तूर डाळ खरेदीतील व्यापार्‍यांचा घोटाळा

0
86

वाचकांचे पत्रे
तूर डाळ खरेदी करताना, शेतकर्‍यांच्या सातबाराचा गैरवापर करून अनेक व्यापार्‍यांनी हमी भावाने तूर विकल्याचे लक्षात आले असून, यात प्राथमिक तपासणीत ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे स्वत: मुख्यमंत्र्यांनीच सांगितल्यामुळे, अनेकांच्या मनातील शंका दूर होण्यास मदत झाली. दोन एकर शेती असलेल्या शेतकर्‍याच्या नावावर एक टन क्विंटल तूर खरेदी दाखविल्याचे निदर्शनास आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यात नाफेड आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचेही संगनमत असल्याने तातडीने तपास करून अशा दोषी अधिकार्‍यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करायला हवेत. सोबतच ज्या शेतकर्‍यांनी आपल्या सातबाराचा वापर करू दिला, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. एकीकडे प्रामाणिक शेतकरी १५ दिवसांपासून तूर खरेदी केव्हा होईल, याची वाट पाहात असताना, व्यापार्‍यांनी आपले खिसे भरणे, ही अतिशय संतापजनक बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी दोषींचा बुरखा जनतेसमोर फाडावा, अशी माझी मागणी आहे.
भाऊराव पाटील
यवतमाळ

केजरीवालांचे लोका सांगे ब्रह्मज्ञान…
पंजाब, गोवा, दिल्लीतील राजौरी गार्डन विधानसभा पोटनिवडणूक आणि नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या तीन महापालिकांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला सर्वत्र पराभवाचे तोंड पाहावे लागल्यामुळे, केजरीवाल धास्तावून गेले आहेत. त्यामुळेच की काय, त्यांनी महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांना ‘मी पक्ष सोडून जाणार नाही,’ अशी शपथ दिली. हे पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही! राजकारणात अशा शपथा घेतल्या जातात का कधी? शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अनेकदा आई भवानीची शपथ दिली. पाळली का त्यांच्या आमदार आणि नगरसेवकांनी? आता केजरीवालही तेच करीत आहेत. मजेची बाब म्हणजे, ‘‘मैं अपने बच्चोंकी कसम खाता हूँ’’ म्हणणार्‍या केजरीवालांनी स्वत:च आपली कसम तोडली आहे! याला म्हणतात, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण!’ दुसरे काय?
अरुण देशपांडे
नागपूर

सेनेच्या ५६ पैकी ५५ जणांची अनामत जप्त!
केजरीवाल यांच्यासारखाच काहीसा रोग शिवसेनेच्या नेत्यांना जडलेला दिसतो. मोदींना शह देण्यासाठी आणि हिंदू मतांचे विभाजन व्हावे, या नीच उद्देशाने शिवसेनेने दिल्ली महापालिका निवडणुकीत ५६ उमेदवार उभे केले. पण, ५६ पैकी ५५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. याला म्हणतात, हात दाखवून अवलक्षण! अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपासोबत युती तोडावी आणि स्वबळावर संपूर्ण देशात मुक्तपणे निवडणुका लढवाव्यात. एकीकडे सत्तेचा मलिदाही चाखायचा आणि दुसरीकडे हिंदू मतांची विभागणी करायची, या चालीकडे महाराष्ट्रातील मतदार गांभीर्याने बघत आहे. याचा वचपा ते येत्या निवडणुकांमध्ये काढतील, यात मुळीच शंका नाही.
विश्‍वास काळे
अमरावती

श्रीमंत शेतकर्‍यांवर आयकर का नाही?
अधिक उत्पन्न घेणार्‍या शेतकर्‍यांवर आयकर लावावा, अशी सूचना नीती आयोगाने नुकतीच केल्यावरून, शेतकर्‍यांचे कैवारी असलेल्या राजकीय पक्षांनी एकच गहजब केल्याचे दिसते. त्याचे कारण वेगळेच आहे. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ९ एकर शेतीतून एकाच वर्षात १२ कोटी ४० लाख रुपयांचे उत्पन्न झाल्याचे दाखविले होते! त्या वेळी हा एकच प्रश्‍न शेतकरी विचारीत होते की, सुप्रिया सुळे यांनी अशी कोणती शेती केली की, ज्यामुळे त्यांना ९ एकरात १२ कोटींचे उत्पन्न झाले? शेतीवर कोणताच आयकर लागत नसल्याने त्यांना १२ कोटी उत्पन्नातून आयकर सूट मिळाली होती. अशा ‘प्रगतिशील’ शेतकर्‍यांवर कर लावला तर राष्ट्रवादीच्या पोटात दुखण्याचे कारण काय? सुप्रिया सुळेंनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले असते, तर कर्जमुक्तीचा प्रश्‍नच उद्भवला नसता! मोदी सरकारने, शेतीच्या नावावर अशी करबुडवेगिरी करणार्‍यांवर पूर्वानुलक्षी प्रभावाने कर आकारायला हवा.
विवेक देशमुख
नागपूर

ज्येष्ठ नागरिकांचे वय
वयाची साठी पूर्ण करणार्‍या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिक म्हणून गणले जाईल, असे नुकतेच केंद्र सरकारने म्हटले आहे. महाराष्ट्र शासनानेही ही वयोमर्यादा ६० वर्षेच केली आहे. परंतु, एसटी महामंडळ हे मानायला तयार नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये सवलत मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी एसटीला तसे आदेश द्यावेत.
सुधाकर अजंटीवाले
०७१५२-२४३८०६