इकडे आड, तिकडे विहीर!

0
170

ज्या ठिकाणी निमलष्करी दले आणि पोलिसांची सक्रियता कमी झाली, त्या ठिकाणी अतिरेक्यांच्या पाठीराख्यांची सक्रियता वाढली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. हळूहळू दगडफेक करणार्‍या जमावाची हिंमत इतकी वाढली आहे की, ते अतिरेक्यांविरुद्ध लढणार्‍या आमच्या शूर जवानांच्या मार्गात आडवे येऊ लागले आहेत. अंगावर येणार्‍यांना मारायचेही नाही अन् मार सहन करायचा, अशा परिस्थितीत ‘इकडे आड, तिकडे विहीर!’ अशी जवानांची अवस्था झाली आहे. हिंसक जमावावर शस्त्र चालविले तर कायद्याची भीती अन् नाही चालविले तर अपमान आणि छळ सहन करा, अशा कचाट्यात जवान सापडले आहेत. ही परिस्थिती आता बदलवली पाहिजे…
दहशतवादाचे चटके खुद्द अमेरिकेला बसल्यानंतर अमेरिकेला दहशतवाद काय असतो हे कळले. तोपर्यंत भारताने अनेकदा तक्रारी करूनही ना युनोने दखल घेतली ना अमेरिकेने! पण, अल् कैदाच्या अतिरेक्यांनी जेव्हा न्यूयॉर्कस्थित ट्विन टॉवरवर हल्ला केला अन् हजारो निरपराध अमेरिकी नागरिकांचा जीव घेतला, तेव्हा अमेरिका खडबडून जागी झाली. दहशतवादाचा मोठा फटका सहन केल्यानंतर अमेरिकेला कंठ फुटला आणि दहशतवादाचा एकत्रितपणे मुकाबला केला पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्षांनी केले. दहशतवाद मोडून काढण्यासाठी अमेरिकेने सगळ्यात आधी अफगाणिस्तानवर हल्ला केला, त्यानंतर इराकवर हल्ला करून सद्दाम हुसेनला नेस्तनाबूत केले. पाकिस्तानात दडून बसलेल्या ओसाबा बिन लादेनलाही अमेरिकेने पाकिस्तानची परवानगी न घेता त्या देशात घुसून ठार मारले अन् समुद्रातही फेकले. हीच अमेरिका दहशतवादाच्या आश्रयदात्या पाकिस्तानला कायम आर्थिक मदत करीत आली आहे. ज्या देशाने दहशतवाद पोसला, वाढविला अन् भारतासह अनेक देशांमध्ये उपद्रव निर्माण केला, त्या पाकिस्तानविरोधात केलेल्या तक्रारींना अमेरिकेने बहुतांश वेळा कचर्‍याचीच टोपली दाखविली. अधूनमधून पाकिस्तानला इशारे देण्याचे नाटक अमेरिकेन जरूर केले. त्यात गांभीर्य कधी दिसले नाही. ही बाब लक्षात घेता, भारताने आता स्वतंत्रपणे निर्णय घेत दहशतवादाचे कंबरडे मोडले पाहिजे. जगाची चिंता करण्याचे काही कारण नाही.
दहशतवाद्यांना आश्रय देऊ नका, असे अमेरिकेने अनेकदा सांगूनही पाकिस्तान ऐकत नाही याचे मुख्य कारण म्हणजे, आपला दुसरा शेजारी चीन हा पाकच्या पाठीशी आहे. चीनने अभय दिल्यानेच पाकिस्तानच्या मनगटात बळ आले आहे. पाकला बळ देण्यात चीनचाही स्वार्थ आहे. आज पाकिस्तानच्या ताब्यात गिलगिट आणि बाल्टिस्तान हे जे दोन भारतीय प्रदेश आहेत, त्यांच्याशी चीनचे हितसंबंध जुडले आहेत. शिनजियांग प्रांतातील कशगर हे चीनमधील जे शहर आहे, ते रेल्वे आणि रस्ते मार्गाने पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील ग्वादर बंदराशी जोडण्याची चीनची इच्छा आहे. आपली आर्थिक प्रगती सातत्याने होत राहिली पाहिजे, त्यात कुठलाही अडथळा येणे चीनला मान्य नाही. त्यामुळेच चीन पाकिस्तानात घुसला आहे. गिलगिट आणि बाल्टिस्तानमधील चीनच्या अस्तित्वामुळे पाकिस्तानचे मनोबल उंचावले नसते तरच नवल. त्यामुळेच पाकिस्तानने आत्मघाती हल्ले वाढवत जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे सगळे पैलू लक्षात घेत, भारताला या आघाडीवर लढण्यासाठी ठोस धोरण तयार करावे लागणार आहे. पाकिस्तानचे आक्रमण निष्प्रभ कसे करता येईल, यावर गांभीर्याने विचार करून रणनीती तयार केली अन् त्याची अंमलबजावी केली, तरच या लढ्यात यश मिळणार आहे.
सीमेपलीकडून पाकिस्तान अतिरेकी पाठवत आहे. हे अतिरेकी प्रशिक्षित आहेत, शस्त्रसज्ज आहेत, त्यांना प्रशिक्षण देणारी कमीतकमी ५० शिबिरं पाकिस्तानात आहेत. एकेका शिबिरात ४०-४० अतिरेकी आहेत. आता सध्या भारतात दीडशेपेक्षा जास्त शस्त्रसज्ज प्रशिक्षित अतिरेकी घुसलेले आहेत. इकडे पाकिस्तानच्या चिथावणीवरून काश्मीरमधले तरुण आपल्याच देशाच्या सुरक्षा दलातील जवानांवर दगड फेकत आहेत. त्यांच्या वाहनांवर हल्ले करीत आहेत. सीमेपलीकडून आणि सीमेच्या अलीकडे जे संकट निर्माण झाले आहे, ते दुहेरी आहे आणि या दोन्ही संकटांचा मुकाबला भारताला एकाच वेळी करायचा आहे. आता तो यशस्वी रीत्या कसा करायचा, हे ठरविण्याची वेळ आली आहे.
पाकिस्तानला वठणीवर आणणे तसे कठीण काम नाही. आज पाकिस्तान ज्या पद्धतीने जम्मू-काश्मिरातील नागरिकांना भारताविरुद्ध चिथावणी देऊन हिंसाचार घडवून आणत आहे, त्याच पद्धतीने भारतही गुलाम काश्मिरातील लोकांना पाकविरुद्ध चिथावणी देऊ शकतो. गुलाम काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये फुटीरवादाची एक चिंगारी पेटविण्याची गरज आहे. काही क्षणात या प्रांतातील लोक पाकिस्तान सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरतील आणि काश्मीरमध्ये पाकने आज जो हिंसक खेळ सुरू केला आहे, तो मागे घेण्यास पाक बाध्य होईल. पाकिस्तानातील सिंध प्रांत आणि खैबर-पख्तुनवा या भागातीलही एक वर्ग असंतुष्ट आहे. त्यांच्या असंतोषाला थोडे खतपाणी घालण्याचे काम भारताने केले, तर तिथल्या राज्यकर्त्यांना पळता भुई थोडी होईल. बलुचिस्तानमध्येही असेच करण्याची गरज आहे. त्यासाठी भारत सरकारला विचारपूर्वक रणनीती आखावी लागेल आणि योजनापूर्वक त्याची अंमलबजावणी करावी लागेल. गुलाम काश्मिरात ज्या लोकांवर अत्याचार होत आहेत, त्यांच्या समस्येला वाचा फोडण्याचीही गरज आहे. त्या लोकांना भारताने मदत केली, तर पाकिस्तान सरकारविरुद्धचा असंतोष मोठ्या प्रमाणात वाढेल अन् तिथली जनता रस्त्यावर उतरली, तर पाकला तिकडेच लक्ष द्यावे लागेल. जोपर्यंत भारत सरकार पाकिस्तानातील या प्रांतांमधील असंतोष वाढविणार नाही, तोपर्यंत आपल्याला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. पाकिस्तानला वठणीवर आणण्याचा हा चांगला मार्ग आहे आणि आपले राज्यकर्ते याचा अवलंब करतील, अशी अपेक्षा करू या!
पाकिस्तानी सैन्याकडून युद्धविरामाचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानी सैन्याने सीमेपलीकडून हल्ला करताना दोन भारतीय जवानांचे बळी घेतले अन् नंतर त्यांच्या मृतदेहांची विटंबना करण्याचे क्रौर्यही केले. त्यामुळे भारतभर संतापाची लाट उसळली अन् बदला घेण्याची मागणी पुढे आली. ज्या दिवशी पाकने हल्ला केला त्या दिवशी खोर्‍यात कॅशव्हॅनही अतिरेक्यांनी लुटली. त्याआधी २७ एप्रिल रोजी सकाळी पाकप्रशिक्षित अतिरेक्यांनी कुपवाडा भागातील भारतीय लष्करी तळावर हल्ला केला. भारतीय सैन्याचे मनोबल खच्ची करण्यासाठीच पाकिस्तानी सैन्याचा हा सगळा खटाटोप सुरू आहे. सीमेवर आणि सीमेच्या आत या ज्या घटना घडल्या आहेत, त्यांची सरकारने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. खोर्‍यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, नियंत्रणाबाहेर जाते की काय, अशी भीतीही वाटायला लागली आहे. आता हे प्रकरण राजकीय वा दहशतवादापर्यंतच मर्यादित राहिलेले नाही. कट्‌टरवाद्यांनी याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न चालविला आहे आणि त्यात ते यशस्वी होतानाही दिसत आहेत. फुटीरतावाद्यांनी हिंसक जमावावर कमालीचे नियंत्रण मिळवल्याचे दिसत आहे. तरुणांनाच त्यांनी हाताशी धरले आहे असे नव्हे, तर महिला आणि लहान मुलांचाही ते वापर करून घेत आहेत. महिला आणि मुलांकडून दगडफेक केली जात असल्याची जी चित्रे आहेत, ती विचलित करणारी आहेत. काश्मीर खोर्‍यात आमचे जे शूर सैनिक प्राणपणाने सीमेचे रक्षण करीत आहेत, त्यांच्याबद्दल खोर्‍यातील जनतेच्या मनात आता सन्मानाची भावना राहिली नसल्याचे प्रत्ययास येत आहे. सोशल मीडियामुळे अतिशय कमी वेळेत हिंसक जमाव जमा करणेही फुटीरतावाद्यांना सोपे झाले आहे. दगडफेक करून आणि घेराव घालून भारतीय सैनिकांना हैराण करण्याचा मार्ग दगडफेक्यांनी अवलंबला आहे. असे असतानाही आम्ही सुरक्षा दलाचे हात बांधून ठेवले आहेत. त्यामुळे सुरक्षा दलातील जवानांचे मनोधैर्य खच्ची होत आहे आणि लढण्याची इच्छाशक्तीही मरते की काय, अशी भीती वाटते आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये आज जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला आज केेंद्रात असलेले सरकार जबाबदार नाही. यासाठी केंद्रातील आधीचे कॉंग्रेसचे सरकार आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार जबाबदार आहे. त्यांच्या लांगूलचालनाच्या धोरणामुळेच खोर्‍यातील वातावरण बिघडले आहे. आज जम्मू-काश्मिरात पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंटच्या नेतृत्वातील सरकारमध्ये भाजपाचा समावेश असला, तरी निर्माण झालेल्या हिंसाचारासाठी भाजपाला जबाबदार ठरविता येत नाही. खोर्‍यात लोकनियुक्त सरकार असावे आणि तिथला कारभार लोकशाही मार्गाने चालावा, या प्रामाणिक हेतूनेच भाजपाने सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, हे लक्षात घेतले पाहिजे. विधानसभेची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीच्या प्रचारात मेहबुबा मुफ्ती यांनी अफस्पा हटविण्याचे आणि सुरक्षा दलांची कथित अत्याधिक तैनाती कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतरही मेहबुबा मुफ्ती यांनी अतिरेक्यांप्रतीही सौम्य भूमिका घेतली. कारण, त्यांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते हे अतिरेक्यांचे समर्थक होते. अशी सगळी परिस्थिती असतानाही सुरक्षा दलातील जवानांना हेच सांगितले जाते की, काहीही झाले तरी प्रत्युत्तर न देता धाडसाचा परिचय द्यावा. कसा देणार धाडसाचा परिचय? शक्यच नाही. आणि का म्हणून मुलांकडून, महिलांकडून, तरुणांकडून होणारी दगडफेक सहन करायची आमच्या जवानांनी? प्रश्‍न हा आहे की, आणखी किती दिवस सहन करायचे हे सगळे? काळाची अन् वेळेची काही मर्यादा ठरवावी लागेल की नाही? कुठेतरी हे सगळे थांबले पाहिजे किंवा थांबविले पाहिजे. गोळीचे उत्तर आता गोळीनेच दिले पाहिजे!
ज्या ठिकाणी निमलष्करी दले आणि पोलिसांची सक्रियता कमी झाली, त्या ठिकाणी अतिरेक्यांच्या पाठीराख्यांची सक्रियता वाढली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. हळूहळू दगडफेक करणार्‍या जमावाची हिंमत इतकी वाढली आहे की, ते अतिरेक्यांविरुद्ध लढणार्‍या आमच्या शूर जवानांच्या मार्गात आडवे येऊ लागले आहेत. अंगावर येणार्‍यांना मारायचेही नाही अन् मार सहन करायचा, अशा परिस्थितीत ‘इकडे आड, तिकडे विहीर!’ अशी जवानांची अवस्था झाली आहे. हिंसक जमावावर शस्त्र चालविले तर कायद्याची भीती अन् नाही चालविले तर अपमान आणि छळ सहन करा, अशा कचाट्यात जवान सापडले आहेत. ही परिस्थिती आता बदलवली पाहिजे. जे लोक खोर्‍यातील तरुणाईची दिशाभूल करून त्यांना दगडफेक करायला लावत आहेत, त्यांना पकडून तुरुंगात डांबले पाहिजे. शिवाय, फुटीरतावादी नेत्यांना भारत सरकारने ज्या सोईसवलती दिल्या आहेत, त्याही काढून घेतल्या पाहिजेत. कठीण परिस्थिती आली असताना अतिशय कठोर निर्णय घेऊन त्यावर मात करता आली पाहिजे. ती वेळ आता आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धाडसी नेते आहेत. ते लवकरच ठोस उपाय करतील अन् परिस्थितीवर नियंत्रण मिळवतील, अशी आशा करू या…!
– गजानन निमदेव