बावळट शेतकरी…

0
135

अग्रलेख
आता काळ बदलला आहे. बदलत्या काळासोबत सगळेच बदलत असते. नव्या पिढीचा मातीशी काहीच संबंध नाही राहिला ना. आता या पिढीला शेतकरी कसा कळणार? त्याचे जगणेच नाही कळले तर त्याचे मरणे त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार? मग नव्या अभ्यासक्रमात शेती कळावी, माती कळवी अन् शेतकर्‍यांचे जगणे, मरणे कळावे म्हणून त्याच्यावर एक ‘लेसन’ असावा, म्हणून एक कमिटी गठित झाली. या कमिटीने मग एक लेसन अभ्यासक्रमात घातला- बावळट शेतकरी. तो धडा नव्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात येण्याआधीच तो आमच्या हाती लागला. तो आमच्या वाचकांसाठी जसाच्या तसा देतो आहोत.
…तर एक गाव होते. त्या गावात एक शेतकरी राहात होता. त्याच्या बापावर कर्ज होते. त्याच्या बापाच्या बापावरही कर्ज होते. आज्याच्या बापावरही कर्जच होते. त्याचा आजा कर्जात मेला. त्याचा बाप कर्जाच्या व्याजात मेला अन् हा तरणा शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनातच बर्बाद झाला होता. नवे कर्ज नाही. जुन्या कर्जाचे हप्ते अन् हप्त्यांचे व्याजच त्यांच्या आंगभर झाले होते. विरोधी पक्षाने मोर्चे काढले. शेतकर्‍यांचे कर्ज माफ करा म्हणाले. हा शेतकरी त्यांच्या मागे गेला. हे लोक सत्तेत आले की आपले कर्ज माफ होईल. मग नवे कर्ज मिळेल आणि आपण दणक्यात शेती करू, असे त्याला वाटले. मग निवडणुका आल्या. विरोधक सत्ताधारी झाले. तरीही शेतकर्‍याकडे कर्ज जसेच्या तसेच होते. मग आताच्या विरोधकांनी मोर्चे काढले. म्हणाले, शेतकर्‍यांचे कर्ज माफ करा. यांचे मोर्चे अन् त्यांचे मोर्चे असे करता करता शेतकर्‍याचे चार हंगाम गेले. हंगाम आला. त्या काळात तुरीच्या डाळीचे भाव अस्मानाला टेकले. म्हणजे दोनशे रुपये किलो झाले! तर या बवाळट शेतकर्‍याची ही कहाणी आहे. तो नैसर्गिक पद्धतीची शेती करत होता. त्याला हवे ते अन्नधान्य पिकवीत होता. आपल्या पोटाला खायचा अन् उरलेले लोकांना द्यायचा. अन्न सकस होते. आंतरपिके घ्यायचा. शेणखत टाकायचा. पाणी राखायचा अन् शेताला घालायचा. पण, दरम्यान देशाची लोकसंख्या वाढली. उद्योग वाढले. त्यामुळे देशाचे सरकार म्हणाले, आता अन्नधान्य खूप हवे. उद्योगपती म्हणाले, आम्हाला कच्चा माल हवा. लोक म्हणाले, कसेही असले तरीही आम्हाला खायला हवे. मग सरकारने शेतकर्‍याला सांगितले, आधुनिक पद्धतीची शेती कर. त्याने मग रसायने, फवारे वापरले. खतेही पाश्‍चात्त्य देशातून येत होती. बियाणेही त्याच्या जवळ होते ते फेकून द्या म्हणाले सरकार. उत्तम पिकणारे, ज्यादा यिल्ड देणारे बियाणे थोडे महाग असेल, पण एकरी उत्पादन जास्त निघेल. त्याला भावही तसाच असेल. एकरी खर्च कमी, उत्पादन जास्त आणि भावही मस्त, असे गणित देण्यात आले. सुरुवातीला हे गणित अचूक सुटते आहे, असे वाटत होते. बावळट शेतकर्‍याने आधुनिक शेती केली. हळूहळू जमिनीचा कस केला, रसायनांच्या भरवशावर पिके सोडून दिली. किडींचेही ऍडव्हान्स व्हर्जन येत गेले. खर्च वाढला, उत्पादन घटले आणि सरकार भावही देईना. परिणाम असा झाला की, त्याच्यावरचे कर्ज वाढत गेले. व्याजही वाढत गेले. बियाणे, खते आणि रसायने याबाबत तो परावलंबी झाला. अमेरिकादी पाश्‍चात्त्य देशात बंदी घालण्यात आलेल्या रसायनांची या बावळट शेतकर्‍याला दणक्यात विक्री करण्यात आली. बियाणेही त्याचे त्याच्याकडे राहिले नाही. बियाणांच्या थैलीचा भाव वाढला, रसायने महाग झाली, मजुरांची मजुरीही वाढली, बिल्डरांनी अन् उद्योगांनी शेतकर्‍याच्या जमिनींचे भाव वाढवून दिले… या सार्‍यात एकच स्वस्त झाले नि ती म्हणजे शेतकर्‍यांची जिंदगी! तो मेला की दारूने मेला, असे स्पष्ट केले जाऊ लागले. त्याचे मरणेही प्रामाणिक आहे की नाही, हे तपासले जाऊ लागले. एका शेतकर्‍याची आत्महत्या एक लाखाची…
आधुनिक शेतीने खर्च वाढला, उत्पादन कमी झाले आणि म्हणून अन्नधान्याच्या किमती वाढताहेत, हे लक्षात आल्यावर सरकारने परदेशातून अन्नधान्य आयात करून देशांतर्गत भाव कमी केले. दरम्यानच्या काळात औद्योगिकीकरणाने लोकांचे म्हणे जीवनमानही उंचावले. परदेशातून आयात अन्नावर सरकारने गरिबांना म्हणे अन्नसुरक्षा दिली. त्यामुळे आधी शेतीत राबणार्‍यांना घरी राहून टीव्ही पाहणे परवडू लागले. कारण गावागावात टीव्ही आला होता. त्यावर आधी रामायण, महाभारत दाखविल्यावर नंतर ‘काहानी घर घर की’ दाखविले जाऊ लागले. क्रिकेटचे सामने प्रक्षेपित केले जाऊ लागले. आयोजक, प्रायोजक, कलावंत अन् प्रोड्युसर यांची सुगी झाली अन् अन्नसुरक्षेने अलाल झालेले टीव्हाडे झाले. शेतात काम करायला मजूर मिळेना. आता लोकांना क्वालिटी फूड हवे होते. सरकारचे काम हेच, लोकांना हवे ते देणे. त्या त्या वेळच्या सरकारने तेच केले. ते आता या बावळट शेतकर्‍याला म्हणाले, तू सेंद्रिय शेती कर. शेतीत नवनवे प्रयोग कर. म्हणजे उन्हातान्हात केसर लाव. कापूस उपड अन् द्राक्ष लाव. ज्वारीची दारू कर… मग बावळट शेतकरी लागला कामाला. त्याने सेंद्रिय शेती सुरू केली. विषमुक्त अन्न. त्याचे मग प्रमाणीकरण करण्यात येऊ लागले. आता बावळट शेतकर्‍याची जमीन आधुनिक शेतीने मेली होती. जनावरे शिवारातून गायब झाली होती. रासायनिक खतांपेक्षा शेणखत महाग झाले होते. अर्थात नैसर्गिक- सेंद्रिय शेती महाग झाली होती. मग सरकार म्हणाले, व्यापारी पिके लावा. तुरीला भाव आहे तर तूर लावा. कांद्याला भाव आहे तर कांदा लावा. तेलबियांना भाव आहे तर तेलबिया लावा. तुरीला भाव आहे, हे पाहून बावळट शेतकर्‍याने तूर लावली. तूरच तूर झाली. तशात या तुरीचे भाव वाढू नयेत म्हणून तूर आयात करण्यात आली. भाव असतानाच हे आयातीचे करार करण्यात आले होते. आज तुमच्याकडे तूर आहे म्हणून, पण नसेल तेव्हा त्यांच्याकडेच हात पसरावे लागतात, म्हणून आता असूनही विदेशातून तूर घ्यावीच लागते. अशाने मग बावळट शेतकर्‍याच्या तुरीचे भाव पडले. व्यापारी तूर पाडून मागू लागले. सरकार घेऊन घेऊन किती तूर घेणार? कितीही तूर घेतली तरी हे — शेतकरी (आता आपण काही शेतकर्‍यांचे जावई नाही अन् ते काही आपल्या बायकोचे भाऊ नाहीत म्हणून जागा रिकामी ठेवली.) समाधानी होत नाहीत, असे नेत्यांचे मत झाले. बावळट शेतकरी असा सतत बावळटपणा करतच राहिला. त्याला सरकार, समाज अन् प्रशासन काय करणार? आमच्या लहानपणी चौथ्या वर्गात ‘चतुर शेतकरी’ असा धडा होता. देव म्हणाला, मी पिकाचा वरचा भाग घेईल. तर शेतकर्‍याने भुईमूग लावला. मग पुढच्या वर्षी देव म्हणाला, मला पिकाचा खालचा हिस्सा हवा तर शेतकर्‍याने ज्वारी लावली. त्या पुढच्या वर्षी देव म्हणाला, तू चत्रेपणा करतोस. मला आता पिकाचा वरचा आणि खालचा भाग हवाय्… तर शेतकर्‍याने मका लावला… देवालाही चकवणारा चतुर शेतकरी कुठे गेला या देशातून कळत नाही! आता मुलांना हा ‘बावळट शेतकरी’ नावाचा धडाच शिकवावा लागतोय्…