अंतर्गत सुरक्षेला धोका

0
90

वेध
ज्याठिकाणी जंगल घनदाट आहे, जिथे विकास झालाच नाही अथवा विकासाचा वेग फार कमी आहे, अशाच भागात नक्षलवाद फोफावला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आणि हाच नक्षलवाद आमच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण करीत आहे. ही बाब लक्षात घेत नक्षलप्रभावित भागात विकासाचा वेग वाढवून नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले पाहिजे. पण, ही बाब नक्षलवाद्यांना माहिती असल्यानेच ते विकास कामांमध्ये अडथळे आणतात, विकास कामे करणार्‍यांना धमकावतात, जे मजूर तिथे काम करतात त्यांना ठार मारतात, त्यांचा अनन्वित छळ करतात. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रस्ते निर्माण कार्याला सुरक्षा देणार्‍या सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केला अन त्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले. जो रस्ता सुकमा जिल्ह्यात निर्माण केला जात होता, तो दोन महामार्गांना जोडणारा होता आणि त्यामुळे या भागात विकासाला गती मिळणार होती. पण, ही बाब हेरून नक्षलवाद्यांनी हल्ला चढवून सुरक्षा दलांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला, हे लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही भागाचा विकास करायचा असेल तर त्या भागात आधी रस्ते तयार होणे गरजेचे असते. पण, असे रस्ते तयार झालेत तर आपली या भागावर आज जी पकड आहे, ती ढिली होईल, आपला प्रभाव कमी होईल, हे नक्षलवाद्यांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळेच ते सातत्याने विकास कामात अडथळे आणण्याची योजना आखून ती अंमलात आणत असतात. मोठ्या संख्येत सीआरपीएफचे जवान गस्तीवर होते. पण, नक्षलवादी दबा धरून बसले होते. घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केल्याने सीआरपीएफच्या जवानांना मोठी प्राणहानी सहन करावी लागली. नक्षलवाद्यांना आता कायमचा आवर घालण्याची वेळ आली आहे. एक काळ तर असा होता की देशातील १२ राज्यांमध्ये नक्षलवाद्यांनी आपले अड्डे तयार केले होते. पण, सुरक्षा दलांच्या संरक्षणात प्रशासनाने विकासाला गती दिली आणि नक्षलवाद्यांचे अनेक ठिकाणचे अड्डे उद्‌ध्वस्त केले. त्यामुळे नक्षलवादी त्या भागातून पळाले. मात्र, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, महाराष्ट्र यासारख्या काही राज्यांमध्ये अजूनही विकास न झालेली जी ठिकाणं आहेत, तिथे नक्षलवादी तळ ठोकून आहेत. हा अंतर्गत सुरक्षेला असलेला धोकाच आहे. हा धोका ओळखून सरकारने नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडणारा कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. नक्षलवाद ही एक स्वार्थी लोकांची चळवळ असल्याचे स्पष्ट झाले असल्याने ही चळवळ मोडून काढताना सरकारने कसलाही विचार करू नये.

नक्षल्यांचे खच्चीकरण आवश्यक
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्याच्या जंगलात नक्षलवाद्यांनी घात लावून सीआरपीएफच्या जवानांवर अमानुष गोळीबार केला अन त्यात आमचे २५ जवान शहीद झाले. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला, हळहळला. गेल्या काही दशकांपासून दरवर्षी अशा प्रकारचे दोनतीन मोठे हल्ले नक्षलवाद्यांकडून केले जातात अन त्यात आमचे शूर जवान शहीद होतात. अनेकदा तर हे नक्षलवादी रस्ते आणि पूल निर्मितीचे काम करणार्‍या गरीब मजुरानांही लक्ष्य बनवितात. कधीकधी पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून ते सामान्य नागरिकांचाही बळी घेतात. पश्‍चिम बंगालच्या नक्षलबाडी ह्या भागातून १९६० च्या दशकात नक्षलवादाचा प्रारंभ झाला असे सांगितले जाते. समाजातील दीन-दलित-पीडित-शोषित-वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढा पुकारला आहे, असा युक्तिवाद प्रारंभी नक्षलवाद्यांकडून केला जात असे. पण, असा लढा पुकारणार्‍यांचा भारतीय संविधानावर विश्‍वास नाही अन ते संविधानाच्या विपरीत वागतात, हे कालांतराने स्पष्ट होत गेले. आता तर ते सूर्य प्रकाशाएवढे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नक्षलवादाचा खरा चेहराही देशापुढे आला आहे. सगळे काही बंदुकीच्या धाकाने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आमच्या भोळ्याभाबड्या आदिवासी बांधवांना सरकारविरोधात भडकवायचे, प्रस्थापितांविरुद्ध त्यांची मनं कलुषित करायची अन स्वत:चा स्वार्थ साधायचा, हाच नक्षलवादी चळवळीत असलेल्यांचा धंदा झाला आहे, हे सांगायला आता कोण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. हळूहळू नक्षलवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मिळविली आणि एका विशिष्ट वर्गाचा वैचारिक पाठिंबाही मिळविला. अन त्या भरवशावर मग त्यांनी शासनाला वेठीस धरणे सुरू केले. आता तर ते सुरक्षा दलांना मोठे आव्हान देत आहेत. सुरक्षा दलांशी समोरून लढण्याऐवजी मागून प्रहार करण्याचा भ्याडपणा ते करीत आहेत. अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. तिकडे पाकिस्तान, चीन हे सतत कुरापती करीत असतात. त्यामुळे सीमेवरील सैनिकांना प्राणपणाने लढावे लागते. इकडे आपल्याच देशाचे नागरिक असलेले नक्षलवादी आपल्याच देशाच्या मुळावर उठले आहेत. ही परिस्थिती फार गंभीर आहे. सुकमाचा हल्ला झाल्यानंतर आपल्या गोंदिया जिल्ह्यातही नक्षलवाद्यांनी घात लावून पोलिसांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेने तो उधळला गेला. अन्यथा, मोठा अनर्थ घडला असता. पण, म्हणून धोका टळलेला नाही. नक्षल्यांचे मनोधैर्य खचविणारी एखादी प्रभावी योजना अंमलात आणली गेली तरच पुढचा काळ चांगला जाईल.
नंदकिशोर काथवटे
९४२३१०१९३८