वेध

0
85

दानवेंचे विधान
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी परवा शेतकर्‍यांना संबोधून जे उद्गार काढले, ते मुळीच समर्थनीय नाहीत. राजकारणात राहताना आणि त्यातही प्रदेशाध्यक्षपदासारख्या उच्च पदावर असताना, आपण काय बोलतो, हे तोलूनमापूनच ठरविले पाहिजे. यापेक्षा सुजाण नेत्याने काय बोलू नये, कमी बोलावे, हा त्यातील उत्तम मार्ग! पण, कधीकधी सत्तेच्या धुंदीत काही शब्द उच्चारले जातात आणि मग पक्षाची बदनामी होते. अजित पवार यांची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत- ‘‘दुष्काळ दुष्काळ ओरडता, आता मी काय लघवी करू का या शेतांमध्ये?’’ असे ते तोर्‍यात बोलून गेले होते. विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात विदर्भाच्या विरोधात बोलल्याबद्दल त्यांच्याकडे एका महिलेने चप्पल भिरकावली होती. अरविंद केजरीवाल यांना तर अनेकांनी मारहाण केली, त्यांच्या तोंडाला काळे फासले, अंगावर शाई फेकण्याच्या घटनाही आपण पाहिल्या आहेत. ‘‘देश के सारे पत्रकार बिकाऊ हैं,’’ असे उद्गार काढणार्‍या अरविंद केजरीवालांना नंतरच्या काळात मीडियाने कसे प्रत्युत्तर दिले, हे आपल्या स्मरणात असेलच. ते शुक्लकाष्ठ अजून संपलेले नाही. किंबहुना सारा मीडिया आज केजरीवालांच्या बदनामीसाठी एक क्षुल्लकशी घटनाही सोडत नाही! अजित पवारांना आपल्या सत्तेचा, सामंतशाहीचा इतका गर्व होता की, त्यांचे आणि नंतर त्यांच्या पक्षाचे काय हाल झालेत, हेही आपणास माहीत आहे, फार दूर जाण्याची गरज नाही.
या सगळ्या पार्श्‍वभूमीवर रावसाहेब दानवे यांनीही त्याचीच री ओढणे, हे कोणत्याही सामान्य माणसाला न पटणारे आहे. आता दानवे यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. ही गोष्ट मान्य केली पाहिजे की, महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी तूर फळाला आली. तूर ठेवायला सार्‍या बाजार समित्या, गोदामे अपुरी पडली. बारदाना अपुरा पडला. त्यामुळे तूर खरेदीस विलंब झाला. आता ३१ मेपर्यंत बाजार समितीत आलेली सर्व तूर खरेदी करण्याचा स्तुत्य निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. ही गोष्टही तेवढीच खरी की, तूर खरेदी करण्याच्या प्रक्रियेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. अशा वेळी शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी त्यांनाच अद्वातद्वा बोलणे हे दानवेंना शोभले नाही. आता त्यांनी कितीही सारवासारव केली, दिलगिरी व्यक्त केली तरी ‘बूंद से गई वो हौदसे नहीं आती!’ हे दानवेंनी लक्षात ठेवावे.
इमामप्रिय ममता
उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी स्वत:ला ‘दलित की बेटी’ म्हणून मागासवर्गीय जनतेवर छाप पाडण्याचा प्रयत्न केला. पण, तो किती सफल झाला, हे २०१४ च्या लोकसभा आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले. आता बंगालमध्येही एक ‘मुस्लिम की बेटी’ उदयास आली आहे. तिचे नाव ममता बॅनर्जी! असे वाटले होते की, डाव्या पक्षांची मक्तेदारी मोडून काढत ममता प. बंगालमध्ये सुशासन देण्याचा प्रयत्न करेल. पण, चित्र असे आहे की, सुशासन तर सोडा, तेथे छुपे दहशतवादी, बनावट नोटांचे सौदागर, गरिबांंची जमीन हडपून अफीमची शेती करणारे माफिया यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांना ममतांनी पूर्ण संरक्षण दिले आहे. ‘‘बांगला देशातून आलेल्या एकाही शरणार्थीला (घुसखोरांना) मी राज्याबाहेर काढणार नाही,’’ अशी दर्पोक्ती याच ममताबाईंनी केली आहे. एवढा सगळा उपद्व्याप केल्यानंतर कोलकात्याचे शाही इमाम कसे मागे राहणार? त्यांनी उधळलेली मुक्ताफळे तर अफलातून आहेत. ‘‘मी आपल्या कारवर लाल दिवा लावणार आहे. कुणाची हिंमत असेल तर त्याने काढून दाखवावा. ही ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे आणि मी त्याच ब्रिटिशांचा सन्मान करतो. भारतीय कायदे मला अडवू शकत नाहीत, कारण आमचे कायदे वेगळे आहेत.’’ असे हा शाही इमाम बरळला आहे. लाल दिवा लावण्यासाठी मला ममता बॅनर्जींनी पूर्ण मुभा दिली आहे. त्यामुळे कुणीही माझा दिवा काढू शकत नाही. ‘‘ममतांचे मंत्री हे माझ्यापेक्षा कितीतरी पटीने छोटे आहेत. त्यापेक्षा इमामांचे महत्त्व अधिक आहे,’’ असेही तो बोलून गेला आहे. आता बोला! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मेपासून कोणत्याही मंत्री, अधिकारी यांच्या कारवर लाल दिवा असणार नाही, असा आदेश जारी केला आणि सर्वप्रथम आपल्या कारवरील दिवा काढण्यास सांगितले. कोणत्या कारवर लाल दिवा असेल याचे नियमही त्यांनी घालून दिले आहेत. या आदेशाचे देशाने पालन केले आहे. स्वत: ममताबाईंनीही आपल्या कारवरील लाल दिवा काढला आणि सर्व मंत्री, अधिकारी यांच्याही कारवर लाल दिवा असणार नाही, असे आदेश दिले. पण, या स्वयंभू शाही इमामाला मोकळीक दिली. आता बंगालमध्ये या एकट्या इमामाच्या कारवर लाल दिवा असणार आहे. आहे की नाही गंमत! मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याच्या सर्व मर्यादा ममताबाईंनी पार केल्या आहेत. ही कृत्येच त्यांना खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत. त्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. हिंदूंच्या सणांवर प्रतिबंध लावणे, त्यांच्या मिरवणुकीला परवानगी न देणे आदी प्रकार त्यांनी सुरू केले आहेत. पण, मुस्लिमांच्या सर्व उत्सवांना पूर्णपणे मोकळीक दिली आहे. दुर्गापूजा या बंगालच्या सर्वात मोठ्या सणाच्या दिवशी काढण्यात येणार्‍या मिरवणुकीसाठी ज्या वेळी उच्च न्यायालयाला आदेश द्यावे लागले, तेव्हा हिंदू पेटून उठला. ममता आता हिंदूंची राहिली नाही, ती पूर्णपणे कुरापतखोर मुस्लिमांना शरण गेली आहे, असा समज तेथे दृढ झाला आहे. ममतासाठी खड्डे तयार आहेत. वाट आहे, पुढील निवडणुकांची…
सुनील काथोटे
८६००३०४२९१