चौफेर

अनुत्तरित राहिलेले प्रश्‍न...

0
121

अनुत्तरित राहिलेले प्रश्‍न…
तसेही सोशल मीडियाचे प्रस्थ वाढल्यापासून सामाजिक चळवळी नामशेष अन् निषेधाचा सूरही अगदीच मवाळ झाला आहे. भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग इतका स्वस्त अन् सहज उपलब्ध झालेला असल्याने, निषेधाची धार तशीच बोथट झाली आहे. लाईक्स अन् कॉमेण्ट्‌सच्या परिघात अडकलेल्या भावनांचा रतीब हवा तसा, हवा तिथे उधळता येऊ लागलाय् अलीकडे. रोष असो की हसू, एखादी बाब आवडलेली असो वा मग न आवडलेली, घराबाहेर न पडता, बसल्या जागेवरूनच संताप वा आनंद व्यक्त करायचा असल्याने कुणाच्याच बाचं काहीच जात नाही इथे…

चौकातल्या सिग्नलवरचा हिरवा दिवा अवघ्या काही सेकंदात सुरू होऊन, पुढे जाण्याचा आपला मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याची खात्री असताना, विनाकारण गाडी पुढे दामटण्याची घाई करणारा माणूस त्या पाच-सात सेकंदात असे कोणते तीर मारून घेणार असतो? टेकऑफसाठी सज्ज झालेल्या विमानातील दिवे मंद झाले की, लागलीच रीडिंग लाईट सुरू करणारे प्रवासी, विमान जमिनीवरून आकाशात झेप घेईपर्यंतच्या त्या अल्पशा कालावधीत असे किती वाचन पूर्ण करून घेत असतील? देवाच्या चरणी कोट्यवधी रुपये अर्पण करण्याची दानत असलेल्यांच्या या देशात, कोट्यवधी लोक उपाशीपोटी का राहावेत? सैन्य दलातील शेकडो पदं रिक्त असताना इथली तरुणाई रोजगार उपलब्ध नसल्याचा कांगावा करत भरकटत असल्याचे चित्र का निर्माण व्हावे? रेल्वेगाडीतील भोजनाच्या दर्जाबाबत झालेली बेईमानी जराशीही खपवून न घेणारा एखादा प्रवासी, स्वत:साठी बर्थ मिळवताना खिसा रिकामा करायला जराही मागेपुढे बघत नाही, हे कशाचे द्योतक असते? चोवीस तास लंगर अन् भंडारा चालणार्‍या ठिकाणीही, लोकांपुढे हात पसरणार्‍या भिकार्‍यांची संख्या कमी का होत नाही? श्रीमंतांची, उच्च मध्यमवर्गीयांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असलेल्या भारतात करदात्यांची संख्या इतकी कमी का भरते? अगदी ‘नासा’नं निवड करावी इतकी बुद्धिवान माणसं इथं असताना हा देश संशोधनाच्या बाबतीत अजूनही तितकीशी प्रगती का करू शकला नाही? रस्त्यावरच्या मोठमोठ्या स्पीडब्रेकर्सवर आक्षेप असणारे आणि न्यायालयाने ते हटविण्यास भाग पाडले म्हणून आनंद व्यक्त करणारे लोक स्पीडब्रेकर्सऐवजी नुसते पांढरे पट्‌टे मारलेल्या क्रॉसिंगवर गाडीचा वेग थोडाही कमी करत नाहीत, याचा अर्थ काय? सध्या देशभरात सुरू असलेल्या स्वच्छतेच्या स्पर्धेत इतर सारेच लोक भराभरा पुढे जात असताना, आपण राहतो ते गाव मात्र माघारलेलेच राहिले, याबाबतची खंत चेहर्‍यावर उमटलेली दिसते अनेकांच्या. आश्‍चर्याची बाब फक्त एवढीच असते की, ती खंत व्यक्त करतानाही तोंडातल्या पानाची पिचकारी सार्वजनिक ठिकाणी उडवायचे विसरत नाहीत लोक! का व्हावे असे?
आहेत तुमच्याकडे उत्तरं या प्रश्‍नांची? नाही ना? खरं तर असे शेकडो प्रश्‍न आहेत. कायम अनुत्तरित राहिलेले. एकीकडे जराशा अव्यवस्थेनेही चवताळून उठणारी गर्दी, तर दुसरीकडे पिढ्यान्‌पिढ्या अन्याय गुमान सहन करीत अन् पचवीत राहिलेली माणसं. परवा दिल्लीहून रांचीकडे जाणार्‍या राजधानी एक्सप्रेसमधे भोजन पुरविणार्‍या कंत्राटदाराने अचानक, विनासूचना आंदोलन पुकारले. मग काय, ना पाणी ना भोजन. गाडीतल्या प्रवाशांचे अगदी हाल हाल झालेत. एरवी राजधानी एक्सप्रेस म्हणजे सुखकारक प्रवास. पण, ‘या’ गाडीच्या बाबतीत मात्र चित्र नेमके उलट होते. खरं तर दरम्यानच्या काळात प्रत्येकानेच आपापली सोय जमेल तशी करून घेतली होती. काहींनी गाडीचा थांबा असलेल्या स्टेशन्सवर खाद्यपदार्थ विकत घेतले, तर काहींनी थेट गाडीच्या पॅण्ट्रीकारवरच हल्ला करून डल्ला मारला. १६ तासांचा प्रवास करून गाडी रांचीला पोहोचली तेव्हा मात्र प्रत्येकच प्रवाशाने जणू रुद्रावतार धारण केला होता. झालेला ‘अन्याय’ सहन न करण्याची भाषा सर्वांच्या तोंडी होती. सेवेसाठी पैसे मोजले असताना असे का घडले, हा सवाल होता त्यांचा. प्रत्येकाला त्याचे उत्तर हवे होते-तेही आत्ताच! एका अव्यवस्थेने निर्माण केलेला हा रोष भविष्यात किती काळ टिकेल, हा प्रश्‍न आहेच. १६ तासांच्या काळात वाट्याला आलेल्या अवहेलनेच्या परिणामस्वरूप सुरू झालेला लढा शेवटापर्यंत किती लोक लढतील, याबाबत मात्र जराशी शंकाच आहे.
तसेही सोशल मीडियाचे प्रस्थ वाढल्यापासून सामाजिक चळवळी नामशेष अन् निषेधाचा सूरही अगदीच मवाळ झाला आहे. भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग इतका स्वस्त अन् सहज उपलब्ध झालेला असल्याने, निषेधाची धार तशीच बोथट झाली आहे. लाईक्स अन् कॉमेण्ट्‌सच्या परिघात अडकलेल्या भावनांचा रतीब हवा तसा, हवा तिथे उधळता येऊ लागलाय् अलीकडे. रोष असो की हसू, एखादी बाब आवडलेली असो वा मग न आवडलेली, घराबाहेर न पडता, बसल्या जागेवरूनच संताप वा आनंद व्यक्त करायचा असल्याने कुणाच्याच बाचं काहीच जात नाही इथे. कुणी दगावल्याची खबर आली की, ‘आरआयपी’ टाकायचा अन् कुणाच्या जन्माची बातमी आली की कॉंग्रॅट्‌स लिहून मोकळं व्हायचं… अगदी निषेध, निषेध, निषेध असं तीन वेळा लिहिलं तरी संतापाची धार तीव्रतेच्या टीपेला पोहोचली असल्याच्या निष्कर्षाप्रत येतात लोक आपसूकच… त्याचं महत्त्व अजीबातच नाही असं नाही, पण फेसबूक, ट्वीटरवर व्यक्त होणार्‍या भावनांना रस्त्यावर उतरून होणार्‍या आंदोलनाची सर कशी येणार? घरात भरीत-भाकरी केली की टाक त्याचे फोटो फेसबूकवर अन् एखाद्या रम्य ठिकाणी गेल्यावर काढलेली सेल्फी टाकली व्हॉटस् ऍपवर. शे-दोनशे लाईक्स आले, पन्नास-साठ कॉमेण्ट्‌स आल्या की गडी खूश! यात दिल्लीतल्या जंतरमंतरमध्ये झालेले शेतकर्‍यांचे आंदोलन कुणाच्या गावीही नसते! तिथल्या सरकारमधला कपिल मिश्रा नावाचा एक मंत्री, आपलाच नेता असलेल्या केजरीवालांविरुद्ध बेमुदत आंदोलन पुकारतो, पण त्यालाही फारसा प्रतिसाद मिळत नाही. कारण सोशल मीडियावर लोकांचा प्रतिसाद मिळण्यासाठीचे निकषही बदलू लागलेत अलीकडे… काल-परवाचीच गोष्ट आहे. जालंधरमधल्या एका कारखान्यात काम करणार्‍या एका मजुराला ऍम्ब्युलन्सचे दर परवडत नाही म्हणून आपल्या वडिलांचा मृतदेह हातठेल्यावर टाकून घरापर्यंत न्यावा लागला. अजून सोशल मीडियावर हळहळ व्यक्त झालेली नाही या संदर्भात, पण होईल पुढेमागे- कुणीतरी सारा घटनाक्रम अपलोड करेल तेव्हा. पण एक मात्र खरे की, या घटनेमागील वास्तवाची धग कळायला त्या मजुराचे जिणे समजून घ्यावे लागेल. मृतदेह हातठेल्यावर ठेवून घराकडे जायला निघण्यापूर्वी खूप शोधाशोध केली, तेव्हा एका रुग्णालयासमोर ऍम्ब्युलन्स उभी असलेली बघितली त्याने. चौकशी केली. चार किलोमीटर दूर जायला चारशे रुपयांची किंमत मोजावी लागण्याची अट मात्र त्याच्या खिशाला न परवडणारी होती. मग त्याने त्याचा मार्ग शोधला. खिशाला परवडेल एवढ्या पैशात फारतर एक हातगाडी उपलब्ध होऊ शकणार होती. मग त्याने व्यवहारी निर्णय घेतला. ऍम्ब्युलन्सचा आग्रह सोडून दिला अन् मृतदेह हातगाडीवर टाकून निघाला घराकडे. समोर उभ्या राहिलेल्या प्रश्‍नाचे उत्तर त्याने त्याच्यापुरते शोधले होते- कुठलीही तक्रार न करता… एरवी, एवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी कायम तक्रारीचा सूर आळवणार्‍या माणसांनी खरंतर शिकावं या तरुणाकडून बरंच काही…
राजधानी एक्सप्रेसमधल्या प्रवाशांचे हाल करण्याचा अधिकार त्या कंत्राटदाराला कुणी दिला? आपल्या मागण्यांसाठी सरकारदरबारी प्रश्‍न मांडायचे सोडून प्रवाशांना वेठीस धरण्याची ही कुठली रीत झाली? त्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर आणि त्या कंत्राटदारांवरही कारवाई झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. खरंच, एक मृतदेह घेऊन चार किलोमीटर अंतरावर जायला चारशे रुपये लागतात एका ऍम्ब्युलन्सला? अन् एखाद् वेळी नसलेच एखाद्याकडे पैसे तर असं माणुसकी सोडून वागता येऊ शकते एखाद्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला…? प्रश्‍न तर अजूनही बरेच आहेत….जयवंत दळवींच्या एका नाटकात, अमेरिकेतील मुलांपासून दूर भारतात म्हातारपण घालवणार्‍या आईबाबांनी विचारलेला, ‘‘हा देश म्हणजे काय तक्रारपेटी वाटते का तुम्हाला?’’ या प्रश्‍नासारखेच… अनुत्तरित…
सुनील कुहीकर
९८८१७१७८३३