संघाचा शंखनाद अन् कम्युनिस्टांच्या पिपाण्या

0
138

अग्रलेख
••स्वयंसेवकांनी गेल्या नऊ दशकात केलेल्या त्याग, बलिदान, तप आणि साधनेतून रा. स्व. संघाच्या कार्याला आजचे त्याचे स्वरूप लाभले आहे. कुण्या येरागबाळ्याने संघमुक्तीचे चार-दोन फलक लावल्याने त्याची महती संपत नाही. समाजातील प्रत्येक घटक या कार्याशी जोडण्याच्या प्रयत्नांचे फलित म्हणूनच आज हिंदूंचे हे संघटन जगभरात मान्यता आणि लौकिक प्राप्त करू शकले आहे.
••रानटी सभ्यतेचे जीवनमूल्यच हिंसा आहे. नेमकी त्याच्या विरुद्ध अहिंसेच्या मूल्यांवर भारतीय जीवनपरंपरा आधारलेली आहे. पण राजकारणच काय, मानवी जीवन जगण्याची रीत अन् मूल्येही परदेशातून आयात करून भारतात तग धरू पाहणारी कम्युनिस्टांची जमात ती रानटी सभ्यता अजूनही उराशी बाळगूनच जगते आहे. आपल्याला न पटणारे विचार, आपल्याला न भावलेली एखादी भूमिका पचविणे त्यांना कधीच जमले नाही. मार्क्स असो वा मग लेनीन, आपल्याला न जुमानणार्‍यांचा, आपल्यापेक्षा वरचढ ठरू पाहणार्‍यांना नेस्तनाबूत करण्याच्या नादात रक्तपात करण्यासाठीही न कचरण्याची रीत कम्युनिस्टांचा हा समूह भारतातही अनुसरू पाहतोय्. बंगालात भाजपाध्यक्षांच्या दौर्‍यानंतर सुरू झालेली चलबिचल असो वा मग केरळात रा. स्व. संघ, भाजपा कार्यकर्त्यांचे खून करत अहिंसेचा मुडदा पाडण्याची जी अहमहमिका गेल्या काही वर्षांत कम्युनिस्ट कार्यकर्त्यांमध्ये लागली आहे, त्यातून रक्ताचे जे पाट या परिसरात वाहविले जाताहेत, त्यातून तीच रानटी परंपरा प्रतिबिंबित होते. परवा केरळातील कन्नूर जिल्ह्यातील पेरुंथत्तील गावात रा. स्व. संघाच्या कार्यालयाची तोडफोड झाली. आदल्याच दिवशी मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या केशव स्मृती सेवालयावर लोकांनी चाल करून जावं असं खरं तर काहीही घडलं नव्हतं. परिसरातील लोकांना उपयोगी ठरतील असे विविध सामाजिक उपक्रम तिथनं राबविले जाणार आहेत. पण रानटी सभ्यतेचे प्रतिनिधित्व करणार्‍यांना ते कसे भावणार? त्यांना तेच तर नको आहे. त्यांना तर हा संपूर्ण परिसर संघमुक्त करायचा आहे. तसे कित्येक फलक त्यांनी कन्नूरच्या पंचक्रोशीत लावले आहेत. म्हणूनच केशव स्मृती सेवालयाच्या उभारणीतही आणता येतील तेवढे अडथळे त्यांनी आणले. कार्यालयाचे बांधकाम रोखण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण ध्येयवेडे संघ स्वयंसेवक त्याला बधले नाहीत. कम्युनिस्टांच्या प्रखर विरोधाला भीक न घालता संघाचे कार्यालय एक दिवस दिमाखाने उभे राहिले अन् तिथेच ठिणगी पडली. पोटशूळ उठला. लाख संकटं निर्माण करूनही ज्याचे निर्माण थांबवता आले नाही, ते संघ कार्यालय उभे राहिल्यानंतर पाडण्याची केविलवाणी धडपड चालवली गेली. ही धडपड नेमकी कशासाठी? राष्ट्रीय विचारांची कास धरणार्‍यांना आणि त्या प्रवाहाचे जगभरात प्रतिनिधित्व करणार्‍या संघाच्या कार्यकर्त्यांना जिवानिशी संपविण्याचा घाट गेली कित्येक वर्षे घातला जातो आहे. त्यांचे रक्त सांडवले जात आहे. त्यांनी तर, बापजाद्यांची जहागिरी असल्याच्या थाटात आपापले क्षेत्र संघमुक्त असल्याची घोषणाही आपल्याच स्तरावर करून टाकली आहे. स्वयंसेवकांनी गेल्या नऊ दशकात केलेल्या त्याग, बलिदान, तप आणि साधनेतून रा. स्व. संघाच्या कार्याला आजचे त्याचे स्वरूप लाभले आहे. कुण्या येरागबाळ्याने संघमुक्तीचे चार-दोन फलक लावल्याने त्याची महती संपत नाही. समाजातील प्रत्येक घटक या कार्याशी जोडण्याच्या प्रयत्नांचे फलित म्हणूनच आज हिंदूंचे हे संघटन जगभरात मान्यता आणि लौकिक प्राप्त करू शकले आहे. याच्या उलट कम्युनिस्टांना भारतात ना सुपर पॉवर रशियासारखी औद्योगिक क्रांती करता आली ना चीनसारखी माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली भरारी त्याला इथे मारता आली. साम्राज्यवादाच्या विरोधात गरळ ओकण्यातच त्यांचे दिवस सरताहेत. ज्यांच्या साहाय्याने भारतीय राजकारणात चंचुप्रवेश केला, त्या नेहरूंची किमयाही आता राहिली नाही. इथे तर नेहरूंच्या कौटुंबिक वारसदारांचेच राजकारणातील अस्तित्व धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत कम्युनिस्टांचे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी कॉंग्रेसची मदत होईल, याची सुतराम शक्यता राहिलेली नाही. या स्थितीत नाउमेद झालेल्या या कार्यकर्त्यांना पोटशूळ उठणे स्वाभाविकच आहे. बहुधा त्यामुळेच की काय पण, लोकाभिमुख कार्याचा ठसा उमटवत आपली रेष मोठी करण्यापेक्षा विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांचा जीव घेणे अधिक सोपे वाटू लागले आहे त्यांना आताशा. ३५ वर्षे सत्ता हाती असताना बंगालात अन् कित्येक वर्षांत केरळातही सत्तेच्या माध्यमातून या राज्यांचे स्वरूप पालटण्यात त्यांना यश लाभले नाही ते नाहीच. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न चालल्याचेही दिसत नाही कधी. सत्तेचा सदुपयोग करून आपल्या कामाची चुणूक दाखवण्यापेक्षा त्याचा दुरुपयोग करून विरोधी विचारांची माणसं जिवानिशी संपविण्याचे कटकारस्थान करण्यातच अधिक रस राहिला त्यांना. मूठभर सांप्रदायिक मुस्लिमांना हाताशी धरून राष्ट्रीय विचारांच्या हिंदुत्ववाद्यांच्या कट्टर विरोधाच्या तालावर नाचत कायम त्याच सूत्रावर आयुष्यभर राजकारण करीत राहिल्याने संघाचे स्वयंसेवक नेहमीच कम्युनिस्टांच्या हिटलिस्टवर राहिलेत. आपल्या विचारधारेची पखरण करण्यात पुरते अपयश आल्याने राष्ट्रीयत्वाची भावना जपणार्‍या हिंदुत्ववादाशी त्यांचे कायम वैर राहिले आहे. केरळात कम्युनिस्टांनी आरंभलेला नंगानाच आणि दहशत निर्माण करण्यासाठी जिवंत माणसांचे मुडदे पाडण्याची त्यांची तर्‍हा, तेच वैरत्व सिद्ध करते. कायम गोरगरिबांचे नाव घेतले, साम्राज्यशाहीविरुद्ध ओरड केली, पुंजीवादाचा विरोध केला तरी भारतीय जनमानसात अजूनही कम्युनिस्ट विचारांची पाळेमुळे रुजवता येत नसल्याने आलेले वैफल्य त्यांच्या असल्या रानटी कृत्यातूनच सिद्ध होते आहे. खरं तर असल्या कृत्याला ‘जशास तसे’ धोरणाने त्याच हीन पातळीवरून प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. पण ती संघाची संस्कृती नाही. शिवाय, कम्युनिस्ट हिंदुत्ववाद्यांचा करतात तसा द्वेष संघाला कुणाचाच करता यावयाचा नाही. कम्युनिस्टांना तर काय, कालपर्यंत त्याच्या पखाली वाहणारा कुणी आज विरोधात गेला, तर त्याचाही खातमा करण्यात खंत वाटत नाही. संघाची कार्यपद्धती याबाबतीतही त्यांच्याशी मेळ खात नाही. एकूण, मागील कालावधीत संपूर्ण समाजातून जे पाठबळ संघाला लाभते आहे, त्याची स्वीकारार्हता ज्या वेगाने वाढते आहे, याउलट संघाला कायम विरोध करीत राहिलेल्यांच्या वाट्याला जो पराभव, जे नैराश्य येते आहे, त्यामुळे नाउमेद होत चरफडत राहणे आणि मनातला विखार ‘अशा’ रीतीने व्यक्त करणे एवढेच त्यांच्या हाती शिल्लक राहिले आहे. आणि तेवढेच ते करताहेत. अन्यथा, कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा तोडून, दारं तोडून, तिथल्या सामानाची तोडफोड करून संघकार्य कसे रोखता येईल? पण मती मारली गेली असल्याने कम्युनिस्टांना त्यातही समाधान मिळू लागले आहे. असले कृत्य केल्याने हायसे वाटू लागले आहे. तिकडे, विजय पताका फडकावीत स्वयंसेवकांची घोडदौड सुरू असताना, त्यांनी फुंकलेल्या शंखनादाने सारा आसमंत निनादून निघाला असताना, केरळात कम्युनिस्ट पिपाण्या वाजवण्यात अन् हात दाखवून अवलक्षण करण्यात धन्यता मानताहेत…