स्टेट बँकेचा अजब एसएमएस

0
63

वाचकपत्रे
भारतीय स्टेट बँकेद्वारा नुकताच खात्यात कमीत कमी ५००० रुपये जमा ठेवण्याबाबत एसएमएस प्राप्त झाला. परंतु एसएमएस प्राप्त होण्यापूर्वी यासंबंधी बँकेत जाऊन विचारले असता कमीत कमी ३००० रुपये जमा ठेवावे लागेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्ष बँकेतील चौकशी व बँकेतर्फे प्राप्त झालेला एसएमएस यात दोन हजारांची वाढ, हे एक कोडंच आहे. कदाचित हे २००० रुपये म्हणजे महामार्गावरील बुडालेला कर असावा, असे वाटते. खरं तर मोदी सरकार बँकेची दारं सगळ्या घटकांसाठी उघडत असताना, ऑनलाईन बँकिंग व्यवहारांना अधिक प्रोत्साहन देऊ इच्छित असताना बँकांनी केलेली ही वाढ व त्याला सरकारची संमती आश्‍चर्यकारक आहे. ही बाब ग्राहकांच्या हिताची निश्‍चितच नाही.
पिनाक दलाल
नागपूर

कम्युनिस्ट राष्ट्रवाद
भारताच्या राष्ट्रपतिपदासाठी कम्युनिस्ट पक्षाने शरद पवारांचे नाव सुचवून, स्वतःला राष्ट्र संकल्पनाच मान्य नसताना हा कम्युनिस्ट राष्ट्रवाद अचानक उफाळून आला ही आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. पण ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न लवासा, डायनॅमिक दूध कंपनी, पवन ऊर्जा कंपनी या माध्यमातून हजार कोटींच्या वर आहे; तरीही ते कुटुंब शेतकरी कुटुंबांना मदत न करता संघर्ष यात्रेत सहभागी होते; ते राष्ट्रपती झाल्यावर देशाचे काय भलं करणार, यावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होणार आहे. भाजपामध्ये या पदासाठी कोणीच लायक नाही ही सूचना कम्युनिस्टांनी देणे म्हणजे तो विनोदच ठरेल.
अमोल करकरे
पनवेल

प्रकल्पग्रस्तांनी संघटित व्हावे
नागपूर करारानुसार विदर्भातील युवकांना ३३ टक्के नोकर्‍या देण्याचा करार झाला होता. प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त ८ टक्के युवकांनाच रोजगार मिळाला आहे. विदर्भात सर्व वरिष्ठ पदांवरील अधिकारी मुंबई-पुण्याकडीलच आहेत. कारण देतात, वैदर्भीयांत पात्रता नाही. सरकारी, खाजगी प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केल्या जातात, तेव्हा प्रत्येक घरातील एक किंवा दोन युवकांना रोजगार देण्याचे आश्‍वासन मिळते. पण, शेतकरी हा फारसा शिकला नसल्याने त्याच्यात शैक्षणिक पात्रता नाही, असे कारण देऊन अन्याय करतात.
प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करतात. २० वर्षे लोटली, अजूनही अनेक प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या मिळालेल्या नाहीत. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. सरकारला जाब विचारण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात संघटन उभारणे, नोंदी करणे, जनजागृती करणे हे कार्यक्रम हाती घेतले जावे. यानंतर कास्तकारांनी सरकारला आपली अर्धा एकर जमीनही संपादित करू देऊ नये, अशी माझी सर्व शेतकर्‍यांना विनंती आहे.
घनश्याम बोढे
९७६५९४१९१७

कॉंग्रेसमुक्त भारत करा,
पण जरा सांभाळून…
कॉंग्रेसमुक्त भारताचे नरेंद्र मोदींचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे आणि या उपक्रमात कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांची मोठी साथ लाभत आहे. यासाठी अनेक कॉंग्रेसजन भाजपावासी होत आहेत. त्यामुळे आतापासूनच कॉंग्रेसमुक्त भारताचा नारा देणारी भाजपा कॉंग्रेसयुक्त होत असल्याची टीका होत आहे. गडकरी म्हणतात,
आमच्या पक्षात वाल्याचा वाल्मीकी होतो. पण, ही संख्या किती असेल? भाजपाने एक लक्षात ठेवावे, चोर चोरी से जाता पर हेराफेरी से नही जाता. म्हणून कॉंग्रेससह अन्य पक्षाच्या लोकांना प्रवेश देताना ही काळजी घ्यावीच लागणार आहे व ती म्हणजे कॉंग्रेसयुक्त भाजपा होऊ नये. अ पार्टी विथ डिफरन्स हे तत्त्व कायम ठेवा. मला राजा परांजपे यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटातील गाण्याची आठवण झाली. ते गाणे होते… पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, उद्धवा अजब तुझे सरकार… असे ऐकण्याची पाळी भाजपावर येऊ नये.
सुधाकर अजंटीवाले
०७१५२-२४३८०६

पाकिस्तानवर अनेक स्ट्राईक करा
पाकिस्तानच्या नापाक कारवायांत अलीकडे खूपच वाढ झालेली दिसते. एका घटनेत तर त्यांनी आमच्या शूरवीर जवानांच्या शरीराची विटंबना केल्याचेही स्पष्ट झाले. जागोजागी पाकिस्तान आणि नवाज शरीफ यांचे पुतळे जाळण्यात आले.
समाजमत सध्या संतप्त आहे. पाकिस्तानला वठणीवर आणायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर अनेक सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे.
विश्‍वास देशपांडे
नागपूर