लालूप्रसाद यादव अडकले पुन्हा चारा घोटाळ्यात

0
134

दिल्लीचे वार्तापत्र
 तुम्ही आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढवू नका, असे नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यांना सांगितले आहे. ही तर सुरुवात आहे, यानंतरही तुमच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही तर असे अनेक ऑडिओ टेप पुढे येतील, असा गर्भित इशारा नितीशकुमार यांनी त्यांना दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण लालूप्रसाद किती ताणतात, त्यावर त्यांचे आणि राज्यातील महाआघाडी सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.
••राजदचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा पिच्छा सोडायला चारा घोटाळा तयार नाही. घर फिरले की घराचे वासे फिरतात, असे म्हणतात, तशी स्थिती लालूप्रसाद यांची झाली आहे. चारा घोटाळ्यात देवघर उपकोषागारातून बेकायदेशीर रीत्या पैसे काढल्याच्या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यावर वेगळा खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. या प्रकरणात लालूप्रसाद यांच्यावरील भ्रष्टाचार, कटकारस्थान आणि अन्य गंभीर स्वरूपाचे आरोप फेटाळून लावण्याचा झारखंड उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लालूप्रसाद यादव अडचणीत आले. चारा घोटाळ्यातीलच अन्य चार प्रकरणातून आपली सुटका होण्याची वाट पाहात असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. देवघर प्रकरणाची सुनावणी नऊ महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे. चारा घोटाळ्यानेच लालूप्रसाद यांची राजकीय कारकीर्द उद्‌ध्वस्त झाली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लालूप्रसाद यादव यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
लालूप्रसाद यादव यांनी घोटाळा करण्यासाठी जनावरांचा चाराही सोडला नाही. लालूप्रसाद यादव यांना घोटाळेही चांगले करता येत नाही. घोटाळाच करायचा तर संगणक घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, विमान घोटाळा, पाणबुडी घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा असे प्रतिष्ठेचे घोटाळे करायला पाहिजे होते. लालूप्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्याचे, तर त्यांच्या दोन मुलांवर माती घोटाळ्याचे आरोप झाले. म्हणजे त्यांची मुलंही लालूप्रसाद यादव यांचाच वारसा चालवीत आहेत. राजकीय नेत्याचे देशातील मातीशी घट्ट नाते असले पाहिजे, असे म्हणतात. लालूप्रसाद यांच्या मुलांनी याप्रकारे मातीशी आपले घट्ट नाते जोडले आहे.
हे घोटाळे कमी होते की काय म्हणून देशात नव्यानेच निघालेल्या एका वृत्तवाहिनीने लालूप्रसाद यादव आणि सिवान कारागृहात बंद असलेला बाहुबली नेता शहाबुद्दीन यांच्यातील संवादाचा ऑडिओ जारी केला आहे. या ऑडिओत शहाबुद्दीन सिवानमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर लालूप्रसाद यांच्याशी संवाद साधताना दिसतात. सिवानच्या पोलिस अधीक्षकांना हटवण्याची मागणीही शहाबुद्दीन यांनी केली आहे. यासंदर्भात आपण सिवानच्या एसपीशी चर्चा करू, असे आश्‍वासन लालूप्रसाद शहाबुद्दीन यांना देतात. या ऑडिओ टेपने बिहारचे राजकारण ढवळून निघाले आहे. या टेपच्या खरेपणाची चौकशी करण्याची मागणी लालूप्रसादांचा सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या जदयुने केली आहे, तर याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्यावर खटला दाखल करण्याची तसेच जदयुने राजदशी असलेले संबंध तोडण्याची मागणी भाजपाने केली आहे. सिवान पोलिसांनीही ही टेप चौकशीसाठी मागितली आहे. या टेपमधील आवाज लालूप्रसाद आणि शहाबुद्दीन यांचेच आहेत का, ते आधी तपासून पाहावे लागेल, असे सिवान पोलिसांनी म्हटले आहे.
या ऑडिओ टेपमुळे विरोधी पक्ष जसे लालूप्रसाद यादव यांच्यावर तुटून पटले, तसाच राज्यातील सत्ताधारी आघाडीतही तणाव निर्माण झाला. लालूप्रसाद यादव यांचा फोन टॅप कसा आणि कोणाच्या आदेशाने झाला, अशी विचारणा राजद नेते रघुवंशप्रसादसिंह यांनी केली आहे. या ऑडिओ टेपचा परिणाम राज्यातील महाआघाडीच्या सरकारच्या स्थैर्यावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण राज्यात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कोणाचाच फोन टॅप होऊ शकत नाही. लालूप्रसाद यादव यांचा फोन टॅप करण्यामागे नितीशकुमार असल्याचा अप्रत्यक्ष आरोप रघुवंशप्रसादसिंह यांनी केला आहे.
जदयु आणि राजद सरकारमध्ये असले तरी त्यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. लालूप्रसाद यादव आज थेट सत्तेत नसले तरी त्यांची वागणूक अजूनही आपण बिहारचे मुख्यमंत्री असल्यासारखीच आहे. सरकारमध्ये हस्तक्षेप करण्याची तसेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी लालूप्रसाद यादव सोडत नाही. मुख्यमंत्री नितीशकुमार हे खपवून घेण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे लालूप्रसाद यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी नितीशकुमार यांनी त्यांचा फोन टॅप करण्याचे आदेश दिलेच नसतील, असे नाही. राजकारणात काहीही होऊ शकते किंवा आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी काहीही करावे लागते. प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते असे म्हणतात, त्याच धर्तीवर राजकारणातही हे सगळे प्रकार करावेच लागतात. कारण राजकारणाची ती अपरिहार्यता झाली आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो, असे म्हणतात, त्याची प्रचीती बिहारचे राजकारण पाहून येते. कधीकाळी लालूप्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे कट्टर शत्रू होते. त्या वेळी राज्यात नितीशकुमार यांच्या जदयुचे आणि भाजपाचे सरकार होते. पण आता लालूप्रसाद यादव हे नितीशकुमार यांचे मित्र आणि भाजपा हा प्रमुख शत्रू झाला आहे. सत्ता ही दोन मित्रांना शत्रू करते, तर दोन शत्रूंना जवळ आणते.
लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात बिहार हे जंगलराज झाले होते. गुंडागर्दी प्रचंड वाढली होती. कायदा आणि सुव्यवस्था ही राज्यात नावालाही उरली नव्हती. भाजपाच्या पाठिंब्याने नितीशकुमार यांची जदयु सत्तेवर आल्यावर परिस्थितीत निश्‍चितच सुधारणा झाली. गुंडागर्दी कमी झाली. सुशासनाचे युग राज्यात सुरू झाले. मात्र नितीशकुमार यांचे भाजपाशी फाटल्यानंतर त्यांनी आपल्या अस्तित्वासाठी लालूप्रसाद यादव यांच्यासमोर मैत्रीचा हात केला. लालूप्रसाद यांनाही राजकीय अडगळीतून बाहेर येण्यासाठी कोणाच्या तरी हाताची गरज होतीच. या दोन हातात कॉंग्रेसचाही तिसरा हात आला. चारा घोटाळा प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे लालूप्रसाद यांना निवडणूक लढवता आली नाही. मात्र राजकारणावरील आपली पकड ढिली होऊ द्यायला लालूप्रसाद तयार नाहीत. याआधीही चारा घोटाळ्यात तुरुंगात जायची वेळ आली तेव्हा लालूप्रसाद यादव यांनी आपल्या बायकोला मुख्यमंत्रिपदावर बसवले होते. आताही आपल्याला निवडणूक लढता येत नाही, हे लक्षात आल्यावर लालूप्रसादांच्या दोन मुलांनी विधानसभेची तर मुलीने राज्यसभेची निवडणूक लढवली. गंमत म्हणजे लालूप्रसादांची राज्यातील प्रतिमा फार चांगली नसतानाही त्यांच्या पक्षाने राज्यात लालूप्रसादांच्या तुलनेत चांगली प्रतिमा असणार्‍या जदयुच्या नितीशकुमार यांच्या तुलनेत जास्त जागा जिंकल्या. आणि आपल्या एका मुलाला उपमुख्यमंत्री आणि दुसर्‍याला आरोग्यमंत्री केले. म्हणजे आज कोणत्याही पदावर नसताना लालूप्रसाद यादव यांच्या हातात राज्यातील अर्धी सत्ता आहे. त्यामुळे ज्या सत्तेसाठी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र आले त्या सत्तेमुळेच आज या दोघातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे.
याआधी माती घोटाळ्यात सरकारने लालूप्रसाद यादव यांच्या मुलांना क्लीन चिट दिली आहे. पण प्रत्येक प्रकरणात तुम्हाला क्लीन चिट देता येणार नाही, असे नितीशकुमार यांनी यानिमित्ताने सुचवले आहे. नितीशकुमार यांनी न बोलता लालूप्रसाद यादव यांना समज दिली आहे. तुम्ही आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढवू नका, असे नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यांना सांगितले आहे. ही तर सुरुवात आहे, यानंतरही तुमच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही तर असे अनेक ऑडिओ टेप पुढे येतील, असा गर्भित इशारा नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांना दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण लालूप्रसाद किती ताणतात, त्यावर त्यांचे आणि राज्यातील महाआघाडी सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७