साप्ताहिक राशिभविष्य

0
600

रविवार, ३० एप्रिल ते ६ मे २०१७
सप्ताह विशेष
•सोमवार, १ मे- श्री नृसिंह नवरात्रारंभ, महाराष्ट्र दिनोत्सव, कामगार दिन; मंगळवार, २ मे- भद्रा (प्रारंभ २०.४९), गंगोत्पत्ती, गंगापूजन, स्वामी तुकाराम महाराज प्रगटदिन- मोहपा (नागपूर); बुधवार, ३ मे- भद्रा (समाप्त ८.११), दुर्गाष्टमी, बुधाष्टमी; गुरुवार, ४ मे- बुध मार्गी, स्वामी पुरुषोत्तम महाराज पुण्यतिथी- काटोल, परमहंस रामनाथ स्वामी यात्रा- वाढोणा (अमरावती); शुक्रवार, ५ मे- श्री कालभैरव यात्रा- निमगाव (बुलडाणा), सती अनसूया माता जन्मोत्सव; शनिवार, ६ मे- भद्रा (८.०४ ते २०.२७), मोहिनी एकादशी, श्री सखाराम महाराज रथोत्सव- अंमळनेर
संक्षिप्त मुहूर्त- साखरपुडा- ३० एप्रिल, ४ मे; बारसे- ३० एप्रिल, २ मे, ५ मे, जावळे- ३० एप्रिल, १ मे, गृहप्रवेश- ३० एप्रिल, १ मे, २ मे.

मेष- प्रकृती सांभाळावयास हवी
या आठवड्यात आपणास प्रकृती सांभाळावयास हवी. उष्णतेचे व पोटाचे त्रास संभवतात. एखादे क्रॉनिक दुखणे असेल तर ते अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण होते आणि विशेष म्हणजे अपघाताचे भय कायम आहे. आठवड्याच्या शेवटात तर या संबंधात विशेष काळजी घ्यावी. वाहने सांभाळून चालवा. वीज, आग यांची उपकरणे सावधपणे वापरा. प्रकृतीची कुणकुण लागताच उपचार घ्या. संततीसुखासाठी हा आठवडा चांगला दिसतो. त्यांच्या प्रगतीच्या बातम्या आपणास आनंद देतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. मात्र सारे काही प्रकृती सांभाळून करावे लागणार आहे हे लक्षात घ्यायला हवे.
शुभ दिनांक- ४, ५, ६.

वृषभ- कार्यक्षेत्रात शुभ घटना
या आठवड्यात नोकरी व व्यवसायात काही शुभकारक घटना घडू शकतात. जनसंपर्क वाढून त्याद्वारे आपली काही कामे सुलभपणे होऊ शकतील. कुटुंबात एखादी नवी खरेदी, मंगलकार्य, पाहुणे व मित्रांच्या गाठीभेटी यामुळे आनंदी वातावरण राहील. विदेशवारीच्या योजना आखत असाल तर त्याला तूर्त अपेक्षित गती मिळणार नाही. थोडे थांबून तत्संबंधी कामात हात घातला तर अधिक सुलभतेने सारे घडून येईल. या आठवड्यात काहींच्या शुभमंगलाचे वा ते जुळून येण्याचे योग निर्माण होऊ शकतात. व्यवसाय-कार्यक्षेत्रात जरा डोके शांत ठेवून कामे केलीत, तर सारे काही तुमचेच असणार आहे.
शुभ दिनांक- ३०, १, २.

मिथुन- स्वभावावर नियंत्रण हवे
या आठवड्याची सुरुवात आपणास काहीशी खर्चिक व कष्टप्रद होणार असली तरी आठवड्याच्या उत्तरार्धात काहीसा दिलासा मिळू शकेल. नोकरी-व्यवसायात मात्र उत्तम योग येतील. आर्थिक आवक वाढेल. व्यापारात वाढ होईल. नोकरीत असणार्‍यांचा अधिकार, पद, दर्जा वाढेल. धनलाभदेखील होईल. साहित्यिक- कलावंतांना तर हा काळ उत्कृष्ट ठरावा. आपल्या कामाचे कौतुक होऊन मान-सन्मान, पुरस्कार मिळू शकतील. मैफिली रंगू शकतात. दरम्यान, आपणास स्वभावावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. डोक्याला ताप, चिडचिड, संताप, भांडणे यांना आवर घालायला हवा.
शुभ दिनांक- ३०, २, ३.

कर्क- कुटुंबात मतभेद टाळा
या आठवड्यात कुटुंबात आनंदी व समाधानाचे वातावरण ठेवण्यासाठी आपसात मतभेद निर्माण होऊ देऊ नयेत. व्यवसाय व आपल्या कार्यक्षेत्रातील वातावरणदेखील आनंदी ठेवण्याचा प्रयत्न असावयास हवा. त्याचप्रमाणे व्यसनांना लगाम घालायला हवा. उष्णतेचे त्रास वाढण्याचे संकेत दिसतात. वाहने सांभाळून चालवायला हवीत. अपघाचे भय आहे. काहींना एखादेवेळी हॉस्पिटलची वारी करावी लागू शकते. आर्थिक व स्थावराचे व्यवहार सांभाळून करावेत. कोणावरही विसंबून राहू नका. विद्यार्थ्यांना उत्तरार्ध परीक्षेतील यशासाठी उत्तम राहील. समाधानकारक यश मिळून पुढची वाट सुकर होईल.
शुभ दिनांक- २, ३, ४.

सिंह- धडाडीमुळे प्रतिमा उजळेल
या आठवड्यात आपल्या कामांना अपेक्षित गती मिळण्यास सुरुवात होईल. गेल्या काही दिवसांत असलेली काहीशी मरगळ आता दूर होऊ शकेल. या धडाडीमुळे आपली प्रतिमा उजळेल. प्रतिष्ठा मिळेल. या सार्‍या बदलामुळे आपली आर्थिक घडी उत्तम बसू शकेल. काही नवे उपक्रम सुरू केले असतील तर त्यात यश मिळून तिजोरीत भर पडेल. नोकरी-व्यवसायातील शत्रूवर्गावर आपला वचक निर्माण होईल. तरीही सावध राहावयास हवे. कारण एखाद्या गाफील क्षणी शत्रुवर्ग आपणास मोठा हिसका बसवू शकतात. मित्रांसोबत मतभेद, नियमाविरुद्ध वर्तन, चौकटीबाहेर काम करण्याचा प्रयत्न नको.
शुभ दिनांक- ४, ५, ६.

कन्या- कामें रेंगाळून मनस्ताप
या आठवड्यातील ग्रहस्थिती पाहता आपणास संमिश्र योग येऊ शकतात. काही कामे अनपेक्षितपणे पूर्ण होतील तर काही अनावश्यक रेंगाळून मनस्ताप देतील. सरकारी कामातील विलंब त्रासदायक ठरेल. तसेच हीच ग्रहस्थिती या आठवड्यात आपणास प्रकृतीबाबतही सचेत राहण्यास सुचवत आहे. वाहने सांभाळून चालवा. खाण्या-पिण्याची पथ्ये सांभाळा. चंचलता व घाई करण्याची वृत्ती यामुळे हे लोक नेहमी सिग्नल तोडून वाहन पुढे दामटतात. सध्या या गोष्टीला लगाम घाला. विशेषतः युवा मुला-मुलींनी हे भान ठेवावयास हवे. विद्यार्थी वर्गाला उत्तम काळ आहे. आपल्या मेहनतीचे चीज होईल.
शुभ दिनांक- २, ३, ६.

तूळ- मुलांकडून अपेक्षांची पूर्तता
या आठवड्यातील ग्रहयोग आपणास प्रकृतीची काळजी घेण्यास सुचवीत आहेत. साथीचे रोग, पोटाचे त्रास, डोळ्यांचे त्रास यांनी आपण त्रस्त होऊ शकता. त्यामुळे वेळीच उपचार घेऊन प्रकृती उत्तम राखली पाहिजे. आपल्या मुलांसाठी मात्र हा आठवडा चांगला ठरू शकतो. त्यांच्याकडून मनास समाधान मिळेल अशा वार्ता आपणास कळतील. त्यांच्याबाबतच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसतील. असे असले तरी त्यांच्यावर कुठलीही सक्ती करण्याची भूमिकादेखील स्वीकारू नका. शांतपणे, त्रयस्थपणे राहून काय होते त्यात बघ्याची भूमिका स्वीकारणेच चांगले. मुलांकडून सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक- ३०, २, ४.

वृश्‍चिक- परिश्रमाचे चीज होईल
या आठवड्यात काही चांगल्या बातम्या कानावर पडतील. नोकरी-व्यवसायात आपल्या परिश्रमाचे चीज होईल व त्यातून आर्थिक लाभदेखील मिळू शकेल. मानाचे पद, अधिकार वाढ, व्यावसायिकांना विस्ताराच्या प्रयत्नात यश, एखादी उत्तम संधी मिळू शकते. आर्थिक आवकदेखील वाढून दिलासा मिळेल. छुप्या शत्रूंपासून मात्र सावध रहायला हवे. त्यांच्या कारवाया वेळीच आटोक्यात आणावयास हव्या. आर्थिक व्यवहारात कोणावरही विश्‍वास टाकून मोकळे होऊ नये. वाहने सांभाळून चालवावीत. कुटुंबातील वातावरण तुम्हालाच सांभाळावे लागणार आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. विद्यार्थ्यांना उत्तरार्धात अधिक उत्तम योग लाभतील. मेहनतीचे चीज होईल. अपेक्षित यश मिळेल.
शुभ दिनांक- २, ३, ५.

धनू- भाग्याला कर्तृत्वाची जोड
या आठवड्यात आपल्या वाट्याला आलेले ग्रहमान बघता भाग्याची आणि कर्तृत्वाची सुरेख जोड आपणास देता येऊ शकेल. नोकरीत असलेल्यांना साहेबांची मर्जी संपादन करता येईल. मिळालेले टार्गेट पुरे करून इन्सेटिव्हज्‌चा लाभ मिळेत. व्यवसायात असाल तर आपण विरोधकांच्या स्पर्धेला निश्‍चितपणे तोंड देऊन पुढे जाल. आपले इप्सित गाठू शकाल. कुटुंबातील काही सदस्यच आपल्या विरोधात कुरापती काढण्याच्या प्रयत्नात आहेत. तिकडे दुर्लक्ष नको. संततीला सध्या उत्तम काळ आहे. मुलांची प्रगती सुखावून जाईल. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी जाणकारांचा सल्ला घ्या. शुभ दिनांक-३०, १, ४.

मकर- कलावंतांना उत्तम संधी
या आठवड्यात कला व साहित्य क्षेत्रात असलेल्या या राशीच्या मंडळींना उत्तम संधी मिळाव्यात असे ग्रहमान लाभले आहे. या आठवड्यात काही विशेष कामे यांच्याकडून होऊ शकतील. त्यामुळे प्रतिष्ठा व मानसन्मान वाढेल. सरकारदरबारी आपले वजन निर्माण होईल. दरम्यान, काही व्यक्तींना प्रकृतीची कुरबूरदेखील सहन करावी लागेल. याबाबतीत सुरुवातीचे काही दिवस क्लेषकारक राहतील. वाहने सांभाळून चालवावीत. वीज व अग्नी यांची उपकरणे सांभाळून हाताळावी. रस्त्यावर व घरात बेसावध असू नये. विद्यार्थी वर्गासाठी अतिशय उत्तम काळ. उत्तम यश पदरी पडून समाधान मिळावे.
शुभ दिनांक- ३०, २, ६.

कुंभ- आर्थिक आघाडीवर हातघाई
या आठवड्यात आपणास आर्थिक व व्यावसायिक आघाडीवर बरीच उलथापालथ करावी लागू शकते. आठवड्याच्या आरंभीच या बाबतीत बरीच कसरत होणार आहे. अतिशय कठीण नसला तरी क्षणाचीही उसंत न देणारा काळ आपण उपभोगीत आहात, असे दिसते. कुटुंबातून काही मोठे खर्च अचानक समोर येऊ शकतात. योजावे एक आणि करावे लागते भलतेच असे काहीसे होऊ शकते. काहींच्या बाबतीत व्यवसाय बदलणे किंवा व्यवसायात मोठे परिवर्तन करावे लागणे, नोकरीत बदल वा अधिक कामाचा त्रास, शत्रूंचा उपद्रव असे काही घडू शकते. संततीबाबत चिंता निर्माण होऊ शकते.
शुभ दिनांक- १, ४, ५.

मीन- आर्थिक सहजतेतून समाधान
या आठवड्यात आपणास सुरुवातीस लाभलेले ग्रहमान बघता आर्थिक आघाडीवर सहजता व त्यातून लाभलेले समाधान दिसेल. मात्र असे असले तरी मेहनतीची कास सोडू नये. काहींना कोर्टाद्वारे नुकसानभरपाई मिळण्याच्या स्वरूपात किंवा वाटणीच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळू शकतो. छंद-कला यांच्या माध्यमातून व्यवसाय उभारणार्‍यांनादेखील हा काळ आर्थिक लाभाचा ठरावा. काहींना मात्र हा काळ संततीबाबत चिंता निर्माण करणारा ठरू शकतो. त्याचप्रमाणे हृदयाचे, पोटाचे त्रास असलेल्यांनीही सध्या काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चीज होताना दिसेल. मिळणार्‍या यशाने समाधान वाटावे.
शुभ दिनांक- २, ३, ६.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६