पुन्हा राहुल गांधी आणि भाजपा

0
144

दिल्लीचे वार्तापत्र
••मध्यंतरी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन झाले. या समारंभासाठी राहुल गांधी यांना आमंत्रित करण्याची आयोजकांची इच्छा होती. निमंत्रण देण्यासाठी आयोजकांनी राहुल गांधींच्या कार्यालयाशी संपर्कही साधला होता. मात्र त्यांना भेटीची वेळच मिळाली नाही.
••पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता भाजपाला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांची दाणादाण उडाली. दिल्ली महापालिका निवडणुकीतही भाजपाने देदीप्यमान यश मिळविले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व विजयानंतर भरधाव निघालेला भाजपाचा विजयरथ रोखण्याची ताकद कॉंग्रेससह अन्य कोणत्याही विरोधी पक्षात नसल्याची दिल्लीच्या निकालांनी खात्री पटली आहे.
जुन्या काळात राजेमहाराजे अश्‍वमेध यज्ञ करत असत. या वेळी राजाचा अश्‍वमेधाचा अश्‍व आपल्या पाठीवर राजाचा झेंडा घेऊन निघत असे. ज्या ज्या राज्यात हा अश्‍व जात असे, ते राज्य त्या राजाचे होऊन जात असे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचा प्रभाव वाढवण्यासाठी जणू असाच अश्‍वमेध यज्ञ करत असल्यासारखे चित्र आहे. भाजपाचा कमलरथ एकेका राज्यात जात विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते ते राज्य पादाक्रांत करत आहे.
या निकालांनी सर्वच विरोधी पक्षांना स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. याआधी देशात कधीही कोणत्याही विरोधी पक्षाची एवढी दयनीय स्थिती झाली नव्हती. कॉंग्रेस फुल फॉर्ममध्ये असतानाही त्या वेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपाची एवढी वाईट स्थिती कधीच झाली नव्हती. आधी जनसंघ आणि त्यानंतर भाजपा निवडणुका हरत होता, पण जनसंघ-भाजपाने कधीच आत्मविश्‍वास गमावला नव्हता. ‘अंधेरा छटेगा, सूरज उगेगा, कमल खिलेगा’ असा आत्मविश्‍वास अटलजींना भाजपा स्थापनेच्या वेळी जागविला, नव्या ताकदीने भाजपा पुन्हा रिंगणात उतरला. पण या वेळी विरोधी पक्षांचा निवडणुकीत नुसता पराभवच झाला नाही, तर त्यांनी आत्मविश्‍वासही गमावल्यासारखे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती, ती एवढ्या लवकर प्रत्यक्षात येईल, असे कोणालाच वाटले नव्हते. कधीकाळी केंद्रात आणि देशातील जवळपास सर्वच राज्यांत सत्ता असलेली कॉंग्रेस आता एका हाताच्या बोटावर मावेल, एवढ्या राज्यातच उरली आहे. कॉंग्रेसची स्थिती एवढी खराब होईल, तिला आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागेल, अशी कल्पनाही कोणी केली नसावी. एक काळ होता ज्या वेळी सर्व विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या पासंगालाही पुरत नसत. त्यामुळे कॉंग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना एकत्र येत आघाडी करावी लागत असे. आज त्याच्या उलट चित्र आहे. कॉंग्रेससह देशातील समस्त विरोधी पक्ष भाजपाच्या पासंगालाही पुरत नाही. त्यामुळे भाजपाच्या विरोधात उभे ठाकण्यासाठी त्यांना आघाडीचे शेपूट धरावे लागत आहे.
विशेष म्हणजे, राजकारणातील ज्यांचा सूर्य मावळतीला लागला आहे, अशा कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांना भाजपाविरोधात विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागत आहे. सोनिया गांधींनी प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणातून निवृत्ती घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांना बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण राहुल गांधी या पदासाठी पात्र नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. राहुल गांधींनी आपल्या नेतृत्वात कॉंग्रेसला आतापर्यंत एकही निवडणूक जिंकून दिली नाही. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला निर्विवाद बहुमत मिळाले असले तरी त्याचे श्रेय हे राहुल गांधींना नाही तर पंजाबचे मुख्यमंत्री असलेल्या कॅप्टन अमरिंदरसिंग यांना आहे. राहुल गांधींना पक्षात तशीच बाहेरही पाहिजे तशी स्वीकारार्हता नाही. आपली पक्षातील तसेच अन्य राजकीय पक्षातील स्वीकारार्हता वाढावी म्हणून राहुल गांधीही गंभीर नाही. आपला पक्षातील तसेच अन्य पक्षातील संपर्क वाढला पाहिजे, या दृष्टीने राहुल गांधी यांच्यात राजकीय प्रगल्भतेचा अभाव आहे.
मध्यंतरी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन झाले. या समारंभासाठी राहुल गांधी यांना आमंत्रित करण्याची आयोजकांची इच्छा होती. निमंत्रण देण्यासाठी आयोजकांनी राहुल गांधींच्या कार्यालयाशी संपर्कही साधला होता. मात्र त्यांना भेटीची वेळच मिळाली नाही. प्रकाशन समारंभात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नेत्याने याबाबतची आपली नाराजी तीव्र शब्दात प्रगट केली. एक वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मिळू शकते, पण राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मिळणे अशक्य असल्याचे या नेत्याने सांगितले. अशा कार्यक्रमांचा उपयोग अन्य पक्षातील आपला संपर्क, विश्‍वासाहर्र्ता आणि स्वीकारार्हता वाढवण्यासाठी करायचा असतो, पण तेवढी समज असती तर ते राहुल गांधी कसले?
प्रगल्भता आणि राहुल गांधी यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. मुळात आडातच नाही ते पोहर्‍यात कसे येणार? कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणार्‍या राहुल गांधी यांच्यासमोर राष्ट्रीय पातळीवर आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये आपली स्वीकारार्हता असल्याचे सिद्ध करण्याची चांगली संधी होती, पण ती त्यांनी गमावली. राजकारणात राहुल गांधी आणि दिल्लीचे अरविंद केजरीवाल असे दोन जण आहेत, जे मिळालेल्या संधीचे सोने नाही तर माती करण्यासाठी ओळखले जातात.
त्यामुळेच अन्य विरोधी पक्षातील नेत्यांचाही राहुल गांधींच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर विश्‍वास नाही. परिणामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची व्यूहरचना ठरवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अन्य नेत्यांनी राहुल गांधींची नाही तर श्रीमती सोनिया गांधींची भेट घेतली नसती.
विरोधी पक्षांचे एकत्र येण्याचे निमित्त राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे असले तरी ते एक तात्कालिक कारण आहे. खरे कारण म्हणजे सर्वांनी घेतलेली भाजपाची धास्ती हे आहे. भाजपाला आपण आताच रोखले नाही तर भाजपासमोर आपण पालापाचोळ्यासारखे उडून जाऊ, अशी सर्वांना वाटत असलेली भीती हे आहे. त्यामुळे भाजपाविरोधात आघाडी तयार करण्याची ही सुरुवात असून, त्यासाठी श्रीमती सोनिया गांधी यांना पुढाकार घ्यावा लागत आहे.
राजकारण हा पूर्णवेळ करण्याचा व्यवसाय आहे, पार्टटाईम करण्याचा नाही. राहुल गांधी तर पार्टटाईम राजकारण करतात. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात जास्तीत जास्त दिसण्याचा सल्ला न मागता दिला होता. जे राहुल गांधी आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटत नाही, ते सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेला कसे भेटणार?
निवडणूक ही महापालिकेची असो, विधानसभेची असो की लोकसभेची, ती अतिशय गंभीरपणेच लढवायची असते, ही भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची शिकवण आहे. मुळात पक्षासाठी झोकून देऊन कसे काम करायचे असते, याचा धडा राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्याकडून घ्यायला हवा. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असूनही अमित शाह यांनी पक्षाच्या नेत्यांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर आदर्श घालून देण्यासाठी दीनदयाल उपाध्याय विस्तार योजनेंतर्गत बुथस्तराच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपला १५ दिवसांचा वेळ दिला.
भाजपा उगीच निवडणुकामागून निवडणुका जिंकत नाही. ‘यथा राजा तथा प्रजा’, अशी एक म्हण त्या चालीवर ‘यथा अध्यक्ष तथा कार्यकर्ता’ असे म्हणावे लागेल. पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याच्या तयारीत असलेल्या, सध्या उपाध्यक्ष असूनही अध्यक्षपदाचे सर्व अधिकार असलेले राहुल गांधीच आपल्या कर्तव्याबद्दल गंभीर नसतील, तर त्यांच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते तरी काय करणार?
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७