पाणी : एक राष्ट्रीय प्रश्‍न

0
94

वेध
लोकसंख्येबरोबर आणि पाणीवापरातील बदलांमुळे आपण केवढ्या मोठ्या संकटाकडे निघालो आहोत, याचा अंदाज जरी घेतला तरी भीतीने थरकाप उडेल. गेल्या ७५ वर्षांत आपण पाण्याच्या दृष्टीने किती गरीब झालो आहोत, हे पाहू या. १९५१ मध्ये आपल्या देशात प्रतिव्यक्ती १४ हजार १८० लिटर पाणी उपलब्ध होते. आजमितीस प्रतिव्यक्ती केवळ ५ हजार १२० लिटर पाणी उपलब्ध आहे. २०१५ पर्यंत प्रतिमाणशी पाण्याची उपलब्धता आणखी कमी होऊन केवळ ३ हजार लिटर पाणीच एका व्यक्तीला मिळू शकेल. असमतोल पाणीवाटपामुळे अनेक ठिकाणी घसे कोरडे आहेत तर अनेक ठिकाणी पाण्याची बेसुमार उधळपट्टी चालली आहे. अशा तर्‍हेने २०२५ पर्यंत प्रवास केल्यानंतर आपले काय होईल, याचा प्रत्येकाने गंभीरपणे विचार करायला हवा. मानवी हस्तक्षेपामुळे कुठे पाण्याचा किती वापर होतो, हे जाणून घेण्यासाठी आजकाल एका खास प्रणालीचा वापर केला जातो. याचे नाव आहे ‘वॉटर फुटप्रिंट.’ आपण कोणत्या कारणास्तव किती पाणी वापरतो, याचे उत्तर ही प्रणाली आपल्याला देते. सर्वात आधी आपल्याला दखल घेतली पाहिजे ती बाटलीबंद पाण्याची. गेल्या २० वर्षांत भारतात बाटलीबंद पाण्याच्या व्यापारात मोठी वाढ झाली आहे. हा व्यवसाय करणार्‍यांची प्रचंड भरभराट झाली आहे. ही भरभराट थक्क करणारी आहे; कारण या व्यवसायात नफ्याचे प्रमाण गुंतवणुकीच्या अनेकपट आहे. एक लिटर बाटलीबंद पाणी जेव्हा आपण विकत घेतो, तेव्हा ते कोणत्या दराने घेतो आणि त्यासाठी किती लिटर पाणी वाया घालवतो, हे माहीत आहे? यासंदर्भातील आकडेवारी म्हणजे एक अत्यंत कडवे सत्य आहे. हे सत्यच आपल्याला दिवसेंदिवस पाण्याच्या भीषण टंचाईकडे घेऊन चालले आहे. हे सत्य म्हणजे एक लिटर बाटलीबंद पाणी तयार करण्यासाठी सुमारे पाच लिटर पाणी खर्ची पडतं. एका आकडेवारीनुसार जगभरात २००४ मध्ये १५४ अब्ज लिटर बाटलीबंद पाणी तयार करण्यासाठी ७७० अब्ज लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. याच प्रक्रियेसाठी भारतात २५.५ अब्ज लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली. बाटलीबंद पाणी आणि शीतपेये बनवणार्‍या कंपन्यांविरुद्ध देशभरातील ग्रामस्थ आंदोलनं करीत आहेत. कॅलिफोर्निया येथील पॅसिफिक इन्स्टिट्यूटचे म्हणणे असे आहे की, २००४ मध्ये अमेरिकेत २६ अब्ज लिटर बाटलीबंद पाणी विकण्यासाठी ज्या प्लास्टिकच्या बाटल्या तयार करण्यात आल्या, त्यासाठी दोन कोटी बॅरल तेलाचा वापर झाला…

उत्तर कोरियाची दहशत
उत्तर कोरियाच्या अणू आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाने अमेरिका अस्वस्थ झाला आहे. कारण, उत्तर कोरियाने स्पष्ट शब्दात अमेरिकेला सुनावले आहे की, आम्ही आपला अणू आणि क्षेपणास्त्र चाचणी कार्यक्रम सुरूच ठेवण्याची प्रतिज्ञा केली आहे. अमेरिकेने उत्तर कोरियाला रोखण्यासाठी त्याच्यावरील आर्थिक निर्बंध अधिक कडक केले आहेत आणि त्याची अण्वस्त्रे रोखण्यासाठी एक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीही सक्रिय केली आहे. उत्तर कोरियावर अर्थातच त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. त्याने पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी घेतली; पण ती अयशस्वी ठरल्याची बातमी आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन वारंवार अमेरिकेला धमकावत असतो आणि त्याच्या असलेल्या किंवा नसलेल्या शस्त्रसिद्धतेने अमेरिकेत अस्वस्थता निर्माण होत असते. अमेरिकेने आगळीक केल्यास आम्ही एकाच क्षेपणास्त्राने अमेरिकेची विमानवाहू नौका ‘विल्सन’च्या चिंधड्या उडवू. त्यामुळे या हुकूमशहाचे काय करायचे, याचा गांभीर्याने विचार अमेरिकेत सुरू आहे. जागतिक स्तरावर चीन हा उत्तर कोरियाचा एकमेव मित्र आहे. उ. कोरियाचा अमेरिकेविरोधात वापर करून घेता यावा म्हणून चीनने या देशाबाबत उदार धोरण स्वीकारले आहे. समजा अमेरिकेने उत्तर कोरियावर हल्ला केलाच तर चीन स्वत: अमेरिकेच्या विरोधात उभा ठाकेल काय? याचे उत्तरही अमेरिकेतील मुत्सद्दी शोधत आहेत. त्यामुळे ही अस्वस्थता वाढतच चालली आहे. चीनने उत्तर कोरियाच्या अणू कार्यक्रमात मदत केली, हे लपून राहिलेले नाही. जगात अगदीच एकाकी पडलेल्या या देशाच्या राज्यकर्त्यांची सारी भिस्त लष्करी सामर्थ्यावर आणि अणू कार्यक्रमावर आहे. अण्वस्त्रेच आपल्याला वाचवू शकतात, असे या देशाच्या सत्ताधार्‍यांना वाटते. त्यामुळे आतापर्यंत जागतिक स्तरावर त्याच्या विरोधात जी जी पावले उचलली गेली, त्यांना त्याने अजिबात दाद दिलेली नाही. शिवाय त्याच्या गरजा भागवायला चीन तत्पर आहेच. चीन आपल्याला सांभाळून घेतो याची खात्री असल्याने प्रसंगी तो चीनचे सल्लेेही झुगारून देतो. अलीकडेच उत्तर कोरियाने केलेल्या अयशस्वी क्षेपणास्त्र चाचणीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे.
उत्तर कोरियाने चीनची प्रतिष्ठा पणाला लावली आहे, असा ट्रम्प यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे; पण त्याचा परिणाम ना चीनवर होणार आहे, ना उत्तर कोरियावर. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केलेच तर त्याच्या मदतीला अमेरिका धावून येईल, हे ठरलेले आहे. दक्षिण कोरियात तीस हजारच्या आसपास अमेरिकन सैन्यही तैनात आहे. शिवाय कथित चीन समुद्राच्या परिसरातही अमेरिकेने आपले नाविक आणि विमानदल सज्ज ठेवले आहे. वास्तविक पाहता उत्तर कोरियाचा बंदोबस्त करणे हे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया वगैरे देशांना अवघड नाही; पण उत्तर कोरियाच्या कथित अणू कार्यक्रमाची धास्ती या देशांना वाटत आहे.
– अभिजित वर्तक
९४२२९२३२०१