संजय भाकरे फाऊंडेशन : हौशी रंगभूमीचा आधारवड…

0
123

संजय भाकरे उवाच
गत २६/२७ वर्षात ‘एकांकिका स्पर्धा व राज्य नाट्य स्पर्धा’ हे माध्यम, ‘कौतुक, बक्षिसे व पुरस्कार’ ही ‘शक्तिवर्धके’ व नागपुरातील हौशी रंगभूमी जिवंत ठेवण्याची जबाबदारी या त्रिसूत्रींवर ‘संजय भाकरे फाऊंडेशन’ची ‘निर्मिती व कार्यप्रणाली’ बांधलेली आहे. आम्हा कलाकारांचं ‘हक्काचं, कौतुकाचं व आश्रयाचं’ एकमेव स्थान-माहेरघर म्हणजे ‘धनवटे रंग मंदिर’. ज्याच्याशी समस्त नाटकमंडळींच्या कडूगोड आठवणी जुळलेल्या आहेत. ‘आकाशवाणी-बालविहार’ हा ‘वाचिक अभिनयाचा पहिला वर्ग तर ‘राज्य नाट्य स्पर्धा’ ही पदवी, असा हा एकुणात प्रवास. प्रथम ‘नाना तालीम घेतात’मधील ‘बालकलावंत’ ही पहिलीवहिली एंट्री, मग ‘अगोचर’, ‘धिस इज फॉर रिअल’ ज्यामध्ये संजय सूरकर, अनिल कुलकर्णी, शैलजा कामत वगैरे, दिग्गज दिग्दर्शकांची तालीम, कालांतराने रोज पाहून पाहून मलाही पाठ होत गेले, घरच्या गच्चीवर स्वत:च ‘दिग्दर्शक व कलाकार’ अशी ही जडणघडण. मधुकर भाकरे (वडील) यांच्या अध्यक्षतेखाली ‘रंगधारा’ या संस्थेच्या माध्यमाने ‘निम्मा शिम्मा राक्षस’, सी. पी. ऍन्ड बेरार कॉलेजच्या स्टेजवर प्रयोग. १० रु तिकीट, जी आम्ही घरोघरी जाऊन विकलीत. नागपूर जेसीज ‘टॅलेन्ट मोनो ऍक्टिंग स्पर्धा’, ‘एकच प्याला’मधल्या सुधाकरने प्रथम पारितोषिक मिळवून दिले. ‘अमॅच्युअर आर्टिस्ट कम्बाईन’ या संस्थेमार्फत माझ्या नाट्य प्रवासाची यात्रा खर्‍या अर्थाने सुरू झाली. ‘असंही एक कुरुक्षेत्र’ हे राज्य नाट्य स्पर्धेतलं पदार्पण, गजानन पांडे दिग्दर्शक, तालमीची शिस्त, वेळ, अभिनयाचे बारकावे, रंगमंचीय हालचाल, आवाजाची लेव्हल हे प्रथमच शिकायला मिळाले. मग मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यात प्रयोग झाला.
एकांकिकेचे पर्व सुरू…
‘घोटभर पाणी’ अमरावतीला पहिला प्रयोग झाला. आणि सुरुवात झाली बक्षिसाच्या वर्षावाची. सलग १४ स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक. अभिनय, दिग्दर्शन आत्मिक आत्मविश्‍वास बळावला. मग जिथे स्पर्धा ‘तिथे घोटभर पाणी’, ‘अमॅच्युअर आर्टिस्ट कम्बाईन’ स्पर्धांमध्ये रुळलेली, बरीच पारितोषिके मिळवली. नंतर मग जवळपास ४० च्या वर एकांकिका केल्या, राज्य नाट्य स्पर्धेत दरवर्षी सहभाग राहिला.
मध्यंतरी ‘आज अचानक’, ‘अंगार’, ‘कळ्या या लागल्या जीवा’, ‘कॉल मी कप्तान रॉबर्ट’, ‘दिस इज फॉर रिअल’, ‘टू इज कंपनी’, ‘रूपक’, ‘असे नवरे अशा बायका’, ‘दिली सुपारी बायकोची’ अशी जवळपास २५ हून जास्त नाटकं अभिनय, दिग्दर्शक म्हणून आणि जवळपास ४० एकांकिका, विदर्भातील सगळ्याच स्पर्धेत सादर केल्या, बक्षिसांची खैरात झाली. नाव कमावले, अनेक पुरस्कारही मिळाले.
थोडंसं वेगळं
‘नाट्यसंहिता’ आवड म्हणून महाराष्ट्रातील अनेक लेखकांचा संपर्क, ४००० च्या वर स्क्रिप्ट जमवल्या व जोपासल्या. ‘नाट्य परिषद’ नागपूर, अनेक वर्ष कार्यरत होतो. महाराष्ट्रातील सर्वात उत्तम काम करीत असल्याचा गौरव नागपूर शाखेस प्राप्त होता. लोकसभा निवडणुकीत मा. नितीनजी गडकरी उमेदवार होते. स्वत:हून त्यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या जाहीरनाम्यावर ’स्ट्रीटप्ले’ बसविला. ज्या ठिकाणी साहेबांच्या सभा असतील तिथे सुरुवातीला गर्दी व्हावी यासाठी भाजपा कार्यालयातून नियोजित कार्यक्रमानुसार रोज ५ शो सुरू झाले. नितीनजी प्रचंड मतांनी निवडून आले. माझा आनंद गगनात मावत नव्हता. खूप लहानपणापासून त्यांच्या सान्निध्यात असल्याने साहजिकच हा विजयही आमचा होता. काही नवीन तरुण मुलांचा यानिमित्ताने संपर्क होऊ लागला. काका, आपण काही तरी वेगळ करू ना! हा आग्रह रोज होऊ लागला.
संजय भाकरे फाऊंडेशन
नवोदित मुलांना रंगमंच उपलब्ध करून त्यांना ‘अभिनय व दिग्दर्शन’ याचे मार्गदर्शन सुरू केले. दरमहा एक एकांकिका करू. संजय भाकरे फाऊंडेशनच्या मृगाचा पाऊस नाटकाची बातमी प्रसिद्ध झाली. खूप फोन आले. काही लोक घरी आले. या उपक्रमाचे कौतुक करायला लागले. तसतशी माझी जबाबदारी क्षणाक्षणाला वाढतच होती. सर्वात जास्त आनंद झाला. आता नागपूरकर रसिकांमध्ये संजय भाकरे फाऊंडेशन हे नाव बरेच रुळले होते. बाप हा बापच असतो (फेब्रुवारी) ही एकांकिका सादर करण्याचे ठरले. गजानननगर समाज भवन परिसरात उभारलेल्या भव्य रंगमंचावर. पूर्ण नवीन टीम, नवीन उत्साह. आता मला पोरांमध्ये जिद्द दिसली. कारण झाला प्रकार त्यांना माहीत होता. रंगकर्म करण्याच्या उद्देशाने प्रेरित होते, नाटकाचा सेट लागला, बाल्या लारोकर प्रकाशयोजना बघत होता. केयूर संगीताची बाजू सांभाळीत होता. पराग साऊंड सांभाळीत होता. समोर तोच उत्साह असलेले रसिक, आता आम्हाला गजानननगरमधील रसिक मिळाले. काही रसिक कौतुकाने पाहत होते, एवढा खर्च, भव्यता कोण करीत असेल? रसिकांना प्रवेश नि:शुल्क, ७ वाजता दुसर्‍या इनिंगचा प्रयोग सुरू झाला. टाळ्यांचा कडकडाट, गर्दी, पुन्हा वृत्तपत्रांनी भरभरून लिहिले, उत्तम प्रतिसाद आणि सातत्याने सुरू केल्या एकाहून एक दमदार एकांकिका (मार्च) खेळ मांडीयेला, (एप्रिल) सायंकाळच्या कविता, (मे) सावधान! एक योगकथा (जून) कुलकर्णी व्हर्सेस देशपांडे (जुलै) पार्टनर (ऑगस्ट) माजघरातील माती (सप्टेंबर) स्टॉप दॅट (ऑक्टोबर) स्थळ काळ वेळ (नोव्हेंबर) मजार, (डिसेंबर) पाषाणकर, तुमचं काय चाललंय आणि (जानेवारी) शेजारी, आम्ही शेजारी.
कृतज्ञता – प्रेरणास्थान, मार्गदर्शक आणि हक्काची माणसं.
माझे मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे मा. नितीनजी गडकरी, सौ कांचन वहिनी, आमदार अनिल सोले, माजी मंत्री नितीन राऊत, चंद्रकांत चन्ने, गजानन पांडे, रमेश अंभाईकर, प्रकाश लुंगे, विलास तरणकंठीवार, बापू चानेखेकर, अजित दिवाडकर, प्रकाश एदलाबादकर, डॉ. मनोहर रोकडे, डॉ. अनिल वैद्य, मेघना वाहोकार, सुधीर वैद्य, मधू जोशी तर सहप्रवासी मुंबईचे विशाल कदम, इरावती कर्णिक, समीर विद्वंस, विजय कान्हेरे, कै. चंद्रमणी तुर्भेकर, किरण पोत्रेकर, जयंत पवार, चतुरंगचे विद्याधर निमकर, पुण्याचे योगेश सोमण, राजू फुलकर, अविनाश फाटक, संजय पवार, प्रशांत गिरकर, नाशिकचे विवेक गरुड, दत्ता पाटील, अनिल काळोखे, नगरचे पी.डी. कुलकर्णी, सांगलीचे इरफान मुजावर, हृषिकेश तुराई व माझी आई विजया भाकरे हिचा आशीर्वाद, माझे बळ आहे, ताकद आहे. प्रत्येक प्रयोगाला तिची उपस्थिती ही पुढच्या प्रयोगास प्रेरणा होते. माझे भाऊ अजय, राम व अभय यांचा हातभार गृहीतच धरला असतो.
माझ्यावर जीव लावून प्रेम करणारी माझ्या विश्‍वासातली माझी मानस कन्या सौ. राखी वैद्य हिने व्यवस्थापनाची माझी खूप मोठी जबाबदारी आपल्याकडे घेतली. नाटकाची फारशी जवळीक नसणारी राखी माझी तडफड बघून बापाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या तयारीत लागली. दोन-चार एकांकिका, एखादं नाटक करून माजणार्‍यापेक्षा माझ्या नवीन मुलांसाठी आयुष्य घालवायचे असे ठरवून ही वाटचाल सतत अर्थात परमेश्‍वर करू देईल तोपर्यंत करतच राहायचे. नवीन पिढीला मी काही दिले यातच माझे समाधान राहील.
याजसाठी केला होता अट्टाहास
मध्यंतरी निखिल रत्नपारखी नागपूरला आले असताना त्यांनी आमच्या संस्थेला आवर्जून भेट दिली, विस्तृत चर्चा केली, आमच्या कामाचे कौतुक केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या वर्तमानपत्रातील स्तंभात आपल्या भेटीचा वृत्तांत मांडताना संस्थेच्या कार्याची स्तुती करून अनेकांच्या निदर्शनास आमचे कार्य आणून देण्याचे मोलाचे कार्य केले. कदाचित याचीच परिणती म्हणून परवा अ.भा. मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेने संजय भाकरे फाऊंडेशनच्या गेली ३ वर्षे सतत एकांकिकेच्या माध्यमातून नागपुरात एक नवीन वातावरण निर्माण केल्याबद्दल विशेष सन्मान केला.
नागपूर नाट्यसृष्टीतील मरगळ दूर करण्याचे महनीय कार्य ‘संजय भाकरे फाऊंडेशन’ या संस्थेने केल्याने त्यासम अनेक संस्था पुन्हा कार्यरत झाल्या. नवनवीन मुले पुन्हा रंगभूमीकडे वळली. याचं संपूर्ण श्रेय ‘संजय भाकरे’ यांना जातं, या शब्दात आमदार गिरीश व्यास यांनी आमची प्रशंसा केली आणि कृतकृत्य झाल्यासारखे वाटले…
माझं कौतुक नाही झालं तरीही चालेल, परंतु ही चळवळ चालू राहिली पाहिजे हा उद्देश व नागपुरातील रंगभूमीशी निगडित तमाम कलाकारांचं ‘पोटेन्शियल, दुर्दम्य इच्छाशक्ती व अपार मेहनत करायची तयारी’ याची परिणती उत्तमोत्तम नाटकांची निर्मिती होऊन नाट्यसृष्टी भरून जावो ही आत्मिक समाधान देणारी बाब… आजवर व्यावसायिक रंगभूमीला नागपूरने अनेक ताकदवर कलाकार दिलेले आहेत याचीच पुनरावृत्ती होवो हीच ईशचरणी प्रार्थना…
– एनसी देशपांडे /९४०३४९९६५४