अण्णा म्हणाले, मी स्वत: उपोषण करीन

0
42

वाचकपत्रे
अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होणे, त्यांच्या सहकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आणि अनैतिकतेचे आरोप होणे यामुळे मी अगदी व्यथित झालो आहे, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे. आता एक पाऊल पुढे टाकीत त्यांनी निर्धार केला आहे.
जर अरविंदवर दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप सिद्ध झाला तर त्यांच्या राजीनाम्यासाठी मी स्वत: जंतरमंतरवर उपोषणास बसेन, असा हा निर्धार आहे. अरविंदच्या डोक्यात सत्तेची नशा चढली आहे. त्याने निवडलेले सहकारी भ्रष्ट निघाले, असेही अण्णांनी म्हटले होते. इकडे केजरीवाल दोन कोटींबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल देशभर शंका निर्माण झाली आहे.
अनिरुद्ध देशमुख
नागपूर

अयोध्येत राममंदिर होणारच
जेथे बाबरी मशीदच नव्हती, ती पाडली म्हणून खटला कशासाठी भरला गेला हेच कळत नाही. तो एक देशाला लागलेला कलंक होता. हिंदूंनी उत्स्फूर्तपणे ती वास्तू पाडली. यात भाजपा नेत्यांचा कोणताही सहभाग नव्हता. तरीही त्यांच्यावर विनाकारण खटले दाखल करण्यात आले. मी या कृत्याचा तीव्र निषेध करतो.
राम हे या देशाचे आदर्श पुरुष आहेत. ते आमचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे हिंदू समाजाकडून तेथे राममंदिराची निर्मिती करणे, हा आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे. तो आमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. एका ढाच्याला कुणी बाबरी मशीद म्हटली म्हणून ती मशीद होत नाही. कारण तेथे कधीच नमाज अदा केली गेली नाही. असे असताना राममंदिराच्या निर्माणात व्यत्यय आणू नये. आता काही मुस्लिम संघटनाच राममंदिराची मागणी करीत आहेत, हा एक चांगला संकेत आहे.
मधुकर अमृत डबीर
महाल, नागपूर

पाटण्यात दारूबंदी खरंच आहे का?
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदी केली असली तरी, तेथे अवैध मार्गाने दारू येत आहेच. पाटण्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी आलेला दारूसाठा भरलेला ट्रक नुकताच पोलिसांनी पकडला आहे. हा साठा कुणी बोलावला, याची कसून चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावयास पाहिजे. हा दारूसाठा राजदच्या लोकांनी बोलावला असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. आता नितीशकुमार यांची कसोटी आहे.
रमेश पाटील
वर्धा

यवतमाळ जिल्ह्यात गुरांची अवैध वाहतूक
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी-केळापूर मतदारसंघातील पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, पाटणबोरी, पारवा, पहापळ आदी गावात जुगार, मटका, सट्टा, अवैध दारूविक्री असे धंदे सर्रास सुरू आहेत. एवढेच नव्हे, तर हैदराबादकडे कत्तल करण्यास नेण्यासाठी गुरांचे ट्रकदेखील पोलिसांच्या नजरेसमोर पिंपळखुटी टोल नाक्यावरून व पाटणबोरी पुलावरून सर्रास जात असतात. पोलिस कारवाईसाठी एखादाच ट्रक पकडतात. मग हे ट्रक कुणाच्या आशीर्वादाने हैदराबादकडे जात आहेत, असा प्रश्‍न यवतमाळवासीय विचारीत आहेत. पोलिस म्हणतात, आम्ही हतबल आहोत. याचा अर्थ तिथल्या लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादानेच ही गुरांची अवैध वाहतूक सुरू आहे, हे स्पष्टच दिसते. राज्यात गोवंश हत्येवर बंदी असताना, हे प्रकार होतातच कसे? यासाठी लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत, असे म्हटले तर त्यात वावगे काय? आता वरिष्ठ अधिकार्‍यांनीच लक्ष देण्याची गरज आहे.
किशोर वैद्य
पांढरकवडा

न्यायपालिकेतील अभूतपूर्व वाद
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्या. सी. एन. कर्नान यांना सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्याची अभूतपूर्व घटना नुकतीच घडली. या कर्नान नावाच्या न्यायाधीशाचे डोक ठिकाणावर आहे काय, असा प्रश्‍न विचारण्याची वेळ आली आहे. कारण, या महाशयांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि आणखी काही न्यायाधीशांना चक्क शिक्षा ठोठावली होती. कर्नान यांनी २० न्यायाधीश हे भ्रष्ट आहेत, असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले होते. नियमानुसार त्यांनी सरन्यायाधीशांना पत्र पाठवायला हवे होते. पण, त्यांनी तसे केले नाही आणि पुरावेही दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका ठेवीत सात सदस्यीय खंडपीठाने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. आता ते मी दलित असल्याचा कांगावा करीत आहेत, जो पूर्णपणे गैरलागू आहे. अशा न्यायाधीशाला शिक्षा झालीच पाहिजे.
वसंत देशपांडे
नागपूर