचा दर्जा लक्षात घेऊन कलावंतांनीही अतिशय परिश्रमपूर्वक प्रभावी सादरीकरण करीत मायबाप रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली. गोंधळ, ललित, आराधी नृत्य या पारंपरिक लोककलांनी या लोककलांना उजागर केले. विविध प्रकारच्या कलाविष्कारातून प्राचीन संस्कृतीचे वैभवशाली दर्शन घडविण्यात हे कलावंत कमालीचे यशस्वी ठरले.
संमेलनात सादर झालेल्या एकांकिका मनोवेधक ठरल्या. त्यातून अनेक विषय पुढे आले आणि खर्‍या अर्थाने विषय आणि आशयाच्या दृष्टीने विकसित होत जाणार्‍या नाट्य चळवळीचे दर्शन घडले. जातिभेदावर भाष्य करणारी ‘माईक,’ काश्मीर प्रश्‍नाला वाचा फोडणारी ‘दर्दपोश,’ निखळ प्रेमाचे दर्शन घडविणारी ‘गोंधा व नमूचा फार्स,’ आत्मविश्‍वास जागृत करणारी ‘हमसफर’ या एकांकिकांनी रंगभूमीला नवी ऊर्जा मिळवून दिली.
हास्याची कारंजी उडवीत एकापेक्षा एक हास्याचे स्फोट उडवणार्‍या ‘एकपात्री’ कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या तब्बल अठ्ठावीस कलावंतांनी सादरीकरण केले. वैदर्भीय कलावंतांनी मात्र येथे बाजी मारत वेगळा ठसा उमटवला. श्रद्धा तेलंग, रमेश थोरात, मी स्वत:, राम झिले, राजा मुंडेकर, रिझवान पटेल, कांचन थोटे अशा सात कलावंतांनी दमदार फलंदाजी केली. दिलीप खन्ना, संतोष चोरडिया, प्रा. विष्णू सुरासे, मनीष आपटे यांनी एकपात्रीमध्ये रंग भरला.
रसिकांची हाऊसफुल्ल गर्दी पाहता हे संमेलन आयोजकांच्या आणि रसिकांच्या दृष्टीने निश्‍चितच यशस्वी झाले यात शंका नाही. बाहेरून आलेले कलावंत आणि प्रतिनिधी यांची व्यवस्था आणि मेजवाण्याही उत्तम होत्या. पण संमेलन हे इथेच संपते का, हा एक प्रश्‍न सहज मनात डोकावून जातो. तो यासाठी की, अशा संमेलनाच्या माध्यमातून लोकांच्या अभिरूचीत काही भर घालता येते का, नाटक आणि नाटकाचा संस्कार दूरवर पोहोचवता येईल का, नवीन पिढीत नाटकांची ओढ निर्माण करता येईल का, रंगभूमीला पोषक वातावरण निर्माण करून एक नवी दृष्टी देता येईल का या हेतूने आपण काहीएक विचार करणार आहोत की नाही. खरे म्हणजे रंगभूमीविषयी काही जाणिवा निर्माण करून नाट्यचळवळीचा ऊहापोह होणे गरजेचे होते. पण त्याची कुणालाच गरज वाटलेली दिसत नाही. महाराष्ट्रात अनेक दिग्गज नाट्यलेखक, दिग्दर्शक, समीक्षक आहेत. पण, एकूणच संमेलनात रंगकर्मीशिवाय कुणाचीच फारशी दखल घेतल्याचे जाणवले नाही. कुणी तिकडे नाट्यधर्म आपला आहे या भावनेने फिरकल्याचेही दिसले नाही. संंमेलनात रंगभूमीविषयी काही चर्चा होतील, विचार व्यक्त होतील, मंथन होईल आणि त्यातून नव्या पिढीला, रंगभूमीला एक पोषक ऊर्जा मिळेल असे वाटले होते. पण यासाठी ते शून्यच होते.
संपूर्ण संमेलनात एक गोष्ट भावल्यासारखी होती, तिचा उल्लेख केलाच पाहिजे. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी तीनही दिवस आपल्यातला नट आणि पद बाजूला सारून सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे उन्हातान्हात तीनही रंगमंचांकडे येऊन उपस्थित कलावंतांना, रसिकांना भेटत होते. विचारपूस करीत होते. रंगभूमी आणि रंगकर्मी यांच्याविषयीची आस्था आणि तीव्र तळमळ जाणवत होती. नवोदितांचे कार्यक्रम बघून त्यांचे कोडकौतुक करीत त्यांची उमेद वाढवीत होते.
रंगभूमी, नाटक आणि कलावंत यांच्याबद्दलची आस्था आणि ओढ मी मराठी म्हणणार्‍या सर्वसामान्यांमध्येही आहे आणि म्हणूनच एरव्ही नाटकाचे (न परवडणारे) तिकीट काढून थिएटरकडे न वळणारी पावलंही नाट्यसंमेलन म्हटलं की आपसूकच ओढल्या जातात. अशा संमेलनाची उत्सुकता सर्वांनाच असते. किमान नट, अभिनेते, अभिनेत्री यांचे ग्लॅमर जवळून बघण्याची संधी हुकवण्याची त्यांची मानसिकता नसते. नाटकाच्या आशयाशी किंवा विषयाशी फारसे देणे घेणे असतेच असे नाही. रंजन हाच त्यांचा मुख्य हेतू असतो आणि हीच संमेलनाची फलश्रुती असेल तर उस्मानाबादी संमेलन यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल.
– प्रा. डॉ. दिलीप अलोणे/९८२२९२९६२९