जोशनाचे यश

0
77

वेध
लहानपणी कंच्याच्या माध्यमातून एक खेळ खेळला जायचा. त्या खेळाचे नाव होते दिवाल टच. हाच दिवाल टचसारखा खेळ आजच्या युगात स्क्वॅश म्हणून ओळखला जातो. हा खेळ जरी आपल्या देशात फारसा लोकप्रिय नसला तरी आपल्या देशातील खेळाडूंनी मात्र या खेळात लोकप्रियता मिळविली आहे. बंद काचेच्या खोलीत भिंतीवर एक चेंडू टोलावून खेळाडू हा खेळ खेळत असतात. नागपूर शहरात या खेळाची व्यवस्था क्लबमध्येच आहे. जामठास्थित व्हीसीए स्टेडियममध्ये याचे एक चांगले स्टेडियम आहे. मात्र, नागपुरातून अजूनपर्यंत एकही खेळाडू उदयाला आलेला नाही. सध्या या खेळात भारताची जोशना चिनप्पा एक चांगलीच लोकप्रिय खेळाडू आहे. जोशनाने नुकत्याच झालेल्या आशिया स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. हे जेतेपद पटकाविणारी ती पहिली भारतीय महिला स्क्वॅशपटू ठरली आहे. जोशनाच्या या विजेतेपदामुळे भारतीय स्क्वॅशपटूंचा राष्ट्रकुल आणि आशियाडमधील दावा मजबूत झाला आहे. जोशनाने याआधीही अनेक स्पर्धा गाजवून आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. आशिया अजिंक्यपद पटकाविताना जोशनाने आपल्याच देशाच्या दीपिका पल्लीकलचा पराभव केला, हेही येथे उल्लेखनीय आहे. दीपिकानेही या खेळात भारताचे नाव चांगलेच मोठे केले आहे. याच जोशना व दीपिका जोडीने तीन वर्षांपूर्वी ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील स्क्वॅशमधील महिला दुहेरीचे सुवर्णपदक पटकाविले होते. हे सोनेरी यश आमच्या दोघींसाठी खास होते. मात्र, माझ्यासाठी आता मायदेशात मिळविलेले ऐतिहासिक विजेतेपद संस्मरणीय ठरले आहे, असे जोशनाने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. लहानपणापासून या खेळाकडे आकृष्ट झालेल्या जोशनाने आपल्या खेळाची चुणूक दाखवताना वयाच्या १४ व्या वर्षीच पहिल्यांदा राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला होता. चालू वर्षी जोशना आतापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली आहे. त्यापैकी आशिया अजिंक्यपद स्पर्धेत तिने पहिल्यांदा जेतेपद मिळविले तर विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेतील एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत तिने धडक दिली होती. २००३ सालापासून जोशनाने व्यावसायिक स्क्वॅश संघटनेचेही सदस्यत्व स्वीकारले होते. २०१२ ते २०१५ या कार्यकाळात झालेल्या चारही वर्षांच्या राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेतील अजिंक्यपद जोशनाने स्वत:कडेच कायम राखले. मात्र, २०१६ साली जोशनाच्या या वर्चस्वाला दीपिकानेच धक्का दिला होता.

दातृत्वाचे गांभीर्य
मागे एकदा नागपूरला एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे व चौथ्या दिवशीही सकाळी रिपरिप सुरू राहिल्यामुळे चौथ्या दिवशीचा खेळ वाया जाणार हे स्पष्ट झाले होते. अशा परिस्थितीत खेळाडू मैदानावर आलेच नाही. त्यांनी इतरत्र आपल्या सख्ख्यासंबंधितांकडे त्या दिवशी जाऊन भेटीगाठी घेतल्या. जेवायची वेळ झाली तेव्हा मात्र जातीने सर्व खेळाडू स्टेडियममध्ये उपस्थित झाले आणि त्यांनी तेथील जेवणाचा आनंद लुटला. सांगण्याचा मुद्दा म्हणजे एवढे पैसे कमावणारे खेळाडू एका जेवणाचाही खर्च उचलू शकले नाही. एवढेच नव्हे, तर हा मुद्दा इतरत्र मांडला असता हे क्रिकेटपटू हॉटेलमध्येसुद्धा मुक्कामाला असताना आपले कपडे प्रेसला देतात, त्याचे पैसेही देत नाहीत. मिळणारे टॉवेल्सही सोबत घेऊन जातात आदी बाबी समोर आल्या होत्या. यातूनच श्रीमंत असलेल्या क्रिकेटपटूंची मानसिकता व व्यावसायिकता दिसून येते. या घटनांकडे लक्ष देता गौतम गंभीरने दाखविलेले दातृत्व निश्‍चितच कौतुकास्पद व गांभीर्याने विचार करणारे ठरते. गौतम गंभीर सध्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करीत आहे. भारतीय संघाचा एक खंदा फलंदाज म्हणून ओळख असलेल्या गंभीरने छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या २५ जवानांच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. हा निर्णय घेऊन त्याने वरील प्रकारच्या क्रिकेटपटूंसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. समाजाकडून घेण्यापेक्षा आपलेही समाजाला काही देणे लागते, ही भावना जेव्हा मनात निर्माण होते तेव्हा कोठे अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असतात. गंभीरने घेतलेल्या निर्णयाचे आता सर्वत्र कौतुकही होत आहे. देशभक्त नागरिकांप्रमाणे गौतम गंभीरलाही आपल्या लष्कराबाबत आदर आणि अभिमान आहे. काश्मीर खोर्‍यात तैनात भारतीय जवानांना स्थानिक युवकांनी मारहाण केली तेव्हा गंभीरने त्या जवानांची पाठराखण करून घटनेची निंदा केली होती. सुकमा येथील घटनेनेही त्याला अस्वस्थ केले. त्या दिवशी त्याच्या कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडू हाताला काळ्या पट्ट्या लावून खेळले होते. त्या घटनेतील २५ जवानांचे हौतात्म्य गंभीरच्या मनाला चटका लावून गेले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करून किंवा मानवंदना देऊन भागणार नाही, याची त्याला जाणीव झाली. या शहीदांच्या कुटुंबीयांना काही तर मदत करायची या भावनेतूनच त्याने त्यांच्या मुलांचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. तसा गंभीर स्वभावाने थोडा हेकड म्हणूनच ओळखला जातो, मात्र तो हळव्या मनाचाही आहे, हे त्याने घेतलेल्या या निर्णयावरून दिसून येते. गंभीरच्या या पावलावर पाऊल ठेवून इतरही सेलिब्रिटींनी असे पाऊल उचलले आणि शहीदांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला तर देश आपल्या जवानांसोबत आहे, असा सकारात्मक संदेश जाईल. अनेकांना प्रोत्साहन मिळेल.
– महेंद्र आकांत
९८८१७१७८०३