केजरीवालांना आता अक्कल सुचली!

0
56

वाचकपत्रे
पराभवासाठी ईव्हीएमच जबाबदार आहे, अशी आदळआपट आणि हल्लागुल्ला केल्यानंतर, संपूर्ण देशातील जनतेने आणि प्रसिद्धिमाध्यमांनीही केजरीवाल यांच्यावर टीकेची एकच झोड उठविल्यानंतर ते एकदम जमीं पर आले आहेत! माझ्या हातून खरंच चुका झाल्या, असे म्हणत ते आता माफी मागत फिरत आहेत. दिल्ली विधानसभेची पोटनिवडणूक आणि महापालिकांच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर त्यांचे डोके तेव्हाही ठिकाणावर आले नव्हते. जेव्हा पक्षातूनच त्यांच्या नेतृत्वावर शंका घेण्याचा सपाटा लावला गेला, तेव्हा कुठे ते ठिकाणावर आले. आता आपण पुन्हा मतदारांकडे, हितचिंतकांकडे जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जनतेने हे विसरू नये की, केजरीवाल यांनी पंजाबच्या निवडणुकीत खलिस्तानवाद्यांना तिकीट दिले होते. मागे त्यांनी नक्षलवाद्यांना तिकीट दिले होते आणि बाटला हाऊस एन्‌काऊण्टर हे बोगस होते, असे म्हणून आमच्या सुरक्षा दलांचा अपमान केला होता. हे पाप ते कुठे भरणार आहेत? ते आता जनतेचे प्रतिनिधी राहिले नसून देशद्रोह्यांचे प्रतिनिधी झाले आहेत! त्यामुळे यानंतरही जनता त्यांना स्वीकारणार नाही, असेच वाटते.
विकास देशमुख
नागपूर

शहीदांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचा आदर्श
प्रसिद्ध क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी सुकमातील शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घोषित करून, आम्ही शहीदांच्या कुटुंबीयांसोबत आहोत, हे दाखवून दिले. त्यापाठोपाठ आयएएस अधिकारी संघटनेनेही शहीदाच्या प्रत्येक कुटुंबाला पाच ते दहा वर्षे दत्तक घेण्याचा व योग्य ती मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. गंभीर आणि आयएएस अधिकारी संघटनेचे अभिनंदन!
वैशाली देशमुख
नागपूर

दिग्विजयसिंह यांना दणका!
कॉंग्रेसचे स्वनामधन्य बोलघेवडे नेते दिग्विजयसिंह यांची गोवा आणि कर्नाटकच्या प्रभारी पदावरून हकालपट्‌टी करण्यात आल्याने त्यांना आपली जागा कळून आलीच असणार. गोव्यात सत्ता येण्यासाठी काहीही प्रयत्न न करता, तेथेही गटबाजीला प्रोत्साहन दिले आणि भाजपाने हातावर तुरी देऊन सत्ता बळकावली. तेव्हापासूनच हा माणूस पक्षासाठी काहीही कामाचा नाही, त्याला काढा, अशी मागणी पक्षातूनच करण्यात आली होती. अखेर कॉंग्रेस श्रेष्ठींनी त्यावर शिक्कामोर्तब केले. गोव्यात जे हाल या माणसामुळे झाले, ते कर्नाटकातही होऊ नये, असा त्यातून अर्थ निघतो. आता त्यांनी टाळ कुटत बसावे.
विनायक पाटील
यवतमाळ

तुरीचा उत्पादन खर्च कमी झाल्याचे स्पष्ट
महाराष्ट्रात सर्वत्र यंदाच्या खरीप हंगामात तुरीचे प्रचंड नव्हे, अभूतपूर्व उत्पादन झाले. गत वर्षी तीन लाख टन उत्पादन झाले असताना, या वर्षी २० लाख टनांवर उत्पादन गेले आहे. याचा अर्थ, तुरीची उत्पादकता गेल्या वर्षीच्या तुलनेत एकरी ३०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे. अजित पवार यांनीही, यंदा तुरीचे बंपर पीक झाल्याचे म्हटले आहे. दुष्काळग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात एवढी तूर झाली की, ठेवायला जागा नाही! याचा सरळ अर्थ असा की, वाढलेल्या तुरीच्या उत्पादकतेमुळे शेतकर्‍याचा उत्पादन खर्च कमी झाला. त्यामुळे तुरीचे बाजारदर व यंदा प्रत्यक्ष आलेला उत्पादन खर्च विचारात घेऊन प्रतिएकर नफा-तोटा पडताळून पाहायला हवा. त्यानंतर समजेल की, गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकर्‍याला नफा झाला की तोटा. माध्यमांनी कोणतीही वस्तुस्थिती जाणून न घेता भावना भडकाविणारी विधाने करू नये.
मिलिंद दामले
९९२१५४४८८१

राणेंना भाजपात मुळीच घेऊ नका!
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोकणात आता कुणी पुसायलाही तयार नाही, अशी बिकट स्थिती त्यांची झाली आहे. कॉंग्रेसने तर त्यांना केव्हाच वाळीत टाकले आहे. ते कॉंग्रेसमध्ये असताना, त्यांनी भाजपाच्या विरोधात केलेली विधाने आठवा. त्यांच्या पुत्राने विदर्भवाद्यांवर केलेले हल्ले आठवा. आता आपला कुणीच वाली नाही म्हणून ते आता भाजपाकडे दयेची भीक मागत आहेत. पण, भाजपा आणि विदर्भविरोधी नेत्याला पक्षात घेतल्याने भाजपाचा कोणताही लाभ होणार नाही, उलट नुकसानच होण्याची अधिक शक्यता आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे मत आधी जाणून घ्यावे. कारण, आतापासूनच अनेक कार्यकर्ते आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. तेव्हा जनमानसाची कदर ठेवून राणेंना भाजपात मुळीच घेऊ नये, अशी आमची विनंती आहे.
संजय सहस्रबुद्धे
नागपूर