कै. दत्तोपंतांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित करावे

0
77

रविवारची पत्रे
थोर कामगारनेते, भारतीय मजदूर संघाचे संस्थापक कै. दत्तोपंतजी ठेंगडी यांचा जन्म आर्वी, जिल्हा वर्धा (महाराष्ट्र) येथे १० नोव्हेंबर १९२० रोजी झाला. त्यांचे वडील बापुरावजी दाजीबाजी ठेंगडी आर्वीचे नामांकित वकील होते. आईचे नाव जानकीबाई. दत्तोपंतांचे हायस्कूलपर्यंतचे शालेय शिक्षण आर्वीत झाले. आर्वीच्या म्युनिसिपल हायर सेकंडरी स्कूलमधून ते मॅट्रिक झाले व पुढे त्यांनी बी. ए., एलएल. बी. केले.
ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. तेथूनच त्यांना देशसेवेचे वेड लागले. त्यांनी आर्वी येथील आपल्या पैतृक निवासस्थानावरील सर्व हक्क सोडून, आपला लहान भाऊ नानाजी यांना ते घर दिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी देशभर दौरे केले. त्यातून त्यांना कामगारांची दैनावस्था दिसली. मालक, कामगारांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करीत आहेत व त्याविरुद्ध कामगारांच्या हक्कासाठी लढा उभारण्याची आवश्यकता भासू लागली. त्यातूनच भारतीय मजदूर संघाचा उदय झाला. त्यांनी भारतीय मजदूर संघ नावाचे लावलेले लहान रोपटे आज विशाल वटवृक्ष बनले आहे.
ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, जीवनाच्या अंतिम श्‍वासापर्यंत प्रचारक होते. राष्ट्रीय स्वयंसेवकव्यतिरिक्त भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच इत्यादी संस्थेशी संलग्न होते. या सर्व संस्थांंतर्गत त्यांनी अहोरात्र समाजसेवा केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकाने ‘पद्मभूषण’ अलंकार देण्याचे ठरविले. त्यास त्यांनी विनम्रपणे नकार दिला. कारण सर्वांनाच माहीत आहे. कोणतीही मोह, माया, राग, लोभ न बाळगता त्यांनी समाजसेवेचे कार्य अहोरात्र, जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत केले. या थोर समाजसेवक व कामगारनेत्याचे महानिर्वाण वयाच्या ८४ वर्षी दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजी झाले.
ना. बा. ठेंगडी यांनी आर्वीचे पैतृक घर, आर्वीतील घनश्यामजी शर्मा-पालिवाल यांना विकले होते. हे घर आजसुद्धा सुस्थितीत आहे. थोडी डागडुजी जरुरी आहे. पालिवाल यांना त्या घराची योग्य किंमत देऊन सरकारने खरेदी करावे व त्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे.
देशात अनेक दिवगंत देशभक्त, समाजसेवी, देशासाठी प्राण देणार्‍या शहीद सैनिकांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकांपासून देशात देशभक्तीची भावना निर्माण होते व त्यांनी केलेल्या कार्यापासून प्रेरणा मिळते. तरी दत्तोपंतांचे स्मारक उभारून त्यात त्यांच्या कार्याची माहिती, छायाचित्रे इत्यादी लावून त्यांनी देशासाठी केलेल्या कामाची माहिती जनतेला व खास करून नवीन पिढीला करून द्यावी. त्यापासून जनतेला प्रेरणा मिळेल.
तसेच तळेगाव-आर्वी-पुलगाव हा राजमार्ग आर्वी शहरातून उत्तर-दक्षिण जात असून, हा रस्ता चौपदरी करण्यासाठी मंजूर झाला आहे. याच रस्त्यावर पुलगावकडे जाताना रस्त्याच्या पश्‍चिमेकडे कै. दत्तोपंतांचे पैतृक घर आहे. रस्ता रुंदीकरण करताना कै. ठेंगडी यांचे घर पाडण्यात येऊ शकते. तरी त्याला वाचविणे फार जरुरी आहे. जेथे हे घर आहे तेथे रस्त्याला नागमोडी वळण देता येईल.
सरकारला विनंती आहे की, कै. दत्तोपंतजींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्मारक बनविण्याचे काम सुरू करावे व त्यांच्या जन्मशताब्दी १० नोव्हेंबर २०२० ला स्मारक अर्पण करून त्यांना श्रद्धांजली द्यावी.
राजकुमार विठ्‌ठलदासजी जाजू
आर्वी

शतदा प्रेम करावे ‘तरुण भारत’ वर…
तरुण भारतचे प्रबंध संचालक धनंजय बापट यांच्या, ११ एप्रिल २०१७ च्या हितगुज या स्तंभात ‘वाढता वाढता वाढे, वाचक मंडळ’ हा लेख वाचला आणि जुने दिवस आठवले. आठवणी दाटून आल्या. बाळासाहेब देवरस एकदा म्हणाले, तरुण भारत सर्वांनी वाचणे आवश्यक आहे.
झेंडा चौक येथे राहणारे कॉंग्रेसचे एक नेते होते. ते महाराष्ट्र दैनिकात सातत्याने संघावर टीका करणारे लेख लिहायचे. संघशाखेच्या वार्षिक उत्सवाची पत्रिका घेऊन मी आणि बबनराव माताडे त्यांच्या घरी गेलो. त्यांना वाकून नमस्कार केला आणि कार्यक्रमाला या, अशी विनंती केली. ते म्हणाले, मी तर संघाचा कट्‌टर विरोधी आहे. आम्ही म्हणालो, संघकार्याची ताकद वाढावी म्हणून आपणासारख्यांपासूनच आम्हाला प्रेरणा मिळते. आम्ही सर्व एकाच समाजाचे घटक आहोत. त्यात कोणतेही वेगळेपण नाही. आपण तरुण भारत वाचता म्हणून आपणास निमंत्रण द्यायला आलो आहे.
आम्ही तरुण भारत जाळल्यानंतरची स्थिती पाहिली आहे. पण, तरीही तरुण भारताने जिद्द न सोडता आणि खचून न जाता पुन्हा भरारी घेतली. आणिबाणीच्या काळातही तरुण भारताचा वाचकवर्ग किती वाढला होता, हेही आम्ही पाहिले. नंतर बाळासाहेब देवरस तरुण भारताचे अध्यक्ष असताना झालेला विकासही आम्ही पाहिला आहे. अनेक वर्तमानपत्रे स्पर्धेत आली. व्यावसायिकतेला उधाण आले, तरीही या स्पर्धेशी हिमतीने सामना करीत केवळ वाचकांमुळेच तरुण भारतने आजपर्यंत ही प्रगती साधली आहे. धनंजय बापट यांच्या लेखामुळे त्या जुन्या स्मृती पुन्हा दाटून आल्या. अतिशय खडतर मार्गावरून मार्गक्रमण करीत तरुण भारत आज निरंतर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय विचारांना सर्वोच्च प्राधान्य देत वाढतच आहे. अनेक दिग्गज संपादक तरुण भारतला लाभले. अनेक मोठे लेखक, कवी तरुण भारतने घडविले आहेत. तरुण भारतवर प्रेम करणार्‍या वाचकवर्गामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. हा वाचकवर्ग उत्तरोत्तर वाढतच जाईल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. राष्ट्रचिंतनाचा हा महायज्ञ असाच धगधगत राहणार आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, शतदा प्रेम करावे ‘तरुण भारत’वर…
मधुकर अमृत डबीर
महाल, नागपूर

हम तुम्हे चाहते हैं ऐसे, मरनेवाला कोई जिंदगी…
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि राजनेते विनोद खन्ना यांचे कर्करोगाने, वयाच्या सत्तराव्या वर्षी दुःखद निधन झाले. अवघी सिनेसृष्टी आणि चाहते ही बातमी कळताच हळहळले. १९४७ ते २०१७ पर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास अखेर विसावला.
पाकिस्तानातील पेशावर इथे जन्मलेला हा कलावंत खानदानी व्यावसायिक होता. परंतु, त्यांच्यात दडलेल्या कलाकाराने त्यांना मुंबई सिनेसृष्टीत आणले. उत्तरेकडे हमखास आढळणारी उंची आणि देखणेपण त्यांच्यात ठास्सून भरले होते. समकालीन नायकांपेक्षा ते दिसण्यात काकणभर सरसच होते. आपल्या कारकीर्दीची सुरवात भलेही त्यांनी खलनायक म्हणून केली, पण अल्पावधीतच ते आघाडीचे नायक म्हणून नावारूपाला आले. जवळपास १४१ चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखविली. कारकीर्दीच्या सर्वोच्च पातळीवर असताना अचानक त्यांना आध्यात्मिकतेची ओढ लागली. पुण्यातील ओशो आश्रमात काही काळ त्यांचा वावर होता. पण, भ्रमनिरास झाल्याने ते परत आपल्या संसारिक दुनियेत वापस आले. जवळपास पाच वर्षांनी कमबॅक करताना दयावान, इन्साफ, चांदनीसारख्या चित्रपटांतून आपला ठसा उमटवला. नंतर त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून काम केले.
या दुसर्‍या इनिंगमध्ये काही काळ रमल्यावर त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि यात ते कमालीचे यशस्वी ठरले. आपल्या मनमिळावू स्वभाव, सकारात्मक राजकारण आणि जनतेशी समरस होण्याच्या कलेने ते गुरुदासपूरमधून लागोपाठ चौथ्यांदा खासदार झाले. अधूनमधून ते काही चित्रपटांत झळकलेसुद्धा. अगदी महिनाभरापूर्वी त्यांचा हॉस्पिटलमधला फोटो पाहून तमाम रसिकांना आपल्या डोळ्यांवर विश्‍वासच बसत नव्हता. कदाचित, हे खरे ठरू नये, अशी मनोमन सर्वच प्रार्थना करत होते. पण, नियती किती निष्ठुर असते, याचा परत एकदा प्रत्यय आला. ‘अमर अकबर अँथनी’मधला हा अमर खरोखरच अमर झाला, यावर विश्‍वासच बसत नाही.
कलेवर मनस्वी प्रेम करणार्‍या, दिलदार कलाकाराची कारकीर्द ‘मन के मीत’ ते ‘दिलवाले’ अशी ‘दबंग’ राहिली. ‘मुकद्दर का सिकंदर’ असणारा हा पठ्‌ठ्या ‘दयावान’ होता. ‘चांदनी’च्या प्रेमात पडणारा हा अस्सल ‘दिलवाले’ होता. ‘मेरा गाव मेरा देश’चा हा वीर आपल्या लोकांसाठी ‘इन्साफ’ देणारा होता. कधीही ‘हेराफेरी’ न करणारा, ‘हम तुम और वो’साठी जीव ओवाळून टाकणारा होता. चाहत्यांसाठी कोणतीही ‘कुर्बानी‘’ द्यायला सदैव तत्पर असायचा. मात्र, आयुष्याच्या अखेरीस कॅन्सरच्या ‘द बर्निंग ट्रेन’मध्ये या कलाकाराची आहुती पडली. अशा या हरहुन्नरी कलावंत, आध्यात्मिक व्यक्ती आणि राजनेत्याला तमाम चाहत्यांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
डॉ अनिल पावशेकर
९८२२९३९२८७

महा ई-सेवा केंद्रातून पैसे कुठे गेले?
डिसेंबरमध्ये दीनदयालनगर, पांडुरंगेश्‍वर शिव मंदिर प्रांगणात महाराष्ट्र शासनाच्या महा ई-सेवा केंद्र, गोपालनगर शाखा यांच्या वतीने एक शिबिर भरवण्यात आले होते. या शिबिरात वस्तीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, स्मार्ट कार्ड इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या संखेने नागरिकांना आकर्षित करण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे नागरिक गोळा झाले. यात ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी प्रत्येकी ३० रुपये घेण्यात आले. मी, आम्हा दोघांसाठी ६० रुपये जमा केले व जेव्हा या रकमेची पावती मागितली तेव्हा ती नाकारण्यात आली व कार्ड १५ दिवसात घरपोच येईल, याची हमी देण्यात आली. आज चार महिने होऊन गेले तरी ना कार्ड आले ना कोणी उत्तर द्यायला तयार आहे. जेव्हा गोपालनगर केंद्रात फोन केला (जवळपास १० वेळा) तेव्हा धड उत्तर न देता टाळाटाळ करण्यात आली व वेगवेगळी कारणे देऊन बोळवण करण्यात आली. माझ्यासारखे अनेक ज्येष्ठ नागरिक अजून कार्डची वाट पाहात आहेत. त्या पैशाचे काय झाले व कोणत्या खात्यात गेले, काही कळायला मार्ग नाही. या शिबिरात भाजपाचे मोठमोठे नगरसेवक ठाण मांडून बसले होते. शासकीय सेवेसाठी घेतलेल्या पैशाचा हिशोब कोणाला मागावा? या अनागोंदी कारभारास कोण जिम्मेदार आहे व अशा शिबिरांद्वारे नागरिकांची फसवणूक का करण्यात येत आहे, हा प्रश्‍न उपस्थित होतो. जर ८ दिवसांच्या आत आमचे कार्ड आले नाही तर आम्हाला योग्य तो कायदेशीर मार्ग अवलंबवावा लागेल.
राजीव दारव्हेकर
९०९६३२२२००

राज्यातील मनोरुग्णांची स्थिती चिंताजनक
आपल्या राज्यात सरकारी मनोरुग्णालयांची संख्या, मनोरुग्णांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यांची अवस्थाही चांगली नाही. केवळ कायदा केल्याने मनोरुग्णांना, नैराश्याने ग्रासलेल्या लोकांना दिलासा मिळणार नाही. त्यासाठी मानसिक उपचार करणार्‍या डॉक्टरांची सुविधाही सरकारने उपलब्ध करून द्यायला हवी. अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरांत अडकलेल्या समाजात अद्यापही मनोरुग्णांवर जादूटोणा, मांत्रिकाकडून अघोरी उपचार केले जातात. मनोरुग्णांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातो. मनोरुग्ण असलेल्या घरातले सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत असल्याने, असा रुग्ण बहुतांश घरातल्या लोकांनाही नकोसा वाटतो, हे कटु सत्य आहे. मनोरुग्णाला सांभाळायसाठी आणि त्याच्यावर वैद्यकीय उपचार करायसाठी गरीब कुटुंबांची आर्थिक परिस्थितीही नसते. याकरिता मानसिक आजार समजून घेऊन कुटुंबीयांनीही मनोरुग्णावर मानसिक आणि वैद्यकीय उपचार करायला हवेत. त्यासाठी सरकारनेही जिल्हा पातळीवर अशा मनोरुग्णांसाठी मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध करायला पाहिजे, जी अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळते. निराशाग्रस्त व्यक्तीला त्या विकारातून बाहेर काढण्यासाठी समाजानेही त्याला चांगली वागणूक आणि धीर द्यायला पाहिजे. कर्जबाजारीपणामुळे निराश झालेल्या राज्यातल्या २० हजाराच्या वर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्यांच्या आत्महत्यांचे हे सत्र थांबलेले नाही, ही बाब लक्षात घेता, मनोरुग्णांची समस्या किती बिकट आणि अवघड आहे, हे लक्षात येते.
प्रा. मधुकर चुटे
९४२०५६६४०४

ही आहे खरी भारतीय संस्कृती!
धर्म-रूढी-प्रथा-परंपरा या मीडियाच्या अखत्यारीतील विषयांना धक्का देणारी भारतीय संस्कृतीची प. बंगालच्या कोलकात्यातील मालदा जिल्ह्यात एका गावातील मुस्लिम समाजाने दाखवून दिलेली माणुसकीची घटना! विश्‍वजित रजक याचा यकृताच्या कर्करोगाने मृत्यू झाल्यावर, त्याच्या अंत्यविधीलाही रक्कम घरात नाही, हे समजताच परिस्थितीचे भान ठेवून, त्याच्या कुटुंबीयांची परवानगी घेऊन मुस्लिम तरुण व मशिदीचे मौलवी यांनी त्या मृतदेहाचा हिंदू पारंपरिक विधीने ‘राम नाम सत्य हैं’ या ललकारीने अंत्यविधी केला आणि भारतीय संस्कृतीचे जतन केले. यालाच माणुसकी म्हणतात! हे डाव्यांना रुचणारे नाही. हीच माणुसकी पाकिस्तानशी सलगी तोडून सर्व मुस्लिम बांधवांनी दाखवावी व प्रत्येक जाती-धर्माचा भारतीय हा हिंदुस्थानी आहे, हे अखिल जगाला दाखवून द्यावे. तरच नवभारताची निर्मिती भारतीयांच्या मनोकामना पूर्ण करेल हे नक्की!
अमोल करकरे
पनवेल

आपल्या देशाचे दुर्दैव
बाबरी ढांचा १९९२ रोजी कोसळला. या गोष्टीला २५ वर्षे होत आली, तरी अजून अयोध्येत राममंदिर होण्याचे चिन्ह दिसत नाही. कोर्ट-कचेर्‍यांमध्ये एवढा विलंब लागतो, ही या देशाची शोकांतिका आहे. वास्तविक पाहता, अयोध्येत राममंदिर पाडून तेथे बाबरी ढांचा बांधण्यात आला. तेव्हा मुस्लिम राजवटीत कोणी अडथळा आणला नव्हता. परंतु, आता आपल्याच देशात राममंदिराच्या जागेवर मंदिर न होऊ देण्यात राजकारणी लोकांनीच खेळ सुरू केला आहे. राजकारणामुळेच योग्य गोष्टी होऊ शकत नाही, त्याचेच हे उदाहरण आहे. ज्या प्रमाणे सोमनाथ मंदिर परत बांधण्यात आले त्याच प्रमाणे अयोध्येत राममंदिरही झाले असते. परंतु, राजकारणी लोक एकमेकाशी शत्रूसमान वागल्यामुळे आज २५ वर्षे होऊनदेखील राममंदिर होण्याचे चिन्ह दिसत नाही. हे या देशाचे दुर्दैव राजकारणामुळे आहे. बाबरी ढांचा कोसळायच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आयोगानेदेखील १७ वर्षे घेतली. मग दोषी कुणाला ठरवायचे? वास्तविक पाहता हे सहज होण्यासारखे काम आहे. परंतु, मंदिरासारख्या वास्तूच्या कामातदेखील राजकारण आणले जात आहे, हे देशाचे दुर्दैव नाही काय?
डॉ. व. गो. देशपांडे
नागपूर

सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्यच
आरक्षण घेणार्‍यांना आता आरक्षण कोट्यातूनच नोकरी मिळेल, हा निर्णय योग्य व अभिनंदनास पात्र आहे. पितृतुल्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अशिक्षित, आर्थिक दुर्बल असलेल्या लोकांसाठी आरक्षण आणले होते. आज ७० वर्षे झालीत, परंतु आरक्षण तसेच! आता तर प्रत्येक समाज स्वत:साठी वेगवेगळे आरक्षण मागत आहे. त्यासाठी मोर्चे, गदारोळ चालू आहे. समाजात सर्वच जातीचे लोक आहेत. आरक्षण घेणार्‍यांना आता एक लाखाच्या घरात पगार आहे. पालक व शिक्षणक्षेत्रात पाल्यांना याचा लाभ मिळतो. परंतु, समाजात असेही लोक आहेत जे गरीब आहेत. ९५ टक्के मार्क्स मिळून त्यांना ऍडमिशन मिळत नाही व ८५ टक्केवाला ऐटीत कॉलेज-शाळेत जातो. त्यामुळे समाजात द्वेषाची भावना वाढत आहे. आरक्षण सर्वांसाठी आर्थिक बाबींवर असावे. मार्कांनुसार प्रवेश खुला करावा. अर्थात, हा निर्णय कुणीही घेणार नाही. त्यामुळे गठ्ठामतांवर परिणाम होईल.
समाजात जाळपोळ, मारामारीला ऊत येईल. आरक्षण आर्थिक बाबीवर देणार, असा निर्णय घेणारा एखादा धाडसी राज्यकर्ता आहे काय? आरक्षणाच्या कुबड्या काढून सर्व समाज-जातीला एका पातळीवर आणा. सुप्रीम कोर्टाने याबाबतीत प्रथम एक पाऊल पुढे टाकले आहे. एक धाडसी निर्णय घेतला आहे.
निर्मला गांधी
टेलिकॉमनगर, नागपूर