बाहुबली : बाहुबोली की बुद्धिबोली?

0
213

आपला सिनेमा
बाहुबलीची कथा अत्यंत वेगवान पद्धतीने व कुठेही रेंगाळत राहणार नाही अशा पद्धतीने सांगण्यात येत असली तरीही चित्रपटाचा पहिला भाग न पाहता दुसरा भाग पाहणार्‍याला त्याची गंमत अनुभवता येणार नाही. अत्यंत वेगवेगळी वळणं घेत, फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करीत आणि आजच्या डिजिटल विश्‍वातील ‘व्ही.एफ.एक्स’ अशा संबोधनाने प्रचलित असलेल्या तंत्राचा वापर करीत ही दृश्ये आपण पडद्यावर पाहतो.
‘बाहुबली’ सध्या चर्चेचा विषय झाला आहे. सिनेमापासून चार हात दूर राहणार्‍या, सिनेमाची आवड असणार्‍या काही जणांनी आवडीने ‘बाहुबली’ पाहण्यात होकार दर्शविला आहे. ‘बाहुबली’ या समर्पक शीर्षकाने प्रकाशित झालेल्या या चित्रपटात जगातील अब्जोवधी प्रेक्षकांना भुरळ घालण्यासारखे नक्की आहे तरी काय? हे सिनेमा पाहिल्याशिवाय कळणार नाही.
१९४७ साली ‘चंदामामा’ नावाचं एक हिंदी मासिक प्रकाशित होत असे. बी. नागी रेड्डी आणि त्यांचे मित्र चक्रपाणी यांनी ते तेलगुमध्ये सर्वप्रथम प्रकाशित केलं. त्यानंतर ते भारतातील तमीळ, बंगाली, कन्नड, इंग्रजी, आसामी, उरिया आणि मराठी अशा अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ लागलंं. या ‘चांदोबा’मध्ये काल्पनिक, चमत्कारिक, पौराणिक, जादूई कथा प्रसिद्ध होत असत. या चित्रकथांचा वाचक हाच त्या काळी प्रसिद्ध होणार्‍या सिनेमाचाही प्रेक्षक असे. इंग्रजी साहित्यातील ‘कॉमिक’ प्रकार खर्‍या अर्थाने रूढ झाला तो चांदोबा, चंदामामामुळे. प्रत्येक भाषेत ‘चंदामामा’ अर्थाचं शीर्षकच या पुस्तकाला देण्यात आले होते. घरोघरी आढळणार्‍या चंदामामाने बाल प्रेक्षकांमध्ये या चित्रकथेतील जादूचे आकर्षण जसे निर्माण केले तसेच शौर्य आणि धाडसही अंगाअंगात भिनवले. तुमच्या आमच्यामध्ये आजही त्या चंदामामाच्या स्मृती नक्कीच जाग्या असतील. ‘बाहुबली’ सिनेमाच्या निर्मितीचं मूळ आहे ते या चित्रकथांमध्ये. कारण या चित्रपटाचा पटकथा लेखक व दिग्दर्शक एस.एस. राजमौली याला याच चांदोबाने झपाटलं होतं. यातील अनेक कथांच्या आकर्षणामुळे त्याच्या डोक्यात तेच अद्भुततेचं भूत पडद्यावर साकारण्याचं ध्येय जणू घर करून बसलं होतं. तीच अद्भुतता अखेर संधी मिळताच त्याने बाहुबलीच्या रूपाने एका महाकाव्यासारखी पडद्यावर साकारली.
भारतातील सिनेमाला जन्म देणारे दादासाहेब फाळके यांनीही त्या काळी सिनेमाचा प्रारंभ केला तो भारतातील पौराणिक कथांचा आधार घेऊन. कारण प्रेक्षक त्यात गुंतून जात असत. ‘ट्रीक सीन्स’ या सिनेमांचा आत्मा आणि नाट्यमय प्रसंगांची रेलचेल यामुळे खर्‍या अर्थाने मनोरंजन करणारा चित्रपट असे त्याचे स्वरूप होते. १९३१ सालापासून मुक्या चित्रपटांना वाचा फुटली तेव्हा पहिला बोलपट पडद्यावर आला तो ‘आलम आरा.’ ‘आलम आरा’तही साहस दृश्ये आणि कल्पनारम्यतेवरच भर दिला गेला होता. ‘शीरीं फरहाद’, ‘लैला मजनू’, ‘सिंदबादवी सेलर’, ‘अल्लाऊद्दीन और जादुई चिराग,’ ‘अलीबाबा चालीस चोर,’ ‘चार दरवेश’, ‘हातीमताई,’ ‘बुलबुले परिस्तान’, ‘पाताळपद्मिनी’ हे पोषाखी आणि अचाट कल्पनाशक्तीने थक्क करणारे चित्रपट यशस्वी ठरले. याचं कारण त्या कथा प्रचलित होत्या. वाचल्या गेल्या होत्या. आणि बालगोपालांमध्ये त्या रंगवून सांगण्याचं काम राजमौलीसारखे उत्साही प्रेक्षक करीत असत. त्याच वेडाचं रूपांतर नव्या तंत्रज्ञानामुळे राजमौलीसारख्या ‘बुद्धिबली’ दिग्दर्शकाने सहजसाध्य करून विशाल पडद्यावर आणलं आहे. त्यासाठी जी कथा के.बी. विजयेंद्र प्रसाद यांनी रचली आहे त्यात रामायण, महाभारतासारख्या ग्रंथामध्ये ज्या मानवी स्वभावाच्या नाट्यमय घटना सांगितल्या गेल्या आहेत त्याच, तशाच घटना थोड्या फार फरकाने यातही मांडल्या गेल्या आहेत. या कथेत कौटुंबिक कलह आहे, सत्तेचं राजकारण आहे. राज्याराज्यांमधील स्पर्धा आहे, मातृप्रेम, भाऊबंदकी, धनलालसा, प्रेमाची वासना, खलनायकी आणि सर्वात कहर म्हणजे युद्धातील अतर्क्य, अनपेक्षित आणि सर्वसामान्यांना रंजक वाटावेत असे डावपेच जे विस्मयकारक व सर्व आबालवृद्धांना आश्‍चर्यचकित करणारे आहेत.
बाहुबलीची कथा अत्यंत वेगवान पद्धतीने व कुठेही रेंगाळत राहणार नाही अशा पद्धतीने सांगण्यात येत असली तरीही चित्रपटाचा पहिला भाग न पाहता दुसरा भाग पाहणार्‍याला त्याची गंमत अनुभवता येणार नाही. अत्यंत वेगवेगळी वळणं घेत, फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करीत आणि आजच्या डिजिटल विश्‍वातील ‘व्ही.एफ.एक्स’ अशा संबोधनाने प्रचलित असलेल्या तंत्राचा वापर करीत ही दृश्ये आपण पडद्यावर पाहतो. हे व्ही.एफ.एक्स. तंत्र नेमकं काय आहे? ते कशाप्रकारे काम करतं? विशाल पडद्यावर दिसणारी लाखो माणसं खरंच तेव्हा होती का? हत्ती, बैल असे युद्धातील हजारो प्राणी आणि विविध आयुधं, शस्त्र, हाणामारीची, अचाट साहसी दृश्ये चित्रित करताना या तंत्राचा कसा वापर केला गेला? अशा तांत्रिक प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यासाठी किंवा त्याचाच विचार करीत जर तुम्ही हा सिनेमा पाहिला तर तुम्हाला सिनेमाचा निर्भेळ आनंद लुटता येणार नाही. कारण तसा विचार करायला ‘बाहुबली’ वेळच देत नाही.
‘काल्पनिक अद्भुतरम्य महाकाव्य’ असं वाखाणलं गेलेल्या बाहुबलीची सुरुवात फेब्रुवारी २०११ साली झाली. राजमौलीने प्रभासला घेऊन आपण एक चित्रपट निर्माण करीत असल्याचा इरादा जाहीर केला. जानेवारी २०१३ साली चित्रपटाचं शीर्षक जाहीर झालं ‘बाहुबली’. ६ जुलै २०१३ रॉक गार्डन कर्नुल येथे धबधब्याची साहसी दृश्ये चित्रित करण्यात आली. केरळमधील ही निसर्गरम्यता बाहुबलीच्या पहिल्या भागाचे आकर्षण आहे. इतर बर्फाळ पर्वतांची दृश्ये नंतर बल्गेरियातील डोंगरदर्‍यात चित्रित करण्यात आली आहेत. महिष्मती नगरी रामोजी सिटीमध्ये उभारण्यात आली होती. विजयेंद्र प्रसाद कथा व पटकथा लेखक यांनी कथा विस्ताराचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण केले होते. चित्रीकरणासाठी तयार करण्यात आलेली १५,००० दृश्ये आजवर कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी आजवर तयार करण्यात आली नव्हती. चित्रीकरणाचा ९० टक्के आराखडा चित्रीकरणाआधीच तयार करण्यात आला होता. जगभरातील १८ व्ही.एफ.एक्स. कंपन्यांनी ही ‘चमत्कृती’ साकार केली आहे, असं म्हटलं जातं. हैदराबाद, चेन्नई, मलेशिया, साऊथ कोरिया अशा ठिकाणच्या स्टुडिओमध्ये हे डिजिटल इफेक्ट्‌स आणि आपल्याला अचंबित करणारी दृश्ये निर्माण करण्यात आली आहेत. बाहुबलीचे दोन्ही भाग एकाच वेळी निर्मिती अवस्थेत होते. २५० कोटींचा खर्च त्यासाठी गृहीत धरण्यात आला होता. तो पुढे तीनशे कोटींच्या घरात गेल्याचे कळते. हजार कोटींच्या घरात व्यवसाय करू शकेल असा आज अंदाज व्यक्त केल्या जाणार्‍या बाहुबलीने जगातील ४००० पडद्यांवर एकाच वेळी आपली शक्ती दाखवली आहे. पुढील एक-दोन महिन्यात तोे चिनी व जपानी भाषेत ‘डब’ केला जाणार असल्याचे कळते.
बाहुबलीच्या दुसर्‍या भागात अमरेंद्र बाहुबलीला कटप्पाने का मारलं? याची कथा मांडली आहे. ती रंजक आहेच, त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे यात साहसी दृश्ये, युद्धनीतीतील युक्त्या यांच्याबरोबरच प्रेमप्रसंग आणि विनोद यांचा मिलाफ तणाव कमी करण्यास मदत करतो. प्राण्यांचा वापर तर आपली झोप उडविणारा आहे. प्रभास व अनुष्का शेट्टी यांच्या प्रणयप्रसंगाचे गीत आणि कला दिग्दर्शकाने उभारलेले त्या प्रसंगीचे जहाज आजवरच्या हिंदी सिनेमातील सर्वश्रेष्ठ मिलाफ मानायला हवा. अशा बर्‍याच दृश्यातील भव्यता, राजमौली यांच्या टीमने त्यासाठी घेतलेले कष्ट, कल्पकता आणि आर्थिक क्षमतेचे अतिभव्य प्रदर्शन अवघ्या जगाला बॉलीवूड व टॉलीवूडच्या सिनेसृष्टीचे कलावैभव पेश करते. कधीकाळी आम्ही हॉलीवूडच्या साहसी दृश्यांची चोरी हिंदी सिनेमासाठी करीत होतो. मोटारींचे पाठलाग, आकाशदृश्ये जशीच्या तशी आमच्या हिंदी सिनेमात जोडली जात होती. इंग्रजी चित्रपटांच्या कथेची चोरी आजही मोठ्या अभिमानाने केली जाते. हॉलीवूडचे सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, हॅरी पॉटर यांना टक्कर देणारा बाहुबली भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरव ठरला आहे. रामायण, महाभारत आणि अनेक पौराणिक कथा आता राजमौलीच्या प्रेरणेमुळे पुन्हा नव्याने पडद्यावर येऊ लागतील तेव्हा रामायणातील रामाला डिजिटली देवत्व प्राप्त होईल. महाभारतातील कृष्णलीला सोप्या वाटू लागतील. दोन्ही महाग्रंथातील युद्धाची दृश्ये पाहताना त्यातील थरार अधिक चमत्कारी असेल. बाहुबलीमुळे हिंदी सिनेमा बदलेल. बाहुबलीपूर्वीचा हिंदी सिनेमा आणि बाहुबलीनंतरचा हिंदी सिनेमा असे दोन ऐतिहासिक विभाग हिंदी सिनेमाचा इतिहास लिहिताना केले जातील. बाहुबलीचा प्रभाव जपण्यासाठी आता नव्या युवा पिढीतील दिग्दर्शकांना स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल यात शंकाच नाही.
– रत्नाकर लि. पिळणकर/९६१९२८७८४८