नरसिंह

0
69

वेध
आपल्याकडे भगवान विष्णूंनी पृथ्वीला संकटापासून वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगी घेतलेल्या अवतारांना ‘दशावतार’ म्हणून ओळखले जाते. पौराणिक उल्लेख, कथांनुसार सतयुगापासून द्वापार युगापर्यंत भगवान विष्णूंनी आतापर्यंत एकूण ९ अवतार घेतले. दहावा अवतार कलियुगात होणार असल्याची मान्यता असून तो ‘कल्की’ या नावाने ओळखला जाईल. आतापर्यंत झालेल्या मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, राम, परशुराम, श्रीकृष्ण, वामन, बुद्ध या नऊ अवतारांपैकी चौथा नृसिंह. वैशाख शुद्ध चतुर्दशीला विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन त्यावेळच्या हिरण्यकश्यपू या राक्षसाचा वध गेला. विष्णूंचे हे सर्व अवतार दुष्टांच्या निर्दालनासाठी झाले असल्यामुळे, आज कोणी असे काम करीत असल्यास त्याचा उल्लेख ‘अवतार’ असा केला जातो. नृसिंह अवताराच्या कथेत म्हणजे तो अवतार झाला त्याच दिवशी या नृसिंहाने पृथ्वीला ओझे झालेल्या हिरण्यकश्यपू या राक्षसाचा वध केला. कश्यप राजाला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या नावाची दोन मुले होती. हे दोघेही दानव म्हणजे राक्षस असून त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवता आणि पृथ्वीवरील सर्वच जीव त्रासून गेले होते. विष्णूंनी घेतलेल्या तिसर्‍या वराह अवतारात हिरण्याक्षाचा वध केला. आपल्या प्रिय भावाचा झालेला वध पाहून संतापलेल्या हिरण्यकश्यपूने पृथ्वीवर नुसता उधम सुरू केला. आपल्या सार्‍या दैत्य अनुयायांनाही त्याने पृथ्वीवर धुमाकूळ घालण्याचा आदेश दिला. याच दरम्यान हिरण्यकश्यपूने स्वत:च प्रतिविष्णू होऊन अमरत्व मिळवण्याचा निश्‍चय केला. त्यासाठी त्याने मंदार पर्वतावर जाऊन खडतर तपश्‍चर्या करण्यास सुरुवात केली. एकाच पायाच्या अंगठ्यावर उभा, हात वर आणि दृष्टी आकाशाकडे, अशी त्याची तपश्‍चर्या सुरू झाली. ही तपश्‍चर्या अतिशय खडतर असल्यामुळे त्याचे परिणाम हळूहळू पृथ्वीवरील प्राणिमात्रांना आणि देवादिकांनाही जाणवू लागले. म्हणतात, हिरण्यकश्यपूच्या तपामुळे त्याच्या मस्तकातून धूर निघू लागला, नद्या आटल्या, भूमीला थरकाप सुटला, देव घाबरले. या संकटातून सोडवण्यासाठी देवांनी सृष्टिनिर्माते ब्रह्मदेवाकडे धाव घेतली. ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूची नेमकी तपश्‍चर्या काय सुरू आहे हे पाहण्यासाठी त्याच्याकडे गेले. त्या वेळी त्याचे शरीर किड्यामुंग्यांनी खाऊन टाकले आहे. त्यात वारुळे तयार झाली आहेत. गवत उगवले आहे असे दिसून आले. केवळ हाडांच्याच भरवशावर त्याचे प्राण शिल्लक होते. ब्रह्मदेवांना आता त्याला थांबवणे आवश्यकच होते.

नियतीचा निर्णय
या राक्षस हिरण्यकश्यपूचे काय करायचे, त्याचा उधम कसा थांबवायचा, त्याचा शेवट नेमका कसा करायचा, हे नियतीने आधीच ठरवले होते. त्याप्रमाणेच सारे सुरू होते. ब्रह्मदेवांनी जेव्हा तपश्‍चर्या करणार्‍या या राक्षसाची स्थिती पाहिली त्या वेळी ते अवाक् होऊन गेले. याला आता इथेच थांबवले नाही तर तो किती विध्वंस, उतमात करू शकेल, याचा अंदाज त्यांना आला. त्यांनी आपल्या कमंडलूतले पाणी शिंपडून त्याचे शरीर पूर्ववत केले आणि त्याला वर मागण्यास सांगितले. यामुळे अतिशय आनंदी झालेल्या हिरण्यकश्यपूने वर मागितला, ‘‘हे ब्रह्मदेव, तुमच्या कोणत्याही निर्मितीपासून- मनुष्य, प्राणी, पक्षी, देव, दानव यांच्याकडून, घरात किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री, ना जमिनीवर ना आकाशात, ना शस्त्राने किंवा अस्त्राने मला मृत्यू येऊ नये. तसेच मला सर्वोच्च स्थान, न संपणारे ऐश्‍वर्य मिळावे आणि मला कोणीच प्रतिस्पर्धी नसावा.’’ ब्रह्मदेवांनी हे सारे त्याला देऊन टाकले. या प्रभावशाली वरामुळे आधीच माज असलेला हिरण्यकश्यपू पूर्णपणे मस्तावून गेला. या वरसामर्थ्याने त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळवला. स्वर्गावरही अधिपत्य मिळविले. त्याच्या क्रौर्याने देवही त्रस्त झाले. त्यांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली. विष्णूंनी सांगितले, ‘‘काही काळजी करू नका. त्याचे सारे नियतीनेच ठरविले आहे. मीच त्याला संपवणार आहे. हिरण्यकश्यपू ज्या वेळी त्याच्या प्रल्हाद नावाच्या पुत्राचा छळ करेल त्या वेळी त्याचा विनाश नक्कीच आहे. थोडी कळ सोसा.’’ प्रल्हाद नावाचा विष्णूंचा भक्त होता. तो सतत ‘नारायण नारायण’ असा जप करायचा. त्याच्या या ‘उद्योगा’मुळे हिरण्यकश्यपू चिडून जायचा. तो त्याला विविध प्रकारच्या जीवघेण्या शिक्षा करायचा. पण, प्रत्येकदा भगवान विष्णू ठरल्याप्रमाणे त्याला वाचवायचे. अशाच एका संतापाच्या वेळी प्रल्हादने, ‘‘माझा नारायण या खांबातही आहे,’’ असे सांगितल्यामुळे त्याने नारायणाचा शोध घेण्यासाठी महालाच्या एका खांबाला लाथ मारली. त्या खांबातून प्रगटलेल्या नरसिंहाने, म्हणजेच नृसिंहाने हिरण्यकश्यपू या राक्षसाचा वध केला. यावेळी मनुष्य नाही, प्राणी नाही, नरसिंह आहे, तसेच दिवस नाही की रात्र नाही, सूर्यास्ताची वेळ होती, जमिनीवर नाही की आकाशात नाही, मांडीवर घेतले होते, शस्त्र नाही की अस्त्र नाही, सिंहाची नखे होती. या नखांनीच पोट फाडून या नृसिंहाने हे कार्य पार पाडले. ब्रह्मदेवाच्या वरातील प्रत्येक अट पाळून भगवान विष्णूंनी नियतीने ठरवल्याप्रमाणे सारेकाही पार पाडले. दशावतारांपैकी कूर्म, वराह, मत्स्य असे ‘पशू’ अवतार देव झाले नाहीत, पण अर्धा मानव असलेले नृसिंह मात्र देव झाले आहेत. या नृसिंह देवाला मानणारे, कुलदैवत असणारे कित्येक परिवार महाराष्ट्रात आहेत. यवतमाळ जिल्हा घाटंजी तालुक्यात अंजी (नृसिंह) येथे आणि सांगली जिल्हा वाळवा तालुक्यात कोळे नरसिंहपूर येथील नृसिंह मंदिरांवर या मंडळींची अपार श्रद्धा आहे.
ॐ उग्रवीरं महाविष्णुं ज्वलनां सर्वतोमुखं |
नृसिंह भीषणं भद्र मृत्युमृत्यु नमाम्यहं ॥
– श्रीनिवास वैद्य
९८८१७१७८२९