सीआरपीएफ जवानांची गस्त दोन आठवडे थांबणार

0
48

नवी दिल्ली, ३० एप्रिल 
मागील आठवड्यात छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर झालेल्या नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी ‘रोड ओपनिंग ऑपरेशन्स’ पुढील दोन आठवडे थांबवली आहेत. नक्षलवादविरोधी मोहिमांचे विशेष महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रांमध्ये प्राथमिक सोयीसुविधा निर्माण करून देण्यास मोठा विरोध असतो. कारण त्याठिकाणी ‘रोड ओपनिंग ऑपरेशन’ सुरू असते. या माध्यमातून नक्षलग्रस्त भागामध्ये बांधल्या जाणार्‍या रस्त्यांना सुरक्षा पुरवावी लागते. मात्र, ही सुरक्षापथक नक्षल्यांचे लक्ष्य ठरलेले असतात. दंतेवाडामध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर झालेला २४ एप्रिलचा दुसरा सर्वात भीषण हल्ला आहे.
डी. एम. अवस्थी यांनी सांगितले की, जवानांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी काही दिवस हे पाऊल उचलणे भाग आहे. या काळात हे जवान आपल्या शिबिरापासून केवळ ४ ते ५ किलोमीटरच्या अंतरातच गस्त घालतील.
नक्षली हल्ल्याच्या ठिकाणी सीआरपीएफ जवान बचावासाठी ‘तयार’ होते. मात्र, काही जवानांनी जोडे काढून ठेवले होते, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे ते सावधानतेमध्ये कमी पडले काय, या बाबीची तपासणी होणार आहे.
सुकमा नक्षली हल्ल्याचा तपास एनआयएकडे
नवी दिल्ली : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफच्या २५ जवानांचे बळी घेणार्‍या नक्षली हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपविण्यावर केंद्र सरकार गंभीर विचार करीत आहे.
एकाच हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जवानांना वीरमरण आले असल्याने एनआयएकडूनच या प्रकरणाचा तपास करणे योग्य होईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाचे ठाम मत झाले असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.  (वृत्तसंस्था)