तर नक्षली थरथर कापतीलच!

0
95

वेध
मागील ३० वर्षांपासून नक्षल चळवळीला सरकारने गांभीर्याने न घेतल्याने आता या चळवळीची डोकेदुखी वाढली असून, निष्पाप जवानांचा बळी घेतला जात आहे. दंडकारण्यात असलेली नैसर्गिक संपत्ती, पर्यटन आणि विकासाला खीळ बसण्याचे एकमेव कारण म्हणजे नक्षलवाद होय. ३० वर्षांनंतरही गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात आजही मूलभूत सोयी मिळत नसतील तर याचा विचार सरकारने करण्याची गरज आहे. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत नक्षल कारवायांत प्रचंड वाढ झाली आहे. सुकमा जिल्ह्यात नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातही नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला आणि यात काही जवान जखमी झाले तर एकाला वीरमरण आले. सुकमामध्ये झालेल्या हल्ल्यातही २५ जवान शहीद झाले. जवान शहीद होणे ही घटना फक्त आताच घडली असे नाही, तर मागील ३० वर्षांपासून सातत्याने हेच सुरू आहे आणि याला जबाबदार कोण असतील तर आजवरच्या सरकारची रणनीती आहे. केवळ निधी देण्याचे आश्‍वासन आणि विकासकामांच्या घोषणांनी नक्षलवाद निपटून काढता येत नाही, तर त्यासाठी आक्रमक भूमिका स्वीकारावी लागते हे आजपर्यंत कुणाच्याच लक्षात आले नाही. मात्र या वेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावून नक्षलवाद्यांविरुद्ध आता आक्रमक होण्याचे निर्देश दिले आहे. बोटावर मोजण्याइतक्या नक्षल सदस्यांनी सुरू केलेला नक्षलवाद आता दुर्गम भागातून शहरापर्यंत पोहोचला आहे. दिल्लीपर्यंत नक्षलवादाची पाळेमुळे रुजली आहेत. प्रा. साईबाबाला अटक केल्यानंतर नक्षल्यांच्या नीतीची व्याप्ती लक्षात आली. मात्र त्यानंतरही सरकार, प्रशासन नक्षल्यांविरुद्ध नांगी टाकत असेल तर ही बाब एकूणच समाजासाठी धोकादायक आहे. ‘‘नक्षली थरथर कापतील, त्यांच्या मनात जवान आणि पोलिसांविषयी धडकी भरेल’’ इतकी आक्रमक रणनीती तयार करा आणि सर्वप्रथम नक्षल्यांची आर्थिक नाकेबंदी करा, असे ठणकावून सांगणार्‍या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याने जवानांना नक्कीच स्फूरण चढेल. मात्र गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता खर्‍या अर्थाने अंमलबजावणीची गरज आहे. नक्षल्यांची आर्थिक नाकेबंदी झाल्यास या चळवळीचे कंबरडे मोडले जाईल. जंगलात दडून बसलेल्या भित्र्या नक्षल्यांना हुडकून काढून खात्मा केल्यास नक्षली नक्कीच थरथर कापतील. अन्यथा केंद्रीय गृहमंत्र्यांना अपेक्षित असलेली आक्रमकता हवेतच विरेल.

जस्टीनचे नखरे!
जस्टीन बीबरच्या नखर्‍यांची सध्या भारतात जोरदार चर्चा सुरू आहे. २३ वर्षांचा जस्टीन भारतात दौर्‍यावर आल्यानंतर त्याला झेलण्यासाठी बड्या बड्या उद्योगपतींपासून तर सेलिब्रिटीपर्यंत सार्‍यांचीच धडपड सुरू झाली आहे. भारतात चित्रविचित्र लोकांसाठी वाटेल ते करण्याची प्रथा असल्याचे जस्टीनचे नखरे सांभाळणार्‍यांकडे बघितल्यावर दिसून येते. कोण तो जस्टीन म्हणे अमेरिकेचा पॉप स्टार आहे. या स्टारसाठी लोटांगण घालणार्‍यांकडे बघितल्यावर आपलीच आपल्याला लाज वाटेल. त्याचा बडेजाव सांभाळण्यासाठी आयोजकांनी चालविलेली केविलवाणी धडपड कीव येण्यासारखीच आहे. जस्टीनसोबत सेल्फी काढण्यासाठी म्हणे २ हजार डॉलर्सचा खर्च आहे. भारतीय रुपयांमध्ये एका सेल्फीची किंमत १ लाख ४० हजार रुपये आहे. आपल्या देशातील उद्योजक, प्रायोजक, राजकारणी, सिनेतारका, अभिनेते या सार्‍यांनीच त्या २३ वर्षांच्या जस्टीनसमोर लोटांगण घालायला सुरुवात केली आहे. आपण आपल्या देशातील ज्यांचा स्टार म्हणून सन्मान करतो ते स्टारही जस्टीनची जी-हुजुरी करू लागले आहेत. विदेशी लोकांचा इतका पगडा भारतीयांवर आहे यातच भारतीयंाचे अपयश आहे. जस्टीन बीबरचे नखरे सांभाळण्यापेक्षा देशातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या विकासासाठी जर या सेलिब्रिटींनी, उद्योगपतींनी, अभिनेत्यांनी पुढाकार घेतला असता तर त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली असती आणि या देशातील गरिबांना न्याय मिळाला असता. मात्र यासाठी पुढाकार घेणार्‍यांची संख्या आपल्या देशात दुर्मिळ आहे. ज्यांच्या भरोशावर नेते होतात, अभिनेते बनतात, स्टारचा किताब मिळवितात त्याच देशातील जनतेकडे पाठ फिरवून जस्टीन बीबरसारख्यांचे नखरे सांभाळण्यात आपण धन्यता मानतो. जस्टीनने आपल्या दौर्‍यात आयोजकांकडे त्याला हव्या असलेल्या वस्तूंची भली मोठी यादी सादर केली आहे. जस्टीनच्या रूममध्ये सर्वत्र पांढरेशुभ्र पडदे हवेत. त्याच्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये १२ रूम हव्यात, याशिवाय त्याच्या रूममध्ये काचेचा फ्रीज हवा, त्याच्या खाण्यात विविधता असावी. त्याला फिरण्यासाठी १० लक्झरी कार असाव्यात. त्याच्या आजूबाजूला कुठेही लीलीची फुले दिसू नये यासह आणखी कितीतरी अफलातून मागण्या जस्टीनने केल्या आहेत आणि आपल्या देशाचे आयोजक त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. कोण लागून गेला हा जस्टीन! आपल्या देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचीदेखील एवढी मिजास नाही.
जस्टीनची मिजास सांभाळण्यापेक्षा या देशातील गरिबांना एकवेळचे अन्न मिळावे, त्यांच्या उघड्या अंगावर कपडे यावेत, फूटपाथवर जगणार्‍या अनाथ मुलांना हक्काचे घर मिळावेे, गरिबीचे चटके अन् आजाराने दम तोडणार्‍यांना उपचार मिळावा म्हणून जस्टीनच्या आयोजकांनो पुढाकार घ्या.
– नंदकिशोर काथवटे
९४२३१०१९३८