महिलांनी आतातरी सावध व्हावे

0
76

रविवारची पत्रे
सध्याच्या धावपळीच्या आधुनिक युगात अनेक स्वास्थ्य समस्या निर्माण झाल्या आहेत. झिरो फिगरच्या जमान्यात स्थुलता, लठ्ठपणा म्हणा की जाड्यता ही बहुतांश महिलांना भेडसावणारी प्रमुख समस्या झाली आहे. विषेशतः विवाहानंतर येणार्‍या स्थुलपणाने बहुतेक महिलावर्ग हैराण आहे. ‘चंद्र वाढतो कलेकलेने अन् सूनबाई वाढते किलो किलोने…’ अशी परिस्थिती जिकडेतिकडे बघायला मिळते.
थोडे आपण भूतकाळात डोकावले तर ही समस्या का उद्भवली याचे उत्तर सहज मिळेल. पूर्वीच्या काळी सूर्योदय ते सूर्यास्त म्हणजेच सर्व कामे घरी महिला स्वतः करत होत्या. अलार्मचा मागमूसही नसताना भल्या पहाटे जात्यावर दळण दळले जायचे. अंगणात सडा शिंपणे असो की रांगोळी घालणे, ही साधी कामेसुद्धा अगदी वेळेवर, मन लावून केली जात होती. बरीचशी कुटुंबे चाळ किंवा फ्लॅटमध्ये स्थलांतरित झाल्याने ना अंगणाचा प्रश्‍न राहिला ना सडा, रांगोळीचा. विहिरीचे पाणी भरणे, भांडी, कपडे धुणे, स्वयंपाक इ. कामे घरच्या घरीच होत असल्याने बर्‍यापैकी अंगमेहनत होत असे. यासोबतच धान्य निवडणे, साफ करणे, शिवणकाम, घर व्यवस्थित ठेवणे यात मेहनत होत असे. उन्हाळा आला की, विविध वाळवणाचे पदार्थ करण्यात महिलावर्ग गुंतून जायचा. संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलाबाळांना सांभाळून ही सर्व कामे उरकल्या जात होती. लग्नसमारंभ आणि तत्सम इतर वेळेसही बरीचशी घरगुती कामे महिला सक्षमपणे पूर्ण करत.
परंतु, हळूहळू आधुनिकतेचा शिरकाव होत गेला आणि शिक्षण, नोकरीधंद्यानिमित्त कुटुंब दुरावत चालले. अंगमेहनतीची कामे मागे पडून फटाफट कामे करणारी यंत्रे उपलब्ध झाली. पाटा-वरवंट्याची जागा मिक्सरने घेतली, तर चूल हद्दपार होऊन गॅस विराजमान झाले. वॉशिंग मशीन, डिश वॉशरने पारंपरिक धुणे-भांडीची कल्पना मोडीत काढली. अशी एक ना अनेक किचनवेअर्स, यंत्रांनी किचनचा कब्जा घेतल्याने होणारी अंगमेहनत झिरो झाली. आजकाल तर हवे ते पदार्थ आपण ऑर्डर करून मागवू शकल्याने परिश्रमाची बचतच होऊ लागली.
शिक्षण, नोकरी आणि व्यवसायात महिलांचा सहभाग वाढल्याने घरच्या कामासाठी आता नोकरांवर अवलंबून राहावे लागते, किंबहुना धुणीभांडी करणारे आपल्या परिवाराचा अभिन्न अंग झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. यासोबतच महिलांमध्ये थायरॉईड, मधुमेह, ओबेसिटी यांचा धोका वाढला आहे. फास्टफूड, व्यायामाचा अभाव, तासन्‌तास टीव्हीवर मालिका बघत राहणे, हार्मोन्सचे असंतुलन हेसुद्धा लठ्ठपणा वाढविण्यासाठी हातभार लावतातच. यामुळेच आत्ताची पिढी आणि जुन्या पिढीत आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने हे अंतर पाहायला मिळते.
संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, योग, प्राणायामाचा दिनचर्येत समावेश करणे, नियमित आरोग्य तपासणी करणे या प्रकारे या समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो.
डॉ. अनिल पावशेकर
नागपूर
आईची माया
‘‘आई, आई, आई गंऽ’’
अशी प्रेमाने ओथंबलेली हाक फक्त आईलाच मारली जाते. आणि ‘‘आले गं बाळ’’ म्हणून तेवढ्याच ममत्वतेने साद देते ती आई.
मनुष्याच्या जीवनात सगळ्यात जवळचं असं एक नातं आहे आईचंच! इतरही अनेक नाती असतात. पण, या मुख्य नात्याच्या जवळपासचे ते नातेवाईक, या प्रेमाच्या टक्केवारीत मात्र कमीच.
आईला माहीत आहे, मी बाळाला जन्म दिला, तो माझा बाळ मोठ्ठा होणार आहे. तिला पक्के माहीत आहे की माझे रोपटे स्वाभाविक गतीने वाढणार आहे. तेव्हाच ती माय बाळाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक जडणघडणीसाठी कार्यमग्न राहते. तिच्या पाल्याप्रती तिचे कर्तव्य ती चोख बजावते.
आई ही अशी व्यक्ती आहे जी निर्व्याज प्रेम करते.
मा, आई, माते, अम्मा, माय, अम्मी, मॉम आणि माउली… कुठल्याही नावाने पुकारा, तिचे तेच प्रेम कायम असते. इतर नाती सव्याज प्रेम करतात. म्हणूनच आई प्रेमस्वरूप आई असते. आई या ममत्वाला शब्दात पकडणे कठीणच. म्हणूनच म्हणावेसे वाटते,
‘कशी मापू खोली सागराची
विशालता नभाची अन्
क्षमाशीलता अवनीची
किमया तशी ही दोन अक्षरांची
कशी वर्णू महती या आईची…’
वीणा मुळे
९८९०६८०८२०

विद्यादान पवित्र काम!
ज्ञानात ज्ञान विद्याज्ञान! दुसर्‍याला दान देताना जवळचे ज्ञान कमी न होता वाढतच जाते. पूर्वी गुरुगृही जाऊन शिक्षण घ्यायचे. शिक्षणासोबत गुरुमाउलीला, गुरुभगिनीला पाणी भरणे, लाकूड तोडणे वगैरे मदत करावी लागायची. गुरुजी क्षमता बघून शिक्षण द्यायचे.
आज भारत देशात सर्व लोकांना साक्षर करावयाचे आहे. त्यासाठी प्रत्येक खेेडेगावात शाळा, प्रौढ शिक्षणवर्ग सुरू आहेत. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सोयी, सवलती, आर्थिक मदत दिली जाते. ज्ञान देणारे शिक्षक विद्यार्थ्यांपेक्षा जास्त शिकलेले व त्याच्या विषयाचे तज्ज्ञ असावे लागतात. त्यांना शिकविण्याचा पगार मिळतो. शिकविणे हे त्यांचे आद्यकर्तव्य आहे. असे असताना यवतमाळ येथील नगरपरिषदेच्या शाळेत विलास काळे नावाच्या शिक्षकाने स्वत:च्या जागेवर स्वत:च वेगळ्या महिला शिक्षिकेची नेमणूक केली. पगार मात्र स्वत: घ्यायचा. अबब! केवढा भ्रष्टाचार आहे. वर्गात मुलांना न शिकविता घरी फी घेऊन शिकविणारे शिक्षक बघितले. अफलातून कल्पना! विलास काळे यांना शिक्षा झाली, परंतु विद्यामंदिरात असे कृष्णकृत्य व्हायला नको. गुरू साक्षात् परब्रह्म असतो, परंतु या शिक्षकाची वागणूक ब्रह्मराक्षसाप्रमाणे वाटते. शाळेत शिक्षणच नव्हे, तर जीवनमूल्ये शिकविली जातात. आजकाल शिक्षकच जीवनमूल्ये पायदळी तुडवितात. मग मुलांना काय दोष द्यावा?
निर्मला गांधी
९४२१७८०२९०

पाकिस्तानच्या वाढत्या कारवाया
जम्मू-काश्मीर राज्यासाठी संविधानामध्ये ३७० वे कलम १७-१२-१९५२ पासून अस्थाई स्वरूपाचे आहे. आता त्याला ६५ वर्षे होत आहेत, तरीपण ते अस्थाई स्वरूपाचे आहे. हे न समजण्यासारखे कोडे आहे. अस्थाई स्वरूप म्हणजे ५ ते १० वर्षांपर्यंत, परंतु ते ६५ वर्षे असूनदेखील परिस्थिती काही बदलली नाही. उलट फुटीरवादी नेते तयार झाले. तंटे वाढतच चालले आहेत, पाकिस्तानच्या कारवाया वाढतच चालल्या आहेत. आता आता काश्मीरच्या हिजबुलच्या दहशतवाद्यांनी बँक व्हॅनमधून ५० लाख लुटून नेलेे. त्यात ७ जण शहीद झाले. अशा परिस्थितीत पाकची एम्बेसी भारतात राहणे योग्य नाही. कारण एम्बेसीचा काही अर्थ उरला नाही. पाक हा भारताला शत्रूसमान पाहतो. पाकची एम्बेसी भारतात कशासाठी? पाकच्या काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया वाढतच आहेत व त्याची वागणूक अमानवीय झाली आहे. काश्मिरात लोकं दगड फेकत आहेत. यालादेखील पाकिस्तानचे समर्थन आहे. त्यामुळे आता पाकविरुद्ध धडक मोहीम आखण्याची वेळ आली आहे. त्यांची एम्बेसी, त्याचप्रमाणे संविधानामधील ३७० कलमदेखील रद्द करण्याची वेळ आली आहे. सध्याची राज्य व्यवस्था या गोष्टीचा योग्य तो विचार करेल, अशी आशा आहे.
डॉ. व. गो. देशपांडे
नागपूर

राष्ट्रपतींची निवडणूक
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपत आल्यामुळे नवीन राष्ट्रपती कुणाला करायचे, कोण त्या पदाला लायक उमेदवार आहे, यासाठी भाजपा व विरोधी गट यांचा विचार सुरू आहे. मोदींच्या कार्यपद्धतीमुळे व देशाचा विकास व्हावा या विचासरणीच्या प्रभावामुळे ग्रामपंचायतीपासून केन्द्रापर्यंत प्रत्येक राज्य मोदीमय होऊन भाजपा प्रत्येक ठिकाणी आपली छाप पाडून निवडणूक जिंकून सत्ता प्राप्त करीत आहे. या घटनेचा पोटशूळ विरोधी पक्षांना झाल्यामुळे आपली आता खैर नाही, आपले अस्तित्व तरी राहील की नाही, याची धास्ती सर्व विरोधी पक्षांनी घेतली व आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीत तरी भाजपाने मान्य केलेला भाजपा व देशाचा विचार करणारा, भाजपाने सुचविलेला उमेदवार नको, या दुष्ट विचाराने सर्व विरोध करणारे पक्ष- ज्यांचा आजपर्यंत परस्पराशी विरोधच होता- असे सर्व नेते (त्यापैकी काही भ्रष्टाचारी आहेत आणि काहींना शिक्षाही झाली आहे) एकत्रित येऊन त्यांचा उमेदवार राष्ट्रपती म्हणून निवडून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आपली तेवढीच ठाकुरकी राहील व देशात तोंड दाखवायला जागा राहील. पण, भाजपाला धर्मनिरपेक्ष वा हिन्दुत्व विचारांचा उमेदवार चालण्यासारखा आहेच. कारण राष्ट्रपती हा देशाचा असतो. सर्वांचा असतो. त्यामुळे त्यांना फिकीर करण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे मोदी सरकार पर्यायाने भाजपा सध्यातरी तटस्थ- शांत आहे. विरोधी पक्षांचे एकत्र येणे म्हणजे अलिबाबा व चाळीस चोर यांच्यासारखी स्थिती आहे. मोदी विरुद्ध सर्व विरोधी नेते त्यामुळेच श्रीमती सोनिया गांधींना पुढे करून एकत्र येण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. पण, जे आजपर्यंत एकमेकांवर चिखलफेक करीत होते तोच चिखल त्यांच्यावर उडू नये म्हणजे झाले! गडकरींच्या म्हणण्यानुसार, भाजपात वाल्याचा वाल्मिकी होतो. त्यामुळे राष्ट्रपती कोणीही झाला तरी मोदी सरकार त्याला सबका साथ, सबका विकास या मंत्रानुरूप कार्य करायला लावेल व नवीन राष्ट्रपती हा देशाचाच विचार करेल, ना कोणत्या पक्षाचा! कारण राष्ट्रपतिपद हे सर्वांचा विचार करणारे, समतोलत्व राखणारे, योग्य दिशादर्शक आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची खेळी कुठपर्यंत यशस्वी होते, हे काळच ठरवेल.
म. ल. भावे
९४०४०८९९१७

काकडधर्‍याचे हिवरे बाजार पुन्हा होईल का?
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरिता वर्धा जिल्ह्यातील आर्वी या तालुक्याची निवड झाली आहे. या निमित्ताने स्पर्धेत सहभागी झालेल्या ५१ गावांत काकडधरा या आदिवासीबहुल गावाचा समावेश आहे. ३५ वर्षांपूर्वी असेफा या संस्थेने या गावात काम सुरू केले होते. हे गाव विदर्भाचे राळेगणसिद्धी या नावाने ओळखले जात होते. काही दिवसांनी असेफाचे काम संपले तेव्हापासून काकडधर्‍याची अवस्था पूर्वीसारखीच झाली. या गावाचे तेव्हा हिवरे बाजार का झाले, याचा शोध घ्यावा लागेल. वैदर्भीयांची मानसिकता, लोकप्रतिनिधींची निष्क्रियता, अधिकार्‍यांचा डोळेझाकपणा इ. अनेक कारणे याला जबाबदार आहेत. विदर्भातील सामान्य जनता जागरूक होईपर्यंत हे असेच चालणार आहे. आर्वी तालुक्यातील केवळ ५ गावांनीच हे काम करावे, इतरांनी माश्या मारत बसावे काय? काकडधर्‍याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले गाव पाणीदार होईल, याचा ध्यास घेणे अत्यंत जरुरीचे आहे. काकडधर्‍यापेक्षाही आष्टी तालुक्यातील १०० टक्के भटक्या विमुक्तांचे गाव आजही पाणी पाणी करीत आहे. सामाजिक न्याय मंत्रालयापासून राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगापर्यंत या गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नाकरिता अनेकांनी पाठपुरावा केला, परंतु अजूनही शासन गावकर्‍यांची तहान शमवू शकले नाही. विदर्भातील स्वयंसेवी संस्था, बुद्धिजीवी वर्ग, लोकप्रतिनिधी यांनी हे प्रश्‍न अग्रक्रमाने हाती घेणे जरुरीचे आहे. ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही पाणी फाऊंडेशनचे काम सुरू करावे. विशिष्ट कालावधीकरिता हे काम व्हावे असे न होता, ही प्रक्रिया नित्य सुरू राहणे आवश्यक आहे. अन्यथा काकडधरा गावासारखी अन्य गावांची अवस्था होईल, हे ध्यानी घेऊन हे मोलाचे कार्य देशातील सर्वच गावात नेहमीकरिताच सुरू राहणे जरुरीचे आहे. त्यानंतरचा टप्पा म्हणजे ही गावे हिवरे बाजार किंवा मेंढालेखाच्या बरोबरीने यायला हवी. तरच आपला देश, महाराष्ट्र सुखी-समृद्ध होईल.
बाबासाहेब गलाट
रोहणा, वर्धा

पद्माकर जोशी यांना श्रद्धांजली!
पद्माकर नरहरपंत जोशी ऊर्फ अप्पासाहेब गेले त्याला आठवडा होईल. ‘‘येतो गं!’’ म्हणून सहज घराबाहेर पडावे आणि थेट माउलीच्या भेटीस जावे! इमरजन्सी नाही, ऍम्ब्युलन्स नाही, आयसीयू नाही, काही फापटपसारा नाही. वैशाख शुद्ध षष्ठी, १ मे २०१७ सकाळी ९.११ चा सुमार. काही क्षणांत स्वर्गारोहण. अतर्क्य एक्झिट!
त्यांचा, आमच्या सिंधूताईशी विवाह झाला, त्याला ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला. अनेक प्रसंग, अनेक आठवणी, अनेक संवाद मनापुढे भराभर सरकतात. एक स्पष्टवक्ते, ठसठशीत, शिस्तबद्ध व्यक्तित्व. त्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू. राजाराम वाचनालयाचे उद्धारकर्ते, संतवाङ्‌मयाचे अभ्यासक, ज्ञानेश्‍वरीचे विशेष उपासक, वक्ते, कीर्तनकार/प्रवचनकार, श्री जनार्दन स्वामींचे आवडते शिष्य, एक ना दोन- अनेक वैशिष्ट्यपूर्ण भूमिका.
‘परंपरा त्यांचे कुळ शुद्ध’ असे माउलीने हरिपाठात म्हटले आहे. अप्पासाहेबांना अशीच (वारकरी) परंपरा त्यांच्या मातापित्यांकडून मिळाली. ती. दादांनी श्री ज्ञानेश्‍वरांचा हात त्यांच्या हाती दिला तो त्यांनी घट्‌ट धरून ठेवलाच, दुसर्‍या हातात सिंधूताईंचा हात घेऊन भक्तिमार्गाचा ओनामा तिलाही शिकविला. राजाराम वाचनालयात झालेल्या अनेक सभा, संमेलनांतून, व्याख्यानांतून त्यांचा ज्ञानेश्‍वरीवर अभ्यास, आवड, आवाका प्रतिबिंबित होत असे. माउलीची ओवी/ बोली त्यांच्या वाणीत चांगलीच भिनली होती. राजाराम सीतारामकरिता समर्पित तन-मन-धन हे आणखी वेगळेच प्रकरण होईल म्हणून विस्तारभयास्तव येथेच थांबतो.
१९५० मध्ये श्री जनार्दन स्वामी नागपुरात प्रवेश करते झाले. त्यांच्या नागपुरातील आद्य शिष्यांपैकी अप्पासाहेब एक होते. स्वामींनी साद घातली आणि त्यांच्या तथाकथित मठीसमोरच राहणार्‍या जोशी कुटुंबीयांनी त्यांना योगगुरू, मार्गदर्शक आणि प्रसंगोपात वैद्य (धन्वंतरी) अशा विविध प्रकारात स्वीकार करून घराचा एक सदस्य बनवून टाकले. कालपरत्वे हे नाते अधिकच दृढ होत गेले. श्री स्वामी समाधिस्त होईपर्यंत अप्पासाहेब आणि श्री स्वामी यांचा ऋणानुबंध गुरू-शिष्य नात्याच्या पार पुढे मानसपुत्राइतका वाढत गेला. दादासाहेब वर्णेकरांनी श्री स्वामींच्या स्मृतिप्रीत्यर्थ आठवणींचे जे संकलन ग्रंथबद्ध केले त्यात अप्पासाहेबांच्या (योगमूर्ती) लिखाणाला वरचा मान आणि भरपूर विस्तार मिळाल्याचे दिसते. पुढे योगाभ्यासी मंडळात होणार्‍या अभिषेक, पूजा, अर्चना, श्राद्धविधी इत्यादी धार्मिक कार्यांचे यजमानपद वर्षानुवर्षे अप्पासाहेबांकडे अनायासे येण्याचे कारण त्यांचा आणि श्री स्वामींचा प्रदीर्घ आणि घनिष्ठ सहवास.
असे संस्थासमर्पित सामाजिक कार्य चालू असतानाच, संसारचक्र चालू ठेवण्यासाठी तेव्हाच्या व्हीआरसीई अथवा आताच्या व्हीएनआयटीमध्ये रुजू झाले आणि डेप्यु. रजिस्ट्रार या पदावरून निवृत्त झाले. गुणवत्तेत तडजोड नाही आणि कामात/श्रमात कुचराई नाही, अशा ध्येयनिष्ठेने काम करीत गेल्याने स्वत:ची गुणवत्ता आणि संस्थेची कीर्ती, यांचा आलेख वर्षानुवर्षे चढताच राहिला. थोडक्यात, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी जबाबदारी स्वीकारली तेथे तेथे त्यांनी उत्तम, उदात्त, उन्नतपणाची आपली छाप पाडलेली दिसते. सिंधूताईंची (पावलोपावली) पूर्ण साथ, मुलांची (सून/जावई) मदत आणि तिसर्‍या पिढीची प्रगती यामुळे त्यांचा कुटुंबवेल बहरून, मोगरा फुलून गगनावर पोहोचला. याचा प्रत्यय, इतक्यातच झालेल्या चि. मानसीच्या विवाहाच्या वेळी आला. त्यांच्या पावन स्मृतीला पुन:पुन्हा प्रणाम…! जोशी कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही बापट मंडळीही सहभागी आहोत.
राम बापट
९०११२७९१७३