धान्य गोदामांची संख्या वाढवा

0
41

वाचकपत्रे
महाराष्ट्रात कधी नव्हे एवढे तुरीचे बंपर पीक झाले. एवढे की, अजूनही बाजार समित्यांमध्ये तूर येतच आहे. ती ठेवण्याची जागा नाही आणि बारदानाही नाही, अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. भारताची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. केवळ मान्सून वेळेवर येणार म्हणून शेअर बाजार आकाशाला टेकले की नाही? पंतप्रधानांनी डाळींचे उत्पादन अधिक घेण्याचे आवाहन केले आणि शेतकर्‍यांनी ते पाळले. आता त्यांच्या तुरीला हमीभावाने खरेदी करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यासाठी आणखी गोदामांची अथवा साठवणुकीची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. ही संख्या तातडीने वाढवायला पाहिजे. ३१ मे ही तारीख जरी दिली असली, तरी महाराष्ट्रात मान्सून त्यापूर्वीच येण्याची शक्यता आहे. असे होऊ नये की, अवेळी मान्सून बरसून ही तूर ओली व्हायची. हे लक्षात घेता ३१ मेची वाट न पाहता, समित्यांत आलेली तूर तातडीने खरेदी करून तूर उत्पादकांना दिलासा द्यावा.
मुकुंद काकीरवार
नवीन सुभेदार, नागपूर

न्या. कर्नन बेपत्ता?
ऐकावे ते नवलच!
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्नन यांना न्यायालय अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. पण, कर्नन यांनी पोलिसांपुढे हजर न राहता, चक्क बेपत्ता होण्यात धन्यता मानली. असे असेल तर सामान्य गुन्हेगार आणि न्यायाधीशात फरक तो काय राहिला? न्यायाधीशच असे बेताल वागत असतील, तर मग न्यायपालिकेवर विश्‍वास तरी कसा ठेवणार.
अमोल पाटील
नागपूर

कॉंग्रेस आता उभी होणे केवळ अशक्य!
१२५ वर्षांची म्हातारी कॉंग्रेस आता एवढी खंगली आहे की, ती आता भविष्यात उभे होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण, तिची देखभाल करण्याची, पालनपोषण करण्याची जबाबदारी ज्यांनी आपल्या शिरावर घेतली होती, त्यांचे पालनपोषण करून त्यांना लहान मुलांप्रमाणे चार शब्द सांगण्याची वेळ आली आहे. अशा मुलांनी काय कॉंग्रेस उभी होणार आहे का? आजकाल जे काही उरलेसुरले नेते आहेत, ते हतबल झाले आहेत. त्यांना आपल्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. अनेक नेते, कार्यकर्ते कॉंग्रेस सोडून इतरत्र गेले आहेत. तरीही चौकडीला वाटते, या बालकाचा राज्याभिषेक करावा. एवढा मोठा देश. या चौकडीला ही एखादी रियासत वाटते का? घराणेशाही केव्हाच गेली. आता लोकशाही आहे. लोकांच्या हातात आता खर्‍या अर्थाने लोकशाहीची किल्ली आली आहे, याचे भानही या पक्षाला राहिलेले नाही. कॉंग्रेसमध्ये अजूनही काही सुजाण लोक आहेत. पण, त्यांचे कुणी ऐकत नाही, अशी बिकट स्थिती आहे. तेव्हा म्हातारीचे अंतिम दिवस जवळ आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
डॉ. एम. एन. पोटभरे
९८५०९२५७७४

संत भ्रष्टाचारी बाबा अरविंद केजरीवाल!
अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा लाभ उठवीत जन्मलेला पक्ष पैलतीर का गाठतो आहे? कमरेचेच नाही, तर तोंडाचेही सोडून डोक्याला बांधणारे हे नेते आहेत की संत भ्रष्टाचारी बाबाचा अवतार? अशा अनेक बाबी भ्रष्टाचाराच्या निमित्ताने या भोंदू साधूच्या व त्यांच्या चेलेचपाट्यांच्या रूपात प्रकट झाल्या आहेत. आरोपांची मालिका तरी किती? आधीच तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. आपल्या नातेवाईकांची वर्णी केजरीवाल यांनी लावली, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. पोरकटपणा, उथळपणा या गुणधर्माने संपादित केलेले राज्य टिकत नाही, हा संदेश मात्र या निमित्ताने सर्वच पक्षांना मिळाला, हेही नसे थोडके! आता अण्णा, आरोप नव्हे, ते सिद्ध होण्याची वाट पाहात आहेत!
अमोल करकरे
पनवेल

कपिल मिश्रांवर हल्ल्यापर्यंत मजल
अरविंद केजरीवाल यांच्यावर, त्यांच्याच पक्षातील एक आमदार कपिल मिश्रा यांनी, दोन कोटी रु. घेतल्याचा आरोप केला. सोबतच आपच्या नेत्यांच्या विदेश दौर्‍याचा तपशील सादर करावा, या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पण, परवा त्यांच्यावर केजरीवालांच्या एका कार्यकर्त्याने हल्ला केला. केजरीवालांचे हे कृत्य भ्याडपणाचे आणि भ्रष्टाचार लपविण्याचे आहे. ‘‘मैं हर निर्णय जनतासे पूंछकर लूंगा’’ म्हणणारे हेच ते केजरीवाल का? आता ते तोंेड का लपवीत आहेत? याचा अर्थ, पाणी कुठेतरी मुरले आहे. फार दिवस प्रामाणिकपणाचा आव आणता येत नाही. जनता त्याचा लेखाजोखा मागते, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
अनुराग देशमुख
नागपूर