अण्णा म्हणाले, अपेक्षाभंग झाला

0
46

वाचकपत्रे
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे अण्णा हजारे खूपच व्यथित झाले आहेत. अण्णा म्हणाले, भ्रष्टाचार संपविण्याच्या आंदोलनातून अरविंद हा राजकारणात आला आणि मुख्यमंत्रीही झाला. पण, त्याला बहुतेक सत्तेची नशा चढलेली दिसते. दिल्लीच्या सहा मंत्र्यांविरुद्ध आरोप झाल्यानंतर आणि त्यापैकी काही जणांवर गुन्हे दाखल झाले, तेव्हाच माझा अपेक्षाभंग झाला होता. आता तर थेट अरविंदवर आरोप झाले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे मला अतिशय दु:ख झाले आहे, असे अण्णा म्हणाले. तरी अण्णा म्हणत होते, अरविंद राजकारणात जाऊ नको. पण, केजरीवालांनी धूर्त खेळी खेळली आणि सार्‍या भ्रष्ट आणि गुन्हेगारांना तिकिटे दिली. आता यापेक्षा नालस्ती व्हायची काही राहिली आहे काय?
रघुनाथ पाटील
यवतमाळ

पाण्याच्या बचतीची सवय लावा
महाराष्ट्रात किती पाणी शिल्लक आहे, याची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे. संपूर्ण राज्यात केवळ ३२ टक्के पाणी आहे आणि नागपुरात ते २२ टक्के आहे. अजून मे संपायचाच आहे आणि जूनचा शेवटचा तडाखा बसायचाच आहे. त्यामुळे या मर्यादित पाण्याची सर्व नागरिकांना अतिशय काटकसरीने बचत करण्याची गरज आहे आणि ती सवय आतापासूनच लावली पाहिजे. केवळ मनुष्याचाच प्रश्‍न नाही, तर मुक्या जनावरांचा, वन्यप्राण्यांचाही प्रश्‍न आहेच. यंदा वन विभागातर्फे हवे तेवढे पाणवठे भरले गेले नाहीत. त्यामुळे वन्यप्राणी शहराकडे धाव घेत आहेत आणि विनाकारण संघर्ष निर्माण होत आहे. म्हणून सर्व नागरिकांनी पाण्याची बचत करण्याचा निर्धार केला पाहिजे. महापालिकांनीही पाण्याचा अपव्यय होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण टँकरमधून अनेकदा बरेच पाणी वाया जाते.
विशाल जाधव
नागपूर

एनसीसीच्या मुलींना समान न्याय मिळाला
अनेक दिवसांपासून एनसीसीच्या एअर विंगमधील मुलींनाही हवाई दलात मुलांसारखीच समान संधी द्यावी, अशी मागणी होत होती. मोदी सरकारने ती पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन! आमच्या संविधानाने मुलगा-मुलगी असा कोणताही भेद न करता, सर्वांना समान संधी या तत्त्वानुसार न्याय देण्याची तरतूद केली आहे. आज मुली विमान, बोटी, हेलिकॉप्टर चालवीत आहेत. बीएसएफमध्येही त्यांना संधी देण्यात आली आहे. मुली या मुलांपेक्षा प्रगतीत आघाडीवरच आहेत, हे आपण दहावी-बारावीच्या निकालात पाहतो. याचा अर्थ मुली या मुलांपेक्षा पुढे जात आहेत. आता त्यांना वायुदलात समान संधी मिळून थेट मुलाखतीसाठी बोलाविण्यात येण्याची तरतूद मनाला सुखावणारी आहे.
मनीषा व्यवहारे
नागपूर

काळा पैसा येत आहे पण, हळूहळू
देशातील १५ लाख कंपन्यांपैकी सात लाख कंपन्यांनी आतापर्यंत आपले रिटर्न्सच भरले नसल्याचा खुलासा केंद्रीय वित्त मंत्रालयाने केला असतानाच, सीबीआय आणि आयकर विभागाच्या धाडीत चारशे बोगस कंपन्यांचे घबाड हाती लागल्याचे वृत्त तभात वाचले. यात काही सार्वजनिक आणि खाजगी बँकाही सहभागी आहेत, असेही म्हटले आहे. ३० हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचा आयकर विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. नोटांबदीनंतर आतापर्यंत देशात ७० हजार कोटी रुपयांचा काळा पैसा धनाढ्यांनी उघड केला आहे आणि अजूनही कारवाई सुरूच आहे. याचा अर्थ काळा पैसा आहे. पण, तो लपवून ठेवण्यात आला आहे. तो हुडकून काढण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल. काही राजकारण्यांचाही यात समावेश असल्याची बाब पुढे आली आहे. मोदी सरकारवर टीका करणार्‍यांसाठी हे चोख प्रत्युत्तर आहे. आता कुणीही प्रश्‍न विचारताना दिसत नाही की, किती काळा पैसा बाहेर आला. मला वाटते, प्रश्‍न विचारणार्‍यांनीच काळा पैसा तर दडवून ठेवलेला नाही?
विश्‍वास देशपांडे
नागपूर

उद्धव ठाकरे युती तोडत का नाहीत?
शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना पुन्हा ओकारीची उबळ आलेली दिसते. मोदी सरकारच्या कृपेने सत्तेत आलेल्या शिवसेनेला अजूनही बुद्धी आलेली दिसत नाही. त्यामुळे कावळ्यासारखी कावकाव सतत सुरू आहे. एवढाच जर स्वाभिमान शिल्लक असेल तर मग उद्धव ठाकरे युती तोडून वेगळे का होत नाहीत? त्यांना कुणी रोखले आहे? तसे झाले तर सत्तेचा मलिदा खाण्यास मिळणार नाही, रसद येणार नाही हे त्यामागील खरे कारण आहे. आता भाजपानेच निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
प्रशांत तिजारे
अमरावती