फॅशन करा, पण जरा जपून

0
30

नवी दिल्ली, ७ मे
जर तुम्हाला फॅशन करण्याची आवड असेल, हाय हिल सॅण्डल, स्लिम बॉडी फीट कपडे यांचे तुम्ही शौकीन असाल तर वेळीच सावध व्हा. कारण फॅशनमधून मिळणार्‍या या आनंदाचे पुढे जाऊन मोठ्या समस्येत रूपांतर होऊ शकते. हाय हिल्समुळे पायाचे दुखणे वाढते तर घट्ट कपड्यांमुळे थेट परिणाम रक्ताभिसरण प्रक्रियेवर होतो. ज्यामुळे भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होतात, अशी माहिती ग्रीनपीस या स्वसंसेवी संस्थेने आपल्या अहवालात दिली आहे.
सुंदर, आकर्षक दिसण्यासाठी हल्ली बरेच तरुण-तरुणी ब्रॅण्डेड कंपन्यांचे घट्ट कपडे घालतात. ते त्यांना शोभूनही दिसतात, पण या तंग कपड्यांमुळे मांसपेशी आवळल्या जातात. यामुळे जितका वेळ हा घट्ट पेहराव शरीरावर असतो तितका वेळ रक्ताभिसरण प्रक्रियेचा वेग मंदावतो. अंग दुखू लागते. चक्कर, मळमळणे, हाता-पायाला मुंग्या येणे यासारखा त्रास अचानक होऊ लागतो.
काही परदेशी कंपन्या आपल्या कपड्यांचे रंग वेगळे दिसावे यासाठी ठराविक रसायने असलेल्या कापडापासून कपडे तयार करतात. ज्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. त्वचेवरील सूक्ष्म छिद्रातून घामावाटे या कपड्यांचा रंग नकळत आपल्या शरीरात जातो. ज्यामुळे हार्मोन्सशी संबंधित विकार होऊ शकतात. यात कॅन्सरही होऊ शकतो. हाय हिल्समुळे मणक्यावर ताण येतो. पाय व गुडघेदुखी सुरू होते. यामुळे फॅशन करताना सावध राहावे. (वृत्तसंस्था)