पाकबाबत अनावश्यक थयथयाट

0
161

दिल्ली दिनांक
••इस्रालयचा एक अधिकारी असाच पळून गेला होता. त्याला परत आणण्यासाठी मोसादने एक टीम तयार केली. त्याचा शोध घेण्यात आला. त्याला गुंगीचे औषध देऊन नियमित विमानात बसविण्यात आले व मायदेशी आणून फासावर लटकविण्यात आले. देशाचा दरारा तयार होतो तो अशा चिवट झुंझीतून!
दुबईतील अल बुस्तान रोटाना हॉटेलमधील ही एक घटना. अकरा टेनिस खेळाडू या हॉटेलच्या लॉबीत बसले होते. काहींच्या हाती टेनिस रॅकेट होती, काही चेंडूंशी खेळत होते. काही वेळाने ते हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावर गेले. खोली क्रमांक २३०! पाच खेळाडू या खोलीत दाखल झाले. काही वेळाने एक व्यक्ती खोलीत आली. लगेच एका खेळाडूने त्याचा गळा पकडला. दुसर्‍या खेळाडूने त्याला पलंगावर पाडले, तिसर्‍याने पलंगावरील उशी त्याच्या नाकावर दाबली. दहा मिनिटांत सारा खेळ आटोपला. ना अस्त्र-ना शस्त्र! खेळाडू हॉटेलबाहेर पडले. विमानतळाकडे रवाना झाले. काही खेळाडूंनी पॅरिसचे विमान पकडले, काहींनी लंडनकडे कूच केले तर काहींनी ऍमस्टरडम गाठले! दुबई पोलिसांना या घटनेची माहिती कळली तेव्हा हे सारे खेळाडू हजारो मैलावरील आपल्या निर्धारित ठिकाणी जाऊन पोहोचले होते.
मोसादचे एजंट
दुबईत दाखल झालेले हे ११ जण टेनिसपटू नव्हते. ते होते मोसाद या इस्रायली गुप्तचर संघटनेचे एजंट! ‘हमास’ या पॅलेस्टिनी संघटनेचा कमांडर मेहमूद अल मेबहूह याला ठार करण्यासाठी ते फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन देशांच्या बनावट पासपोर्टवर दुबईत दाखल झाले होते. पॅलेस्टिनी कमांडरने काय अपराध केला होता? २० वर्षांपूर्वी त्याने इस्रायलच्या एका सैनिकाची हत्या केली होती. त्या हत्येचा हिशेब २० वर्षांनी चुकता करण्यात आला होता. आपण इस्रायलच्या एका सैनिकास ठार केले याचा विसर हमासच्या कमांडरला पडला असेल, पण इस्रालयला पडला नाही. फक्त एका सैनिकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आले होते.
भारत-पाक सीमेवर दोघा भारतीय जवानांना ठार करण्यात आले. आता राजकीय नेते, प्रसिद्धिमाध्यमे यांचा थयथयाट सुरू आहे. भारत केव्हा बदला घेणार, भारत काय करणार, अशा चर्चा झडत आहेत. इस्रालयमध्ये असे काहीच घडत नाही. टी.व्ही. स्टुडियोत बसून योजना आखल्या जात नाहीत, सांगितल्या जात नाहीत. त्या फक्त अमलात आणल्या जातात.
मोसादचे नियोजन
मोसादने मेहमूदला ठार करण्यासाठी किती नेमकी योजना आखली होती. हमासचा नेता शस्त्र खरेदी करण्यासाठी दुबईला जात असतो, अशी माहिती मोसादला मिळाली होती. मोसादने आपलाच एक शस्त्र व्यापारी तयार केला. या व्यापार्‍याने हमास नेत्यास दुबईला बोलावले. आणि मोसादने त्याला ठार करण्यासाठी आपले ११ एजंट दुबईस पाठवून त्याला संपविले. तेही रक्ताचा एक थेंब न सांडविता. ही एक घटना नव्हती. १९७४ च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी इस्रालयच्या ११ खेळाडूंची हत्या केली. या हत्याकांडात कोण कोण सामील होते याची माहिती काढण्यात आली आणि त्यांना संपविण्यासाठी इस्रालयने एक योजना केली. त्या योजनेचे सांकेतिक नाव होते, ऑपरेशन ईश्‍वरी प्रकोप! मोसाद आपल्याला ठार करील याची कल्पना या मारेकर्‍यांना होती. ते जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन दडून बसले होते. मोसादने त्या प्रत्येकाला शोधून काढले व ठार केले. ही कारवाई १० वर्षे सुरू होती. इस्रायली खेळाडूंना ठार करणार्‍या एकाही मारेकर्‍यास नैसर्गिक मृत्यू लाभू द्यायचा नाही, असा सक्त आदेश मोसादला देण्यात आला होता. प्रत्येकाला मोसादने ठार केले.
रॉ अधिकारीच फरार
भारताची रिसर्च ऍण्ड ऍनालिसीस विंग म्हणजे ‘रॉ’कडे ही जबाबदारी असल्याचे म्हटले जाते. सात वर्षांपूर्वी ‘रॉ’चा एक अधिकारी रविंदरसिंग अचानक देशाबाहेर पळून गेला. तो आता अमेरिकेत चैनीत राहात असल्याचे म्हटले जाते. इस्रालयचा एक अधिकारी असाच पळून गेला होता. त्याला परत आणण्यासाठी मोसादने एक टीम तयार केली. त्याचा शोध घेण्यात आला. त्याला गुंगीचे औषध देऊन नियमित विमानात बसविण्यात आले व मायदेशी आणून फासावर लटकविण्यात आले. देशाचा
दरारा तयार होतो तो अशा चिवट झुंझीतून!
चुकीची अपेक्षा
पाकिस्तानच्या लष्कराने भारतीय जवानांना ठार केले यात पुराव्याची काय गरज आहे? पाकिस्तानने आपल्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केली आहे. पाकिस्तान कशाला कारवाई करील? पाकिस्तानने हे करविले आहे. भारताच्या गुप्तचर संघटनेत धमक असेल तर त्यांनी कारवाई करावी. भारताच्या दोघा जवानांना कोणी ठार केले याची माहिती काढावी. त्या अधिकार्‍यांना ठार करावे आणि अधिकार्‍यांना ठार करणे शक्य नसेल तर त्यांच्या कुटुंबीयांना ठार करावे! ते न करता रक्ताचे डाग दिसत आहेत, पावलांचे ठसे दिसत आहेत अशी निरर्थक भाषा परराष्ट्र मंत्रालयाचा प्रवक्ता वापरीत आहे.
युद्धाचे नवे रूप
पाकिस्तान भारतविरोधी कारवाया करणार आहे. त्या हाताळण्यासाठी ब्राह्मोस मिसाईल, नाग प्रक्षेपास्त्र कामाचे नाही. यांचा उपयोग २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन समारोहात दाखविण्यासाठी असतो. जग बदलले आहे. पूर्वी टेलिग्राम, ट्रंककॉल होता. आता ते सारे कालबाह्य झाले आहे. तसेच युद्धाची व्याख्याही बदलली आहे. उघड युद्ध कालबाह्य होत आहे. त्याची जागा छुप्या युद्धाने घेतली आहे. अशात मग, पृथ्वी, अग्नी यांची उपयोगिता मर्यादित झाली आहे.
नवे तंत्र हवे
पाकिस्तानने भारताच्या दोघा जवानांना ठार केले. आता भारत पाकिस्तानच्या चार जवानांना ठार करील. यानेही फारसा परिणाम होणार नाही. पाकिस्तानाला हेच हवे आहे. दोन-पाच, आठ-दहा जवान ठार झाल्याने पाकिस्तानचे काही बिघडत नाही. पाकिस्तान लष्कराच्या पाठीशी पाक सरकार आहे. पाक सरकारच्या पाठीशी चीन उघडपणे आहे, तर अमेरिका छुपेपणे आहे. चीनने फार मोठी आर्थिक गुंतवणूक पाकिस्तानात केली आहे. बलुचिस्तानात केली आहे. अमेरिकेला आपल्या शस्त्र कंपन्या चालवायच्या आहेत. मालवाहक विमाने भारताला आणि लढावू विमाने पाकिस्तानला, असे अमेरिकेचे उघड धोरण आहे. कारण, जगाच्या क्षितिजावर भारताचा उदय चीन-अमेरिका कुणालाच नको आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारताला वेगळ्या तंत्राचा वापर करावा लागणार आहे.
कसाबचा बदला जाधव
पाक लष्करी अधिकार्‍यांच्या मनात दहशत बसावी एवढ्या क्रूर कारवाया भारताला कराव्या लागतील. केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, भारत सरकारला पाकिस्तानबाबत अतिशय कठोर धोरण सुरू ठेवावे लागेल, क्रूर कारवाया सुरू ठेवाव्या लागतील. कसाबला फाशी झाली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यातच भारत धन्यता मानतो. पण, कुलभूषण जाधवच्या बाबतीत पाकिस्तान काय करत आहे? तुम्ही कसाबला फाशी देता काय, आम्ही जाधवला फाशी देतो, असा हा सरळसरळ हिशेब आहे.
स्थिती गंभीर
दुसरीकडे काश्मीर खोर्‍यातील स्थिती गंभीर होत आहे. काश्मीरमध्ये प्रथमच काश्मिरी युवती हाती दगड घेत रस्त्यावर उतरल्या आहेत. हे आजवर झाले नव्हते. दक्षिण काश्मीरमध्ये लष्करी कारवाई सुरू असली तरी काश्मिरी जनतेला शांत करण्यासाठी उपाय करण्यात आले पाहिजेत. राज्यपाल वोरा वा मुख्यमंत्री मेहबुबा यांच्याकडून तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. याचा पूर्ण फायदा पाकिस्तान उठवीत आहे
– रवींद्र दाणी