सरकारचे अभिनंदन

0
47

वाचकपत्रे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंग यांची भेट घेतली अन तूर खरेदीची कोंडी फोडली. आणखी एक लाख टन तूर खरेदी करण्यास केंद्र सरकारची परवानगी मिळवून शेतकर्‍यांना दिलासा दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन हे केलेच पाहिजे. राज्यातील शेतकर्‍यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर तुरीचे उत्पादन घेतल्याने सरकारचीही पंचाईत झाली आहे. तूर ठेवायला जागाही नाही आणि पैसाही नाही अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. बारदाना उपलब्ध नसल्याने शेतकरीही संतप्त झाले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनीच तोडगा काढला हे फार बरे झाले. राज्यातील सगळेच प्रश्‍न मुख्यमंत्री अतिशय कौशल्याने हाताळत आहेत, हेही स्पष्ट झाले आहे.
बाळासाहेब काटे
नागपूर

व्वा, विखे पाटील साहेब!
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेचं नेतृत्व करावं, असं आवाहन करून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी षटकार हाणला आहे. राणे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राज्यभर सुरू आहेत. आज जाणार की उद्या, एवढाच प्रश्‍न असल्यासारख्या ह्या चर्चा आहेत. पण, राणे अजून तरी भाजपात गेलेले नाहीत, त्यांच्याकडून तसे स्पष्ट संकेतही मिळालेले नाहीत. आता विरोधकांची संघर्ष यात्रा कोकणातच निघणार आहे, त्याचे नेतृत्व राणेंनी करावे असं आवाहन करून विखे पाटलांनी त्यांची राजकीय पंचाईत करून टाकली आहे. व्वा, विखे पाटील साहेब! चतुर राजकीय खेळीबद्दल आपले अभिनंदन!
राम वसंत आमले
डोणगाव

रिकामटेकडेपणाच, दुसरे काय?
गेल्या महिनाभरापासून आयपीएलचे क्रिकेट सामने सुरू आहेत. तसे पाहिले तर या स्पर्धेत जे काही विक्रम होणार आहेत, झाले आहेत, त्यांची कुठेही नोंद होणार नाही. शिवाय, जगातले दहाही देश क्रिकेट खेळत नाहीत. पण, आपल्या देशात या खेळाचे महात्म्य एवढे वाढवून ठेवण्यात आले आहे की लोक कामधंदे सोडून हे सामने पाहात आहेत. अगदी मैदानावर हजारोंच्या संख्येत जाऊन आणि कोट्यवधींच्या संख्येत टीव्हीपुढे बसून लोक सामने पाहतात अन आपला व देशाचा अमूल्य वेळ वाया घालवतात. आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू मस्त पैसा कमावतात, पंचतारांकित संस्कृतीत वावरतात अन आम्ही रिकामटेकडेपणाचं प्रदर्शन करून वेळ आणि पैसा वाया घालवतो, हे काही बरे नाही.
जीवन के. राजकारणे
महाल, नागपूर

व्हॉट्‌स ऍपचं खूळ…
आजकाल सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचं नागरिकांचं प्रमाण फार वाढलं आहे. काळ आधुनिक आहे, आयटीच्या क्षेत्रात नवनवे शोध लागताहेत, जीवनमान सुकर होत चालले आहे हे चांगलेच आहे. पण, व्हॉटस ऍप आणि फेसबुकमुळे आपण आपला अमूल्य वेळ वाया घालवतो आहोत, त्यासाठी इंटरनेटचा वापर करावा लागत असल्याने पैशांचाही अपव्यय करत आहोत, हेही आपल्या लक्षात येत नाही. नुकतेच एक सर्वेक्षण आले आहे. त्यात व्हॉटस ऍपवरून व्हिडीओ कॉलिंग करण्यात भारतीय युजर्स पाच कोटी मिनिटं रोज वाया घालवतात, याचाच अर्थ असा की भारतीय लोक दररोज आपला अमूल्य असा वेळ विनाकारण खर्च करतात. दिवसेंदिवस हे खूळ वाढतच चाललं आहे. हे कुठेतरी थांबवणंही आवश्यक आहे.
चंद्रशेखर जोशी
मेहकर

कपिल मिश्रांचे आरोप
आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार आणि माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप केले आहेत, ते लक्षात घेता नैतिकतेच्या आधारावर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. भ्रष्टाचारविरोधी लढा पुकारूनच केजरीवाल राजकारणात आले अन मुख्यमंत्री झाले. आता त्यांच्याच सहकार्‍याने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने त्यांनी तत्काळ राजीनामा देत चौकशीला सामोरे गेले पाहिजे. निर्दोष सिद्ध ठरताच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे. त्यास कोणाची काही हरकत असण्याचे कारण नाही. जराही नीतिमत्ता शिल्लक असेल तर केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा आणि अन्य कोणाला मुख्यमंत्रिपदी बसवावे. याने त्यांची प्रतिष्ठा वाढेल, हे निश्‍चित!
मुक्तेश्वर जहागीरदार
लोणार