भवं नेतुमेतत् त्स्वराष्ट्रम्

0
60

प्रासंगिक
मोदींचे सरकार आल्यापासून त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे दूरगामी परिणाम दिसायला लागलेले आहेत. हे सारे परिणाम सामान्य, दलित आणि शोषित समाजासाठी आशावादी आहेत आणि त्याचेच परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीनंतर बिहार आणि पंजाब राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या निकालांचा अपवाद वगळता इतर सर्व निवडणूक निकालांचा कल हा मोदींच्या पक्षाकडे झुकलेला दिसून येतो आहे. नुकत्याच झालेल्या दिल्लीतील महानगरपालिकांच्या निवडणुकीत तर विधानसभेत प्रचंड बहुमताने निवडून दिलेल्या ‘आप’ला भारतीय जनता पक्षाने भलतीच धोपीपछाड मारली आणि भगवा फडकावला. यावरून मोदींवरच्या विश्‍वासाकडे जनभावना वळलेली दिसत आहे, हेच सिद्ध होते.
हे सारे बघताना या देशातील सत्तरी पार केलेल्या पक्षाच्या आणि त्यासोबतच त्या पक्षाच्या पायवाटेलाच आपली वाट समजणार्‍या पक्षांची दु:स्थिती नाही बघवली जात. अर्थात त्यांच्या या परिस्थितीला त्या पक्षातील बेशिस्त वागणूक, जनतेच्या प्रश्‍नांकडे त्यांनी जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष आणि पक्षातील शीर्ष नेत्यांचे स्वार्थी निर्णयही कारणीभूत आहेत, हे सांगण्यासाठी कुठल्याही विचारवंताची आवश्यकता नाही.
नितीशकुमार यांनी मोदींसोबत बिहारमध्ये युती करण्यास नकार देऊन भ्रष्टाचारी लालूंसोबत संगत का केली, कारण मोदींचा, ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोधरा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीमागे हात असणे, एवढाच बिनबुडाचा आरोप आणि एवढेच कारण नितीश कुमारांनी दिलेले होते. अर्थात आपल्या या निर्णयासाठी सर्वधर्मसमभाव अशा आपल्या विचारांची पुष्टीही त्यांनी जोडली होती. मोदी हे या मुसलमानांचे आणि त्या अनुषंगाने देशातील सर्वधर्मसमभाव या विचारांशी एकनिष्ठ असणार्‍यांचे कट्टर शत्रू आहेत, अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी देशातील प्रत्येक भाजपाविरोधी पक्षांमध्ये अहमहमिका लागली. परंतु, मोदी मात्र आपल्या प्रत्येक पावलाने देशाला जिंकण्यासाठी निघाले आणि जिंकलेही. त्यांचा आणि भारतीय जनता पक्षाचा हा विजय केवळ अभूतपूर्व नव्हता, अविश्‍वसनीय नव्हता, तर पूर्णत: अनाकलनीय होता.
देशाचे नेतृत्व एका प्रदेशाचे नेतृत्व करणारा मुख्यमंत्री सांभाळू शकेल की नाही, ही साशंकताही अनेकांच्या मनात होती. एवढेच नव्हे, तर गुजरात सरकारचा हा कणखर मुख्यमंत्री आपल्याच पक्षाच्या, आपल्यापेक्षा वय आणि अनुभवाने ज्येष्ठ नेत्यांसोबत केन्द्रात योग्य कार्य करू शकेल, अशी खात्रीही कुणी देऊ शकत नव्हते. कारण केन्द्राच्या राजकारणाचा मोदींना अनुभव नव्हता. परंतु, केवळ आणि केवळ देशाबद्दल, देशाच्या प्रगतीबद्दल आणि देशातील जनतेच्या जाणिवांच्या परिपूर्णतेचा वसा घेतलेला हा कार्यकर्ता प्रधानसेवक म्हणून त्यासाठी रात्रंदिवस झटत राहिला आणि टीकांचा भडिमार अंगावर घेत दौडत राहिला. परराष्ट्र व्यवहार, सांस्कृतिक सौहार्दता, सर्वधर्मसमभाव, अर्थकारण, तरुणांना योग्य मार्गदर्शन, जनतेशी कायम संवाद आणि कठोर निर्णय, याव्यतिरिक्त स्वच्छ भारत निर्मिती आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या बांधणीसाठी केलेली सुरुवात, त्याला दिलेले विशेष महत्त्व याद्वारे सामान्य जनतेच्या हृदयात एक अतिविशिष्ट जागा मोदींनी निर्माण केली. भारतीय जनतेच्या अपेक्षा वाढविल्या आणि मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांना विकासाच्या राजकारणातून मुस्लिम समाजाचा पाठिंबा कसा मिळवू शकतो, हा पाठही दिला.
मोदी या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव केवळ राष्ट्रीय पातळीवर राहिलेला नाही, तर आंतरराष्ट्रीय अवकाशातही मोदी हा एक चमकणारा आणि ध्रुवपदी विराजमान झालेला तारा आहे, हे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. या तीन वर्षांपूर्वीच्या दशकात पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी जे काही प्रताप करून ठेवले, जितके स्वार्थ पोसण्याचे कार्य केले, स्वत:ला देशापेक्षा मोठे करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इथला सामान्य माणूस आकाशाकडे डोळे लावून शरीर आणि विचारांनी खंगत राहिला, मनातल्या मनात एकच प्रश्‍न विचारत राहिला, राजकारण्यांनो, कुठे नेऊन ठेवलंत माझ्या देशाला?
मोदींच्या गेल्या जवळपास तीन वर्षांच्या अनुभवाने, कुठल्याही आणि कुणाच्याही प्रभावाखाली कार्य न करता, कुठल्याही आणि कुणाच्याही टीकांकडे दुर्लक्ष करीत केवळ देशहितासाठी घेतलेल्या निर्णयांनी या देशाचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे, याची निश्‍चिती वाटते. या देशाचे नेतृत्व पुढील दोन दशके जर मोदींकडेच राहिले आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत करीत देशातील जनता त्यांना अशीच पाठिंबा देत राहिली, तर जनतेच्या मनात केवळ एकच प्रश्‍न राहणार आहे की, मोदीजी या देशाला तुम्ही खरंच नक्की किती उंचीवर नेऊन ठेवणार आहात?
– मधुसूदन (मदन) पुराणिक
९४२००५४४४४