तवलीनबाईंना दोन शब्द…

0
95

वेध
तवलीन सिंग या प्रख्यात पत्रकार आहेत. त्या भौतिक विकासाच्या पक्षधर आहेत. त्यांचे लिखाण तिखट असते. पण, तरीही त्यांच्यावरील दिल्लीतील अतिश्रीमंत वस्तीतील संस्कार काही पुसले गेलेले नाहीत. मुस्लिमांबाबतचा त्यांचा कळवळा वेळी-अवेळी बाहेर येत असतो. गोहत्येवरून झालेल्या एखाद-दुसर्‍या मुस्लिमाच्या हत्येचे सूत्र धरून त्यांनी स्तंभात लिहिले आहे- सध्या भारतीयांचे गायींबाबत हे हिंसक प्रेम उफाळून आले आहे, त्यामुळे जगात आपली स्थिती हास्यास्पद होण्याची भीती आहे. मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर भिरभिरणारा एक विनोदही सांगितला. त्यात म्हटले आहे- प्रिय पाकिस्तान, जवान शहीद होण्याचे आम्हाला एक देश म्हणून काहीच वाटेनासे झाले आहे. कारण जवानांना मरण्यासाठीच तर पगार मिळतो. परंतु, तुम्ही सहज म्हणून एखाद्या गायीला तर मारा आणि बघा, आम्ही तुम्हाला कशी मजा चाखवतो ते! हा विनोद असला तरी, त्यामागची भावना, सेक्युलरी गरळाची आहे. तवलीनबाईंना कुणी तरी सांगायला हवे की, बाई गं! गुरू गोविंदसिंगांच्या त्या दोन मुलांचे-फतेहसिंग व जोरावरसिंग यांचे चुकलेच. पूजापद्धतीच तर बदलायची होती ना! त्या बदल्यात, मुसलमान राजाकडून त्यांनी पंजाबसाठी महामार्ग, कारखाने, आयआयटी व एम्ससारख्या संस्था, शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी आणि सिंचनाच्या सोयी वगैरे मागून घ्यायच्या होत्या. कशाला त्यांनी क्षणाक्षणाने कवटाळणारा मृत्यू स्वीकारला? (हे लिहिताना आजही अंगावर सरसरून काटा येतो आणि आमच्या भाकड आयुष्याची कीव येऊन डोळ्यात पाणी येते). रोज गोमांस खाल्ले नाही तर नरकात जाल, असे जरी पवित्र कुराणात लिहिले असते (खरे तर असे काहीच लिहिलेले नाही) तरीदेखील, हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर करीत आम्ही गोमांस कदापि खाणार नाही, असा निश्‍चय मुसलमान का करू शकत नाही? प्रथम हा देश टिकला पाहिजे. संपूर्ण देशच काश्मीरसारखा किंवा ईशान्य भारतातील काही राज्यांप्रमाणे केवळ लष्कराच्या बळावर टिकवून ठेवण्याची पाळी आली, तर मग तुमचा तो भौतिक विकास कुठे करायचा? याच वृत्तीपायी देशाचे तुकडे झालेत. आताही तेच होऊ द्यायचे का? ही वृत्ती तिथल्या तिथे ठेचलीच पाहिजे. विकास वगैरे नंतर होत राहील.

स्वीडनची घाबरगुंडी
३ मे रोजी, जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील स्वीडिश दूतावासात एक चर्चा आयोजित होती. विषय होता- ऑनलाईन सार्वजनिक जीवनात महिलांचा सहभाग. त्यात केंद्रीय मंत्री मेनका गांधी, बरखा दत्त आणि स्वाती चतुर्वेदी सहभागी होणार होत्या. बरखा आणि स्वाती यांच्यासारख्या हिंदुद्वेष्ट्यांचा सहभाग असल्याचे समजताच, चिडलेल्या लोकांनी ट्विटरवरून स्वीडिश दूतावासावर ट्विटचा भडिमार केला. लोकांनी स्वीडनहून भारतात आयात होणार्‍या वस्तूंवर बंदी घालण्याची धमकी दिली. त्याने, वृत्तपत्र स्वातंत्र्याचा दिखाऊ कळवळा प्रदर्शित करणारे स्वीडिश दूतावास हादरले. स्वीडिश वस्तूंवर खरेच बंदी आली तर आपल्या देशाचे आर्थिक हित धोक्यात येईल, असा विचार करून या दूतावासाने हा कार्यक्रमच रद्द करून टाकला. ट्विटरवरच्या काही लोकांच्या धमकीला आम्ही किंमत देत नाही आणि ठरलेला कार्यक्रम होणारच, अशी ठाम भूमिका स्वीडिश दूतावासाला घेता आली असती. ती त्यांनी घेतली नाही. खरे तर हे जगासमोर आणायला हवे होते. पण झाले भलतेच. सोशल मीडिया लोकशाहीला धोका आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे. ट्विटरवरच्या लोकांनी मोर्चा काढला नाही. कुणाला धक्काबुक्की केली नाही. कुठे दगडफेकही केली नाही. फक्त त्या देशाच्या मालावर बंदी घालण्याची धमकी दिली. ही धमकी किती लोकांनी अमलात आणली असती, हाही एक प्रश्‍नच आहे. पण स्वीडिश सरकार घाबरले. मूल्यांच्या कोरड्या गप्पा मारणे सोपे असते; पण ती मूल्ये प्रतिष्ठित करण्यासाठी प्रसंगी प्राणही अर्पण करायचे असतात, हे या व्यापारी मनोवृत्तीच्या युरोपीयनांना कोण सांगणार? भारतासारख्या वसाहतींचे शोषण करून संपन्न झालेल्या या युरोपीय देशांना कुठली आलीय् मूल्यांची चाड? असो. आता मोठमोठे पत्रकारपंडित आपापल्या स्तंभातून ट्विटरवरील लोकांवर टीका करीत आहेत. त्यांना अक्कल सांगत आहेत. पण यापैकी कुणीही, लोकांचा बरखा दत्त किंवा स्वाती चतुर्वेदीवर एवढा राग का आहे, याचा विचार केलेला दिसत नाही. गोहत्या बंदी केली तर, मुसलमानांच्या अन्नाचे काय? या प्रश्‍नाने अस्वस्थ होऊन या मंडळींच्या घशाखाली अन्नाचा कण आणि दारूचा घोटदेखील जात नाही. तसाच कळवळा, समाजातील बहुसंख्य लोकांबाबत का येत नाही? का म्हणून लोक बरखा किंवा स्वातीवर चिडले आहेत, याची प्राथमिक चौकशीदेखील करायला हे पंडित तयार नाहीत. एक संकेत देतो. सोव्हिएत रशियाचे शकले झाल्यावर, तिथल्या लोकांनी लेनिनग्राडमधील लेनिनचा प्रचंड उंचीचा पुतळा पाडला आणि लाथांनी तुडविला. एवढेच नव्हे, तर त्या गावाचे नाव पुन्हा सेंट पीटर्सबर्ग असे केले. कां केले असेल लोकांनी असे? शेतकर्‍यांचा, कामगारांचा त्राता होता ना लेनिन! मग इतका राग! राहू दिला असता पुतळा! आम्ही नाही का पराजयाच्या, अपमानाच्या खुणा राष्ट्रीय संरक्षित वास्तू म्हणून जपून ठेवतो! पण नाही. रशियनांनी पुतळ्याला तुडविले. हे असे का, याचा निष्पक्ष शोध या पत्रपंडितांनी घेतला तर त्यांना, दारूचे घोट घेत घेत स्तंभ लिहिताना पडणारे काही प्रश्‍न सुटण्यास मदतच होईल.
– श्रीनिवास वैद्य
९८८१७१७८३८