स्मार्ताग्नी

0
217

स्मार्ताग्नी म्हणजे ज्याच्या स्थापनेचा आणि विनियोगाचे विधी स्मृतिग्रंथात देण्यात आले आहेत असा अग्नी. तसंच ज्या अग्नीच्या स्थापनेचा आणि विनियोगाचे विधी श्रौत ग्रंथात दिले आहेत तो श्रौताग्नी. स्मार्ताग्नीचं सर्वात लोकप्रिय उदाहरण म्हणजे विवाहप्रसंगी लाजाहोमाच्या वेळी स्थापलेला अग्नी. यालाच गृह्याग्नि असंही म्हणतात.
वैदिकांनी अग्नीला विविध स्वरूपात पाहिलं. त्यापैकी पहिली पाच रूपं ही निसर्गात आढळणारे आग, वडवानल (समुद्रात पेटलेली आग), ढगात कडाडणारी वीज, वणवा आणि जठराग्नी म्हणजे भूक. तर नंतरची रूपं अग्नीच्या कामानुसार मानण्यात आली. वैदिक कर्मकांडात अग्नीचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार सृजनात्मक हव्यवाहन अग्नी आणि दुसरा प्रकार विध्वंसक कव्यवाहन किंवा क्रव्याद अग्नी, म्हणून त्याला दोन तोंडं दाखवण्यात येतात.
वैदिक मान्यतेनुसार सृजनात्मक म्हणजे विविध कर्मकांडात विविध देवतांचा हविर्भाग अर्थात यज्ञकुंडात आहुती म्हणून अर्पण करण्यात येणारे खाद्यपदार्थ वाहून नेणारा तो हव्यवाहन अग्नी. याचेही दोन प्रकार आहेत. यापैकी स्मार्ताग्नी म्हणजे ज्याच्या स्थापनेचा आणि विनियोगाचे विधी स्मृतिग्रंथात देण्यात आले आहेत असा अग्नी. तसंच ज्या अग्नीच्या स्थापनेचा आणि विनियोगाचे विधी श्रौत ग्रंथात दिले आहेत तो श्रौताग्नी.
स्मार्ताग्नीचं सर्वात लोकप्रिय उदाहरण म्हणजे विवाहप्रसंगी लाजाहोमाच्या वेळी स्थापलेला अग्नी. यालाच गृह्याग्नि असंही म्हणतात. याच अग्नीला साक्षी ठेवून पतिपत्नी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतात. हा असतो ‘योजक अग्नी’ = मूळ धातू ‘युज’ म्हणजे जोडणे त्यापासून तयार झाला ‘योजक’ म्हणजे जोडणारा, जुळवणारा.
इंग्रजी भाषेत ‘वेल्ड’ असं एक क्रियापद आहे. धातूचे दोन तुकडे/भाग सांधणं, जोडणं, जुळवणं या अर्थी ते वापरलं जातं. ‘वेल्डिंग’ केलेले धातूचे ते दोन भाग वेगवेगळे दिसत जरी असलेत पण असतात एकच. त्या दोन भागांना वेगळं करायचं तर आरीसारख्या तीक्ष्ण हत्याराचा वापर करून कापून काढावं लागतं. धातुशास्त्रात ही प्रक्रिया करायची तर आग हवीच. ‘वेल्ड’ या क्रियापदाचा कर्ता असतो ‘वेल्डर’ इंग्रजीत वेल्डिंगचं काम करणार्‍या माणसाला वेल्डर संबोधतात, पण वेल्डिंग करण्याचं काम मात्र आगच करत असते. म्हणजे खरीखुरी वेल्डर असते ती आगच! वैदिकांनी धातुविद्येत वापरण्यात येणारी ही ‘वेल्डिंग’ची प्रक्रिया विवाहातही पाहिली. पतिपत्नी वेगवेगळ्या दोन व्यक्ती असल्यात तरी विवाहानंतर त्यांना आयुष्य एकत्रपणे, एकसंध होत कंठावं लागणार आहे. लग्नामुळेच वेगवेगळी दोन कुटुंबं एकमेकांशी जोडली जाणार आहेत. ती वरकरणी दोन दिसत असलीत तरी एकच असणार आहेत. वर आणि वधूचं आयुष्य सांधण्यासाठीच या अग्नीची योजना वैदिकांनी केली आणि त्याला ‘योजक’ म्हणजे ‘वेल्डर’ असं नावही दिलं. त्यानं सांधलेल्या या नात्यात मृत्यूसारखी अपरिहार्य अप्रिय घटनाही केवळ याच जन्मात पतिपत्नीला एकमेकांपासून दूर करेल, परंतु पुढच्या जन्मी ते नातं तसंच नित्य असेल हे त्या ‘योजक’ अग्नीचं प्रयोजन आहे.
लाजाहोम झाला की एका समिधेत त्याचा समारोप करून त्याला वैदिक नवदंपती गृहप्रवेशाच्या वेळी आपल्या घरात स्थापन करत. त्यानंतर त्याला ‘गृह्याग्नी’ म्हणत. याचा प्रतिपाळ वैदिक पतिपत्नी आयुष्यभर करतात. त्या काळी एकत्र कुटुंबात जितकी जोडपी घरात असतील तितके गृह्याग्नी असत. प्रत्येक जोडप्याच्या मुलाबाळांचे सोळा संस्कार त्या त्या जोडप्याच्या गृह्याग्नी करण्याची प्रथा होती. प्रत्येक संस्कारासाठी हा गृह्याग्नी वेगवेगळ्या नावांनी पुजल्या जाई. उदाहरण म्हणजे विवाहातला लाजाहोमाचा ‘योजक अग्नी’वराच्या आईवडिलांच्याच गृह्याग्नीतून घेतला जायचा. हा वंशसातत्य दाखवणारा विधी आहे.
त्यानंतर गर्भिणी स्त्रीवर होणार्‍या संस्कारासाठी गृह्याग्नतीतून ‘मरुत’ नावाचा अग्नी स्थापन करण्यात येई. याचं नाव ‘मरुत’ म्हणजे ‘वायु’ किंवा ‘वात’. आयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी ‘वात’ हा दोष गर्भधारणा, गर्भारपण आणि बाळंतपण सुलभ, सुकर करतो. ‘वात’दोष हा संपूर्ण शरीराचा नियंत्रणकर्ता आहे. वात संतुलित असला की शरीर आणि मन निरोगी राहतं. बाळंतपणात वातविकार वाढला तर बाळंतीण दीर्घकाळ किंवा कायमचीच आजारी राहते. बाळात वातदोष असंतुलित राहिला तर बाळाच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. वाताला प्रसन्न करण्यासाठी त्याच्याच नावाचा अग्नी स्थापण्याची मखलाशी वैदिक करत.
त्यानंतर मूल आठ वर्षांचं झालं की, त्याचा/तिचा उपनयन संस्कार होई. याच विधीला ब्रह्मोपदेश संस्कार असंही म्हणतात. यात विद्याध्ययन करण्याचं म्हणजेच शिक्षण घेण्याचं व्रत मुलाला/मुलीला देण्यात येतं. या मौंजीबंधन प्रसंगी मातापित्याच्या गृह्याग्नीतून एक समिधा पेटवून घेत एक वेगळा अग्नी स्थापन करतात आणि त्याला ‘समुद्भव’ अग्नी म्हणतात. ‘समुद्भव’ म्हणजे पुन्हा उत्पन्न होणारा! जसं आगीच्या संपर्कात आल्यामुळे एखादं धातुखनिज वितळतं त्यातले अशुद्ध घटक जळून राख होतात आणि शुद्ध धातू तेवढी उरते. तिचं पुन्हा खनिजात रूपांतर करता येत नाही. तो त्या धातूचा पुनर्जन्मच असतो.
तसंच शिक्षणामुळे व्यक्ती तावून सुलाखून निघते, अधिकाधिक परिपक्व आणि गुणसंपन्न होत जाते. तिच्यातला रानटीपणा, अज्ञान, अशुद्धता दूर होते आणि तिला आत्मविश्‍वास, कर्तृत्व आणि जाणिवेची सर्वस्वी नवी झळाळी असलेलं व्यक्तिमत्त्व मिळतं. एकूण शिक्षणाच्या आधीचं ते ओंगळवाणं स्वरूप शिक्षणामुळे जळून जातं. त्या सगळ्या प्रक्रियेत त्या व्यक्तीचा पुनर्जन्म झाल्यासारखा आमूलाग्र बदल होतो, तिला पुन्हा अशिक्षित अनाडी होता येत नाही म्हणजेच ती व्यक्ती शिक्षितरूपात पुन्हा उत्पन्न होते हे सांगणारा तो ‘समुद्भव’ अग्नी.
स्मार्ताग्नीत आणखी एका अग्नीचा उल्लेख आहे आणि तो म्हणजे ‘वरदाग्नी.’ कोणत्याही शान्तिकर्मासाठी जो अग्नी गृह्याग्नीतून घेतल्या जातो तो हा ‘वरद’ नावाचा अग्नी. बाळ जन्मल्यावर त्याची नक्षत्रशांती असो की ग्रहशांती, नवीन घराची गृहशांती असो की अन्य कोणत्या वास्तूची वास्तुशांत, वयाची साठ वर्षं पूर्ण होण्याआधी करायची उग्ररथशांति असो की मृत्यूनंतरचे चौदा दिवस आटोपल्यावर करण्याची उदकशांति असो हा वरद अग्नी सगळ्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा, परिस्थिती, परिणाम भस्म करतो आणि सकारात्मक शक्ती, ऊर्जा, परिस्थिती, परिणाम वाढवतो. हा मांगल्यवर्धनाचा वर देतो म्हणून हा वरद अग्नी असतो.
म्हणजे समिधा त्याच, हवनकुंड तेच, आगही तीच, पण तिच्या स्थापनेमागचा उद्देश आणि तिच्यावर करण्याच्या विधींच्या प्रयोगानुसार तिचा होणारा विनियोग यामुळे त्या आगीचा अग्नी होतो आणि त्या त्या प्रयोजनानुसार त्याची नावंही वेगवेगळी असतात. म्हणून म्हटलं की, वैदिकांचा अग्नी हे आणखी एका लेखाचं प्रयोजन होऊ शकतं. तस्मात् या लेखाचा पूर्णविराम इथेच रेखते.
– डॉ. रमा गोळवलकर ९४२२११४६२०