वेध

0
58

महासती सीता
प्रभू रामचंद्रांची अर्धांगिनी सीता, देवी म्हणूनच आपल्या देशात मानली जाते. रामाची जशी रामनवमी तशीच सीतेची सीतानवमी आपण कालच साजरी केली. सीता ही अयोध्येचा राजा रामचंद्राची पत्नी, म्हणजेच अयोध्येची राणी, नुसतीच राणी नव्हे, तर महाराणी. स्वयंवरानंतर सीता अयोध्येची महाराणी होण्याकरिता सासरी आली. त्या वेळी कैकेयीने रामाला चौदा वर्षे वनवासात पाठविण्याचे ठरविले. त्याच कैकेयीने सीतेला, ‘‘तुझ्या अंगावरची हळदही अजून उतरली नाही, तू इथेच राजवाड्यात राहा,’’ असे सांगितले. वनवासात जाण्याची कोणतीही सक्ती नसताना, ‘जिथे राम तिथे सीता’ असा ठाम निश्‍चय करून सीतेने वनवास निवडला होता.
वनवासात असताना रावणाने सीतेला पळविले, हा काही तिचा दोष मानला जात नाही. राम आणि लक्ष्मण तिचे संरक्षण करण्यात कमी पडले किंवा कुठेतरी चुकले, हेच महत्त्वाचे. पुढे राम-रावण युद्ध झाले, चौदा वर्षांचा वनवासही संपला. राम, सीता, लक्ष्मण अयोध्येला परतले. तत्पूर्वी लंकेतच रामाने सीतेची अग्निपरीक्षा करून घेतल्याची कथा आहे. यावेळी उपस्थित लक्ष्मण, सुग्रीव आणि हनुमान हे तिघेही या अग्निपरीक्षेच्या प्रकाराने व्यथित, क्रोधित आणि मूक झाले होते, असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. त्यानंतर अयोध्येत रामाला राज्याभिषेक झाला. राम राजा आणि सीता महाराणी झाली. त्यानंतर पुन्हा एक दिवस रामाचे मन बदलले. पुन्हा अग्निपरीक्षा झाली. साक्षात अग्नीने सीतेला शुद्ध ठरविले, पण रामाने तिला पुन्हा वनवासात पाठविले.
रामराम म्हणता वाचे,
सीता खरी हिरकणी |
रामा राज्य, भाऊ तिन्ही
सीतेलावो नाही कुणी ॥
अशा ओळी आपल्याकडे ग्रामीण भागात लोकांच्या तोंडी आहेत, त्या सीतेवरील प्रेमापोटी आणि सहानुभूतीमुळेच. ज्या सीतेने रामासोबत चौदा वर्षे वनवासात आणि काही काळ राजवाड्यातही काढला, तरीही तुम्ही मला ओळखले नाही, ओळखू शकले नाही, असे खुद्द सीतेनेच रामाला म्हटले होते. आपल्याकडे पौराणिक मान्यतांनुसार अहल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी या पाच महासती आहेत. सीता तर संयमी आणि कणखर मानली जाते. कदाचित म्हणूनच असेल, रामायण हे ‘दशाननाचा, म्हणजे रावणाचा वध आणि सीतेचे महत्चरित्र’ आहे, असे खुद्द महाकवी वाल्मिकींनी म्हटले आहे.
रावेरीची स्वयंसिद्धा
सीताचरित्र हा अनेक विद्वान, विचारवंतांसाठी नेहमीच अभ्यास आणि चिंतनाचा विषय राहिला आहे. आपल्याकडील स्त्रीचा, म्हणजे सतीच्या छळाचा हा कार्यक्रम अगदी महासती सीतेपासून सुरू असल्याचे, शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी मांडले आहे. राज्याभिषेकानंतर गर्भवती सीतेला अयोध्येच्या महालातील दोन खोल्या बाळंतपण होईपर्यंत द्यायला काय हरकत होती, असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. तेवढाही मनाचा मोठेपणा पुरुषोत्तम रामाला दाखवता आला नाही. म्हणूनच तर मर्यादा असलेला ‘मर्यादापुरुषोत्तम’ असे रामाला म्हणत नसतील? अखेर जुळी बाळे पोटात असताना सीतेला वनवासात यावे लागले. यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे सीता थांबली आणि तिथे एका खोपटात लव-कुशांचा जन्म झाला, अशा कथेला आपल्याकडे मान्यता आहे.
रामराम म्हणता खरी
सीता मोठी रामापरी |
लवांकुशासाठी राणी
राहे तमसेच्या तीरी ॥
कोणी काहीही म्हटले, तरी सीतेबद्दलची लोकभावना अशीच आहे. रामाचे स्थान तर अढळ आहेच, पण सीतेलाही आपण रामासारखेच मानतो. सीतेसारखीचे हे हाल, तर सामान्य स्त्रीचे काय, असा प्रश्‍न शरद जोशींना नेहमी पडायचा. रावेरीतील सीतेच्या वास्तव्याबद्दल एक कथा आहे. बाळंतपणानंतर पथ्याकरिता सीता गावकर्‍यांकडे पसाभर गहू मागायला गेली. पण, एकेकाळच्या या महाराणीला तेवढीसुद्धा भीक लोकांनी घातली नाही. सीतेचा तळतळाट होऊन तिने शाप दिला, तुमच्या गावात गहू पिकणार नाही! रावेरीचे शेतकरी सांगतात, ‘‘परवापरवापर्यंत संकरित गहू येईपर्यंत गावच्या वावरात गहू म्हणून कधी पिकलाच नाही!’’
रावेरीत सीतेच्या वास्तव्याच्या अनेक खुणा आहेत. प्रत्यक्ष प्रसूतिस्थानी सीतामंदिर आहे. भारतात सीतेचे एकटीचे, म्हणजे राम नसलेले हे एकमेव मंदिर आहे, असे मानतात. सीतेचे स्नानगृहसुद्धा याच परिसरात आहे. लव-कुशांनी युद्धाच्या वेळी हनुमंताला बांधून ठेवल्याची कथा आहे. या बांधून ठेवलेल्या अवस्थेतील हनुमंताचे मंदिरही या ठिकाणी आहे. पौराणिक तमसा नदी म्हणजेच आजची रामगंगा आहे. येथे सीता, महादेवाची आराधना करायची, ते एक शक्तिपीठ म्हणून मान्यताप्राप्त आहे. या जवळजवळ उद्‌ध्वस्तच झालेल्या सीतामंदिराचा जीर्णोद्धार करायचे शेतकरी संघटनेने ठरविले.
या कामाला आता बर्‍यापैकी रूप आले आहे. रावेरी या गावात सीतेने एक तपश्‍चर्याच केली होती, स्वत:ला सिद्ध केले होते म्हणून ती ‘स्वयंसिद्धा.’ शेतकरी संघटनेने प्रत्येक घरातील स्त्रीला योग्य स्थान मिळावे म्हणून ‘स्वयंसिद्धा’, ‘लक्ष्मीमुक्ती’, ‘सीताशेती’, ‘माजघर शेती’ असे उपक्रम राबविले. त्यातून स्त्रियांची वणवण कमी झाली, त्यांना थोडेतरी बरोबरीचे स्थान मिळाले, हेच सीतानामाचे माहात्म्य!
अनिरुद्ध पांडे
९८८१७१७८२९