सौजन्याची ऐशीतैशी

0
71

रंगभूमीवरून…
राग-केदार, गायक-भरत जाधव
आणि सबनीसांचा खयाल लुप्त
गतस्मृतींचा आढावा….
‘सौजन्याची ऐशीतैशी’ या नाटकाची ‘व्हिडीओ सीडी/डीव्हीडी’ बाजारात व बहुतेकांच्या घरात स्थानापन्न आहे. म्हणूनच ‘राजा गोसावी’ या एका महान कलाकाराची ही एक हृद्य आठवण व अफलातून कलाकृती आजही घराघरांमधून सहकुटुंबसहपरिवार मनमुराद हशा आणि आनंद मिळवून देत आहे. ‘सौजन्य’ या संकल्पनेची जणू मनसोक्त खिल्ली उडवण्याची परवानगीच ‘नाना बेरके व कुटुंबीय’ यांना दिल्याने एकुणात मेंदू नसल्यागत वावरणारी या फॅमिलीशी निगडित प्रसंगांवर बेतलेली ही संहिता अजरामर ठरली आहे. सबनिसांनी निखळ, निर्मळ विनोद निर्मिती करणारी ही संहिता नाटकाच्या फॉरमॅटमध्ये बांधताना ‘अवाजवी, अनावश्यक व अश्‍लील’ शब्दरचना पूर्णपणे टाळून साध्या साध्या घरगुती प्रसंगांच्या माध्यमातून ‘एक उत्तम फार्सिकल नाटक’ जन्माला घातलं आहे. विनायक चासकरांच्या दिग्दर्शनाखाली राजा गोसावी, अविनाश खर्शीकर, जयंत सावरकर, प्रकाश व जयमाला इनामदार, लता थत्ते, मंदा देसाई यांनी अक्षरश: धमाल उडवून दिली आहे.

कथासंहिता
खरंतर प्रत्यक्ष वा ‘व्हीडीओ सीडी/डीव्हीडी’च्या माध्यमातून या नाटकाची पारायणे झाल्याने कथानक सांगायची तशी गरज नाही; परंतु ‘चंद्रलेखा’ या संस्थेने या नाटकाला पुनश्‍च रंगभूमीवर आणताना, याची ‘रंगावृत्ती’ नव्याने सादर करताना आजच्या युगातील अनेक बाबींची सरमिसळ केली आहे. म्हणून थोडक्यात :
आपलं गिरणगावाच्या चाळीतील घर विकून ही ‘भांडखोर व बेरकी फॅमिली’ मुंबईच्या उपनगरात रहायला गेलेली असते. ‘त्यांच्या नशिबाने’ त्यांना लॉटरी लागते आणि ‘चाळकर्‍यांच्या दुर्दैवाने’ आता पुन्हा ही ब्याद ‘चाळ-रीडेव्हलपमेंट-फ्लॅट’ आपल्या मूळ जागी म्हणजेच नव्या इमारतीत रहायला येते. ‘देसाई-मांडलेकर’ ही दुक्कल ‘बेरक्यांच्या’ जागेवर डोळा ठेवून असल्याने त्यांना हुसकावून लावण्याच्या योजना आखतच असतात; परंतु घरावरील संकटांच्या वेळची ‘एकी, रक्तातच भिनलेला बेरकीपणा, भांडकुदळपणा व आक्रमकता’ या चार स्तंभावर बलशाली असलेल्या ‘बेरकी खानदानाचे काहीही वाकडे’ करू शकत नाहीत. ‘पक्या आणि मंदी’ या बेरक्याच्या दिवट्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यांच्या घरातील कर्णकर्कश म्युझिक व उपद्व्यापांनी शेजारी ‘बेजार, बेहाल व हैराण’ झाले आहेत. या कुटुंबाला हुसकावून लावण्यासाठी अनेक नानाविध उपाय व क्लृप्त्या शोधूनही ‘बेरके’ पुरून उरतात. सरतेशेवटी ‘डिव्हाईड ऍण्ड रूल’ ही जगप्रसिद्ध आयडिया वापरली जाते व ‘बेरके कुटुंबात फूट’ पाडली जाते व नानांना एका संकटात अडकवले जाते. आता या संकटांचा सामना करण्यासाठी ‘बेरके’ काही काळ ‘शेजार्‍यांशी सौजन्यपूर्ण वागणुकीचा’ मार्ग अवलंबतात. मग या तत्त्वप्रणालीमुळे जे काही ‘रामायण-महाभारत’ घडतं, तेच हे नाटक होय.
नव्याने सादर होताना…
१९७४ साली सादर झालेल्या लेखक वसंत सबनीस यांच्या या सदाबहार नाटकाला ४०/४५ वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर ‘चंद्रलेखा’ या संस्थेतर्फे पुनश्‍च रंगभूमीवर सादर करताना सबनिसांच्या संहितेतील केवळ ‘कथाबीज व आराखडा’ घेऊन ‘ओंकार मंगेश दत्त व केदार शिंदे’ या जोडगळीने एका नवीन नाटकाचेच लेखन केले आहे, असेच म्हणता येईल. कदाचित लेखक वसंत सबनीस यांचं व नाटकाचं नाव, जुन्या टीमचं गुडविल, सेलेबिलिटी व नक्कल केल्याचा आरोप या बाबींचा विचार करता दुसरं नवीन नाव ठेवलं नसावं. किमान ‘सबनिसांच्या नाटकाची आधुनिक रंगावृत्ती’ म्हणता येईल इतपतही ‘सिमिलिट्यूड वा गुंजाईश’ या नवीन रूपामध्ये ठेवलेली नाही, हे खेदाने नमूद करावेच लागेल.
एका चाळीतील ‘बेरके कुटुंब’ यांच्या त्रस्त करणार्‍या कारवाया व त्यांना धडा शिकवणारे ‘नंबरी शेजारी’ यांच्यातील ही एक रंगतदार फुटबॉल मॅच आहे. नवीन आवृत्तीत ‘चाळ-रिडेव्हलपमेंट-फ्लॅट’ हा काळाचा बदल झाल्याने त्या इमारतीत ‘लिफ्ट’ येणारच! परंतु ही ‘लिफ्ट’ केदार शिंदे याने एका पात्राच्या रूपात पेश केली आहे. तद्वतच कालानुरूप ‘मोबाईल फोन’ व ‘बारबाला’ ही आधुनिक प्रकरणे यात गोवली आहेत. अर्थात ‘मोबाईल फोन’ एखाद्या वेळेस समर्थनार्थ होऊ शकेल; परंतु ‘बारबाला’ म्हणजे सबनिसांचीच ‘ऐसीतैसी….’
राग – केदार – गायक भरत व घराणे सबनीस …
‘केदार शिंदे+भरत जाधव’ हे ‘ऑल द बेस्ट आणि ऑल टाईम फेव्हरेट कॉम्बिनेशन’ असल्यामुळे मनोरंजनाचा काही प्रश्‍नच उरत नाही, अगदी हमखास! ‘फार्सिकल नाटक’ हा केदारचा हातखंडा असल्याने त्याची खास अशी ‘शैली, वेग, एकापाठोपाठ घडणार्‍या घटना’ यामुळे प्रेक्षक ‘कथानक, पात्र, प्रसंग’ यांच्याशी ‘बांधलेले, गुंतलेले’ राहिल्याने खुर्चीला ‘रिव्हेटेड राहतात, हे कसब अर्थातच ‘कास्टिंग व ड्रामा’ दिग्दर्शक केदार शिंदे यांचंच!
‘राजा गोसावी’ यांच्याशी तुलना होण्याची अजिबात भीती न बाळगता आपल्या नेहमीच्याच शैलीत ‘भरत जाधव’ याने ‘नाना बेरके’ उत्तम केला आहे. भरतची ‘विनोदाची स्टाईल’ सगळ्यांनाच सुपरिचित आहे, पण सेलेबल आहे. ‘कमलाकर सातपुते’ बहुतांशी अशा नाटकात असतोच आणि आपलं काम चोख करतो. त्याला मांडलेकर छान जमला आहे, यात काही वादच नाही. देसाईसाठी कांचन पगारे चालसे! स्मिता गोंदकरची
‘पारू-बारबाला’ ठसकेबाज!
पक्यासाठी आवश्यक ‘ऊर्जा, देहबोली व रंगबदल’ मयूरेश पेम याच्यामध्ये ‘दिसतो, जाणवतो व भावतो.’ बाकी प्रशांत विचारे याने ‘बायकी विभाकर, भ्रष्ट म्युनिसिपल अधिकारी व आगावू पोलीस इन्स्पेक्टर’ ही तिहेरी लढाई जिंकली आहे, तर चैताली गुप्ते (नानी), परी तेलंग (मंदा), विभव राजाध्यक्ष (वसंत) व जयराज नायर (सदाशिव) यांनी आपापल्या भूमिका चोख निभावल्या आहेत. प्रदीप मुळ्ये यांनी यापूर्वी स्टेजवर ‘अख्खी लोकल’ पेश केली होती त्यामुळे या नाटकातील ‘लिफ्ट’ उभारणे ‘वॉज अ इझी जॉब.’ शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना ‘नेपथ्याला व प्रसंगांना’ अनुरूप! सोनिया परचुरे (कोरिओग्राफी), उर्वशी ठाकरे (वेशभूषा), शरद सावंत (रंगभूषा) व साई-पीयूष (पार्श्‍वसंगीत) ही सर्व तंत्रज्ञ मंडळी नाटकाला एक सुयोग्य उठाव देतात.
जाता जाता…
हा प्रयोग रंगतो आणि याचे वरचेवर प्रयोगही होत आहेत, ही खूप चांगली बाब असूनही काही गोष्टी खटकतात…
एक वेगळं नाटक म्हणून या नाटकाला पैकीच्या पैकी मार्क्स परंतु ‘सबनीस+सौजन्याची ऐसीतैसी’ या नावाचा वापर केवळ सेलेबिलिटी वाढवण्यासाठी केल्याचे स्पष्टपणे जाणवते. जुन्या नाटकातील फक्त कथाबीज वापरून ‘स्क्रिप्ट, प्रसंग व संवाद’ यामध्ये ‘अकल्पित, अनावश्यक व अतर्क्य’ बाबी घुसडून केलेली ‘विनोद निर्मिती’ याचं समर्थन होऊच शकत नाही. तद्वतच यातील पात्रांनी विनोद निर्मितीसाठी अंमलात आणलेली ‘देहबोली, लकब व स्टाईल’ बघितल्यानंतर ‘तोचतोचपणा’ नकोसा वाटतो. ‘केदार शिंदे+भरत जाधव’ यांच्या ‘सही रे सही’चा टी.आर.पी. कितीही असला तरीही अजूनही ही दुक्कल त्यातून ‘सही’-सलामत’ बाहेर
पडलेली नसल्याचे ‘प्रकर्षाने व वारंवार’ जाणवते, किंबहुना आता तो त्यांच्यातला ‘दोष’ असल्याचे नमूद करावेच लागेल. त्यामुळे आजच्या काळात ‘सबनीस व राजा गोसावी’ यांचं गुडविल + आजचे सेलेबल कलाकार + सोशल मीडियामधून फिरणारे विनोद + ‘सही रे सही’ची मानसिकता ही भट्टी जमूनच येत नाही.
सारांश
‘गोंधळ, गदारोळ व आरडाओरड’ हे या नाटकातील अविभाज्य अंग होय, हे मान्य परंतु या प्रयोगात अगदी सुरुवातीपासूनच ‘तारस्वरात’ संवादणारे हे ‘अभिनयसक्षम कलाकार’ वाईटपणा ओढवून घेतात. कारण विनोदाच्या अनेक जागा प्रेक्षकांच्या ध्यानात न येताच नाटक पुढे सरकतं. शिवाय हे कलाकार आपापल्या भूमिकांमध्येच गुंतल्यामुळे एकसंधता आढळून येत नाही. परिणामस्वरूप ही पात्रं जरी प्रेक्षकांच्या पसंती मिळवत असतील तरीही नाट्य बाजूलाच राहून जातं. सबनिसांचे नर्मविनोदी संवाद प्रेक्षकांना आजही मुखोद्गत आहेत ते ‘राजा गोसावी’ या कलाकारांमुळे. पण, या नव्या आवृत्तीत विनोदाच्या जागा भरण्यासाठी ‘सोशल मीडिया’मधून व्हायरल झालेले जुनेच विनोद पेरल्याने गंमत तर येतच नाही, परंतु लेखनही कमी पडल्याचे स्पष्ट दिसून येते. मग सबनिसांचं कथानक काय वाईट होतं, असा प्रश्‍न निर्माण होतो. म्हणजे धड ‘ना सबनीस ना केदार’ अशी परिस्थिती! जर या नाटकाला एक नवीन रूपच द्यायचं होतं तर मग ‘थोडं सबनीस, थोडं सोशल मीडिया’ हा प्रकार टाळून नवीनच लेखन करायला पाहिजे होतं. आजच्या काळात हे नाटक सादर होताना जुन्या काळातील प्रसंग हा प्रकार प्रेक्षकांच्या फारसा पचनी पडत नाही. असो, या सर्व गुणदोषांसहीत एक प्रयोग म्हणून प्रेक्षक आनंद घेतात व त्यानिमित्ताने ‘वसंत सबनीस व राजा गोसावी’ यांच्या स्मृतींना उजाळा मिळतो, हेही नसे थोडके!
– एनसी देशपांडे /९४०३४९९६५४