साप्ताहिक राशिभविष्य

0
480

रविवार, १४ ते २० मे २०१७
सप्ताह विशेष
•सोमवार, १५ मे- अगस्ति तार्‍याचा लोप (अस्त); मंगळवार, १६ मे- संत चोखामेळा पुण्यतिथी;
बुधवार, १७ मे- भद्रा (१६.२८ ते २९.०४); गुरुवार, १८ मे- कालाष्टमी, तुंबरु जयंती, धनिष्ठा नवकारंभ (९.२३); शनिवार, २० मे- भद्रा (प्रारंभ २९.१३), मिथुनायन (२५.५३), झिपरु अण्णा पुण्यतिथी- नासिराबाद (जळगाव),श्री विठ्ठलानंद सरस्वती पुण्यतिथी- अमरावती.
मुहूर्त ः साखरपुडा- १४,१६,१७,१८ मे; बारसे- १६,१८,१९ मे ; जावळे- १७,१८,१९ मे; गृहप्रवेश- १६,१७,१८,१९ मे.
मेष- स्वभावात ताठरपणा टाळा
आजच राश्यंतर करून राशीस्वामी मंगळाच्या सहवातात येणार्‍या रविमुळे आपल्या स्वभावात काहीशी उग्रता, ताठरपणा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा योग वाणीचे स्थान मानल्या जाणार्‍या द्वितीय स्थानात होत आहे. त्यामुळे तीव्र व तिखट शब्दांचा वापर टाळायचा प्रयत्न करावयास हवा. कोणाचेही मन दुखावले जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी. व्यवसायात, भागीदारीत कोणाशीही वितुष्ट येऊ देऊ नये. स्वभावात विनम्रता आणली तर कामें सहजगत्या होऊ शकतील. खर्चवाढ होण्याची शक्यताही राहील. खिशावर नियंत्रण ठेवावयास हवे. काही मंडळी प्रवासाच्या योजना आखीत असावेत. त्यांचा प्रवास सुखकर होईल. पर्यटनाची स्थळे, तीर्थयात्रेची ठिकाणांना जाणार असाल तर अवश्य निघा. युवावर्गाला नोकरी व व्यवसायासाठी एखादी चांगली संधी अवश्य येऊ शकेल. शुभ दिनांक- १४,१५,१७.
वृषभ- युवावर्गास भाग्यकारक योग
आपला राशीस्वामी शुक्र लाभस्थानात असतानात राशीत मंगळासोबत आजपासून रवि देखील आलेला आहे. तो आपल्या डोक्यात विचारांचे काहूर माजवेल. आपणास उष्णतेच्या विविध त्रासांचा धोका देखील निर्माण होण्याची भीती आहे. स्वभावात संताप, चिडचिडेपणा निर्माण होईल. जो मुलात आपला स्वभाव नाही. त्यामुळे डोके शांत ठेवून कामे करण्याचा, बाहेरच्या जगात वावरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. युवावर्गास नोकरी-व्यवसायाच्यादृष्टीने भाग्यकारक योग लाभू शकतात. नोकरीतील नव्या संधी, जबाबदारी वाढण्याबरोबरच काहींना स्थानांतरण करावे लागू शकते. बदलीमुळे घरापासून दूर जाण्याचेही योग येऊ शकतात. व्यवसाय-विस्ताराच्या काही योजना देखील आकारास येऊ शकतात. विवाहेच्छू युवा-वर्गास विवाह जमणे किंवा विवाह होण्याच्यादृष्टीने वेगवान हालचाली घडू शकतील. शुभ दिनांक- १६,१७,१८.
मिथुन- प्रकृतीची काळजी घ्या
आपला राशीस्वामी बुध लाभात आहे. तर आजच राश्यंतर करून व्ययात आलेला रवि मंगळाच्या जोडीने काही उपद्व्याप करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेषतः आर्थिक व्यवहार करताना सावध असले पाहिजे, तसेच प्रकृतीची काळजी घेण्याचीही जरूरी आहे. याशिवाय नोकरी व्यवसायातील विरोधकांच्या कारवायावर लक्ष ठेवण्यासही तो सुचवीत आहे. काहींना एखाद्या छोट्यामोठ्या अपघातास, शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागण्याचे देखील भय निर्माण होत आहे. त्यामुळे पडणे, लागणे, कापणे, मोडणे अशा गोष्टी घडणार नाही यासाठी सतर्कता आवश्यक आहे. घरातील मुला-मुलींच्या शिक्षणातील प्रगतीच्या बातम्या आनंद देतील. व्यवसायात प्रगती होईल. काही नवे उपक्रम काहींना सुरू करता येतील कार्यक्षेत्रावर आपल्या कामाचा ठसा उमटेल. शुभ दिनांक- १४,१५,१६.
कर्क- अनपेक्षित लाभ संभव
आपला राशीस्वामी चंद्र या आठवड्याच्या प्रारंभी षष्ठ स्थानात शनिसोबत आहे. तर, आजच राश्यंतर करीत रवि लाभात मंगळासोबत आलेला आहे. रविचे हे भ्रमण आपणास सुखदायी असणार आहे. नोकरी तसेच व्यवसायाच्या ठिकाणी काही अनपेक्षितपणे फायदेकारक घटना घडू शकतात. तर काहींना नोकरीत बदल करण्याचा निर्णय देखील घ्यावा लागू शकतो. तो निर्णय व्यावहारिकदृष्ट्या फायद्याचा ठरू शकेल. विरोधकांच्या कारवायांवर आपला वचक बसेल. व्यवसायात मात्र एखादेवेळी भागीदाराशी मतभेद निर्माण होऊन त्याचा विपरीत परिणाम दिसू शकतो. त्यामुळे शांत राहून, काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असल्याचे वाटत असले तरी त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळावयास हवे. संततीसाठी हा आठवडा उत्तम राहावा. मुलाबाळांना त्यांच्या कामात अपेक्षित यश मिळू शकेल. त्यांच्या पाठीशी उभे राहा. शुभ दिनांक- १६,१७,१८.
सिंह- गुंतवणुकीस उत्तम वेळ
आपला राशीस्वामी रवि आजच दशमामध्ये मंगळाच्या सोबतीला येत असून राशीस्थानी राहू विराजमान आहे. स्थानबली होणारा रवि आणि मंगळ आपला अर्थत्रिकोण बलवान करीत असून हा योग आर्थिक गुंतवणूक, नवा व्यवसाय, नोकरीत बदल वगैरे बाबतीत लाभकारी ठरू शकतो. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची योजना असेल तर आठवड्याच्या सुरुवातीस निर्णय घेता येऊ शकेल. व्यवसाय विस्ताराच्या काही संधी लाभू शकतील. त्यांचा वेळीच लाभ घ्या. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने काही चांगल्या घडामोडी संभवतात. आर्थिक लाभ होईल. आवक वाढेल. जुनी येणी मिळू शकतील. आपल्या कामाचे कौतुक होईल, वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. त्याचा फायदा पुढे मिळेल. दरम्यान, राशीतील राहू काही प्रमाणात मृगजळ निर्माण शकतो, मात्र व्यावहारिक दृष्टिीकोणातून निर्णय घेऊन प्रगती साधता येईल. शुभ दिनांक- १५,१९,२०.
कन्या- कुटुंबात आनंद, समाधान
आपला राशीस्वामी बुध अष्टमात आहे. तो प्रकृतीची काहीशी कुरबूर निर्माण करू शकतो. मात्र आतापर्यंत त्याच्यासोबत असलेला रवि मंगळाच्या सोबतीला भाग्यात गेला आहे. कन्या राशीच्या मंडळींना सध्या गुरु-शुक्राच्या शुभयोगामुळे विवाह, वैवाहिक सुख, संतती यादृष्टीने सध्या उत्तम योग असतानाच त्यात रवि-मंगळामुळे भाग्योदयाची संधी निर्माण झलेली आहे. या राशीच्या विवाहेच्छू मुला-मुलींना मनासा?रखा जोडीदार लाभून गृहस्थ जीवनाचा शुभारंभ करता येईल. त्याचप्रमाणे संततीची अभिलाषा बाळगणार्‍या नवपरिणितांना इच्छापूर्तीचे योग लाभतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. कुटुंबात उत्साह, आनंदाचे व समाधानाचे वातावरण राहील. आपला जनसंपर्क वाढेल. नवीन ओळखी, नव्या क्षेत्रात पदार्पण घडून येण्याची शक्यता आहे. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. काहींना प्रवास संभवतो. शुभ दिनांक- १७,१८,१९.
तूळ- आरोग्य सांभाळावयास हवे
आपला राशीस्वामी शुक्र सध्या सहाव्या स्थानात गुरुच्या शुभदृष्टीने आनंदित आहे. मात्र आजच अष्टमात येत असलेला रवि व तेथे आधीच असलेला मंगळ आपणांस प्रकृतीच्या काही तक्रारी निर्माण करून राशीस्वामीच्या आनंदीपणावर विरजण घालण्याचे भय आहे. विशेषतः उष्णतेमुळे निर्माण होणार्‍या त्रासांबाबत काळजी घेतली पाहिजे. पाठीचे दुखणे, पोटाचे त्रास यावर एखाद्यास शस्त्रक्रिया वगैरे देखील करावी लागू शकेल. वीजेची व आगीची उपकरणे सांभाळून वापरावीत. छोटे-मोठे अपघात, पडणे, कापणे वगैरे बाबत सावध असावे. या व्यतिरिक्त, गुरु-शुक्राच्या शुभयोगामुळे युवा वर्गाला नोकरी व व्यवसायात उत्तम संधी उपलब्ध होतील. नोकरीतील बदलाच्या प्रयत्नात असलेल्यांना यश मिळू शकेल. तरुण वर्गाला विवाह व संततीचे उत्तम योग लाभावेत. घरात मंगलमय वातावरण राहील. शुभ दिनांक- १५,१९,२०.
वृश्‍चिक- कामें यशस्वी होणार
आपला राशीस्वामी मंगळ सप्तमात असून आज त्याच्या सोबतीला रवि येत आहे. त्यांची थेट दृष्टी आपल्या राशीस्थानी येत असल्याने काही उत्तम योग आपल्या वाट्याला येणार आहेत. मात्र सोबतच आपल्या स्वभावात उग्रता निर्माण होण्याचे भय देखील राहील. रवि-मंगळावरील गुरुच्या दृष्टीमुळे आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती व मोठा आर्थिक लाभ होऊ शकणार आहे. नोकरी-व्यवसायात उत्तम संधी लाभतील. काही मोठी कामें यशस्वीपणे पूर्ण झाल्यामुळे आनंद व उत्साह अनुभवाल. नोकरीत बदल करू इच्छिणार्‍यांना काही चांगल्या संधी लाभतील. काहींना त्यांच्या मुलांच्या अनुषंगाने उत्तम योग लाभू शकतात. मात्र या सार्‍याचा आनंद अनुभवताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागेल. संताप, चिडचिड, अति राग यामुळे सार्‍या आनंदावर विरजण पडू शकते. प्रकृतीदेखील सांभाळावयास हवी.
शुभ दिनांक- १७,१८,२०.
धनु- शुभवार्ता कानी पडतील
आपला राशीस्वामी गुरु दशमस्थानात असून आपल्या राशीत शनि आहे. आजच षष्ठस्थानात येणारा रवि तेथे आधीपासून मुक्कामास असलेल्या मंगळाचे बळ वाढवीत आहे. या एकंदर ग्रहमानामुळे काहीसे संमिश्र योग आपणास या आठवड्यात अनुभवास येऊ शकतात. षष्ठातल्या रवि-मंगळावर गुरुची दृष्टी असल्याने ते नोकरी व व्यवसायास उपकारक ठरणार आहे. विरोधकांवर आपला वचक राहील, तर सहकारीवर्ग आपल्या पाठीशी राहून यशात योगदान देणार हे निश्‍चित आहे. पंचमेश गुरुच्या दृष्टीत असल्याने मुलांकडून शुभवार्ता कानी पडतील. मुलांचा उत्कर्ष, शिक्षण, नोकरीतील त्यांची प्रगती, मुलांचे विवाहादी योग कुटुंबात आनंद निर्माण करू शकतात. दरम्यान आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. चिंता व तणाव वाढेल. उष्णतेचे त्रास संभवतात. वाहने सांभाळून चालवा. शुभ दिनांक- १५,१६,१८.
मकर- सुयोग्य नियोजन फायद्याचे
आपला राशीस्वामी शनि व्ययस्थानी असून भाग्यात गुरु आहे. पंचमात असलेल्या मंगळाला सोबत करण्यासाठी आजच रवि तेथे आहे. या शुभ ग्रहमानाचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी कामाचे व वेळेचे सुयोग्य नियोजन करणे फायद्याचे ठरेल. सकारात्मक भूमिकेतून व वक्तशीरपणे केलेल्या कामांमुळे अचानक उद्भवणार्‍या अडचणींचा प्रभाव फारसा जाणवत नाही, हे सूत्र लक्षात ठेवावयास हवे. गुरुची शुभ दृष्टी आपल्या प्रयत्नांना बळ देईल व सतत आपली बाजू उंच ठेवण्याचा प्रयत्न करेल. आर्थिक व्यवहारांमध्ये सतर्कता बाळगावयास हवी. डोके शांत ठेवून सार्‍या योजना मार्गी लावाव्या. दरम्यान अष्टमात असलेल्या राहूमुळे काहींना प्रकृतीच्या तक्रारी सतावतील. फारसे मोठे दुखणे नसले तरी किरकोळ तक्रारी व लवकर निदान न होण्यामुळे त्या बेजार करू शकतात. त्यांची वेळीच दखल घ्यावी. शुभ दिनांक- १७,१८,१९.
कुंभ- घरातील वातावरण सांभाळा
आपला राशीस्वामी शनि लाभस्थानात असून चतुर्थात असलेल्या मंगळाच्या सोबतीस आजच रवि येऊन पोहचत आहे. अशातच लाभेश गुरु अष्टमात आहे. ही स्थिती मानसिक व शारीरिक आरोग्यास तसेच घरातील सौहार्द्रपूर्ण वातावरणाच्या दृष्टीने फारशी चांगली नाही. धनस्थानातील उच्च शुक्रामुळे आपले आर्थिक अंदाजपत्रक शाबूत राहणार असले तरी खर्चांना विविध वाटा मिळालेल्या राहू शकतात. त्यामुळे सध्या तरी नव्या योजना, व्यवसाय विस्ताराच्या प्रयत्नांना फारसे यश मिळावयाचे नाही. त्यामुळे त्या जरा लांबणीवर टाकणेच योग्य राहील. नोकरीत असणार्‍यांना देखील आपल्या महत्त्वाकांक्षांना सध्या थोडी मुरड घालावी लागेल. दरम्यान नव्या ओळखी, मित्रांचे सहकार्य यादृष्टीने वातावरण उपयुक्त राहील. कुटुंब स्थानात असणारा शुक्र काही तरुण-तरुणींना विवाह योग देऊ शकतो. शुभ दिनांक- १५,१९,२०.
मीन- तरुण वर्गाला उत्तमसंधी
राशीस्वामी गुरु सप्तमस्थानात असून राशीत उच्च शुक्र आहे. आतापर्यंत धनात असलेला रवि तृतीयस्थानात मंगळाच्या सोबतीला आज जाणार आहे. रवि-मंगळाची येणारी दृष्टी पाहता ती आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी काही अशांतता, नाराजी निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते. आधीच तेथे असलेला राहू काही छुप्या शत्रूंना बळ देऊन आपला त्रास वाढवू शकतो. हा योग प्रकृतीला देखील पोषक नाही. विशेषतः उष्णतेचे त्रास निर्माण होऊन आपल्या कार्यकलापांवर परिणाम करू शकतात. प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. दरम्यान, शुक्र आणि गुरु यांच्यातील शुभयोग पाहता या राशीच्या तरुण वर्गासाठी विवाहाच्या उत्तम संधी निर्माण होऊ शकतात. अनेक विवाहेच्छूंना यामुळे जीवनाचा उत्तम साथीदार लाभू शकेल. काही लोकांना सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदविता येईल. शुभ दिनांक- १६,१७,१८.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६