दारुडे उंदिर!

0
132

अग्रलेख
कालूभाऊ उंदराच्या बिळात तो व्हॉट्‌स ऍप बघत बसला होता. त्याची बायको काळूबाईदेखील बाजूलाच तिच्या मोबाईलवर व्हॉट्‌स ऍपवर डोळे खिळवून बसली होती. काळू उंदराच्या मिशा पिंजारल्या. त्याची शेपूट वळवळू लागली अन् त्याने रागाने दात कचाकचा वाजविले. तिने डोळे मोठे करून काळूंद्र्याकडे (हे बाईंचे नवर्‍यासाठीचे लाडाचे नाव) पाहिले. नजरेनेच विचारले, काय झाले? काळूशेठ मात्र रागाने थरथरत होता. वारंवार त्याच्या मोबाईलकडे बघत होता. अंमळ शांत झाल्यावर ‘कंट्रोल, कंट्रोल’ असे ‘वेलकम नाना’ स्टाईल काळू ओरडला आणि घरभर चकरा मारायला लागला. आता मात्र काळिंद्रीच्याने राहवेना. तीही मग त्याच्या मागे तुरुतुरू निघाली. तो मध्ये थांबून म्हणाला, ‘‘आता मात्र या माणसांनी हद्द गाठली आहे…’’ उंद्रीण म्हणाली, ‘‘नेमके झाले तरी काय आहे?’’ उत्तरादाखल काळू उंदराने त्याचा मोबाईलच त्याच्या बायकोसमोर धरला. तीही ते पाहून उडालीच. ‘‘काय हे? माणसांचा काय हा उद्दामपणा? आमचे आयुष्यच कुरतडायला निघालेत मेले…’’ बिहारची बातमी त्यांच्या व्हॉट्‌स ऍपवर आली होती. बिहारात दारुबंदी करण्यात आल्यावर विविध ठिकाणी धाडी टाकून दारू पकडण्यात आली होती. ती पोलिस स्टेशनच्या मालखान्यात पडून होती. जवळपास ९ लाख गॅलन दारू होती. आता मात्र ती दिसत नव्हती? दारू गेली कुठे, असा सवाल केल्यावर आरोप थेट उंदरांच्या माथ्यावर मारण्यात आला होता. ‘‘सगळी दारू उंदीर प्यायलेत,’’ असे बिहारच्या पोलिसांनी सांगून टाकले होते. ही पोस्ट वाचून काळूमामा उंदीर संतापणारच नाहीत तर काय? कुठलाही पुरावा नसताना निष्पाप उंदरांवर दारू प्यायल्याचा आरोप करायचा? आता काळूमामा हे अखिल भारतीय मूषक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. उंदरांवर झालेला हा आरोप त्यांच्यासाठी मानहानीकारकच होता. तरीही उंदरीणबाई म्हणाल्या, ‘‘तरीच! इतक्यात तुम्ही सारखे बिहारच्या दौर्‍यावर जात होतात…’’ त्यावरून तर मामा मग फारच संतापले. हे असले आरोप आता बिळोबिळी होतील. सारीच माणसे उंदरांकडे संशयाने बघतील. काळूमामा म्हणाले की, मी तेल पितो. आवडतेही मला ते. हेही खरेच आहे की, हिवाळ्यात खोबर्‍याचे तेल गोठते आणि मग खोबरेल तेलाच्या शिशीचे झाकण कुरतडून मी त्यात शेपूट घालतो आणि मग खोबरेल तेलात भिजलेले माझे शेपूट मी चुरपतो. आहाहाऽऽ काय मस्त मजा येते… मात्र आपली कार्टी मी झोपल्यावर माझी खोबरेल तेलात न्हायलेली शेपूटच कुरतडतात. त्यावर काळीणबाई म्हणाल्या, मग आपली पुढची पिढी दारूदेखील पीतच नसावी, असे कसे म्हणता तुम्ही? त्यातल्या त्यात ते बिहारचे उंदीर. बिहारमध्ये माणसांची जात काहीबाही खातात. तुम्ही काळू, तिकडे माणसात म्हणे कुणी लालू आहे. त्याने चारा खाल्ला, मातीचा घोटाळा केला. काळू म्हणाला, आता हे खरं आहे की, माणसं काहीही खातात. अगदी सिमेंटही खातात आणि तरीही त्यांना बद्धकोष्ठ होत नाही… उंदीर कधीच दारू पीत नाहीत, हे तुला माहिती आहे. अगदी पुराणकाळातही देव-देवता सोमरस पीत असायचे, पण उंदरांनी कधीही नशा केलेली नाही. म्हणूनच निर्व्यसनी असल्यानेच श्रीगणेशाने आपल्याला त्याचे वाहन बनविले.
असे म्हणत काळू उंदराने त्याचे ट्विटर अकाऊंट ओपन केले अन् त्यावर निषेध ट्विट केला. त्याच्या अ. भा. मु. संघटनेच्या ग्रुपवर त्याने तातडीच्या बैठकीच्या निमंत्रणाची पोस्ट टाकली. काळूमामाचा ट्विट वाचून अनेकांनी त्यावर आपली प्रतिक्रिया लगेच अपलोड केली. उंदीरही अलीकडच्या काळात टेक्नोसॅव्ही झाल्याचा आनंद काळूमामाला झाला. ‘‘माणसांनी उंदरांना दारुडे ठरविणे अत्यंत अन्यायकारक आहे. आपण माणसांचा अन्याय आता सहन करायचा नाही. लोकशाही मार्गाने याचा निषेध झालाच पाहिजे,’’ असे रिट्विट एका ज्येष्ठ उंदराने केले. अगदी तासाभरातच रेल्वे स्टेशनच्या मालखान्यातील मूषक संघटनेच्या विभागीय कार्यालयातच खास उंदरांची बैठक जमली. अर्थात त्यांचे हे बसणे हे माणसांच्या ‘बसण्या’सारखे नव्हते. फारच फार विक्री यार्डातली तुरी खाऊन कंटाळलेले उंदीर इथे लोडिंगसाठी तयार असलेले काजू-बदाम कुरतडून खायला तयार होते. सार्‍यांनाच माणसांनी केलेल्या दारुडे असण्याच्या आरोपाचा संताप आला होता. एकतर ते दारूचे पिंप इतके मोठे. बरे ते जाडही असतात. प्लास्टिक असल्याने कुरडताही येत नाहीत. अंमळ तहान लागली म्हणून कुणी अगतिक उंदीर दारू प्यायला गेला तरीही तो पिंपात पडून मरायचा. कारण पहिल्यांदा तो दारू झाकणावर बसून ओणवा होऊन प्यायला तर दुसर्‍यांदा त्याचा नशेने तोल जायचा आणि मग त्याला बुडून मरण्याशिवाय पर्यायच नाही. बरे उंदीर फार कमी पाणी पितो. तो काही खाल्ले तरच पाणी पितो. त्यातही त्याला तहान फार लागतच नाही. त्यामुळेच तो बिळात राहू शकतो. अगदी तीन-चार महिनेही तो विनापाण्याने राहू शकतो, अशी माहिती एका तज्ज्ञ उंदराने दिली. ही माणसे स्वत: काहीबाही खातात आणि मग त्याचा आरोप उंदरांवर करतात… अखेरीस एक निवेदन तयार करण्यात आले आणि ते माध्यमांना तर द्यायचेच, पण ते मनेका गांधी यांच्याकडेही पाठवायचे ठरले. त्याचा मुसदा असा-
(अ)प्रिय मानव, बिहारमध्ये नऊ लाख गॅलन दारू उंदरांनीच फस्त केल्याच्या आरोपाने समस्त मुषक जग अत्यंत व्यथित झालेले आहे. हे खरे आहे की, उंदरांच्या खाण्याच्या सवयी माणसांसारख्याच आहेत. त्याचे कारण हेच की, आम्ही मूषक जमात माणसांनी जे खायला दिले तेच खातो. मात्र, पिण्याशी आमचा काहीएक संबंध नाही. माणसं विविध दिवस पाळतात मात्र दारू डे पाळत नाहीत. कारण प्रत्येकच दिवस त्यांच्यासाठी दारू डेच असतो. विशेषत: रविवार हा दारू डेच असतो. त्यावरूनच पिणार्‍या माणसांना ‘दारुडे’ म्हणण्याचा प्रघात पडलेला आहे. माणसं दारूच्या व्यसनापायी आपले संसार उद्ध्वस्त करतात. आता राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने किमान ५०० मीटर्सच्या आत दारूची दुकाने नकोत, असा नियम केल्यावर प्रवासाला निघण्याआधी माणसं रांगेत उभी राहून आपापली ‘सोय’ करून घेतात. माणसांना अगदी तोरणा- मरणालाही दारू हवीच असते. बर्‍याचदा माणूस मेला की, त्याच्या चितेतही उशाला दारूची शिशी ठेवतात. पोलिस नामक माणूस तर हप्त्यांपासून काय काय खात असतो. त्यांनी जप्त केलेला माल मालखान्यात असतो आणि बघता बघता तो जागेवरच जिरतो. नाव मात्र उंदरांवर घेतात. मालखान्यात उंदीर असतात, असे नाव करून तिथे मग सर्प येतात, असा गवगवा करण्यात येतो. बहुतांश मालखान्याच्या बाजूला म्हणूनच नागाचे देऊळ असते. ही नागाची भीती उंदरांना नव्हे तर इतरांसाठी असते. त्यामुळे मालखान्याकडे सहसा कुणी फिरकत नाही, अगदी इन्स्पेक्शन करायला आलेलेदेखील नाही. मग मालखान्यातल्या वस्तू फस्त केल्या जातात. नाव उंदरांवर टाकले जाते. आजवर आम्ही हे सहन केले मात्र आता आम्हाला दारुडे ठरविण्यात येत आहे. मदिरा आणि मदिराक्षीमुळे अखिल सजीव विश्‍वात बदनाम असलेल्या माणसांनी उंदरांसारख्या अत्यंत निर्व्यसनी, निरुपद्रवी आणि सज्जन आद्य सस्तन प्राण्याला असे बदनाम करावे, हे निंदनीय आहे. आम्ही यापुढे असेच सुरू राहिले तर माणसांची सगळी दारूची दुकाने कुरतडून टाकू आणि मग माणसांना दारूचा थेंबही मिळणार नाही…
आपले- समस्त मूषक गण
हे पत्र मिळाल्यावर तातडीने चौकशी बसली आणि बिहार पोलिसांच्या मालखान्यातली दारू कुठे गेली याचा शोध सुरू करण्यात आला. दारू पाचक असल्याने नेमकी ती कुणी प्यायली हे अद्याप कळलेले नाही. कळणारही नाही!