अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोप

0
42

वाचक पत्रे
दिल्ली मंत्रिमंडळातील मंत्री कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर एका सौद्यासाठी दोन कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. केजरीवालचे मस्तवाल साथीदार म्हणत आहेत, केजरीवाल यांच्यासारखा प्रामाणिक माणूस जगात सापडणार नाही. खरेच आहे. पंजाबात तिकीट विकण्यासाठी उमेदवारांकडून लाखो रुपये घेतले, देशद्रोही खलिस्तानवाद्यांकडूनही त्यांनी पैसा आणला होता, ही बाब आता लपून राहिलेली नाही. त्यामुळे केजरीवाल हे धुतल्या तांदळासारखे आहेत, हा समज मुळातच खोटा आहे. आता मिश्रा यांच्या आरोपांची कसून चौकशी व्हावी आणि खरे खोटे जनतेसमोर यावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे.
अरविंद देशमुख
नागपूर

निर्भयाला न्याय मिळाला
२०१२ साली दिल्ली येथे निर्भयावर सहा नराधमांनी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला होता. या कृत्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. या गुन्ह्यात नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला फाशीचा निकाल योग्य आहे. या गुन्ह्यातील दोषींचे कृत्य क्रूर, रानटी, पाशवी आणि प्रचंड घृणास्पद होते. मानवतेला हादरवणार्‍या या कृत्याबद्दल हे गुन्हेगार कोणत्याही प्रकारच्या दयेच्या पात्र नव्हते. निर्भयाला करण्यात आलेल्या गंभीर जखमा आणि दोषींचे गंभीर गुन्हेगारी वर्तन याकरिता सर्वोच्च न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा बलात्कार्‍यांच्या छातीत धडकी भरविणारी आहे. या शिक्षेमुळे निर्भयाला खर्‍या अर्थाने न्याय मिळाला आहे.
मधुकर चुटे
नागपूर

वन्यप्राणी शिकार्‍यांना जन्मठेप का नाही?
वन्यप्राण्यांची शिकार करणार्‍या कुख्यात गुन्हेगारांना आपल्या देशात केवळ तीन वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद आहे. नुकतीच वाघाची शिकार केल्याच्या गुन्ह्यात कुख्यात कट्टू पारधी याला न्यायालयाने केवळ तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. तो भारताची शान आहे. असे असताना, केवळ तीन वर्षांची शिक्षा? ही बाब मनाला पटत नाही. अशा शिकार्‍यांना जन्मठेपेचीच शिक्षा देणे योग्य ठरेल आणि तेव्हाच त्यांच्यावर जरब बसेल. महाराष्ट्राचे झुंजार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीकडे लक्ष द्यावे, ही विनंती.
प्रभाकर देशपांडे
चंद्रपूर

या चिमण्यांनो परत फिरा रे…
अकोल्यातील सिव्हिल लाईन चौकात रविवारी लोकांची एकच गर्दी दिसली. तेथे चिमण्यांसाठी हक्काचा आसरा देणारी एक निसर्गप्रेमी संस्था पुढे सरसावलेली दिसली. संस्थेच्या पुढाकाराने चिमण्यांसाठी घरटे, पाणीपात्र, अन्नपात्र आदी साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते आणि ते विकत घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. आधुनिकतेच्या व विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. जल, वायू प्रदूषणामुळे चिमण्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला. निसर्ग व मानवी समूहाशी असलेलं चिऊताईचं अतूट नातं दुरावलं. परंतु आज चिऊताईच्या येण्यासाठी मानवी स्वभावात झालेला हा आमूलाग्र बदल लाखमोलाचा वाटतो. सदर संस्थेचेही मनापासून आभार मानावे वाटतात. या सर्व प्रयत्नांतून चिऊताईशी असलेले अतूट नाते पुन्हा तयार व्हावे व रुसलेली चिऊताई पुन्हा चिव चिव करत आमच्यापर्यंत यावी यासाठी पुन्हा एकदा तिला आर्त हाक द्यावीशी वाटते, या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या…
अखिल सुरेशराव देशपांडे
अकोला

कोर्टाने सरकारला टोलसाठीही फटकारावे
वैद्यकीय/अभियांत्रिकी प्रवेशांबद्दल कानउघाडणी, पार्किंगबद्दल महापालिकेला कोर्टाची तंबी, गटार सफाई पावसाळ्यापूर्वी करा, १०० कोटी खर्चावर ५०० कोटी जमा तरीही टोल चालूच… अशा प्रकारच्या बातम्या आपण वाचत असतोच. कोर्ट जर जनहिताच्या गोष्टींकडे बारीक नजर ठेवून असेल तर ती चांगलीच स्वागतार्ह गोष्ट आहे. न्यायालयांनी जनतेला लुबाडणार्‍या टोल नाक्यांबद्दल स्पष्ट भूमिका घेऊन असे करार तातडीने रद्दबातल ठरविण्याचे आदेशही संबंधितांना दिल्यास कितीतरी गोष्टी सोप्या होतील.
केवळ करार केला आहे म्हणून, सर्व देय रकमेची कमाई होऊनसुद्धा, जनतेला लुटणार्‍या या टोल ओरबाडणार्‍या मंडळींना आता सक्षम कोर्टानेच फटकारले पाहिजे. या दिवसाची वाट पाहू या!
प्रमोद बापट
पुणे