तनू, टिनाचा सिनेप्रवेश

0
112

आपला सिनेमा
एक टिना दुसरी तनू. दोन पिढ्यातील या नायिका. एकीला अनपेक्षित सिनेमात प्रवेश मिळाला, तर दुसरीचा जन्मच सिनेमात आणि सिनेमासाठी झाला होता. तनुजाचा देवआनंद आवडता नायक; परंतु तिला त्याची नायिका होण्याचं भाग्य लाभलं नाही. मात्र तिने त्याच्या ‘ज्वेलथीप’ व ‘अमीर गरीब’मध्ये छोट्या भूमिका केल्या, तर टिना मुनीमला मात्र देवची नायिका होण्याची संधी कशी सहज मिळाली पहा! याला म्हणतात ‘देव’ करतो ते भल्यासाठी करतो.
प्रांतीय चित्रपटात काम करणारे त्या त्या राज्यात मातृभाषेमुळे स्थानिकांना नेहमीच आपलेसे वाटत असतात. हिंदी चित्रपट देशभर पाहिला जात असल्यामुळे ते सर्वत्र प्रसिद्ध होतात आणि त्यातील नायक-नायिका व सहकलाकारांना देशभर ओळखलं जातं म्हणून भाषा वा राज्य कोणतंही असो प्रत्येकाला मनातून वाटत असतं की, आपण हिंदी सिनेमात दिसावं. हिंदी सिनेमात नायक-नायिका होण्यासाठी कोणती गुणवत्ता असावी लागते? निव्वळ सौंदर्य या एकाच निकषावर हिंदी सिनेमात काम मिळत नाही, तसंच अभिनयाच्या बळावरही टिकाव धरता येईल याचीही शाश्‍वती देता येत नाही. तरीही स्वत:मधील कलाकार ओळखून हजारो मुलं, मुली नाट्य, चित्रपट अभिनय संस्थांमधून शिकून, काही व्यावसायिक रंगभूमीवर काम करता करता आपली चमक दाखवून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करतात. अशा कलावंतांना खरंच मानायला हवं. या कलाकारांमधील झपाटलेपण आणि आपलं सर्वस्व पणाला लावण्याची त्यागी वृत्ती त्यांना भविष्यात मानसन्मान देऊन जाते. तर काही व्यक्तींना त्यांच्या ध्यानीमनी नसतानाही अनपेक्षितपणे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळतो.
देवआनंद सौंदर्याची पुजारी. ‘प्रेम पुजारी’ही म्हणा. नवनव्या सुंदर चेहर्‍याच्या मुली त्याच्या अवतीभवती कायम घुटमळत असायच्या आणि त्याच्या कन्येच्या वयाला शोभाव्यात अशा तरुणी त्याच्या नायिका व्हायच्या व त्यांचा पडद्यावर रोमान्सही खुलून दिसायचा. अशा प्रत्येक नायिकेच्या चित्रपट प्रवेशाचे काही ना काही किस्से आहेत. अशाच त्याच्या एका नायिकेचा हा किस्सा.
देवच्या एका गाण्याचं शूटिंग सुरू होतं. शूटिंग पाहण्यासाठी स्टुडिओत काही प्रेक्षकही होते. गाण्याचा शॉट संपला. कट् झाला… ओके होताच एक गोड मुलगी उत्स्फूर्तपणे धावत सेटवर गेली व ओरडली लवली लवली…
आपली छोटी डायरी तिने देवआनंदसमोर धरली व म्हणाली, ‘साईन प्लीज!’ देव तिच्याकडे क्षणभर पाहतच राहिला व म्हणाला, ‘सिनेमात काम करणार का?’ ती म्हणाली, आधी सही द्या. देव म्हणाला ही, देतो पण एक सांग, ‘सिनेमात काम करशील का? स्क्रीन टेस्ट देशील का?’ ती म्हणाली, हो. देवने तिची आणि तिच्यासोबत आणखी दोन मुलींची स्क्रीन टेस्ट घेतली व निवड केली या सेटवर धावून आलेल्या मुलीची. १८-१९ वर्षांची ही मुलगी १९७५ सालची ‘टिनेजर रनर अप’ होती. सौंदर्य स्पर्धेत तिने भाग घेतला होता. ‘मिस फोटोजनिक, ‘मिस बिकीनी’ अशा काही सौंदर्य स्पर्धा तिने जिंकल्या होत्या. याचा अर्थ देवआनंदची नजर स्वर्गीय सौंदर्य शोधक होती नाही? राज कपूरनंतर देव एक असा निर्माता व नायक होता की, ज्याला व्यावसायिक सौंदर्याची जाण होती. म्हणून देवआनंदच्या बर्‍याच नायिका चित्रपटसृष्टीत टिकून राहिल्या. याला म्हणतात ‘देवाचा परिसस्पर्श.’
१९७८ साली या मुलीला त्याने सर्वप्रथम संधी दिली. चित्रपट होता ‘देस परदेस. त्यानंतर बातो बातो मेें, कर्ज असे चित्रपट आले. १९७९ सालच्या कर्जमध्ये तिचा नायक होता ‘ऋषी कपूर.’ कर्जने बॉक्स ऑफिसवर हंगामा केला आणि देवआनंदच्या सेटवर उत्स्फूर्तपणे धावून जाणारी ती वीस वर्षीय गोड चेहर्‍याची ‘टिना मुनीम’ तरुणाईची लाडकी ‘ऍक्ट्रेस’ झाली. देवआनंदने त्यानंतर तिला ‘मनपसंद’, ‘लूटमार’मध्ये पुन्हा संधी दिली. हां हां म्हणता त्या वेळच्या टॉप स्टार गणल्या जाणार्‍या बर्‍याच नायकांची ती नायिका झाली. त्यात होता ‘काका’ अर्थात राजेश खन्ना. राजेश खन्ना व तिचा चित्रपट प्रदर्शिन झाला ‘फिफ्टी फिफ्टी’. टिना तेव्हा होती २४ वर्षांची आणि राजेश खन्ना ३९ वर्षांचा. याच चित्रपटापासून दोघांचे प्रेमप्रकरण चर्चिले जाऊ लागले. त्यानंतर राजेश खन्ना व टिनाचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. ‘सुहाग’, ‘सौतन’, ‘आखिर क्यों’, ‘बेवफाई’, ‘इन्साफ मै करूंगा,’ ‘अलग अलग’, ‘अधिकार.’ राजेश खन्नाबरोबर पडद्यावर आणि पडद्यामागे तिचा रोमान्स सुरू असतानाच काकाच्या व्यक्तिगत जीवनात वादळ सुरू झालं होतं. या वादळातून तिची सुटका व्हावी म्हणून की काय ‘संजय दत्त’ रॉकी बनून तिच्या जीवनात आला. आपल्यापेक्षा वयाने १५ वर्षे मोठा असणार्‍या राजेश ऊर्फ काकापेक्षा तिला कोवळा समवयीन संजूबाबा जवळचा वाटला असावा. १९८१ सालीच सुनील दत्तने संजूबाबाबरोबर त्याच्या पहिल्याच रॉकी चित्रपटासाठी टिनाची निवड केली. रॉकी त्या सालातील उत्तम व्यावसायिक चित्रपट गणला गेला. राजेश खन्ना व संजय दत्त तिचे फिल्मी करिअरमधील हिरो, तर १९९२ साली तिच्या जीवनात अनिल अंबानी यांचा प्रवेश झाला. १९९१ साली तिने चित्रपटसृष्टीला रामराम केला व अनिल अंबानी यांच्याशी विवाह करून तिने ‘उद्योगजगतात’ आपलं स्थान पक्क केलं.
ध्यानीमनी नसतानाही चित्रपटसृष्टीत अभिनेत्री बनलेल्या टिनाला नशिबाने कसे कसे घडवले ते पहा. तर दुसरीकडे चित्रपटातच आपलं नाव व करिअर सिद्ध करायचं असं ठामपणे ठरविणार्‍या एका अभिनेत्रीला चित्रपटात प्रवेश करताच कोणत्या अडथळ्याचा सामना करावा लागला व त्यातून तिने कशाप्रकारे मात करून आपलं व आपल्या खानदानाचं नाव उज्ज्वल केलं तो किस्साही ऐकणं मजेदार आहे.
१९६१ साली शोभना समर्थ नावाच्या अभिनेत्रीने आपल्या दोन क्रमांकाच्या कन्येसाठी एक नायिकाप्रधान चित्रपट निर्माण करायचं ठरवलं होतं. शोभना समर्थ त्या काळातील एक बडं प्रस्थ. आपली मोठी कन्या ‘नूतन’ तर चित्रपटसृष्टीत पदार्पणातच नावारूपाला आली होती. दुसरी तनुजा बाल कलाकार म्हणून ओळखली जात होती. तिच्यासाठी शोभनाबाईंनी एका सिनेमाची घोषणा केली. त्या सिनेमाचं नाव होतं ‘हमारी याद आयेगी.’ केदार शर्मा एक नामांकित लेखक-दिग्दर्शक त्याचे को- प्रोड्युसर होते. तनुजाने पूर्वी नूतनसाठी निर्माण केलेल्या ‘हमारी बेटी’मध्ये एक भूमिका केली होती तेव्हा ती होती फक्त ७ वर्षांची आणि मोठी नूतन होती १४ वर्षांची. १९६१ सालच्या ‘हमारी याद आयेगी’ची नायिका तनुजा तेव्हा होती १८ वर्षांची. सिनेमा होता घरची निर्मिती आणि केदार शर्माचे व तनुजाचे संबंंध अगदी घरेलू होते. सिनेमाच्या एका शॉटमध्ये तनुजाला रडण्याचा अभिनय करायचा होता. तनुजाचं वागणं होतं बेधडक, बिनधास्त. शूटिंग सुरू झालं आणि ‘ऍक्शन’ म्हटलं की रडण्याऐेवजी तनुजाला हसू येत असे. दोन- तीन वेळा दिग्दर्शक केदार शर्मांनी ते सहन केलं. तिला समजावलं, ताकीदही देऊन पाहिली; परंतु तिचं हसणं काही थांबत नव्हतं. सेटवरचं वातावरण चांगलंच तापलं होतं. शेवटचा एक प्रयत्न म्हणून शूटिंग सुरू केलं तेव्हाही तोच प्रकार घडला. तेव्हा न राहावून केदारजींनी तनुजाच्या एक सणसणीत अशी थोबाडीत ठेवून दिली की, एका क्षणात तनुजाचं हसणं बंद झालं व ती चिडून सेटवरून तडक घरी निघून गेली. पहिल्याच सिनेमाचा हा प्रसंग सर्वांना चक्रावून टाकणारा होता.
तनुजा रडत रडत घरी गेली व त्याच रागाने तिने सेटवरचा प्रकार आई शोभनाबाईंना सांगितला. ते ऐकून शोभनाबाई भयंकर चिडल्या. त्यांनी तनुजाला तसंच फरफटत आपल्या गाडीत बसवलं आणि सेटवर नेलं व तिला शर्माजींच्या ताब्यात देऊन म्हटलं, अजून वाटल्यास हिच्या दोन मुस्कटात द्या, पण हिचा जराही बेशिस्तपणा खपवून घेऊ नका. काम म्हणजे काम. या धक्क्याने तनुजा भानावर आली आणि तिने अत्यंत गंभीरपणे चित्रीकरणात भाग घेतला. समर्थ घराणं पूर्णपणे सिनेमाशी एकरूप झालेलं. अभिनय कला त्यांच्या नसानसात भिनलेली त्यामुळे रंगदेवतेचा अपमान होणं शोभनाबाईंनी नक्कीच सहन केलं नसतं. याच अनुभवाचा फायदा पुढे तनुजाला झाला.
सिनेमातील प्रवेशाचे हे दोन वेगवेगळे किस्से. एक टिना दुसरी तनू. दोन पिढ्यातील या नायिका. एकीला अनपेक्षित सिनेमात प्रवेश मिळाला, तर दुसरीचा जन्मच सिनेमात आणि सिनेमासाठी झाला होता. तनुजाचा देवआनंद आवडता नायक; परंतु तिला त्याची नायिका होण्याचं भाग्य लाभलं नाही. मात्र तिने त्याच्या ‘ज्वेलथीप’ व ‘अमीर गरीब’मध्ये छोट्या भूमिका केल्या, तर टिना मुनीमला मात्र देवची नायिका होण्याची संधी कशी सहज मिळाली पहा! याला म्हणतात ‘देव’ करतो ते भल्यासाठी करतो.
– रत्नाकर लि. पिळणकर/९६१९२८७८४८