अस्वलाच्या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू

0
197

– अखेर अस्वलाला केले ‘शूट’
– भयावह हल्ल्याची पहिलीच घटना
नागभीड/चंद्रपूर, १३ मे 
तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या सहा ग्रामस्थांवर अचानक अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शनिवार, १३ मे रोजी सकाळी सिंदेवाही तालुक्यातील आलेवाही रेल्वे स्थानकालगतच्या खरकाडा जंगलात घडली.
अत्यंत क्रूरतेने अस्वलाने काही लोकांना ठार केले, ही माहिती मिळताच संतप्त गावकर्‍यांनी एकच गर्दी केली. वनकर्मचारी व पोलिसांनाही गावकरी जुमानत नव्हते. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असे वाटताच अस्वलाला ठार करण्याचा निर्णय घेतला गेला आणि बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस जवानाच्याच बंदुकीने अस्वलाला ठार करण्यात आले.
एवढा भयावह हल्ला पहिल्यांदाच घडल्याचे ईको-प्रोचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव सचिव बंडू धोतरे यांनी सांगितले.
असुरक्षितता ही अस्वलाच्या या हल्ल्याचे एक कारण असू शकते. तिला पिले होती का, याचा शोध सुरू आहे. तसाही अस्वलाचा हल्ला हा वाघापेक्षा भयानकच असतो. अगदी झाडावर चढून आपला जीव वाचविणार्‍या एकाला ओढून अस्वलाने जखमी केले. कुणाचे डोके फोडले, तर कुणाचे डोळे काढले. शेवटी गावकर्‍यांच्या आक्रोश व संतापानंतर अस्वलाला वनविभागाने ठार मारले. जेथे अस्वल ठार झाले, त्याच झाडावर दोन गावकरी बसले होते. झाडाखाली तास-दोन तास अस्वल तसेच बसले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
मृतकांमध्ये किटाळा गावातील एकाच कुटुंबातील रंजना अंबादास राऊत, फारुख शेख, बिसन कुळमेथे यांचा समावेश आहे. मीना दुधाराम राऊत, कुणाल दुधाराम राऊत तसेच सचिन बिसन कुळमेथे जखमी झाले आहेत.
शनिवारी सकाळी खरकाडा जंगलात प्रथम शिंदी तोडणार्‍या फारुख शेख (रा. खरकाडा) याच्यावर अस्वलाने हल्ला केला. त्याच्या चेहर्‍यावर पंजा मारून डोळे फोडले. त्यानंतर रंजना राऊतला ठार केले. तिला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या मीना राऊत व कुणाल राऊत यांच्याकडे अस्वलाने मोर्चा वळविला. त्यांना घटनास्थळावर जखमी केले. कुणाल व मीनाला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. त्यानंतर किटाळी येथील रहिवासी बिसन कुळमेथे याच्यावर हल्ला केल्याने त्याचाही जंगलात मृत्यू झाला. बचावासाठी झाडावर चढणार्‍या सचिन बिसन कुळमेथे याचा पाय ओढून त्याच्यावरही अस्वलाने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच आलेवाही जंगलात तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के दंगा नियंत्रक पथक व वनविभागाचा ५०० जणांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. तेव्हा आणखी दोन जण झाडावर चढून होते. त्याच झाडाखाली अस्वल होती. त्यांची सुटका करण्यासाठी वनविभागाच्या शूटरला पाचारण करण्यात आले. शूटरने ४ गोळ्या घालून अस्वलाला ठार मारले.
शूटरने अस्वलाला ठार केलेल्यानंतरही संतप्त गावकर्‍यांनी मृतदेहाला काठ्यांनी झोडले. हल्ला करणारी अस्वल पिसाळलेली होती. त्यामुळे एकाच दिवशी पाच जणांचा बळी घेतल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. (तभा वृत्तसेवा)