अग्रलेख

फयाझची हत्या वळणबिंदू ठरो!

0
143

फयाझची हत्या वळणबिंदू ठरो!
सारे काश्मीर खोरे फयाझच्या हत्येने हादरून गेले आहे. काश्मीरची सहानुभूती फयाझच्या बाजूने गोळा झाली आहे. या घटनेनंतर, काश्मिरी जनतेचे मतपरिवर्तन सुरू झाले असेल, तर ते फारच चांगले व आवश्यक आहे. त्या दृष्टीने उमर फयाझचा मृत्यू, काश्मीरच्या नजीकच्या इतिहासात, एक वळणबिंदू ठरू शकतो…
राजपुताना रायफल्सचा लेफ्टनंट उमर फयाझ याची दहशतवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या, सार्‍या देशाला हादरवून गेली. प्रत्येक जण हळहळला. नातेवाईकाच्या लग्नाला म्हणून सुटी घेऊन आलेल्या उमरला लग्नमंडपातून दहशतवाद्यांनी उचलून नेले. तिथल्या कुणीही विरोध केला नाही. नंतर दहशतवाद्यांनी त्याचा जबडा तोडला, हातपाय तोडण्यात आले आणि नंतर छातीत गोळ्या झाडून त्याचा जीव घेतला. हे वर्णन वाचताना प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत पाणी आले. चीड आणि हताशा यांचे मिश्रण असणारी भावना प्रत्येकाच्याच हृदयात दाटून आली. आपापल्या परीने प्रत्येकाने प्रतिक्रिया नोंदविल्यात. मान्यवरांच्या प्रतिक्रिया मीडियात प्रकाशित झाल्या. सर्वसामान्यांनी आपापल्या प्रभाव-वर्तुळात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण, तिकडे काश्मीर खोर्‍यात सर्वसामान्यांमध्ये या घटनेची काय प्रतिक्रिया होती, हे बघणे अधिक महत्त्वाचे आहे. तिकडील ग्रेटर काश्मीर, रायझिंग काश्मीर, काश्मीर रीडर्स, श्रीनगर टाइम्स, दैनिक आफताब, काश्मीर उझमा आदी महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी फयाझ याच्या हत्येची बातमी दिली. सविस्तर दिली. पण, त्यावर मतप्रदर्शन केले नाही. कुणी अग्रलेख किंवा प्रासंगिक लिहून कुठल्या एका पक्षाची बाजू घेतली नाही. तुमच्या डोक्याला दहशतवाद्यांची बंदूक लागलेली असते, तेव्हा तुम्ही आपले मत मांडू शकत नाही. त्यामुळेच या वृत्तपत्रांनी मत मांडण्याचा धोका पत्करला नाही, असे म्हणता येईल आणि हे स्वाभाविक म्हणावे लागेल. परंतु, सोशल मीडिया मनमोकळेपणे व्यक्त होतो असे म्हणतात. त्यामुळे सोशल मीडियावर फयाझसंदर्भात ज्या प्रतिक्रिया आल्यात, त्यावरून काश्मिरींच्या मनात काय आहे, याचा थोडाफार अंदाज लावता येऊ शकतो. काश्मिरातील सोशल मीडियावर मिश्रित प्रतिसाद आहे. दोन्ही बाजूंची मते मांडली गेली आहेत. काहींनी या हत्येची निंदा केली आहे, तर काहींनी या हत्येमागची पृष्ठभूमी सांगितली आहे. काश्मिरातील परिस्थितीला दोष देत, दहशतवाद्यांना मोकळे सोडले आहे. मानवाधिकार कार्यकर्ता खुर्रम परवेजचे म्हणणे आहे की, भांडखोरपणा स्वत:वरदेखील उलटू शकतो. ज्या संदर्भात काश्मिरात हत्या होत आहेत, तो संदर्भ आता बदललेला आहे, असे तो म्हणतो. एक पत्रकार वासिम खलिद म्हणतो की, एक लष्करी अधिकारी, जो नि:शस्त्र होता आणि घरी एका लग्नसमारंभासाठी आला होता, त्याला ठार करणे, मला योग्य वाटत नाही. तो काही लढत नव्हता. त्याने काश्मिरी जनतेच्या हिताविरुद्धही काही केले नव्हते. त्याला समजावता आले असते. खलिद पुढे म्हणतो, आम्ही भारतीय लष्कराप्रमाणे इतक्या खालच्या पातळीवर उतरायला नको. आम्ही भेद केला पाहिजे. आमचा लढा सत्य, न्याय आणि नैतिकतेवर आधारित आहे. या अशा घटना आमच्या ध्येयाला बदनाम करणार्‍या आहेत आणि आमच्यावरील आक्रमकांच्या रांगेत आम्हाला बसविणार्‍या आहेत. मोहम्मद फैजलने ट्विट केले आहे की, आम्ही ज्यासाठी लढत आहोत, त्याची तत्त्वे आणि मूल्ये यांचे विस्मरण व्हायला नको. दुष्प्रवृत्तींनी आमच्या श्रद्धा आणि मानवतेवर ताबा मिळवायला नको. परंतु, बर्‍याच यूझर्सनी युक्तिवाद केला आहे की, एखादा लष्करी अधिकारी कर्तव्यावर नसला म्हणजे तो लष्करी अधिकारी नसतो असे नाही. तो कर्तव्यावर नसला तरी आघातलक्ष्य असू शकतो. काहींनी फयाझच्या हत्येला भारतीय अधिकार्‍यांनाच दोषी धरले आहे. एका प्रसिद्ध काश्मिरी छायाचित्रकाराने लिहिले आहे की, एखादा दहशतवादी बँकेत खाते उघडायला गेला किंवा नातेवाईकाच्या लग्नात गेला, नि:शस्त्र, तर तो सामान्य नागरिक किंवा लढा सोडलेला व्यक्ती होईल का? भारताच्या दृष्टीने तो दहशतवादी नसणार का? तसे पाहिले, तर बुरहानचा भाऊ खालिदला जेव्हा मारण्यात आले तेव्हा त्याच्याजवळ कुठलेच शस्त्र नव्हते. तो भारतीय सैनिकांशी लढतही नव्हता, तरी त्याला का मारण्यात आले? या सर्व प्रातिनिधिक प्रतिक्रिया बघितल्या की, आपण किती वेगळ्या विश्‍वात, वेगळ्या मानसिकतेत जगत असतो आणि त्यावर आधारित मतप्रदर्शन करीत असतो, हे ध्यानात येईल. परंतु, ही परिस्थिती खूपच खराब आहे किंवा कॉंग्रेसचे नेते म्हणतात त्याप्रमाणे काश्मीर हातातून गेला आहे, असे वगैरे काही नाही. दहशतवादच नाही, तर कुठल्याही चळवळीला जेव्हा तिथल्या जनतेचा पाठिंबा असतो, तोपर्यंत जगातील कुठलेही सरकार, कुठलीही लष्करी शक्ती त्या चळवळीला नष्ट करू शकत नाही. लोकांचा पाठिंबा संपला की ती चळवळ, विझण्यापूर्वी दिवा जसा भडकतो, तशा प्रकारची वळवळ करीत विझून जाते. पंजाबमधील खलिस्तान चळवळीचा अंतही असाच झाला. दहशतवादी घरात लपून असायचा आणि पोलिस रस्त्यावरून जात त्याचा शोध घेत राहायचे. लोक माहितीच देत नव्हते. पण जेव्हा हे दहशतवादी आपल्याच लोकांवर उलटले, तेव्हा मात्र लोकच दहशतवाद्यांचा ठिकाणा पोलिसांनी सांगू लागले. ती चळवळ अशा रीतीने विझली. काश्मीरलाही हे लागू आहे. स्थानिक जनता या दहशतवाद्यांच्या विरोधात उभी झाली पाहिजे. उघडपणे नाही तर गुप्तपणे. उमर फयाझच्या हत्येनंतर काश्मिरात अशी भावना प्रकट होऊ लागली आहे. मरणाच्या भीतीने कुणी स्पष्टपणे तसे बोलून दाखवत नसेल. पण, मनातून स्थानिक जनता हळूहळू दहशतवादापासून स्वत:ला दूर करीत आहे. त्याला वेळ लागेल, पण हाच मार्ग आहे आणि त्यातच यशदेखील आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असणे आणि काश्मिरात भाजपा-पीडीपीचे संयुक्त सरकार असणे, या दोन फार मोठ्या व सकारात्मक गोष्टी आज विद्यमान आहेत. काश्मिरात भाजपा सत्तेत वाटेकरी असणे, तिथल्या लोकांनी स्वीकारणे, हा एक शुभसंकेत आहे. काश्मीरसाठी विकासाच्या अनेकविध वाटा मोकळ्या करायच्या. तिथल्या लोकांसमोर खर्‍या जीवनाचे मर्म समजेल अशा भाषेत मांडायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना समूळ नष्ट करण्यासाठी अतिशय कठोर भूमिका घ्यायची, ही जी रणनीती भारत सरकारने स्वीकारली आहे, ती अतिशय समर्पक अशीच आहे. सर्वसामान्य चळवळ आणि दहशतवादी चळवळ, यात आपण फरक केला पाहिजे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी अतिशय वेगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. त्याचे फळ मिळण्यासाठी सामान्य लोकांना थोडी वाट बघण्याची गरज असते. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून काश्मीर प्रश्‍न सोडविण्याच्या दिशेने ते अधिक खंबीर पावले उचलत आहेत. त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडली की, आपण उतावीळपणे प्रतिक्रिया देणे योग्य नसते. उमर फयाझ काश्मिरी होता. तरुण होता. मुख्य म्हणजे अत्यंत खडतर अशा एनडीए परीक्षेत यश मिळवून तो लष्करात अधिकारी झाला होता. त्याच्या हत्येवर काश्मिरात उघड प्रतिक्रिया उमटल्या नसतील, तरी सूत्रांच्या माहितीनुसार, सारे काश्मीर खोरे फयाझच्या हत्येने हादरून गेले आहे. काश्मीरची सहानुभूती फयाझच्या बाजूने गोळा झाली आहे. या घटनेनंतर, काश्मिरी जनतेचे मतपरिर्वन सुरू झाले असेल, तर ते फारच चांगले व आवश्यक आहे. त्या दृष्टीने उमर फयाझचा मृत्यू, काश्मीरच्या नजीकच्या इतिहासात, एक वळणबिंदू ठरू शकतो…