उद्धवजी, जरा भानावर या!

0
53

वाचक पत्रे
राज्यात भाजपाच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आहे. शिवसेना त्यात सहभागी आहे. पण, तरीही शिवसेनेचे पक्षप्रमुख सातत्याने सरकारवर अन भाजपावर टीका करीत असतात. त्यांचे धोरण नेमके काय आहे, हेच जनतेला कळायला मार्ग नाही. जनता म्हणते एकतर तुम्ही सत्तेत राहून टीका करू नका किंवा मग सत्तेबाहेर राहून टीका करा. काय चुकले हो जनतेचे? काहीच नाही. उद्धव ठाकरे यांनी भाजपाची वाढलेली ताकद आता मान्य केली पाहिजे, अन्यथा स्वत:ची ताकद दाखवून दिली पाहिजे. म्हणूनच त्यांना म्हणावेसे वाटते-उद्धवजी, जरा भानावर या!
पिनाकीन साठे
कोल्हापूर

लाल दिवे शान होती…
मंत्री आणि अधिकार्‍यांच्या वाहनांवरील लाल दिवे गेल्याचा आनंद आम्हाला जरूर झाला. पण, त्याचवेळी दु:खही झाले. लाल दिवे ही गाड्यांची शान होती. भारतासारख्या विशाल अन प्रचंड लोकसंख्येच्या देशात अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची वेगळी ओळख त्यामुळे होत होती. पण, आता ती राहणार नाही. दोनतीन दिवसांपूर्वी लाल दिवा काढलेल्या एका वाहनाच्या चालकाला भेटलो. तो खूपच नाराज होता. मला म्हणाला, लाल दिवा होता तर गाडी कशी ऐटीत उभी राहायची. गाडी एखाद्या ठिकाणी पार्क केली तर कोणी हटवायला सांगत नसे. पण, आता तसे राहिले नाही. सगळी मजाच गेली. मलाही त्याचे म्हणणे पटले. कारण, मीसुद्धा एका मंत्र्याच्या शोधात नागपूरच्या रविभवनात फिरत होतो. एकाही बंगल्यासमोर लाल दिव्याची गाडी न दिसल्याने मंत्रिमहोदय नेमके आहेत कुठे, असा प्रश्‍न पडला अन लागलीच भानावर आलो. अरे, आता लाल दिवे तर राहिलेच नाहीत. मग मंत्र्यांच्या पीएला फोन केला अन बंगला शोधला.
मनोज वैद्य
महाल, नागपूर

आपलीही काही जबाबदारी आहे
पंतप्रधान झाल्यानंतर लागलीच नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हाती घेतले अन स्वत:पासून सुरुवातही केली. मोदींचे अभिनंदनही करण्यात आले. पण, पुढे काय? जे मोदींनी केले ते आम्ही नको का करायला? आमच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कोणाची? ती जबाबदारी आमचीच आहे असे आम्ही कधी मानणार? मानले तरी जबाबदारी पार पाडणार का? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं शोधून आम्ही कामाला लागलं पाहिजे. नका करू सगळीकडची स्वच्छता, पण किमान आपण राहतो, तो परिसर तरी स्वच्छ ठेवा ना! शिवाय, नसेल स्वच्छता करायची तर घाण तरी करू नका. आपल्या घरचा कचरा सार्वजनिक ठिकाणी कुठेही न टाकता कचराकुंडीतच तो टाका. असे केले तर स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल, तुमचेआमचे अन देशाचे आरोग्य उत्तम राहील.
संजय विनायक बरबडे
यवतमाळ

सर्जिकल स्ट्राईक करा
पाकिस्तानात घुसून त्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. वारंवार पाकिस्तान भारताला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतात अतिरेकी पाठवून घातपाती कारवाया करण्यासोबतच सीमेपलीकडून गोळीबार करत आमच्या शूर जवानांना कावेबाजपणे मारण्याचा घाणेरडा प्रयत्न पाक करीत आहे. पाकने आमच्या जवानांना ठार तर मारलेच आहे, जवानांच्या मृतदेहांची विटंबनाही केली आहे. त्यांच्या संवेदनाच हरवल्या आहेत. त्यामुळे आता मुर्दाड पाकिस्तान्यांना वठणीवर आणण्याची वेळ आली आहे. याआधी ज्या चुका आम्ही केल्या, तशा चुका आता पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावाला बळी पडण्याची काहीएक गरज नाही. अमेरिका, रशिया ज्याप्रमाणे वागतात, त्याप्रमाणेच वागण्याची गरज आहे. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पाकला कायमची अद्दल घडवली तरच आपला पुढला काळ सुखाचा जाईल, हे लक्षात घेतले पाहिजे.
राम वसंत आमले
डोणगाव

अभिनंदन!
बिल्डरांकडून ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी नुकताच रियल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट लागू करण्यात आला, ही ग्राकांसाठी आनंदाची बाब होय. बिल्डरांच्या मनमानीला चाप लावणारा हा कायदा अस्तित्वात आला, हे आमचे सुदैवच. आता या कायद्याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते अन दोषी बिल्डरांवर खरेच कारवाई होते काय, हे पाहण्यासारखे राहील. कायद्यात घर खरेदी करणार्‍यांच्या हिताच्या अनेक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. ह्या तरतुदी ग्राहकांना नक्कीच दिलासा देतील. यासाठी सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. जे बिल्डर नियमांचा भंग करतील त्यांना तीन वर्षेपर्यंत शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली, हे फार बरे झाले. शिवाय, प्रकल्पाची नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले, हे सगळ्यात चांगले झाले. आता ग्राकांनी आपल्या हक्कांप्रति जागरूक राहावे अन तरतुदींचा फायदा पदरात पाडून घ्यावा, एवढेच.
गजानन उर्‍हेकर
नागपूर