केरळातील साम्यवादी हिंसाचाराचा लेखाजोखा

0
144

तिसरा डोळा
केरळमध्ये १०४० मध्ये सुरू झालेल्या संघकामाचा प्रभाव प्रारंभी जाणवत नव्हता. पण, जसा प्रभाव वाढत गेला तसा डाव्यांचा हिंसक विरोधही व्यापक होत गेला. खरे तर भारतीय राज्यघटना प्रत्येकाला मतस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, प्रसारस्वातंत्र्य देते. त्यातूनच संघालाही आपल्या विचारांचा प्रसार-प्रचार करण्याचे अधिकार मिळतात. पण, डाव्यांना ते अमान्य आहे. ‘आमच्या राज्यात आमचे सरकार’ ही तशी आदर्श म्हण, पण या म्हणीचा दुरुपयोग करून ‘आमच्या गावात आमचीच दुकानदारी’ असे ठणकावत विरोधकांना झोपवण्याचाच सिलसिला डाव्यांनी चालवला आहे…
जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांचे हत्यासत्र कधी संपेल? नक्षलवाद्यांचा देशाच्या विभिन्न भागात सुरू असलेला हैदोस कधी आटोक्यात येईल? महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशातील शेतकरी आत्महत्या कधी थांबवतील, कथित पुरोगाम्यांचा या देशातील संस्कृती आणि पंरपरांबद्दलचा आकस कसा नाहीसा होईल? इसिसचे दहशतवादी जगाला वेठीस धरणे कधी सोडतील? पाकिस्तान आणि चीन भारतासोबत आगळिकीचे सत्र कधी आवरते घेतील… हे प्रश्‍न राजकारण आणि समाजकारणात वर्षानुवर्षे काम करणार्‍या मंडळींनादेखील उकलत नाहीत. मग जनसामान्यांना या प्रश्‍नाची कोडी सुटतील, असे कसे शक्य आहे? सामान्य लोकांचा तर या मुद्यांबाबत विचार करताना डोक्याचा पार भुगा होतो आणि तरीदेखील प्रश्‍न अनुत्तरीतच राहतात. असाच एक मुद्दा भारतात वर्षानुवर्षे चिघळत आहे. ही समस्या आहे केरळातील रक्तरंजित हिंसाचाराची अन् त्यातील दोन प्रतिद्वंदी आहेत साम्यवादी विचारांचे डावे पक्ष आणि संघ परिवार. राजकारणातून तर या समस्येवर तोडगा निघण्याची तूर्तास तरी शक्यता नाही आणि समाजकारणही येथे असफल राहिले आहे. २०११ च्या जनगणनेचा विचार करता, केरळमधील ५४.७३ टक्के जनता हिंदू, २६.५६ टक्के मुस्लिम, १८.३८ टक्के ख्रिश्‍चन आणि उर्वरित ०.३२ टक्के नागरिक इतर धर्मावलंबी आहेत. राज्यातील जनतेने वर्षानुवर्षे आलटून पालटून दर पाच वर्षांनी एकतर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला (युडीएफ) किंवा मार्क्सवाद्यांच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीला (एलडीएफ) कौल दिलेला आहे. अगदी गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत भारतीय जनता पक्षाचा केरळमध्ये एकही आमदार नव्हता, पण आज तेथे ओ. राजगोपाल यांच्या निमित्ताने भाजपाने विधानसभेत चंचुप्रवेश केला आहे. त्यामुळे संघ परिवाराला त्यांच्याविरुद्ध होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आवाज मिळाला आहे. भारतात सुरू झालेला ६० च्या दशकातील नक्षलवाद विसाव्या शतकात पार भरकटला. प्रारंभीच्या काळात जमीनदारांच्या रक्तासाठी आसुसलेले नक्षलसमर्थक आज आपल्याच जातिबांधवांच्या रक्तासाठी चटावले असून, त्यांचेच गळे कापण्यात स्वारस्य मानत आहेत. दुसरीकडे मुस्लिम दहशतवादी संघटनादेखील काय करताहेत? वरवर आमची लढाई इस्लामसाठी असल्याचे दाखवत, या संघटनांचे पुढारी वर्चस्वाची लढाई लढत आहेत. प्रारंभीची केवळ सत्ताधार्‍यांविरुद्धची, पिळवणुकीविरुद्धची आणि होय, मुस्लिमेतरांविरुद्धची त्यांची लढाई आज आपल्याच जातभाईंच्या बळीसाठी चटावली आहे. असाच प्रकार साम्यवाद्यांनी केरळमध्ये ६० च्या दशकात आरंभला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम येथे सुरू झाले आणि यांची पोटदुखी सुरू झाली. केरळमध्ये १०४० मध्ये सुरू झालेल्या संघकामाचा प्रभाव प्रारंभी जाणवत नव्हता. पण, जसा प्रभाव वाढत गेला तसा डाव्यांचा हिंसक विरोधही व्यापक होत गेला. खरे तर भारतीय राज्यघटना प्रत्येकाला मतस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, प्रसारस्वातंत्र्य देते. त्यातूनच संघालाही आपल्या विचारांचा प्रसार-प्रचार करण्याचे अधिकार मिळतात. पण, डाव्यांना ते अमान्य आहे. ‘आमच्या राज्यात आमचे सरकार’ ही तशी आदर्श म्हण, पण या म्हणीचा दुरुपयोग करून ‘आमच्या गावात आमचीच दुकानदारी’ असे ठणकावत विरोधकांना झोपवण्याचाच सिलसिला डाव्यांनी चालवला आहे. डाव्यांनी हिंसाचाराचा कन्नूर पॅटर्नच विकसित केला. गेल्या ६० वर्षांचा विचार करता, संघाचे ३०० कार्यकर्ते या हल्ल्यांमध्ये दगावले आहेत. केरळातील रस्त्यांवरचा हिंसाचार आज प्रत्येकाच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येऊन दाखल झाला आहे आणि वैचारिक लढाई वैयक्तिक संघर्षात परिवर्तित झाली आहे. येथे विचार बाजूला पडून सत्तासंघर्षातून वर्चस्वाची लढाई सुरू झाली असून, त्यात उभय बाजूंच्या निरपराधांच्या रक्ताचे पाट वाहात आहेत. गावागावातील वर्चस्वाच्या संघर्षातून केरळी विरुद्ध केरळी असा संघर्ष उभा ठाकला आहे. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी गुंडांची मदतही घेतली जात आहे. बरे, हा हिंसाचार कुणा केरळविरोधकांशी अथवा देशविरोधकांशी नाही. भरकटलेले जे केरळवासी संघपरिवाराशी जवळीक साधत आहेत, त्यांनाच साम्यवादी लक्ष्य करीत आहेत. कन्नूर जिल्ह्यातील पेरुंथत्तील गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची नुकतीच झालेली तोडफोड हा त्याच कटाचा एक भाग आहे. संघाचा विरोध इतका टोकाला गेला की, येथे ‘सीपीएमच्या गावात आपले स्वागत आहे, हा संघमुक्त परिसर आहे, येथे संघाला बंदी आहे,’ अशी पोस्टर्स लावली गेली. डाव्यांच्या या कडव्या आणि हिंसक विचारांमुळे एकेकाळी देवभूमी म्हणून असलेली केरळची ओळख हिंसाचारासाठी देशातच नव्हे, तर जगात होऊ लागली आहे. खरे तर गावातील समस्या गावातच सुटायला हव्यात. न्यायदेखील तेथेच मिळायला हवा. पण वर्षानुवर्षे ते होत नव्हते, त्यामुळे संघ परिवारातील काही संस्थांनी हिंसाचाराने पीडितांना दिल्लीत आणून, त्यांच्या अनुभव कथनाचे कार्यक्रम केले. विषय एवढाच की, यातून पीडितांच्या दुःखाची राष्ट्रीय नेत्यांनी, मीडियाने आणि समाजातील जुन्याजाणत्यांनीही नोंद घ्यावी. अन्यथा मानवाधिकारवाल्यांना केरळसारख्या भारताच्या दक्षिणेकडील एका छोट्या राज्यातील हिंसाचाराची नोंद घेण्याची फुरसत कशी मिळाली असती? हिंसाचारग्रस्तांचे अनुभव अतिशय दाहक आणि हृदय पिळवटून टाकणारे आहेत. गेल्या ६५ वर्षांत संघपिरवारातील लोकांनी आमच्या २०५ कार्यकर्त्यांचे बळी घेतले आणि त्यांच्या हल्ल्यांमध्ये आमचे शेकडो कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावा मार्क्सवादी पक्ष करतो, पण त्यात किती तथ्य आहे, ही बाब शोधायला हवी. उजव्या विचारांच्या लोकांनी १९६७ मध्ये रांचीत दंगे घडविले, १९९२ मध्ये बाबरी ढांचा उद्ध्वस्त केला, २००२ च्या गुजरात दंग्यांमागे उजव्याच विचारांची मंडळी होती आणि नुकत्याच झालेल्या मुझप्फराबाद दंग्यांमध्येही याच मंडळींचा हाता होता, असा आरोप करणार्‍या साम्यवाद्यांनी केरळातील हिंसाचारपीडितांचे अनुभव निश्‍चितच ऐकले पाहिजे, वाचले पाहिजे आणि त्यानुसार आपल्या विचारांमध्ये बदलदेखील केले पाहिजेत. केवळ आरोप करून काही साध्य होणार नाही. देशाच्या इतर राज्यांमध्ये संघपरिवारातील कार्यकर्ते सुरक्षित असताना ते केरळमध्येच असुरक्षित का? याचे उत्तर कधीतरी डाव्यांना द्यावेच लागणार आहे. घृणा, हिंसाचार, अविचार, अतिरेक याला संघात मुळीच स्थान नाही, ही बाबदेखील नोंदवून घेतली जायला हवी. विस्मया नामक मुलीची एक कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळेच ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. अनुभवकथनात ती म्हणते, पोलिस अधिकारी होऊन लोकांची आणि गावाची सेवा करायची माझी इच्छा होती. तथापि, वामपंथी गुंडांनी माझ्या वडिलांची हत्या करून टाकली. माझे स्पप्न साकार करण्यासाठी वडील तयार होते. पण, त्या रात्री माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला. ५२ वर्षीय संतोषकुमार (विस्मयाचे वडील) यांचा एकच दोष होता की, त्यांनी गावातील पंचायत निवडणुकीत भाजपा आणि संघपरिवारातील लोकांच्या मदतीने अर्ज भरला. ती पुढे म्हणते, त्यांनी केवळ माझ्या वडिलांचीच हत्या केलेली नाही, तर माझ्या स्वप्नांचीही राखरांगोळी केली. आता माझ्या डोळ्यापुढे केवळ अंधार आहे. त्यांनी माझ्या वडिलांची हत्या का केली, याचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. अशीच एक हिंसाचारपीडित महिला नारायणी अम्मा. उत्तमन, नारायणी अम्माचे पती, एक उत्कृष्ट बसचालक होते. २००२ मध्ये त्यांचीदेखील हत्या झाली. ते बस चालवत असताना वामपंथी गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. दिवसाढवळ्या बसखाली उतरवून रस्त्यावरच त्यांचा मुडदा पाडण्यात आला. त्या वेळी त्यांचा एकुलता एक मुलगा रेमिथ ११ वर्षांचा होता. पतीच्या हत्येनंतर सावरलेल्या नारायणी अम्माने मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसातरी सुरू केला. मुलाच्या आसर्‍याने पुढचे जीवन सुकर होईल, अशी आशा या वेडीला होती. थोडी स्थिरता आली असतानाच २०१६ मध्ये रेमिथचीदेखील हत्या केली गेली. याचे कारणही तेच की रेमिथसुद्धा संघाचा स्वयंसेवक होता. रेमिथ आपल्या बहिणीसाठी औषध घ्यायला घराबाहेर पडताच, त्याच्यावर सशस्त्र हल्ला करून, त्याची इहयात्रा संपवण्यात आली. डोळ्यांसमोर झालेल्या पुत्राच्या हत्येने नारायणी अम्माला आणखी एक धक्का बसला. डाव्यांच्या प्राजोजित गुंडांपुढे हात जोडून ही माता म्हणत होती, ज्या चाकूने तुम्ही माझ्या पतीची आणि मुलाची हत्या केली, त्याने माझादेखील बळी घ्या! आता मी कुणाच्या सहार्‍याने पुढचे जीवन जगणार आहे? या तिच्या आर्त प्रश्‍नाने या गुंडांचे मन थोडीच हेलावणार होते. प्रजिल नावाचे विभाग प्रचारक तर चालते बोलते शहीद आहेत. त्यांच्या शरीरावर ३० च्या जवळपास शस्त्रांनी भोसकल्याच्या खुणा आहेत. नशीब बलवत्तर म्हणूनच ते वामपंथी गुंडांच्या हल्ल्यातून बचावले. श्रीधरन यांची कहाणी थोडी वेगळी आहे. त्यांना समाजासाठी धावून जाण्याची सवय होती. मोहल्ल्यातून लोकांची आरडाओरड कानावर पडताच ते मदतीला धावून जाण्यासाठी घराबाहेर पडले. तथापि, डाव्यांच्या प्रायोजित गुंडांनी बॉम्ब फेकून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला. ते बचावले, मात्र त्यांचे दोन्ही पाय कायमचे शरीरावेगळे झाले. केरळमधील एका महाविद्यालयाच्या प्राचार्य, डॉ. टी. एन. सरसू या सेवानिवृत्त झाल्या. त्या वेळी एआयएसएफ या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे फुलांनी सजवलेल्या चाबकाने स्वागत केले. शिवदा, रजनी, सरोज, स्वरा अशा कितीतरी महिलांचे अनुभव हृदयाची स्पंदने वाढवणारे आहेत. पिनाराई विजयन सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री. त्यांच्याकडे हिंसाचाराबाबतची निवेदने, निदर्शन सारे काही झाले. पण, पीडितांना न्याय मिळण्याची शक्यता नाही. उलट मार्क्सवादी राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यापासून संघपरिवारातील कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांच्या सत्रात निरंतर वाढ होत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी होत आहे. पण एक बाब ध्यानात घेतली पाहिजे, पिनाराई विजय यांच्यावरच ते पक्षाचे सरचिटणीस असताना एका संघ स्वंसेवकाच्या हत्येचा आरोप असताना त्यांच्याकडून न्याय मिळेल, ही अपेक्षा धरण्यात काय हशील?
– चारुदत्त कहू/ ९९२२९४६७७४