काश्मिरी ‘इंतेफ़ादा’ची गोष्ट…

0
113

मंथन
गेल्या दहा-बारा वर्षांत हळूहळू काश्मीरचा पॅलेस्टाईन कधी होऊन गेला, तेच आपल्या लक्षात आलेले नाही. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचे पॅलेस्टाईनचे फोटो कुठे मिळाले तर मुद्दाम शोधून बारकाईने तपासा. मग त्याची प्रचीती येईल. यापूर्वी निदान काश्मीरमध्ये हुर्रियत व फ़ुटीरवादी, निवडणुकीवर बहिष्कार वा अधूनमधून सार्वत्रिक बंदचे आवाहन करीत. पण, कुठे लष्करावर हल्ले झाले किंवा दगडफेक झाली, असे प्रसंग चार-पाच वर्षांपूर्वीही आपल्याला बघायला, ऐकायला मिळत नव्हते. पण, आजकाल असे प्रसंग वारंवार घडू लागलेले आहेत. त्याची कार्यप्रणाली म्हणूनच तपासून बघता येईल. पॅलेस्टाईनच्या राजकारणात ज्याला चार दशकांपूर्वी ‘इंतेफ़ादा’ असे नाव दिले गेले त्याची ही भारतीय पुनरावृत्ती आहे. म्हणजे असे की, काही पॅलेस्टिनी शांततेचे नाटक रंगवणार आणि इस्रायलच्या भागात रोजंदारीसाठी जाणार. त्यापैकी कोणी तिथे घातपात करणार. मग त्याला पकडले वा गोळी लागून मारला गेला, तर धुमाकूळ सुरू करायचा. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर हे युद्ध छेडले जात असे. म्हणजे असे की, अशा घटना घडल्या, मग बाजूचा लेबेनॉन तोच मुहूर्त साधून इस्रायलवर हल्ले सुरू करायचा. युद्धाची स्थिती निर्माण करायचा. म्हणजे पॅलेस्टाईनचा पश्‍चिम किनारा व बाजूच्या अरब राष्ट्राकडून एकाच वेळी इस्रायलच्या सीमेवर हल्ले सुरू व्हायचे. एकीकडे लेबेनॉन सशस्त्र हल्ले करणार आणि पॅलेस्टाईनचे तरुण किरकोळ बॉम्ब वा दगडफेकीने इस्रायली सेनेवर हल्ले करणार. मग जगभरच्या पुरोगामी माध्यमांनी त्याचा हलकल्लोळ करून टाकायचा. पॅलेस्टाईनमध्ये कसे निरपराध नागरिक मारले जात आहेत, त्यावरून मानवतावादी संघटनांनी रान उठवायचे. ही एक ‘मोडस ऑपरेण्डी’ बनून गेलेली होती. आजकाल पाकिस्तानी सेना व काश्मिरातील फ़ुटीरवादी तशीच काहीशी रणनीती संयुक्तपणे राबवीत आहेत. या संदर्भात ज्यांना अधिक तपशील हवा असेल, त्यांनी इंटरनेटवर ‘इंतेफ़ादा’ शब्दाचा शोध घेऊन तपशील मुद्दाम वाचले पाहिजेत. काही फुटीरवादी जिहादी नेमका तोच शब्द काश्मिरातही वापरत असतात. कारण स्पष्ट आहे. आता तीच रणनीती योजनाबद्ध रीतीने इथेही वापरली जात आहे. मग त्यावरून काहुर माजले की, भारतातले मानवतावादी पाकिस्तानशी बोलणी करा म्हणून टुमणे लावणार किंवा काश्मिरात सैनिकी कारवाईत बळी पडलेल्यांचे उदात्तीकरण करणार. फारुख अब्दुल्ला यांची भाषा व पॅलेस्टाईनचे नंतर अध्यक्ष झालेले यासर अराफ़त यांची भाषा किती जुळतीमिळती आहे, त्याचाही जिज्ञासूंनी अभ्यास करायला हरकत नाही. आज काश्मिरात काय चालले आहे, त्याची ओळख ‘इंतेफ़ादा’ समजून घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. ‘इंतेफ़ादा’ ही रणनीती आहे. कुरापत काढायची आणि त्यातून लष्करी कारवाईचा बडगा उगारला, की मग अमानुष म्हणून सत्तेच्या विरोधात गळा काढायचा. अशी ही रणनीती आहे. यात प्रत्येक पात्राला त्याची भूमिका ठरवून दिलेली आहे. त्यात दीर्घकाळ जिहादी घातपाताचे कृत्य करण्यासाठीच प्रसिद्ध असलेल्या यासर अराफ़त यांच्याशी इस्रायलने बोलणी केली आणि त्यांच्या पॅलेस्टाईन प्रदेशाला स्वायत्त म्हणून मान्यता दिली. पण, अशा स्वायत्ततेला आपले सैन्य उभारण्यास मोकळीक दिलेली नव्हती. आपल्या काश्मिरात यापेक्षा काहीही वेगळे नाही. पण, आपल्यावरचा जिहादी कलंक पुसला गेल्यावर अराफ़त यांनी, आडोशाने अन्य जिहादी पुढे करून तोच उद्योग चालू ठेवला होता. अराफ़त त्यात सक्रिय नव्हते, पण जे कोणी घातपात करीत होते, त्या ‘हमास’ संघटनेच्या हिंसाचाराला पाठीशी घालत, त्याचे उदात्तीकरण अराफ़तच करीत होते. आज फ़ारुख अब्दुल्ला काय वेगळे करीत आहेत? हा सगळाच संगनमताने चाललेला तमाशा नाही काय? फरक इतकाच आहे की, इस्रायल अन्य कुठल्या मानवतावादी संघटना वा त्यांच्या जागतिक नेत्यांना दाद देत नाही. हल्ले वा घातपात झाले, मग इस्रायली सेना लगेच प्रतिहल्ला चढवते आणि युद्धपातळीवर परिस्थिती हाताळू लागते. त्यात पॅलेस्टाईन भागातून जिथे कुठे घातपाती अड्‌डे आहेत, त्यांच्यावर क्षेपणास्त्रे डागून विध्वंसक प्रतिहल्ला केला जातो. जिथे सैनिकी कारवाईत निदर्शक म्हणून दगडफेक करणारे समोर येतात, त्यांना घातपाती ठरवून गोळीबारही केला जातो. त्याच वेळी पॅलेस्टाईनचे नेते म्हणून पोपटपंची करणार्‍यांनाही आपल्या घरातून बाहेर पडता येणार नाही, इतका हलकल्लोळ त्याही भागात केला जातो. एकदा तर अराफ़त यांचे वास्तव्य असलेल्या कंपाऊंडवरही बॉम्बफेक करण्यात आली होती. काही दिवस त्यांना काळोखात काढावे लागले होते. तिसरी आघाडी लेबेनॉनसारखे शेजारी लढवत असतात. उघडपणे लेबेनॉन कधी इस्रायलशी लढाईत उतरत नाही. पण, तिथे हिजबुल्ला नामक जिहादी संघटना आहे, तिच्यामार्फत इस्रायलवर सैनिकी हल्ले केले जातात. आपल्याकडे काश्मिरात ‘तोयबा’ वा ‘मुजाहिदीन’ नावाने तसेच हल्ले, पाकभूमीत बसलेले पाक सैनिक करीत असतात. हा सगळा प्रकार अगदी लेबेनॉनसारखा आहे. उरी येथे असा हल्ला झाल्यावर आपण त्याला ‘सर्जिकल स्ट्राईक’ने उत्तर दिले होते. त्याचे आपल्याला मोठेच कौतुक आहे. पण, असे प्रतिहल्ले इस्रायल इतके खोलवर करते की, त्यानंतर अनेक महिने लेबेनॉनच्या हिजबुल्ला संघटनेला डोकेही वर काढता येत नाही! हवाई हल्ले व क्षेपणास्त्रे सोडून इस्रायलने अनेकदा लेबेनॉन बेचिराख करून टाकला आहे. त्यात शेकड्यांनी नागरिकही मारले गेले आहेत आणि सैनिक तर त्याहूनही अधिक मारले जातात. असे होऊ लागले, मग जागतिक नेते मध्यस्थी करतात आणि इस्रायलही युद्ध संपल्याची घोषणा करून टाकतो. पण केव्हा?
इस्रायलची ही रणनीती आपण गंभीरपणे अभ्यासली पाहिजे. एकदा असा ‘इंतेफ़ादा’ सुरू झाला, मग इस्रायल सर्व पातळीवर आणि सर्वच आघाड्यांवर युद्धाचा पवित्रा घेऊन टाकतो. त्यात जागतिक नेत्यांनी हस्तक्षेप करण्यापर्यंत एक-दोन आठवड्यांचा कालावधी निघून जातो. परिणाम असा होतो की, इस्रायलच्या सीमेपलीकडचा प्रदेश पूर्णपणे होरपळून निघतो. शेकड्यांनी लोक जखमी होतात, तितकेच मारले जातात. हजारो घरे व इमारती जमीनदोस्त होऊन जातात. साहजिकच अशा नागरी वस्तीत आडोसा घेऊन बसलेल्या ‘हिजबुल्ला’ वा अरबी सेनेचा कणा पूर्णपणे मोडून काढला जातो. त्यांनी कष्टपूर्वक उभारलेली गनिमी युद्धाची रचना व सामुग्री अशी उद्ध्वस्त करून टाकली जाते, की इस्रायल कितीही गाफील राहिला, तरी पुढील कित्येक महिने कुणाही जिहादीला कुरापत काढणेही अशक्य होऊन जाते. भूकंपातून सावरासावर करावी, तशी त्यांची दुर्दशा होऊन जाते.
जिहादी लढवय्ये सोडाच, त्यांचे पालनपोषण करणारी कुटुंबे व वस्त्याही पुरत्या नष्ट होऊन जातात. त्यातून अगोदर नित्यनेमाने जगण्याच्या सुविधा
पुन्हा उभारण्याचे काम हाती घ्यावे लागते. नागरी जीवन रुळावर आल्याखेरीज इस्रायलची कुरापत काढण्याचा विचार ‘इंतेफ़ादा’ पुकारलेल्यांच्या मनात येऊ शकत नाही. साहजिकच वर्ष-दीड वर्ष इस्रायलला शांततापूर्ण जीवन जगता येते. मग तो कालावधी उलटला की, पुन्हा पॅलेस्टिनी व लेबेनॉनच्या ‘हिजबुल्ला’ला लढायची खुमखुमी येते. पुन्हा ‘इंतेफ़ादा’ सुरू होतो. पुन्हा इस्रायल आधीच्याच रणनीतीचा अवलंब करतो. हा घटनाक्रम आता जगाच्याही अंगवळणी पडला आहे. हळूहळू भारतालाही काश्मीर व पाकिस्तानातील त्यांच्या पाठीराख्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायली युद्धनीतीचाच अवलंब करावा लागणार आहे. कारण आपण ज्याला आझादीची लढाई समजून बसलो आहोत, तो प्रत्यक्षात काश्मिरातील पॅलेस्टाईनी ‘इंतेफ़ादाच’ आहे!
– भाऊ तोरसेकर