दणका हवाच

0
107

वेध
भारतीय क्रिकेट नियामक मंडळामधील अनागोंदी कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीची नियुक्ती करून संपूर्ण कारभाराची चौकशी करण्याची आणि काही सूचना, शिफारशी करण्याची जबाबदारी सोपविली होती. या लोढा समितीने बीसीसीआयची सर्वंकष चौकशी केली आणि त्यात या समितीला अनेक त्रुटी आढळून आल्या. त्या दूर करण्यासाठी काही शिफारशीही करण्यात आल्या. त्याची अंमलबजावणी संघटनेने करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. तरीही संघटना काही हालचाल करीत नव्हती. मागेपुढे पाहात होती. अखेर न्यायालयाने दणका देऊन सर्व शिफारशींची अंमलबजावणी केलीच पाहिजे, असे स्पष्ट आदेश दिले. तरीही हालचाली दिसून न आल्यामुळे अखेर न्यायालयाने या संघटनेवर प्रशासकीय समितीच नियुक्त करून टाकली. हा सारा प्रकार पाहून इतरही क्रीडा संघटना व महासंघांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी लोढा समितीची नियुक्ती केली जावी, अशी भावना दबल्या आवाजात व्यक्त केली जात होती. त्याला वाचा फोडली ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याने एका चर्चासत्रात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी ज्या प्रमाणे न्या. लोढा समितीने काम केले तसेच काम देशातील इतरही राष्ट्रीय क्रीडा महासंघांमध्ये पारदर्शिता आणण्यासाठी आवश्यक असल्याचे मत सुशील कुमारने व्यक्त केले आहे. त्याची ही मागणी तशी रास्तही आहे. आज विविध क्रीडा महासंघ आपली जागीर असल्यासारखे अनेकांचे वर्तन असल्याचे दिसून येते. आपले हे पद कसे टिकून राहील, याचाच अट्टाहास करताना ही मंडळी दिसून येते. त्यांना खेळ आणि खेळाडूंच्या विकासाकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही किंवा त्यासाठी त्यांच्याकडून या संदर्भात ठोस काही पावलेही उचलली जात नाहीत. अनेक वर्षे एकाच पदावर काम करणारी मोठमोठी मंडळी आजही आपल्याला क्रीडा महासंघांवर वर्चस्व गाजविताना दिसून येते. हे पद टिकविण्यासाठी मग राजकारणही मोठ्या प्रमाणावर केले जात असते. निवडणुकांमध्ये अवास्तव व मोठ्या प्रमाणावर पैसाही खर्च केला जातो. या सार्‍या प्रकारात मग खेळ आणि खेळाडू भरडला जातो. परिणामी भारतीय पथक आशियाड आणि ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या उत्साहात जाते आणि अखेर दोन-चार पदकांवर समाधान मानून हात हलवीत परत येते. काही दिवस त्यावर चर्चा वगैरे होते आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या… अशी परिस्थिती राहाते.

मार्ग मोकळा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक सकारात्मक निर्णय घेऊन भारतीय क्रिकेट संघाच्या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेतील सहभागाचा मार्ग मोकळा केला आहे. आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या परिणामी भारतीय संघ इंग्लंडच्या यजमानपदाखाली होणार्‍या या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत खेळेल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. अखेर बीसीसीआयने स्पर्धेत संघ पाठविण्याचा निर्णय घेऊन संघाचीही घोषणा केली आहे. विदर्भ एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणार्‍या उमेश यादवचीही या संघात वर्णी लागली आहे. वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर उमेशकडून चांगली कामगिरी बजावली जाईल, अशी अपेक्षा आहे. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे हा प्रवेश का लांबला? क्रिकेटच नव्हे तर इतरही खेळांमधील जे अव्वल आठ संघ असतात त्यांच्यात एक वेगळी स्पर्धा खेळली जात असते आणि ती स्पर्धा चॅम्पियन्स चषकाच्या नावाने ओळखली जात असते. इतर स्पर्धांचा कित्ता गिरविताना क्रिकेटची विश्‍वचषक स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर अलीकडच्या काळात आता चॅम्पियन्स चषक स्पर्धेचेही आयोजन केले जाऊ लागले. पुढील महिन्यात १ जूनपासून सुरू होणार्‍या या स्पर्धेत यजमान इंग्लंडसह ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान हे आठ संघ सहभागी होत आहेत. आयसीसीने ठरवून दिलेल्या नियमानुसार या स्पर्धेसाठी सहभागी देशांना आपापल्या संघांमधील खेळाडूंची निवड २५ एप्रिलपर्यंत जाहीर करायची होती. उर्वरित संघातील खेळाडूंची निवड जाहीरही झाली होती. मात्र, भारताने आपला संघ निर्धारित कालावधीत जाहीर केलेला नव्हता. याचा अर्थ भारत आयसीसीचा निषेध करण्यासाठी या स्पर्धेवर बहिष्कार तर टाकणार नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात होती. आयसीसीने विविध स्पर्धांमधून प्राप्त होणार्‍या नफ्यातून मोठा वाटा आपल्याला देण्यास नकार दिल्यामुळे बीसीसीआयने हा पवित्रा घेतला होता. मात्र, रविवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत या विषयावर सांगोपांग चर्चा झाली आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा संघ पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ४८ तासांच्या आत संघाची घोषणाही करण्यात आली. सध्या बीसीसीआयमधील निष्कासित अध्यक्ष असलेले श्रीनिवासन यांनी हा डाव रचला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. श्रीनिवासन यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणार्‍या संघटनांच्या प्रतिनिधींनी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत संघ पाठवू नये म्हणून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. याशिवाय आयसीसीकडून जास्तीत जास्त नफा मिळविण्याचेही षडयंत्र याच गटाने रचले होते. मात्र, विशेष सर्वसाधारण सभेत श्रीनिवासन यांचे हे षडयंत्र पार उधळून लावण्यात आले. संघ पाठविण्यासोबतच जास्तीचा नफा मिळविण्यासाठी आयसीसीला नोटीस पाठवायची नाही, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे श्रीनिवासन गटाला चांगलाच दणका बसला आहे.
– महेंद्र आकांत
९८८१७१७८०३