साप्ताहिक राशिभविष्य

0
427

रविवार, ७ ते १३ मे २०१७
सप्ताह विशेष
•सोमवार, ८ मे- सोमप्रदोष; मंगळवार, ९ मे- श्री नृसिंह जयंती, भद्रा (प्रारंभ २५.०४), वैशाख पौर्णिमा (प्रारंभ- २५.०४); बुधवार, १० मे- भद्रा (समाप्त १४.०७), वैशाख पौर्णिमा (समाप्ती- २७.१०), वैशाखस्नान समाप्ती, बुद्ध पौर्णिमा, कूर्म जयंती, पुष्टिपति विनायक जयंती, श्री साईबाबा उत्सव-शिर्डी, श्री सखाराम महाराज पालखी- अंमळनेर; गुरुवार, ११ मे- रवि कृत्तिका नक्षत्रात (दुपारी १२.००); शुक्रवार, १२ मे- शबेबरात; शनिवार, १३ मे- द्वितीया वृद्धितिथी, भद्रा (प्रारंभ २१.०१).

संक्षिप्त मुहूर्त ः साखरपुडा- ७, ८, ११ मे; बारसे- ७, ८ मे, ५ मे, जावळे- ७, ८ मे, गृहप्रवेश- ७, ८ मे.

मेष- आर्थिक आघाडीवर समाधान
या आठवड्यात ग्रहस्थिती फारशी बदललेली नाही. चंद्राचे भ्रमण ६ ते ८ या स्थानांमधून होणार आहे. ही आरोग्यासंबंधीची स्थाने आहेत. त्यामुळे या आठवड्यातही आपणास प्रकृती सांभाळावयास हवी. शनी-मंगळ षडाष्टक अपघाताचे भय दर्शवीत आहे. त्यामुळे आपण प्रकृतीकडे विशेष प्राधान्याने लक्ष द्यावे. वाहने सांभाळून चालवा. वीज, आग यांच्यापासून सावध राहा. याव्यतिरिक्त आपली आर्थिक बाजू मात्र बरीच सावरत असलेली दिसेल. नोकरी व व्यवसायात काही महत्त्वाचे टप्पे गाठू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. व्यवसाय व संपत्तीविषयक महत्त्वाच्या व्यवहारांची पूर्तता आपण करू शकाल. गुंतवणुकीला चालना मिळेल. मात्र शेअर बाजारातील सौदे सांभाळूनच करायला हवेत. थोरामोठ्यांचे व अनुभवी मंडळींचे मार्गदर्शन घेणे लाभदायक ठरेल. शुभ दिनांक- ८, ९, १०.
वृषभ- योजना सफल व्हाव्या
या आठवड्यातील ग्रहमान फारसे बदललेले नाही. चंद्राचे भ्रमण मात्र आपणास ५-६-७ या शुभ व उपयुक्त स्थानांमधून होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला संततीसंबंधाने उत्तम योग आहेत, तर आठवड्याच्या मध्यात नोकरी व व्यवसायाच्या संबंधाने काही शुभकारक घटना घडू शकतात. सरकारी कामात व व्यवसायाच्या अनुषंगाने काही योजनांमध्ये सफलता मिळेल. आपले कर्तृत्व सिद्ध होईल. आठवड्याच्या शेवटी शेवटी कुटुंबात एखादे मंगलकार्य ठरू शकेल. दरम्यान, शनी-मंगळ षडाष्टक आपल्या राशीतून होत आहे. ते काहींना त्रासदायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा योग विस्फोटक आहे. त्यामुळे पडणे, लागणे, कापणे, मोडणे अशा गोष्टी घडणार नाहीत यासाठी सतर्क राहायला हवे. वाहने सांभाळून चालवा. काहींनी प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. शुभ दिनांक- ११, १२, १३.
मिथुन- उधळ्या स्वभाव आवरा
या आठवड्यातील ग्रहमान बव्हंशी मागील आठवड्याप्रमाणेच आहे. चंद्राचे भ्रमण आपल्या सुखस्थानापासून कर्मस्थानापर्यंत होणार आहे. आठवड्याची सुरुवात नोकरी- व्यवसायात उत्तम संधी देणारी आहे. त्यामुळे सारी महत्त्वाची व अर्थार्जनाला मदत करणारी कामे या आठवड्यात ताबडतोब हाती घेऊन लवकर पूर्ण केली पाहिजेत. यामुळे उत्तम यश पदरी पडेल. आर्थिक आवक वाढेल. व्यापारात मोठा लाभ होईल. नोकरीत चांगल्या व लाभकारक घडामोडी घडतील. मात्र यासोबतच आपणास आठवड्याच्या मध्यात चंगळवादी भूमिकेपासून सावध राहावयास हवे. तसेच खर्च वाढविणारी अनेक कारणे अचानक समोर उभी ठाकलेली दिसतील. काहीसा आळसही बळावलेला राहील. तेव्हा सावधान. शुभ दिनांक- ९, १०, ११
कर्क- आनंदी व समाधानकारक
मागील आठवड्यातील ग्रहस्थितीच या आठवड्यात बव्हंशी कायम आहे. मात्र आपला राशिस्वामी चंद्र पराक्रम ते पंचम या स्थानांमधून भ्रमण करणार असल्याने हा आठवडा आपणास मुख्यत्वे आनंदी व समाधानकारक जावा असे वाटते. काहींना आठवड्याच्या सुरुवातीलाच व्यवसाय वा नोकरीतील कामाच्या निमित्ताने एखादा प्रवास घडू शकतो. काही लोक सहल- तीर्थाटन करू शकतात. आठवड्याच्या मध्यात कुटुंबीय व आप्तेष्टांसोबत राहण्याचे योग यावेत. कुटुंबात एखादे कार्य ठरून त्यानिमित्ताने सर्वजण एकत्र येऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी संततीकडून काही आनंदाच्या बातम्या कळतील. शनी-मंगळ षडाष्टक आपल्या कर्मस्थानातून होत आहे. कार्यक्षेत्रातील हितशत्रूंपासून सावध राहावे. त्यांच्याबाबत नरमाईचे धोरण बाळगणे त्रासदायक ठरू शकेल. शुभ दिनांक- १०, ११, १२.
सिंह- नवीन संधी मिळेल
या आठवड्यातील ग्रहमान बरेचसे मागील आठवड्याप्रमाणेच आहे. केवळ चंद्राचे भ्रमण बदलले आहे. चंद्र आपल्या धनस्थानापासून सुखस्थानापर्यंत भ्रमण करणार आहे. त्यामुळे ते आपणास अतियश उपयुक्त, धनवर्धक व सुखदायी ठरण्याची शक्यता राहील. आठवड्याची सुरुवातच मुळी आर्थिक कामांनी व्हावयास हवी. व्यवसायात आर्थिक आवक वाढेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. जुनी येणी वसूल व्हायला हवीत. नोकरी-व्यवसायात प्रतिष्ठा, मानसन्मान लाभावेत. काहींना पदोन्नती, पगारवाढ, महत्त्वाची जबाबदारी मिळू शकेल. चांगली गुंतवणूक करता येईल. आठवड्याच्या मध्यात एखादी भाग्यकारक घटना घडू शकते. नवीन संधी मिळेल. शनी-मंगळाचे षडाष्टक आपल्या पंचमातून होत आहे. ते कौटुंबिक वातावरणात तणाव आणणारे ठरेल. संततीसंबंधी काळजी राहील. शुभ दिनांक- ७, ८, ९.
कन्या- दगदग, धावपळ वाढेल
या आठवड्यातील ग्रहस्थिती बरीचसी मागील आठवड्याप्रमाणेच आहे. चंद्र आापल्या राशिस्थानापासून पराक्रमापर्यंत प्रवास करणार आहे. त्याचे हे भ्रमण आपणास शुभ व धनवर्धक ठरू शकेल. व्यवसायात असलेल्यांना हा आठवडा अतिशय चांगला जावा. नोकरदार वर्गासाठी हा जरा चढ-उताराचा काळ ठरू शकतो. मात्र आपण प्रतिष्ठा जपण्यात यशस्वी होऊ शकाल. आर्थिक क्षमता वाढेलच, शिवाय बौद्धिक कामातही चुणूक दाखवून बाजी मारून घ्याल, असे दिसते. धार्मिक व सामाजिक कार्यात रुची निर्माण होईल. शनी-मंगळाचे षडाष्टक आपल्या भाग्यस्थानातून होत आहे. ते दगदग, धावपळ वाढविणारे राहील. काहींची त्यात दमछाक होणार असली तरी त्याचे चीज होईल. अधिकारी वर्ग खूष होईल. आपली मते, विचार इतरांना पटवून देऊ शकाल. या सार्‍याचा चांगला प्रभाव पडेल. शुभ दिनांक- ७, ८, ९.
तूळ- प्रकृतीबाबत सावध असावे
या आठवड्यातील ग्रहयोग बरेचसे मागील आठवड्याप्रमाणेच आहेत. केवळ चंद्राचे भ्रमण या आठवड्यात काहीसे बदल घडवून आणू शकेल. चंद्र व्ययस्थानापासून धनस्थानापर्यंत प्रवास करणार आहे. त्याच्या प्रभावाने आठवड्याची सुरुवात बरीच खर्चिक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा चंद्र आपणास प्रकृतीची काळजी घेण्यासदेखील सुचवीत आहेत. वेळीच उपचार घेऊन प्रकृती उत्तम राखता येईल. आठवड्याचा मधला काळ संमिश्र स्वरूपाचा राहू शकेल. शेवटचे दोन दिवस मात्र आपणास आर्थिक लाभ देणारे ठरावेत. व्यवसायात आवक वाढेल. नोकरीत महत्त्व वाढेल. काही लाभ अचानक पदरी पडू शकतील. शनी-मंगळाचे षडाष्टक आपल्या अष्टम स्थानातून होत आहे. अष्टम हे आरोग्याची हानी करणारे स्थान आहे. त्यामुळे या आठवड्याच्या विशेषतः सुरुवातीला आपण प्रकृतीबाबत सतर्क असले पाहिजे. वाहने सांभाळून चालवावीत. छोटे-मोठे अपघात टाळावेत. शुभ दिनांक- ९, ११, १३.
वृश्‍चिक- आर्थिक व्यवहारात सतर्क
या आठवड्यातील ग्रहमानात मागील आठवड्याच्या तुलनेत फारसा बदल झालेला नाही. चंद्र मात्र लाभस्थानापासून भ्रमण सुरू करीत तो आपल्या राशीत येईल. त्यामुळे आठवड्याची सुरुवात व शेवट दोन्ही उत्तम आणि मधला काही काळ मात्र खर्चिक, त्रासदायक, दगदग वाढविणारा राहू शकेल. आठवड्याची सुरुवात काही उत्तम बातम्या कानावर पडण्याने होईल. नोकरी-व्यवसायातून आर्थिक लाभ वाढताना दिसू शकेल. एखादी उत्तम संधी मिळू शकेल. आठवड्याच्या मध्यात मात्र आपणास सावध राहावे लागेल. आर्थिक व्यवहारात सतर्क असावयास हवे. फसवणूक, वस्तू हरवणे वगैरे प्रकार संभवतात. या काळात प्रकृतीचीही काळजी घ्यावी. शनी-मंगळाचे षडाष्टक धन स्थानातून होत आहे. हेदेखील त्रासदायक स्थान असल्याने वाहने सांभाळून चालवावीत. कुटुंबातील वातावरण सांभाळावे.
शुभ दिनांक- ८, १२, १३.
धनू- मेहनत लाभदायक ठरेल
या आठवड्यातील ग्रहमान बरेचसे मागील आठवड्याप्रमाणेच आहे. चंद्राचे भ्रमण तेवढे बदलणार असल्याने मागीलपेक्षा काही तुरळक बदल या आठवड्यात अनुभवास येऊ शकतील. चंद्र दशम ते व्ययस्थान असा प्रवास करणार आहे. त्यामुळे आठवड्याची सुरुवात नोकरी-व्यवसायास उत्तम ठरेल. नोकरीत असलेल्यांना स्वतःची छाप जमविता येईल. साहेबांची मर्जी मिळवता येईल. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. आठवड्याचा मधला काळ आपल्या परिश्रमांना शुभ फलांचे वरदान देताना दिसेल. सुरुवातीला केलेली मेहनत लाभदायक ठरेल. आठवड्याचा शेवट मात्र खर्चिक, काहीचा मनस्ताप देणारा, क्लेषकारक राहू शकतो. शनी-मंगळाचे षडाष्टक आपल्या राशीतूनच होत आहे. त्यामुळे स्वभावातदेखील तापटपणा वाढण्याचे भय आहे. राग आवरावा लागेल. प्रकृती सांभाळावी लागेल. शुभ दिनांक-९, १०, ११.
मकर- प्रलंबित कामांना वेग

या आठवड्यातील ग्रहमान बव्हंशी मागील आठवड्याप्रमाणेच आहे. चंद्राचेच भ्रमण तेवढे बदलणार असून, ते आपल्या भाग्यस्थानापासून लाभस्थानापर्यंत होणार आहे. त्यामुळे आठवड्याची सुरुवात व शेवट दोन्हीही भाग्यवर्धक व लाभकारक असण्याची शक्यता आहे. हा आठवडा काही शुभ वार्ता घेऊन येऊ शकेल. चंद्राचे उपयुक्त भ्रमण पाहता आतापर्यंत प्रलंबित राहिलेली काही कामे पूर्णत्वास जाऊ शकतात. काही आर्थिक योजनादेखील पूर्णत्वास जाऊ शकतात. व्यवसाय वाढीच्या संधी मिळतील. विविध योजना अंमलात आणू शकाल. युवकांना नोकरीच्या संबंधात काही चांगल्या संधी लाभतील. नोकरीत असलेल्यांना स्वतःचा दबदबा निर्माण करता येईल. शनी-मंगळाचे आपल्या व्ययस्थानातून होणारे षडाष्टक दगदग करावयास लावणारे व प्रकृती बिघडवणारे राहू शकते. शुभ दिनांक- ७, ८, १२.
कुंभ- अवांछनीय घडामोडी संभव
या आठवड्यातील ग्रहमान हे बव्हंशी मागील आठवड्याप्रमाणेच कायम असून, केवळ चंद्राचे भ्रमण तेवढे बदलणार आहे. चंद्र या आठवड्यात आपल्या अष्टम स्थानापासून दशमापर्यंत प्रवास करणार आहे. चंद्राच्या या भ्रमणामुळे आपणास आठवड्याच्या सुरुवातीला प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. तसेच छोट्या-मोठ्या अपघातांपासून सावध असावयास हवे. वाहने सांभाळून चालवावी. शनी-मंगळाचे षडाष्टक आपल्या सुखस्थानावरून होत आहे. ते आपल्या सुखांचा नाश करणारे राहील. थोडक्यात त्रास वाढेल. आर्थिक व व्यावसायिक आघाडीवर काही अवांछनीय घडामोडी घडताना दिसतील. कुटुंबातदेखील एखाद्या सदस्याच्या आजारपणामुळे आपण त्रस्त राहू शकता. एकूणच चिंतेचे वातावरण राहू शकते. शुभ दिनांक- ९, १०, ११.
मीन- नोकरी-व्यवसायात तणाव
या आठवड्यातील ग्रहमान बरेचसे मागील आठवड्याप्रमाणेच आहे. केवळ चंद्राचे भ्रमण या आठवड्यातील घडामोडींवर प्रभाव टाकणारे राहील. चंद्र आपल्या सप्तमस्थानापासून प्रवास सुरू करीत भाग्य स्थानापर्यंत जाणार आहे. त्यामुळे आठवड्याची सुरुवात कौटुंबिक समाधान, सामंजस्य, उत्साह, आनंदाच्या वातावरणात होऊ शकेल. मात्र मधला काही काळ प्रकृतीच्या दृष्टीने काळजी घ्यावसाय लावणारा असू शकतो. स्वतः व जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कु टुंबात कोणी आजारी असल्यास त्याचीही चिंता राहील. शनी-मंगळाचे षडाष्टक आपल्या दशम स्थानातून होत आहे. हे कर्मस्थान असल्याने या योगामुळे नोकरी-व्यवसायात तणाव निर्माण होऊ शकतो. स्पर्धा, नोकर व सहकार्‍यांचे असहकार्य त्रासदायक ठरेल.
शुभ दिनांक- ७, ८, १२.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६